• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

पुलावरची बाई…

- श्याम पेठकर (गावगप्पा)

श्याम पेठकर by श्याम पेठकर
September 22, 2021
in गावगप्पा
0

रामराम मंडयी… का म्हनता? मांगच्या टायमाले म्या तुमाले आमच्या गावचं झोटींगचं भूत सांगतलं. आता मातर म्या हे ‘भूताडन’ सांगत हाव थे आमच्याच गावचं हाय. आमच्या गावच्या लोकसंखेपेक्षा तठीच्या भूतायची संख्या जादा हाय. म्हंजे हरेक घरचा कोनीना कोनी भूत झालेला असल्यानं हरेकाले भूताबद्दल एक पारिवारीक जिव्हाळा हाय.
आमच्या गावाजवय एक जुनी गढी हाय. थे भूतायची गढी म्हनूनच प्रसिद्ध हाय. आधी तठी इजारदार राहे असं गावचे जुने लोक सांगत. आताबी थे गढी जुनी हाय पन जशीच्या तसी हाय. आता इजारदाराचे कोनीच तठी राहात नाही म्हनून थे बंद हाय. थो इजारदार रंगेल व्हता. त्याच्या गढीत रंगमहालच व्हता. नाचनार्‍या बायकायचा तठी राबता हमेशा राहे. रातरात गाने न बजावने सुरू राहे. आपन आपल्या आंगनात सडा टाकतो पान्याचा त्याच्यापेक्षा दारू त्याच्या या रंगमहालात गान्याची मैफलीत सांडे. आता या बायका निस्त्या गाने म्हनून अन् नाचून वापस जात असतीन का? असंबी सांगतेत का गावात कोनी नवी बाई आली, म्हंजे नर्स, मास्तरीन गी नाहीत कोनाची नवी सून असीन त आधी इजारदाराच्या गढीवर नेली जाए न मंग इजारदारानं उपभोगली का मंग थ्या आपली नॉर्मल जिंदगी जगे, असंबी लोक सांगत. त या इजारदारानं बायका म्हने भिंतीत चिनून मारल्या. इजारदारानन नासवलेल्या बायकायनं गढीवरून दरीत उडी मारून खुदखुसी करे… आता असे कोनी नाखुशीनं मरत असीन, मारलं जात असीन त गावच्या नियमानुसार त्याले भूत होनं आलच का नाई?
इजारदाराच्या थ्या गढीत अमावस्या-पौर्निमेले आताबी घुंगरायचे आवाज येतेत म्हने… काही लोकायले त तठी बायकाबी नाचत असतानी रातबेराती दिसाच्या. इतलं मातर नक्की का गढीतून कईकई घुंगरायचे आवाज अन् गाने-बजावने आयकू ये. थे आवाज अनेकायनं आयकले हायत. मोठा झाल्यावर मले समजलं का गढीत रातीबेराती बायकायचाच नाच होते न काही लोक पहाले जातेत. आता भूताच्या नावावर बायकायचे नाच पहाले गेला म्हनल्यावर बायको मारू मारू भूत करन का नाही? म्हनून भूतायचं नाव कराचं अन् काम आपलं कराचं… एक मातर नक्की का भूतं दिसतेत असं पसरलं असल्यानं गढी अजूकई शाबीत हाय, नाहीत गावकर्‍यायनं एकई दगड नसता ठिवला न गढीचा.
आता आमच्या गावाच्या नदीवरच्या पुलाचीच गोष्ट घ्या. तठी म्हने थ्या ठेकेदारानं पुल पक्का रहाव म्हनून नरबळी दिला. एक गवळनीला पकडून त्या पुलात चिनून टाकलं… मायला! ह्या नवाच फॉर्म्युला हाय; पन आमच्या गावात असे फॉर्म्युले असतत. पुल पक्का राहन्यासाठी ठेकेदारानं तठी कोनाचातबी बळी देन्याच्या कहान्या सर्वीकळच आयकाले येतेत. जुन्या काळात का सिमेंंट नोतं का दगडं नोते? मले वाटते का हे बळीचा भावार्थ अल्लगच असते. ठेकेदारानं, तवाच्या व्यवस्थेनं विकासाच्या नावावर गावायच्या अन् मजुरायच्या केलेल्या शोषनाची थे कहानी असते. तसी आमच्या गावात हे गवळीनीची कहानी. ठेकेदारानं पुलाच्या मजबुतीसाठी पुलात गाडून टाकेल गवळनीच्या चाळायचा अवाज अजूकई आमच्या गावात येते. तिची साद अर्ध्या रातीच्या बाद आयकाले येते, दही घ्याहोऽऽ दहीऽऽऽ
त्याच्यापायी राती दहा- अकराच्या बाद कोनीच पुलावरून ये- जा करत नाही. रोज सांजेले कोनीना कोनी तठी दही-भात नेवून ठेवत. दही- भात खावून तिची भूक भागली का मंग थे गवळन गावात नाही येत, नाहीत आली असती ना राती बेराती गावात न आपल्या दारावर थाप मारून म्हनली असती, ‘घ्याना दहीऽऽ’ आपल्या दिमाकचा किती दही झाला असता असं झालं त!
पावसाळ्यात त्या पुलावरून पानी वाहे पयलच्या कायात. आता तसा पूर नाही येत. तवा मंग पुलावरून पानी वाहे. आता पुलावरून दोन हात- चार हात पानी होतं असं लोक तवा म्हनेत. आता समजत नाही का थे मोजत कसे होते? मातर तवा लोक सांगे का कोनी टरकवाला डेअरींग करून पुलावरून गाडी टाकत असीन पान्यात त त गवळीनीचे हिरव्या बांगड्या घालेल हात त्याले पान्यात दिसे म्हने. म्हंजे गवळन पुलावरून कोनाचा जीव जात असीन वाचवे. कोनी बाई रातीले पुलावरून येत असीन त तिले हे गवळन थांबवून सांगे का असी एकली नोको निंघत जावू, तुहाबी बळी जाईल.
एकदा त आमच्या गावच्या सरपंचाच्या सायकलवरच बसली होती ना थे गवळन डबलसीट. म्हणजे सरपंच येत होता रातीचा कुठल्या गावावरून त्याच्या सायकलनं… आता तवा मोटायसायकली नव्हत्या. त अचानक आमच्या सरपंचाले मांगून जडजड काही जानवलं. आपल्या सायकलच्या कॅरीयरवर कोन बसलं मढं म्हणून त्यानं मागे पाहीलं तर हे गवळन बसली होती ना! हिरवा चुडा, मोठ्ठं कुकू… हसली म्हने सरपंचाकडे पाहून अन् म्हने, भाऊ आज पाय लय दुखलेत, मला न्या ना त्या पार… सरपंचानं गुपचाप तिले पुलाच्या या भागात आनलं अन् मागे वळून पाहतो तर काय??? गायब!!
सरपंचानं हे गोष्ट गावात सांगितली तवा आमचा बीट जमादार म्हनेच ना त्याले का, तरीच मी इचारात पडलो होतो का सरपंचाच्या सायकलवर हे कोन बाई इतल्या अंधाराची बिलगून… आता बीट जमादार म्हंजे प्रत्यक्ष पोलिसनंच पाह्यलं होतं याचा अर्थ सरपंच सांगत होता थे काही खोटं नोतं, अन् सरपंचासारखा गावचा प्रथम नागरीक खोटं कायले बोलनार हाय?
मंग त्या गवळनीनं सरपंचाले बराच धरला होता. एकत सरपंचाकडं शेतीवाडी, जमीन- जुमला खूप होता. त्याच्यात असी सत्ताबी आलती, मंग गावाच्या नदीच्या किनारी असलेल्या ढाब्यात त्याची अर्धी मालकी आली. बारचं लायसन सरपंचानं जमवून आनलं ममईहून, त्याच्यापायी त्याचा अर्धा वाटा. पैसा वहाडला. सरपंचाले जिल्हा परिषदवर जाचे डोहाळे लागले. मंग हे गवयन त्याच्या सायकलवर बसाले लागली. आता सरपंच खोटं नोता बोलत अन् थे गवळनीचं भूतबी खोटं नोतं.
काहूनका काही वर्षांतच सरपंचानं त्या डबलसीटवालीला बाजूच्या गावात घर करून दिलं असी चर्चा गावात होती.
तर त्या पुलावरच्या गवळनीचा असा लय मोठा पसारा होताना आमच्या आमच्या गावात. आमच्या गावात तेव्हाच्या काळात सायकल असनं हेबी श्रीमंतीची गोठ होती ना. आता सुबत्ता आली की मानसं चैन करतेतच… त्यापाई आमच्या गावात शेती पिकली का मग त्याच्या घरी सायकल याची अन् मग त्याच्या सायकलवर डबलसीट थे गवळन बसन्याचा अनुभव त्या नव्यानं पैशाची मस्ती चढलेल्या मर्दाले याचाच. अनेकायले त्याच्या सायकलवर अचानक डबलसीट बसलेली गवळन दिसाची… मंग गावात काही घरी बजाजची स्कुटरबी आली. चार-पाच साल तवा बजाज स्कुटरवर वेटींग राहे. सरपंच अन् कुमारअन्ना कोमट्याच्या पोरानं ऑनवर पाच हजार देवून बजाज स्कुटर घेतली. आता सायकलवर बसनारी थे गवळन स्कुटरवर बसा लागली. रातीच्या टायमाले सायकल नाहीत या स्कुटरवाल्यायसंग हे गवळन दिसा लागली होती.
आमच्या गावातले लोक गवळनीचं भूत हायच याच्यावर आधीच इस्वास ठेवाचे अन् मंगत अगदी त्यायची भुतावर श्रद्धाच बसली ना… कारन, ‘भूतखेत ही अंधश्रद्धा आहे. फसवणूक आहे.’ असे लोकायले समजावनार्‍या आमच्या गावच्या लय सज्जन मास्तरच्या सायकलवरबी ती गवळन बसली एका राती… बरं निस्ती बसली नाही त मास्तरच्या सायकलवर गवळन बसल्याचं आमच्या बीट जमादारानं पाह्यलंबी.
आता तुम्हाले हकनाक पिंजरा शिनम्यातला मास्तर आठुला असन, तमासगिरीन बाईले मिठी अन् ‘ब्रह्मचर्य हेच जीवन’ या सुभाषिताची पाटी मास्तच्या पायाखाली, ‘ब्रह्मचर्य’ ह्या शब्द मास्तरच्या पायाखाली अन् वाचता येते फकस्त ‘हेच जीवन’. भुसनळ्यायहो भलत्या भानगडीत नाक खुपसू नोका आमच्या गावच्या… आमचा मास्तर सज्जन होता अन् गवळणीचं भूत खरंच होतं.
त हे गवळीन न तिचं राती- बेराती ‘दही घ्याहोऽऽ दहीऽऽ’ असं हाका मारनं आमच्या गावात लय झनायनं आयकल होतं. आता ज्यायच्याकडं सायकल नाहीत स्कुटर नोती त्याहिले तिच्या या हाकावरच समाधान माना लागाचं. लयच झालं त काही लोकायले तिच्या पैंजनाचे आवाज आयकाले भेटले.
दिवसाउजेडी थे दिसत नोती… पन आमच्या गावच्या नदीचा काठ मातर मस्तच होता. स्वच्छ रेती पसरली होती दूरवर. रेतीले माफिया नावाना राक्षस लागला नोता. गावाजवळ धरन बांधनं सुरू असतानी तठीच्या इंजनियर लोकायनं नदीच्या पात्रात कोजागिरी करन्याचं ठरविलं. गावकर्‍यायन त्याहिले समजावलं; पन थे आयकेनात. आमच्याच गावातून औषधापुरतं पद्धत म्हणून दूध अन् बाकी ‘सामान’ नेलं त्यायनं नदीच्या तिरावरच दूध आटवलं. चखनाही तयार केला. (दुधासोबत लागते ना चखना कोजागिरीच्या) कोंबडं शिजविलं. सगळी तयारी झाली अन् मग घुंगराचा आवाज आला… असन ना कोनी, म्हनत आपल्या कामात लागले. त नदीच्या एका काठावर पैंजनायचे आवाज अन् लगेच पलिकडच्या काठावर ‘दही घ्याऽऽ होऽऽऽ’ मंग मातर इंजिनियर लोकायची सटारली. सगळं तठीच टाकून थे पयाले बुडाले पाय लावत… दुसर्‍या दिवशी गावात हेच चर्चा होती अन् आमच्या रंगाकाका अन् त्याचं टोळकं आपसात चर्चा करत होतं गुपचाप… कालची कोजागिरी मस्त झाली आपली इंजिनियर लोकायच्या भीतीच्या जोरावर!
आता इतकं सांगूनही तुमचा इश्वास नसन बसत गवळीनीच्या भुतावर तर मंग अखीन मी का करनार?
हे मात्र नक्की की हे भूत गवळीन आमच्या गावात मातर कधी आली नाही. त्याचं कारण हे होतं का नदीच्या काठावर पुलाच्या गावाकडच्या बाजूला देवीचं एक मंदिरं होतं जुनं. त्याच्या मांग झोपडीत एक बाई राहाची. गावात थेबी कई आली नाही अन् कोनासंग बोललीबी नाही. एकडाव मायले म्या इचारलं होतं का थे बाई कोन? त माय म्हने, थे देवी हाय… देवीवर सोडली हाय तिले. देवी हाय त मंग आठ हात काहून नाई तिले? ह्या माह दुसरा सवाल होता. मायनं मंग सटकावालच मले. म्हनजे आज तिच्या हाताचा इचार करत हाय, उद्या अखीन कोंच्या अवयवाचा करसीन… मले मातर थ्या बाईबद्दल लयच उत्सूकता व्हती, थे जगते कसी? कमावते काय? खाते काय? तिले त्या गवळनीची भीती नाही का वाटत?
हं… मी मोठा झालो. गाव सुटलं. थे देवीवर सोडलेली बाई मग म्हतारी झाली अन् मंग दिसेनाशी झाली… मंग गवळीनीचं भूत दिसनबी बंद झालंं… गावाचा विकास झाला, नवा उंच पुल बांधला, जुना पुल वापरात नाही आता. कितीबी पूर आला तरी पुलावरून पानी जात नाही… गावाचा विकास झाला म्हणजे उंच पूल बांधला हे खरं तर नदीचा आता नाला झाला आहे, त्याचे काय?

– श्याम पेठकर

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)

Previous Post

कोकणी कमाल

Next Post

सिरिअल किलर

Next Post
सिरिअल किलर

सिरिअल किलर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.