हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख आणि जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कमध्ये ‘कार्टून कट्टा’ या व्यंगचित्रकारांच्या समूहातर्फे व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. ‘आमचेही फटकारे’ या प्रदर्शनात देशातील एकूण १२० चित्रकार व व्यंगचित्रकारांनी त्यांना भावलेली शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा आपल्या अर्कचित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. १७ व १८ नोव्हेंबर या दोन दिवशी भरलेल्या या प्रदर्शनाला असंख्य रसिकांनी प्रचंड प्रतिसाद नोंदवला. एखाद्या कलाकाराचे स्मरण त्याच्याच कलेच्या माध्यमातून साकारण्याचा हा अनोखा प्रयोग यशस्वी झाला. एरवी बाळासाहेबांचे फटकारे दाखवणार्या या पानांवर आज, या ताज्या दमाच्या व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यांतून उतरलेल्या बाळासाहेबांचं दर्शन घडवत आहोत… हीच त्यांना सर्वात मोठी मानवंदना!