शिवसेना ही जगाच्या पाठीवरची एकमेव संघटना आहे जिने आपल्या छप्पन्न वर्षाच्या यशस्वी वाटचालीत अनेकांना लाल दिव्याच्या गाड्या भरभरुन मिळवून दिल्या, अगदी आपली अर्धी हयात काँग्रेसमध्ये घालवूनही ज्यांना त्यांच्या हाय कमांडने देण्याची दानत दाखविली नाही अशांनाही केवळ समाजकारण हाच ध्यास उराशी बाळगलेल्या बाळासाहेबांनी सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळवून दिली.
– – –
मला आठवतं, मी त्यावेळेला अकरा वर्षांचा होतो. १९ जून १९६६ या दिवशी बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी ‘शिवसेना’ या संघटनेची स्थापना केली. ‘हटाव लुंगी, बजाव पुंगी’ म्हणत शिवसेनेनं आपलं स्वरुप दाखवायला सुरुवात केली होती. बाळासाहेबांवर प्रादेशिकवादाचे आरोप होऊ लागले. शिवसेनेच्या स्थापनेच्या बरोब्बर आठ दिवस आधी म्हणजे साने गुरुजींच्या पुण्यतिथीदिनी ११ जून १९६६ रोजी आमचे पिताश्री वसंतराव त्रिवेदी यांनी ‘आहुति’ साप्ताहिक अंबरनाथहून सुरु केलं होतं. शिवसेनेच्या स्थापनेमुळे बाळासाहेबांवर चौफेर टीका होत असताना ‘आहुति’मध्ये शिवसेनेचं स्वागत करणारा अग्रलेख वसंतरावांनी लिहिला होता. योगायोग म्हणजे वसंतराव त्रिवेदी यांनी सुरु केलेल्या ‘आहुति’ला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या ‘शिवसेने’ला नुकतीच छप्पन्न वर्षे पूर्ण झाली.
शिवसेनेने सुवर्ण महोत्सवी वर्षाची झंझावाती वाटचाल पूर्ण करुन विक्रमी शतकी घोडदौड करण्यास सुरुवात केली आहे. एकचालकानुवर्ती संघटनेची ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये दिमाखदार नोंद ही केवळ आणि केवळ शिवसेनेचीच आहे, ज्याचा प्रत्येक मराठी, प्रत्येक हिंदू आणि प्रत्येक राष्ट्राभिमानी व्यक्तीला निश्चितपणे अभिमान आहे. आज योगायोगाची गोष्ट म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना आज सुवर्णमहोत्सवी वर्षात राज्य सरकार आणि कित्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमध्ये सत्तास्थानी आहे.
नंदमुरी तारक रामाराव म्हणजेच एन. टी. रामाराव यांनी तेलुगू भाषेच्या अस्मितेसाठी तेलुगु देसम स्थापन केला आणि अवघ्या नऊ महिन्यांत तो आंध्र प्रदेशात सत्तेवर आणला. पण मराठी स्वाभिमान टिकविणार्या शिवसेनेला सत्तेवर येण्यासाठी १९६६पासून १९९५पर्यंत वाट पहावी लागली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याच भाषेत सांगायचं तर लोकांना त्यांच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळत असतं. १९९५ ते १९९९ आणि आताही निव्वळ शिवसेनेची एकहाती सत्ता नव्हती आणि नाही. १९९५ ते १९९९ या काळात हिंदुत्वाची शिवसेना-भारतीय जनता पक्षाची अभेद्य युतीची शिवशाहीची सत्ता होती. २५ सप्टेंबर २०१४ रोजी ही अभेद्य युती तोडण्याची घोषणा झाल्यानंतर १५ ऑक्टोबर २०१४ रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे एकटे महाभारतातल्या कुरुक्षेत्रावरच्या अभिमन्यूसारखे लढले आणि ६३ वाघ विधानसभेवर निवडून पाठविण्यात जबरदस्त यशस्वी ठरले. २८८च्या विधानसभेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते म्हणून केवळ जनमताचा कौल आणि जनादेश शिरोधार्य मानून तसेच मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी जी साद घातली तिला प्रतिसाद म्हणून उद्धव ठाकरे यांनी स्थिर सरकार देण्यासाठी ५ डिसेंबर २०१४ रोजी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. उद्धवादेशाने सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, एकनाथ शिंदे आणि डॉ. दीपक सावंत यांनी कॅबिनेट तसेच रवींद्र वायकर, दीपक केसरकर, विजय शिवतारे, दादा भुसे आणि संजय राठोड यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
सत्तेत सहभागी असली तरी शिवसेनेने जनतेशी असलेली नाळ तुटू न देता सतत जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची, बाळासाहेबांनी दिलेल्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्राप्रमाणेच आजवर भूमिका यथायोग्य पार पाडली आणि यापुढेही ही घोडदौड वायुवेगाने होणार हे निःसंशय. शिवसेनेच्या छप्पन्न वर्षाच्या वाटचालीचा साधा आढावा जरी घ्यायचा म्हटला तरी डॉ. मनोहर गजानन जोशी यांनी मुंबई विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधापेक्षा मोठे खंडशः ग्रंथ लिहिले तरी ते कमी पडतील. शिवसेनेने अनेक वादळे, असंख्य आव्हाने, अगणित संकटे पचवलीत, परतवून लावलीत आणि सामनाही केला. उन्हाळे, पावसाळे अनुभवले आणि आपली दाहकता, जाज्वल्य, ज्वालाग्राही, घणाघाती, कणखर, परखड विचार इतकेच नव्हे तर ज्वलंत हिंदुत्व या आभूषणांनी नटविली. या आभूषणांसमोर तकलादू कृत्रिमतेला कधीही शिवसेनेने स्थान दिले नाही. अनेकजण आले आणि गेले पण बाळासाहेबांच्या शिवसेनेला काही फरक पडला नाही. अनेकांना आम्ही म्हणजेच संघटना असा जो दर्प चढला होता त्यांना काळाने त्यांची जागा, पायरी दाखवून दिली. ‘वाघ एकला राजा, बाकी खेळ माकडांचा’ याचा प्रत्यय आणून दिला.
शिवसेना ही जगाच्या पाठीवरची अशी एकमेव संघटना आहे की ज्या संघटनेने छप्पन्न वर्षाच्या यशस्वी वाटचालीत अनेकांना लाल दिवा मिळवून दिला पण या लाल दिव्याचा मोह ना शिवसेनाप्रमुखांनी बाळगला ना पक्षप्रमुख वा युवासेनाप्रमुखांनी धरला. लाल दिव्याच्या गाड्या आपल्या कार्यकर्त्यांना भरभरुन मिळवून दिल्या, अगदी आपली अर्धी हयात काँग्रेसमध्ये घालवूनही ज्यांना त्यांच्या हाय कमांडने देण्याची दानत दाखविली नाही अशांनाही केवळ समाजकारण हाच ध्यास उराशी बाळगलेल्या बाळासाहेबांनी सत्तेची फळे चाखण्याची संधी मिळवून दिली. अर्थात तेही संधीसाधूच निघाले. बाळासाहेबांवर सडकून टीका करण्याचं काम मीडिया अव्याहतपणे करीत आली पण त्याच मीडियामधल्या एक दोन नव्हे, तर तब्बल सहा पत्रकारांना संसदेत पाठवण्याचं धारिष्ट्य दाखवलं.
१९९५ साली शिवशाही सरकार आलं तेव्हा त्या पहिल्याच वर्षी बाळासाहेबांवर दोन कौटुंबिक आघात झाले. आधी तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना काळाने हिरावून नेलं आणि नंतर चिरंजीव बिंदुमाधव ठाकरे यांना रस्ता अपघातात प्राण गमवावे लागले.
बाळासाहेबांवर मधल्या काळात यशस्वी हृदय शस्त्रक्रियाही झाली. अनेक संकटं लीलया झेलणार्या या झुंझार सेनापतीनं १७ नोव्हेंबर २०१२ रोजी या जगाचा निरोप घेतला. १७ आणि १८ नोव्हेंबर २०१२ हे दोन दिवस केवळ मुंबई, महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या विश्वाने चमत्कार पाहिला. ज्या शिवतीर्थानं बाळासाहेबांच्या लाखोंच्या घणाघाती सभा अनुभवल्या, त्याच शिवतीर्थानं हा झुंझार सेनापती आपल्या कुशीत चिरनिद्रेसाठी विसावताना पाहिला. अरबी सागरालाही लाजवेल अशा जनसागराला आपल्या या अनभिषिक्त सम्राटाला अखेरचा जय महाराष्ट्र करताना जसा पाहिला, तद्वतच घटनात्मक सत्तेचं कोणतंही पद न भूषविणार्या पण शासकीय तोफांची अंतिम सलामी स्वीकारतानाही अवघ्या विश्वानं पाहिला. अवघी मुंबापुरी दोन दिवस एकाच जागी थांबली होती, थबकली होती, निःशब्द झाली होती. हा खर्या अर्थानं अनभिषिक्त सम्राट आणि हीच विश्वविक्रमी शिवसेना म्हणजे ‘न भूतो न भविष्यति’ असंच म्हणावं लागेल! हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महानिर्वाणानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तितक्याच सक्षमतेने शिवसेनेला पुढे नेत स्वतः मुख्यमंत्री होत सत्तेच्या कोंदणात नेऊन बसविले. राजकीय विश्लेषकांचे सर्व आडाखे मोडीत काढून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर सत्तेचे गणित जुळविताना स्वतःला वैचारिकदृष्ट्या वेगळे ठेवण्याचा बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच एक पाऊल पुढे टाकत चमत्कार घडवून आणला.
पाण्यातून मासा बाहेर काढल्यानंतर मासा जसा तडफडतो, तद्वतच सत्तेचा घास तोंडातून काढून घेतल्यामुळे राजकीय मासे तडफडताहेत. आज युवराज आदित्य रश्मी उद्धव ठाकरे हेही स्वतःला सिद्ध करून राजकीय क्षितिजावर झेपावले आहेत. हाही एक आगळावेगळा चमत्कार म्हणावा लागेल. मराठी आणि हिंदुत्व या दोन ढाली हाती घेतलेल्या आणि समर्थपणे सत्ताशकट हाकणार्या उद्धवादित्यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, यशाची सर्व शिखरे पादाक्रांत करीत सर्वसामान्य माणसाला सुगीचे दिवस आणण्यासाठी यशाची उत्तुंग भरारी घेण्याचे सामर्थ्य देवो, ही आई तुळजाभवानी, आई जगदंबा, आई एकवीरा चरणी प्रार्थना!
[email protected]
मो. 9892935321