बंगळूर येथील नामांकित संस्था आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्ट या दोन संस्थांतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या व्यंगचित्र प्रदर्शनात संभाजीनगरचे ज्येष्ठ व्यंगचित्रकार धनंजय एकबोटे यांच्या दोन रेखाटनांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या व्यंगचित्रकारांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांचे हे प्रदर्शन २५ सप्टेंबरपासून भरणार आहे. निवडक आणि गतवर्षीच्या उत्कृष्ट व्यंगचित्रांना यात स्थान दिले जाते. रसिकांसाठी हे प्रदर्शन दहा दिवस खुले राहणार आहे.
धनंजय एकबोटे हे गेल्या २२ वर्षांपासून विविध प्रकाशनांसाठी व्यंगचित्र रेखाटत आहेत. हिंदी, इंग्रजी व मराठी या तिन्ही भाषेतील वर्तमानपत्रांत त्यांनी काम केले आहे. साप्ताहिक ‘मार्मिक’मध्येही त्यांची व्यंगचित्रे नियमित झळकत असतात. २०१६ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कार्टूनिस्टतर्फे उत्कृष्ट राजकीय व्यंगचित्रकार या पुरस्कारनेही त्यांन गौरविण्यात आले होते. हा पुरस्कार त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते स्व. गिरीश कर्नाड यांच्या हस्ते देण्यात आला होता.