आपल्या देशाचे ऐतिहासिक सर्वोत्कृष्ट पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस. भाजपकडून ४ आठवडे म्हणजेच १७ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरपर्यंत `थँक्यू मोदीजी’ म्हणत साजरा होणार आहे. याकरिता भाजपकडून मोदींजींना `थँक्यू मोदीजी’ लिहिलेले ५ कोटी पोस्ट कार्ड पाठविण्यात येणार आहेत. यासोबतच शेकडो कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देशाच्या अशा सर्वांगीण ओहोटीला कारणीभूत असणार्या महान नेत्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देशवासियांना उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम थँक यू मोदीजी..
नवीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करतांना ६०० शेतकरी मेले हरकत नाही, शेकडो जखमी झाले, पर्वा नाही पण शेतकर्यांच कल्याण झालं पाहिजे याकरिता शेतकर्यांसाठी त्यांची इच्छा नसतांना ३ कृषी कायदे आणून त्यांच जबरदस्ती कल्याण करण्यासाठी थँक्यू मोदीजी. ह्या कायद्याला विरोध करणार्या ६०० मूर्ख शेतकर्यांना यमसदनी धाडणार्या मा. पंतप्रधानांच्या वाढदिवसाला ‘किसान सन्मान दिन’ साजरा करणे किती यथायोग्य आहे हे भाजप किसान मोर्चाने दाखवून दिलं आहे.
पंजाबमधले सहा हजार शेतकरी परिवार असे आहेत. ज्यांची एकुलती एक मुले युद्धात किंवा सीमेवरील चकमकीत मारली गेलीत. म्हणजे ६००० परिवार सैन्यात भरती होऊन निर्वंश झालेत. त्यांचा वंश चालविणारा कोणी उरला नाही तरी ते शेतकरी अजूनही आपल्या मुलांना सैन्यात पाठवतातच. ह्या अशा मूर्ख देशभक्तांना हे किसान नाहीत तर हे खलीस्थानी, पाकिस्तानी, आतंकवादी, देशद्रोही आहेत असा खरा सन्मान मिळवून देण्यासाठी थँक्यू मोदीजी.
कोरोना जगभरात पसरल्यानंतरसुद्धा अमदाबादला लाखो लोकांच्या उपस्थितीत नमस्ते ट्रम्प कार्यक्रम घेतला. मध्य प्रदेशमध्ये सत्तांतर घडवून आणलं. आधी कोरोनाला आत देशात येऊ दिलं मग त्याच्यावर हल्ला करण्यासाठी एक दिवस अचानक लॉकडाऊन करून टाकलं. आता कोरोना पळेल कुठे? लाखो मजुरांचे झाले असतील हाल या अचानक लॉकडाऊनमुळे, मेले असतील शेकडो मजूर पायपीट करत; पण त्यांना स्वतः कळायला नको की जगात कोरोना वाढतोय तर आधीच आपापल्या घरी निघून जावं? लोकांना पण वेळेवरच सर्व पाहिजे. आधी काहीच सांगत नाहीत. वेळेवरच चांगला इलाज पाहिजे, ऑक्सिजन आणि वेंटिलेटर बेड पाहिजे. अरे, आधी सांगितलं असतं तर नसती दिली चायनाच्या कंपनीला ३००० कोटी रुपयांची सरदार पटेलांचा पुतळा बनविण्याची ऑर्डर. थांबवलं असत राम मंदिर आणखी दोन वर्षं आधी सांगत नाही आणि मग वेळेवर म्हणता ऑक्सिजन नाही भेटला म्हणून इतके मेले, बेड नव्हता म्हणून तितके मेले ह्या सर्व उणिवांवर एकच मास्टरस्ट्रोक म्हणजे २० हजार कोटींचं अदृश्य कोरोना पॅकेज दिल्याबद्दल थँक्यू मोदीजी.
मार्च २०१४मध्ये भारत सरकारवर ५४ लाख ९० हजार कोटी रुपये कर्ज होते. मागील वर्षी २०२०मध्ये म्हणजेच फक्त ६ वर्षात हा कर्जाचा बोजा १०१.३ लाख कोटी रुपयांच्या वर घेऊन जाणे ही सोपी गोष्ट नाही. फक्त ६ वर्षात देशावरील कर्ज दुप्पट करून कुणालाही दिसणार नाही असा देशाचा गुप्तपणे विकास करणार्याकरिता थँक्यू मोदीजी.
मोदीजींनी सर्व सरकारी कंपन्या विकून त्यांचं खासगीकरण करून आरक्षणच बंद करून टाकलं. यांना आरक्षण द्या-त्यांना आरक्षण द्या या अशा सर्व भेदभाव पसरविणार्या झंझटीतून भारतीय जनतेला मुक्त करण्याकरिता थँक्यू मोदीजी. देशात कधीच नव्हती इतकी बेरोजगारी सातच वर्षात निर्माण करण्यासाठी आणि बेरोजगारीचे आकडे जाहीर करणे बंद करून बेरोजगारीच गायब करण्यासाठी थँक्यू मोदीजी.
भलेही लाईनमध्ये लागून १०० पेक्षा जास्त लोक मेले असतील, पण अचानक नोटबंदी करून नकली नोटा आणि आतंकवाद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी थँक्यू मोदीजी.
याअगोदरचे मनमोहनसिंग सरकार ९२५ रुपयांचे गॅस सिलिंडर फक्त ४५० रुपयांना, १०५ रु.चे पेट्रोल ६८ रुपयांना आणि १५० रु.लिटरचं खाण्याच तेल ७२ रुपयांना विकून जनतेला मूर्ख बनवत होती. ह्या तिन्ही गोष्टींची खरी किंमत आम्हाला माहीत करून दिल्याबद्दल थँक्यू मोदीजी.
काहीही काम नसतांना विनाकारणच आपल्या खात्यात पैसे काढ-घाल करणार्या आणि बँकेच्या कर्मचार्यांना त्रास देणार्या सामान्य नागरिकांवर बँकेच्या ४ व्यवहारानंतर प्रत्येक व्यवहारावर सर्व्हिस चार्ज लावून आणि खात्यात मिनिमम बँलन्स नसले तर त्यावर दंड आकारून ह्या बँकांना त्रास देणार्या सामान्य नागरिकांकडून हा १५०० कोटी रुपयांचा दंड वसूल करून त्यांना धडा शिकवल्याबद्दल थँक्यू मोदीजी.
देशात लसींचा तुटवडा असतांना आणि देशातील नागरिक कोरोनाने मरत असताना ४.५ कोटी डोज पाकिस्तानला व पाकिस्तान-बांगलादेश सोबत १४ देशांना सुद्धा पुरवून भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी थँक्यू मोदीजी.
यावर्षीच मोदीजींनी नवीन स्क्रॅप पॉलिसी आणली आहे. यात वैयक्तिक २० वर्ष जुन्या तर व्यावसायिक १५ वर्ष जुन्या गाड्या-वाहने भंगारात विकावी लागतील. म्हणजे २०००पर्यंत घेतलेल्या सर्व गाड्या आता भंगारात विकाव्या लागणार. असं केल्यास तुम्हाला एक प्रमाणपत्र मिळेल जे दाखवून तुम्ही जेव्हा नवीन गाडी घ्याल त्या १० लाखाच्या नवीन गाडीचे जे काही २०-३० हजार नोंदणी शुल्क असेल ते तुम्हाला लागणार नाही. नवीन गाडीचे १० लाखापैकी फक्त नऊ साडे नऊ लाखचं भरावे लागतील. किती ही बचत? थँक्यू मोदीजी.
मागील वेळीच बचत ठेवीवर (फिक्स डिपॉझिट) वरील मिळणारं व्याजदर सरकारने कमी केलाय. तो दर ५ टक्के असल्यामुळे नोकरदारांना आपल्या पी.एफ.मध्ये अधिक गुंतवणूक सुरू केली होती. पण ही लोकांची चालाकी लगेच ओळखून आता पी.एफ. (भविष्य निर्वाह निधी) वरसुद्धा टॅक्स लावण्यासाठी थँक्यू मोदीजी.
आधी जसे मोदीजींचे प्रचारक सांगत असत की मुस्लिमांच्या ’हज’ यात्रेला सबसिडी आहे परंतु हिंदुस्तानात हिंदूंचेच महत्वाचे धार्मिक स्थळ असलेल्या `वैष्णोदेवी’ व `अमरनाथ’ यात्रेला सबसिडी नाही. असं म्हणून फक्त सातच तर वर्ष झालेत हो. बस अजून एकदा मोदीजींना निवडून दिलं की लगेच ते वैष्णोदेवी व अमरनाथ यात्रेवर सबसिडी सुरू करणार आहेत. काँग्रेस काळात मुस्लिमांसाठी सुरू झालेल्या योजना ज्या अजूनही तशाच सुरू आहेत त्या योजनादेखील बंद करून टाकणार आहेत. चीनला तर आता फक्त लाल आंख करून नाही तर घरात घुसून मारणार आहेत आणि आपली बळकावलेली जमीन परत घेणार आहेत. `बँक ऑफ चायना’ला भारतात दिलेली मान्यता रद्द करणार आहेत. इतिहासात सर्वात जास्त सैनिक या मागील सात वर्षात सीमेवर का मारले गेलेत याचा शोध घेणार आहेत आणि पुलवामा हल्ल्याचे सूत्रधार कोण याचाही पत्ता लावणार आहेत. २०२४मध्ये इतकं सर्व तुम्ही कराल त्याकरिता आधीच थँक्यू मोदीजी.
चवथ्या वर्गातल्या १० वर्षीय चिमुकल्यांवर मोदीजींच्या सरकारविरोधी नाट्य सादर करण्यासाठी गुन्हे दाखल केले. आतंकवाद्यांसह जम्मूत रंगेहात अटक झालेल्या, देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या पोलीस अधिकारी देवेंद्र सिंहसारख्या अधिकार्याला जमानत देऊन टाकली. या दोन्ही घटनांमधून देशातील न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे हे दाखवून दिल्याबद्दल थँक्यू मोदीजी.
अगोदर उद्योगपती एकूण नफ्याच्या ७ टक्के रक्कम देणगी म्हणून देऊ शकत असे. परंतु मोदीजींनी ज्या सर्व मर्यादा हटवून आता उद्योगपती आपल्या नफ्याच्या १०० टक्के निधी राजकीय पक्षांना देऊ शकतील अशी व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर आधी राजकीय पक्षाला हा निधी कुणी व किती दिला? चेक दिला की कॅश दिला? हे माहितीच्या अधिकारात कुणीही विचारू शकत असे; परंतु मोदीजींनी माहितीच्या अधिकारातून हा विषय काढून टाकला. पीएम केअर्स फंड सरकारी आहे असे सांगून मोदीजींनी निधी गोळा केला आणि जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती विचारली गेली, तेव्हा हा पीएम केअर्स फंड मोदीजींनी एका मिनिटात सरकारीचा प्रायव्हेट करून टाकला. ह्या अशा अत्यंत पारदर्शक कारभाराकरिता थँक्यू मोदीजी.
मोदीजींनी जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविल्यापासून वर्षभरात तब्बल दोन लोकांनी जम्मू-काश्मीरमध्ये जागा घेतली आहे. समस्या नंतर येतात त्याअगोदर मोदीजी उपाययोजना तयार करून ठेवतात. मोदीजींनी राफेल विमान खरेदीची घोषणा केली त्याच्या १३ दिवस अगोदरच अनिल अंबानींची डिफेन्स कंपनी स्थापन झाली होती. अमर्यादित शेतमालाच्या साठवणुकीची सूट देणारे ३ कृषी विधेयक येण्याअगोदरच ’अदानी अॅग्री लॉजिस्टिक’चे देशात शेकडो गोडाऊन तयार होते. ह्या दूरदृष्टीसाठी थँक्यू मोदीजी.
न्यायव्यवस्था सरकारचे ऐकत नाही म्हणजे काय? न्यायव्यसस्थेत हस्तक्षेप करून न्याय कसा केला पाहिजे हे मोदीजींच्या सरकारने त्यांना शिकवले. राष्ट्रपती-राज्यपालांसारख्या संवैधानिक पदांचा व ईडी, सीबीआय, आयकर विभाग अश्या सरकारी संस्थांचा विरोधकांना नामोहरम करण्यासाठी कोणतीही नैतिकता न पाळता कसा गैरवापर करावा हे भारतीय राजकारण्यांना शिकविण्याकरिता थँक्यू मोदीजी.
सरकारला पाठिंबा म्हणजे देशभक्ती व सरकारला विरोध म्हणजे देशद्रोह ही नवीन व्याख्या निर्माण करण्यासाठी थँक्यू मोदीजी.
मोदीजी आल्यापासून मुली-स्त्रियांवर होणार्या अत्याचारांना वेगळ्याच प्रकारे हाताळल्या जातंय. उन्नाव बलात्कार प्रकरणात पीडितेवर आणि तिच्या कुटुंबियावरच गुन्हे दाखल केले गेले. पीडितेच्या वडिलांना कारागृहातच तिच्या काकू, मावशी आणि ड्रायव्हरला अपघातात मारून टाकलं गेलं. हाथरस पीडितेचे प्रेत घरच्यांच्या मर्जीविरोधात तिच्या घरच्यांना कोंडून रात्री २.३० वाजता पोलिसांकडून जाळून टाकण्यात आलं. कठुवामध्ये ८ वर्षीय आसिफावर अत्याचार झाले आणि बलात्कार्यांच्या समर्थनार्थ स्थानिक बार असोसिएशन चे अध्यक्ष- सदस्यांनी, सत्ताधारी आमदार व मंत्र्यांनी तिरंगा हातात घेऊन भारतमाता की जय म्हणत बलात्कार्यांना पाठिंबा जाहीर केला. अशाप्रकारे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ नार्याचा खरा अर्थ समजून सांगितल्याबद्दल थँक्यू मोदीजी.
मोदीजींनी १८-१८ तास काम करून देश स्वतंत्र झाल्यापासून सर्वात जास्त म्हणजे २४ कंपन्या आतापर्यंत विकून त्यातून देशासाठी पैसा उभा केला आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आणली. परराष्ट्र संबंध खराब केले. ५७० कोटींचं राफेल विमान १६७० कोटींना विकत घेतलं. देशात हिंदू-मुस्लिम द्वेष वाढेल असं वातावरण निर्माण केलंय. स्टेडियमला सरदार पटेलांसारख्या महापुरुषाचे नाव बदलून स्वतः चे नाव दिले. कुंभमेळ्याला परवानगी दिल्याने शेकडो साधूंना कोरोनामुळे कुंभात मरण आलं. म्हणजे त्यांना मोक्षप्राप्ती करून दिली. भले त्यांना पुरायला नदीकाठी जाग्ाा कमी पडली असेल पण त्यांना मोदीजींनी स्वर्गात जागा कमी पडू दिली नाही त्याबद्दल थँक्यू मोदीजी.
मला तर अनेकदा हे प्रश्न पडतात की हा देश आतापर्यन्त बिनामोदींचा चाललाच कसा? मानवाची उत्क्रांती झालीच कशी? देश मोदींविना स्वतंत्रच कसा झाला? मोदीजी नसते तर आज आपण कुठे असतो? हा विचार करूनच गहिवरून येत. तुम्ही सत्तेवर येऊन ‘न भूतो न भविष्यती’ असा पंतप्रधान आणि असे ‘अच्छे दिन’ याची देही याची डोळा पाहण्याची संधी दिल्याबद्दल ढोपरापासून हात जोडून थँक्यू मोदीजी.