राशीभविष्य कालावधी
२६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२२
अशी आहे ग्रहस्थिती :
राहू -हर्षल मेषेत, मंगळ (वक्री) – वृषभेत, केतू – तुळेत, रवि-शुक्र-बुध वृश्चिकेत, शनि – मकरेत, नेपच्युन- कुंभेत, गुरु -मीन राशीत, चंद्र- मकर, कुंभ आणि मीन राशीत. दिनविशेष – ३ डिसेंबर रोजी मोक्षदा स्मार्त एकादशी.
मेष – मंगळाचे वक्री भ्रमण द्वितीय भावातून, शुक्र-मंगळ परिवर्तन योग. चमचमीत खाण्यापिण्यातून पचनसंस्थेचे विकार निर्माण होऊ शकतात. गुरुचे स्वस्थानातील भ्रमण शुभघटनांचा लाभ मिळवून देईल. धार्मिक कार्यासाठी वेळ द्याल. कौटुंबिक सौख्य लाभेल. नव्या वास्तूचा लाभ होईल. आईचे सहकार्य लाभेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. दशमातील स्वराशीचा शनि व्यवसायात स्थिरता देईल, त्यातून चांगले लाभ होतील. नोकरीच्या ठिकाणी बदलीचे योग आहेत.
वृषभ – अनुकूल काळ आहे. खोळंबलेली कामे मार्गी लागतील. विवाहेच्छुक व सामाजिक कार्यकर्त्यांना चांगला काळ आहे. पतप्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थीवर्गाला शिष्यवृत्ती मिळेल. खेळ आणि कलेच्या माध्यमातून नव्या ओळखी होतील. शनि आणि गुरु यांच्या लाभयोगामुळे अनपेक्षित लाभाचे प्रमाण वाढेल. दाम्पत्य जीवनात सुख मिळवून देणारा काळ आहे.
मिथुन – व्यवसायात रुतलेली चाके हळूहळू पुढे सरकतील. नव्या व्यवसायाच्या कल्पना सुचतील. मार्गी गुरूमुळे आर्थिक स्थिती भक्कम होईल. अडकून राहिलेले पैसे हातात पडतील. गुंतवणुकीतून चांगले लाभ होतील. संततीच्या प्रकृतीची तक्रार निर्माण होऊ शकते. व्यय भावातील वक्री मंगळ आरोग्य नरम गरम ठेवेल. कानाचे दुखणे निर्माण होऊ शकते. नोकरांबरोबर वाद होतील. मामा मावशी यांच्याकडून चांगली बातमी कानावर पडेल. प्रवासात काळजी घ्या, वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे.
कर्क – अनपेक्षित लाभ होण्याची शक्यता आहे. हातात पैसे राहतील, नव्या वस्तूची खरेदी होईल. शेअर, सट्टा, कमिशनमधून कमाई होईल. मार्गी गुरूमुळे चांगल्या घटनांचा अनुभव येईल. प्रकृती सांभाळा. विद्यार्थीवर्गास चांगला लाभ मिळेल. उच्च्शिक्षणाच्या संधी चालून येतील. २८ आणि २९ तारखांना दाम्पत्यजीवनात कटकटी निर्माण होऊ शकतात. खेळाडूंना यशप्राप्ती होईल. दोन ते चार डिसेंबरपर्यंतचा आठवडा धार्मिकदृष्ट्या उत्तम राहील.
सिंह – येणारा काळ उत्साहवर्धक आहे. व्यवसायात चांगली प्रगती होईल. कामे वाढतील. त्यातून आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.कौटुंबिक जीवनात कुरबुरी होतील. संततीकडून चमकदार कामगिरी घडेल. जुन्या गुंतवणुकीच्या माध्यमातून चांगली रक्कम हाती पडेल. थोडे पैसे खर्च होतील. महिलावर्गाने आरोग्याची काळजी घ्यावी. छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.
कन्या – कामे मार्गी लागतील. आमदनी वाढेल. नवीन कामे मिळतील. नव्या नोकरीच्या शोधात असणार्यांना यश मिळेल. भागीदारीत सबुरीने घ्या, उगाच चिडू नका. रवि-बुध-शुक्र-गुरु नवपंचम योगामुळे अडचणीच्या प्रसंगातून मार्ग मिळेल. सल्लागार, समुपदेशक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. चित्रकार, शिल्पकारांसाठी उत्तम काळ आहे.
तूळ – आठवडा लाभदायक आहे. कायदेशीर प्रकरणात निर्णय तुमच्या बाजूने लागेल. गोड बोलून काम मार्गी लावा. मानसिक स्थिती बिघडू देऊ नका. त्याचा कामावर परिणाम होऊ शकतो. त्यातून एखादा चुकीचा निर्णय घेतल्याने नस्ती आफत निर्माण होऊ शकते. आर्थिक बाजू भक्कम राहील. नोकरीत अडलेली महत्वाची कामे मार्गी लागतील. कामानिमित्ताने छोटासा प्रवास होईल. २९ आणि ३० तारखेला वाहन सांभाळा.
वृश्चिक – अभियांत्रिकी, डिझायनर यांच्यासाठी उत्तम काळ आहे. नव्या संकल्पनेतून व्यवसाय आकाराला येईल. नोकरीच्या ठिकाणी हेवेदावे आणि घरात कुरबुरी होतील. डोके थंड ठेवा, शब्दावर नियंत्रण ठेवा. गुरु-बुध-शुक्र-रवी नवपंचम योगामुळे सर्वांगीण विकासाला चांगली साथ मिळेल. संधीचा फायदा करून घ्या.
धनु – आर्थिक अडचणीतून काही काळाने सुटका होईल. हातातले पैसे जपूनच वापरा. षष्ठम भावातील मंगळ आरोग्याच्या बाबतीत अनुकूल नाही. मात्र, व्यवसायात तो चांगले लाभ मिळवून देईल. नोकरीच्या ठिकाणी महत्वाची जबाबदारी येईल. कामासाठी परदेशवारी घडेल. गुरुचे चांगले सहकार्य राहिल्याने व्यवसायात चांगली बरकत येईल. व्यवसायात अचानकपणे अधिकची गुंतवणूक करावी लागेल, त्यामुळे आर्थिक कोंडी होण्याची शक्यता आहे.
मकर – विवाहेच्छुकांसाठी शुभ काळ आहे. घरात वाद वाढू देऊ नका. शांत राहा. महिलांना आरोग्याचे त्रास निर्माण होऊ शकतात. अनपेक्षित लाभाची शक्यता आहे. जुगारातून लाभ होऊ शकतो. बंधू वर्गाकडून चांगली मदत मिळेल. कामासाठी संघर्ष करावा लागू शकतो. सद्सद्ववेकबुद्धीच्या जोरावर काही नवीन मार्ग सापडू शकतो. बोलताना शब्दावर नियंत्रण ठेवा.
कुंभ – उत्पन्नपेक्षा अधिकचा खर्च होण्याचे संकेत आहे. पैसे जपूनच खर्च करा. आर्थिक स्थिती सुधारेल. उद्योग, व्यवसायात बस्तान बसण्यासाठी स्थिती अनुकूल आहे. नोकरीतील कडू अनुभवाच्या स्थितीत सुधारणा होताना दिसेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांबरोबर चांगला संपर्क निर्माण होईल. आर्थिक लाभ वाढतील. नोकरीनिमित्ताने प्रवास घडतील. राजकारणात उत्तम काळ आहे.
मीन – नोकरीच्या ठिकाणी परिवर्तन झालेले दिसेल. मोठे घबाड मिळू शकते. बदलीचे प्रयत्न झटपट मार्गी लागतील. इच्छापूर्ती करणारा काळ आहे. संततीच्या करियरचा प्रश्न मार्गी लागेल. कामासाठी धावपळ होईल, पण त्यामधून आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रवासात सावध राहा.