प्रबोधनकारांचं `कोदण्डाचा टणत्कार` हे पुस्तक अनेक अर्थांनी महत्त्वाचं ठरलं. महाराष्ट्राच्या इतिहासलेखनाच्या ब्राह्मणी पद्धतीला या पुस्तकाने आव्हान दिलं. त्या पद्धतीच्या प्रामाणिकपणावरच प्रश्नचिन्ह उभं केलं.
– – –
प्रबोधनकारांच्या `कोदण्डाचा टणत्कार’ अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी` या पुस्तकाची पहिली आवृत्ती १७ नोव्हेंबर १९१८ला प्रकाशित झाली. खरं तर तेव्हा इन्फ्लुएंझाची साथ जोरात होती. तरीही इतिहासाचार्य राजवाडेंनी केलेली कायस्थांची बदनामी वेळीच मोडून काढण्यासाठी हे पुस्तक तातडीने प्रकाशित होणं गरजेचं होतं. त्यामुळे कसेतरी दोन छापखान्यांत घाईघाईत हे पुस्तक छापलं होतं. तरीही या कोदण्डातून म्हणजे धनुष्यातून निघालेल्या प्रतिवादाच्या बाणाने इतिहासाचे भीष्मपितामह आडवे झालेच.
या पुस्तकाची पहिली आवृत्ती उपलब्ध होत नाही. २५ एप्रिल १९२५ला छापलेली दुसरी आवृत्ती मात्र उपलब्ध आहे. त्यात पहिल्या पुस्तकाची ओळख करून देणारा उतारा पुस्तकात आहे. तो या पुस्तकाचं स्वरूप समजावून सांगण्यास स्वयंस्पष्ट आहे. तो असा, `श्री. केशव सीताराम ठाकरे, प्रबोधनकार यांच्या सणासण उसळ्या मारणार्या लेखणीतून महाराष्ट्रात खळबळ उडविणारे हे पुस्तक बाहेर पडले असून यांत संभाजींच्या चरित्रावर अकल्पित प्रकाश पाडणारा इतिहास, त्या काळच्या राज्यक्रांतीची मुद्देसूद निःस्पृह छाननी, बाळाजी आवजी, खंडोबल्लाळ चिटणीस, कायस्थांची स्वराज्यनिष्ठा, ब्राम्हणी वादाची स्पष्ट मीमांसा, धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत क्षत्रिय मराठ्यांची व कायस्थांची भिक्षुकशाहीने केलेली लोणकढी फसवणूक, कायस्थांच्या उत्पत्ति-स्थितीचा इतिहास, पुराणांच्या जाळ्यात सापडलेल्या जनतेचा कोंडमारा इ. क्षेत्रांत भिक्षुकांनी कसकसे नंगे नाच घातलेले आहेत, याची चित्रे खोचदार व मुद्देसूद लेखनशैलीने सप्रमाण विवेचित करून रेखाटलेली आहेत. प्रत्येक स्वाभिमानी महाराष्ट्रीयाने हा ग्रंथ अवश्य वाचावा, म्हणजे खर्या खोट्या नाण्याची पारख होईल आणि स्वराज्याच्या चळवळीची दिशा सुधारण्याचा मार्ग दिसू लागेल, असे वाटते.`
१६७ पानांच्या पुस्तकात प्रबोधनकारांनी इतिहासाचार्य राजवाडेंचा चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजावरचा बदनामी करणारा एकही आरोप सडेतोड उत्तराविना ठेवला नाही. साधार आणि तार्किक मांडणीचा उत्तम नमुनाच त्यांनी सादर केलाय. पण जातीच्या आधारावर भांडणं करण्यात आपल्याला रस नसल्याचंही त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलंय, हेही (आज त्यांच्या लेखातील अवतरणे वाचून बाह्या सरसावण्याआधी) लक्षात घ्यायला हवं. ते लिहितात, `सध्याचा काळ धार्मिक किंवा सामाजिक बाबतींत तंटे बखेडे करून राष्ट्रीय आकांक्षांना विरोध करण्याचा नव्हे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. इतकेच नव्हे तर प्राचीन हाडवैराची गाडली गेलेली भुते आपापल्या थडग्यांतून कधीकाळी पुन्हा बाहेर पडल्यास महाराष्ट्राच्या भवितव्यतेवर त्यांच्या तांडवनृत्याचा केवढा प्राणघातक परिणाम होईल, याचे भेसूर चित्र आम्हाला दिसत नाही, अशातलाही प्रश्न नव्हे. परंतु राष्ट्रैक्याची सताड पुराणे झोडणारे आमचे पुणेकर चित्पावन देशबंधूच जेव्हा इतिहास संशोधनाच्या ढोंगाखाली चांद्रश्रेणीय कायस्थ प्रभूंवर हा नवीन ग्रामण्याचा हल्ला चढविण्यात पुढाकार घेतात, तेव्हा हेच खरे देशाचे दुर्दैव नव्हे काय?`
राजवाडेंनी लिहिलेला लेख हा केवळ चित्पावन आणि सीकेपींमधल्या हाडवैराच्या मानसिकतेतून जन्माला आल्याचं प्रबोधनकार सांगतात. शिवकाळापासून या दोन सुशिक्षित समाजांत टोकाचे मतभेद आहेत. त्याचं वर्णन प्रबोधनकार एकाच वाक्यात असं करतात, `कायस्थांचे वाटोळे होण्याचा प्रत्येक प्रसंग म्हणजे पुणेरी चित्पावनांना अजूनही पुत्रजन्मोत्सव वाटत असतो.` मुळात या लेखात कायस्थ धर्मदीप हा ग्रंथ पहिल्यांदाच लोकांसमोर आणण्याचा देखावा होता. पण तो १८७२ सालीच छापण्यात आला होता. गागाभट्टाने हा ग्रंथ संकरज कायस्थ प्रभूंसाठी लिहिला होता. चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंसाठी वेगळा कायस्थप्रदीप हा वेगळा ग्रंथ लिहिला होता, असा दावा प्रबोधनकारांनी केलाय. कायस्थांच्या उत्पत्तीचे मूळ शोधण्यापेक्षा राजवाडेंनी चित्पावनांचं मूळ शोधावं, असं आव्हानही त्यांनी दिलंय.
ते आव्हान देताना, ते राजवाडेंची धुलाई करायला मागेपुढे पहात नाहीत, `राजवाड्यांच्या या बहुमोल कामगिरीचे त्यांच्या चित्पावनी हृदयाने पार मातेरे केले आहे, असे कष्टाने म्हणावे लागते. मेंढी दूध देते पण लेंड्यांनी घाण करते, असलाच हा प्रकार आहे. ते कष्टाळू संग्राहक आहेत, पण प्रामाणिक संशोधक नव्हते. ते जेव्हा संशोधकी घमेंडीने संग्रहित कागदपत्रांतील मजकुराची ठरवाठरव करू लागतात आणि चिकित्सेच्या दिमाखाने विधानांची अंडी उबऊ लागतात, तेव्हा `मोडतोड तांबापित्तल`वाल्याने केमिकल अनालायझरचे काम करण्याचा आव घालण्यासारखा मूर्खपणा त्यांच्या हातून घडत असतो. इतिहास संशोधनाचे कामी त्यांनी आजपर्यंत जो खेळखंडोबा केला, कमअस्सल कागदपत्रांना अस्सलपणाचा बाप्तिस्मा देण्यांत जी हातचलाखी दाखविली आणि एखाद्या क्षुल्लक वेलांटीच्या आधाराने गोलांटी उडी मारून सुताने स्वर्गाला जाण्याचा कसकसा आणि केव्हा केव्हा उपक्रम केला, त्याची वाच्यता करू म्हटले तर निराळाच `मंडळ धर्मदीप` लिहावा लागेल.`
चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या नावाचा अर्थ लावण्यासाठी दिलेली चंद्रसेन राजाची पुराणातली कथा ते नाकारतात. परशुरामाने मारलेल्या चंद्रसेन राजाची गरोदर राणी दालभ्य ऋषींच्या आश्रमात बाळंत झाली. त्याआधी तिचं बाळ बरेच महिने घाबरून राहिलं होतं. त्याचा वंश म्हणजे चांदसेनीय कायस्थ प्रभू समाज, अशा या कथेत काहीच अर्थ नसल्याचं प्रबोधनकार सांगतात. आपली कुळं ठरवण्यासाठी बहुजन समाजाला भिक्षुकशाहीने दिलेल्या कथा लागणं ही गुलामगिरी असल्याची टीका ते करतात. त्याविषयी त्यांचे तर्क रोखठोक आहेत, `सूर्यवंशी आणि चंद्रवंशी क्षत्रियबुवांचा अभिमान काय विचारता? ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडातून (वांतीसारखे की काय?) पडले तर यांची उत्पत्ति थेट चंद्रसूर्याच्या रेतापासून! चंद्रसूर्यांनी तरी आपल्या जन्मजात क्षत्रियपणाचे आज्ञापत्र ब्रह्ममुखजन्य किंवा ब्रह्मवांत्युप्तन्न भिक्षुकशाहीकडून मिळविले होते की नाही, हे मात्र कळत नाही. शिवाय असाही प्रश्न उद्भवतो की चंद्रसूर्याला जर पूर्वी पोरे झाली, तर त्यांच्या बायका कोण? का ब्राह्मणांच्या उत्पत्तीसाठी ब्रह्मदेवाने स्वतःकडे जसे बायकोपण घेतले, तसाच येथेही प्रकार घडला? बरें, पूर्वी पोरे झाली तर मग आताच का होत नाहीत? का चंद्रसूर्याच्या रेताचा खजिनाच आटला? का एकेका पोरापुरतेच त्यांनी कंत्राट घेतले होते? आणि एकेक पोरगाच ते प्रसविले म्हणावे तर पुढच्या वेलविस्ताराकाठी त्यांनी कोणाच्या पोरींशी लव्हाळी जमविली?`
या निरर्थक उत्पत्तीऐवजी प्रबोधनकारांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू शब्दाचा खरा इतिहास सांगितला आहे. चांद्रश्रेणी हे काश्मीरमधल्या चिनाब नदीचं मूळ नाव. त्यामुळेच कायस्थांमधे चिनूबाई हे नाव आढळतं. तिथले रहिवासी काय म्हणजे अयोध्या प्रांतात येऊन वसले, ते चांद्रश्रेणीय कायस्थ. शिवाय ते प्रभू हा राजसत्ता दाखवणारा शब्द असल्याचंही सिद्ध करतात. त्यामुळे ते कायस्थ हे चातुर्वर्णाच्या उतरंडीत क्षत्रिय असल्याचं सांगतात. त्यानंतर ते आपल्या प्रतिवादाची विषयचौकट स्पष्ट करतात, `आम्ही फक्त ऐतिहासिक मुद्द्यांपुरतेच आमच्या प्रत्युत्तराचे क्षेत्र मर्यादित केले आहे. कायस्थांच्या उत्पत्तीविषयी, रक्तशुद्धीविषयी व शूद्रत्वाविषयी राजवाड्यांनी काढलेल्या चित्पावनी प्रलापांविषयी आम्ही काही लिहू इच्छित नाही. गावभवानीच पातिव्रत्याचा दिमाख मिरवू लागली तर तिच्या बाजारबसवेपणाबद्दल कोण घासाघीस करू इच्छील?`
छत्रपती शिवरायांनी बाळाजी आवजींना चिटणिशी देण्याआधी महाराष्ट्रात चांद्रसेनीय कायस्थांचा कोणताही सामाजिक, धार्मिक, राजकीय इतिहास नसल्याचा दावा राजवाडेंनी केला होता. त्यावर प्रबोधनकारांनी उलट दावा केलाय, की चित्पावनांचा सन १७१४पूर्वीचा कसलाच इतिहास उपलब्ध नाही. मग त्यांनी इसवी सन १०८८पासूनच्या शिलालेखांवरपासून सीकेपींच्या इतिहासाच्या नोंदींची जंत्रीच दिली आहे. हे पुरावे शिलाहारांपासून जंजिर्याच्या सिद्दीपर्यंतच्या काळातले आणि महाराष्ट्राच्या विविध भागांतले आहेत. बाळाजी आवजींनी छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक वेदोक्त पद्धतीने घडवून आणल्यामुळे ब्राह्मणांनी कायस्थांचा मत्सर सुरू केला. त्यातून कायस्थाविरुद्ध ग्रामण्ये म्हणजे त्यांना वाळीत टाकण्याचे प्रयत्न झाले, असा इतिहास प्रबोधनकारांनी सांगितला आहे. कायस्थांची बाजू मांडण्यासाठी त्यांनी ग्रँड डफ आणि राजारामशास्त्री भागवत यांची साक्षही काढली आहे.
प्रबोधनकारांच्या साठीनिमित्त `नवयुग`मध्ये लिहिलेल्या लेखात आचार्य अत्रेंनी कोदण्डाचा टणत्कार या पुस्तकाविषयी लिहिलंय, `त्या निबंधात राजवाडे यांनी कायस्थ प्रभू ज्ञातीबद्दल अत्यंत असत्य, खोडसाळ आणि बदनामी करणारी अशी अनेक विधाने केलेली होती. राजवाडे यांच्या उज्ज्वल संशोधक कीर्तीला खरोखरच लांच्छन लावणारे असे ते लिखाण होते. तथापि, राजवाडे यांच्या लिखाणाविरुद्ध किंवा त्यांच्या संशोधनाविरुद्ध ब्र काढण्याचीही त्यावेळी महाराष्ट्रातल्या विद्वानांची छाती नव्हती. पण ठाकरे यांनी ते धाडस करून राजवाडे यांच्यावर पहिले हत्यार उगारले आणि अखिल महाराष्ट्रावर एक बाँबगोळा टाकला. राजवाडे यांचे हे संशोधन किती चुकीचे, द्वेषमूलक आणि हीन दर्जाचे आहे, हे दाखवून देण्यासाठी ‘कोदण्डाचा टणत्कार’ हे ज्वलजहाल पुस्तक ठाकरे यांनी लिहून राजवाडे आणि इतिहास संशोधक मंडळ यांना अक्षरशः हैराण करून टाकले. या पुस्तकातील ठाकरे यांच्या बिनतोड पुराव्याला आणि कोटिक्रमाला उत्तर देण्याची खुद्द राजवाडे यांचीदेखील प्राज्ञा झाली नाही. मान खाली घालून त्यांना आपला पराभव मुकाट्याने कबूल करणे भाग पडले.`
सीकेपी समाजावरच्या हीन आरोपांना खरं तर प्रबोधनकारांनी उत्तरंही दिली नाहीत. तरीही त्यांनी राजवाडेंचा खोटारडेपणा उघड केला. प्रबोधनकारांचा हल्ला राजवाडेंच्या आक्रमक शैलीपेक्षाही तिखट होता. त्याला राजवाडेंकडे उत्तरच नव्हतं. पण या प्रतिवादाच्या पुढे जात प्रबोधनकारांनी केलेली इतिहासाची मांडणी महत्त्वाची ठरली. कारण त्यात राजवाडे आणि त्यांच्या कंपूने छत्रपती संभाजीराजांच्या बदनामीची मांडणी मुळातून खोडून काढली आहे.