□ उत्तर प्रदेशाची कथित प्रगती दाखवणार्या जाहिरातीत बंगालमधला पूल; समाजमाध्यमांवर उडाली रेवडी
■ सोपं काम आहे का हे? ‘योगी’साधना आहे ही. पंतप्रधानपदाचे वेध लागलेले दिसतायत, २०१४ला कर्नाटकातल्या आरामबस गुजरातची प्रगती म्हणून खपवल्या गेल्या होत्याच की!
□ आता सीएम नाही तर पीएम बदलण्याची गरज : काँग्रेसची भाजपवर टीका
■ ती हिंमत आता फक्त देशाची जनताच दाखवू शकेल… संधी मिळाली तर!
□ मुलामुलींना एकत्र शिक्षण नाही : तालिबानचा फतवा
■ मुळात यांचं शिक्षण म्हणजे धर्मकायदेच ना? ते शिकून असंही काय भलं होणार आहे मुलांचं?
□ देशभरात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ
■ देवीपणाच्या पोकळ मखरातून बाहेर काढून स्त्रीला बरोबरीने वागवायला सुरुवात केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही.
□ इंग्रजी शाळा नको, मराठी शाळांसाठी शिक्षक परिषदेची मोहीम
■ लहानपणापासून इंग्रजी माध्यम नको, हे बरोबर; पण जगाच्या बाजारात वावरण्यासाठी इंग्रजी उत्तम आलंच पाहिजे. त्यालाही पर्याय नाही.
□ वरूण गांधी यांनी आदित्यनाथांना पत्र लिहून केल्या शेतकर्यांसाठी काही मागण्या
■ आदित्यनाथांनी ते उघडून तरी पाहिलं असेल का?
□ साकीनाका अत्याचार प्रकरणानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची महाराष्ट्र सरकारवर टीका
■ त्यांचा एकमेव राष्ट्रीय कार्यक्रम तोच आहे… भाजपशासित प्रदेशात तोंड उचकटायची हिंमत झाली असती का?
□ सात वर्षांत उमेदवारी मिळवण्यासाठी ११३३जणांनी दिली पक्षाला सोडचिठ्ठी
■ ही मंडळी नंतर निष्ठा शिकवतात बरं का सामान्य माणसाला!
□ सिंधुदुर्ग शिक्षणाचे नवे मॉडेल बनेल : राज्यपाल कोश्यारी
■ नवं मॉडेल ‘जुन्या मॉडल’वर बेतलेलं नसलं म्हणजे मिळवली…
□ तालिबान सरकारमध्ये महिलांना स्थान नाही
■ स्त्रीला नरकाचं द्वार मानणार्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?
□ जनता जागी झाली तर मोदी सरकारही पडू शकते : अण्णा हजारे
■ तिला तेव्हा कुशीत घेऊन थोपटून भ्रष्टाचारविरोधाची अंगाई गात, लोकपाल विधेयकाचं दुदू तोंडात देऊन गाई गाई करून झोपवणारे तुम्ही आधी जागे झालात का?
□ लस न घेतलेल्या नागरिकांना कोरोनाचा दहापट जास्त धोका : अमेरिकी संशोधनाचा निष्कर्ष
■ आमच्याकडे वर्षात ५० वाढदिवस साजरे झाले तरच हा धोका कमी व्हायची शक्यता.
□ केंद्रीय मंत्री नारायण राणे अलिबाग क्राइम ब्रँचसमोर हजर; पण म्हणतात मी हजर झालो नाही, फक्त न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
■ तो आदेश हजर होण्याचाच होता, हा निव्वळ योगायोग.
□ केवळ संस्कृत नाही, तर प्रत्येक भाषा देवाची
■ जेव्हा माणसाला भाषा अवगत नव्हती, तिचा शोधच लागला नव्हता, तेव्हा देव होता का, त्याची माणसाला जाणीव होती का, तेव्हाचा माणूस देवाशी कसा संवाद साधत असेल?
□ २०१७च्या आधी अब्बाजान म्हणणारे लोक रेशन फस्त करत होते : योगी आदित्यनाथ
■ निवडणुका जवळ आल्या की अब्बाजान आठवतातच त्यांना… लोकांना गंगेत वाहिलेल्या प्रेतांचा विसर पाडायचा, तर ठेवणीतली भुतं बाहेर काढायलाच लागणार ना.
□ राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष : प्रवीण दरेकर
■ तरी बरं राणेंनी निव्वळ शब्दांनीच गाल रंगवला होता यांचा… टीव्ही-सिनेमातल्या नटनट्यांच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन निवडणुका जिंकण्याची आपल्या पक्षाची राष्ट्रीय परंपरा विसरले वाटतं!
□ महाराष्ट्रातील माणूस गुन्हे करत नाही का? चंद्रकांतदादा पाटलांचा सवाल
■ करतो ना, तुमच्यासारखे अस्तनीतले निखारे प्रज्वलित करून ठेवण्याचा गुन्हा घडलाय खरा महाराष्ट्राकडून.
□ आदित्यनाथ सरकारकडून गुंडगिरीचा अंत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
■ ‘नोटबंदीने काळा पैसा संपवला’च्या अफाट यशानंतरचा नवा हास्यस्फोटक प्रयोग दिसतोय हा!
□ म्हशी किंवा महिला, उत्तर प्रदेशात सारेच सुरक्षित : योगी आदित्यनाथ
■ सगळे पुरुष, रेडे आणि सांड एकदमच सुधारले की काय?