□ कुर्ल्याच्या भारत कोलची जागा मिंधे सरकारच्या मर्जीतल्या बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव; काँग्रेसचा आरोप.
■ नाहीतर सत्तेत कशासाठी आलेत ते?
□ अमृता फडणवीसांना धमकी देऊन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होता – देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन.
■ दाऊदच्या हस्तकाची मुलगी इतकी वर्षं उपमुख्यमंत्र्यांच्या अंत:पुरात वावरत होती, तर आता मुख्यमंत्र्यांनी त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्याबरोबर चहापान बंद केलंय की नाही?
□ शिक्षणमंत्री कोकणातले असूनही रत्नागिरीत शिक्षणाचा बट्ट्याबोळ.
■ तसे तर सूक्ष्म लघु पण कोकणातले आहेत, पण कोकणचो सूक्ष्म तरी फायदो झालो हा का?
□ शिंदेंनी विश्वासघात केला म्हणून त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले- कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद.
■ नव्हे, ते पद मिळवण्यासाठीच त्यांनी विश्वासघात केला सिब्बल साहेब!
□ अदानींच्या मुद्द्यावर सरकार आणि मोदी घाबरले- राहुल गांधी यांचा हल्ला.
■ वॉशिंग पावडरचा पुडाच घाणीत मळलेला आहे, हे पहिल्यांदाच लोकांसमोर येतंय ना?
□ वटवाघूळ, घुबड, गिधाडांनी येऊरचे जंगल सोडले; ध्वनिप्रदूषणामुळे पक्षी-प्राण्यांना धोका.
■ तिथे आता मानवरूपातली वटवाघळे, घुबडे आणि गिधाडे चित्कारत असतात…
□ नादुरुस्त बसेस रस्त्यावर आणण्यास कल्याण-डोंबिवली परिवहन कर्मचार्यांचा विरोध.
■ असं ठरवलं तर एक तरी बस बाहेर काढता येईल का?
□ पोलीस भरतीसाठी मुंबईत येणार्या उमेदवारांची गैरसोय.
■ नंतर नोकरीत काय भोगावं लागणार आहे, त्याचा ट्रेलर आहे तो…
□ मनीष सिसोदिया यांच्यावर सीबीआयचा आणखी एक गुन्हा दाखल.
■ म्हणजे नंतर न्यायालयात आणखी एक एक्स्ट्रा चपराक खाण्याची तयारी केली आहे तर सीबीआयने.
□ मत न देणार्यांना चपलेने मारले पाहिजे – किरण खेर.
■ तुम्हाला मत देणार्यांना तर नक्कीच तसा प्रसाद दिला पाहिजे.
□ लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांची मोठी आघाडी उभी राहणार; सपा नेते अखिलेश यादव यांना विश्वास.
■ तुम्ही ममता बॅनर्जींबरोबर स्वतंत्र चूल मांडणार, राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार, भारत राष्ट्र समितीची आणखी वेगळी तर्हा- आणि मोठी आघाडी कशी उभी राहणार?
□ राहुल गांधींच्या घरात पोलीस घुसले.
■ राहुल गांधी सत्ताधार्यांच्या असे पटात घुसले आहेत, की त्यांना अडवण्यासाठी काही ना काही रडीचा डाव खेळावा लागणारच.
□ बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमात चोरांचा ‘दरबार’; ५० लाखांचे दागिने लंपास.
■ या भोंदू बुवाने दिव्यशक्तीने चोर पकडून दिले की नाही? किमान हवेतून दागिने तरी काढून द्यायचे सगळ्यांना. हाच तिकडून सोबत टोळी घेऊन येत असेल, तर त्यातही आश्चर्य वाटायला नको.
□ भाजपला गरज नसेल तर स्वतंत्र लढणार; राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा भाजपला इशारा.
■ यांचे काही सांगता येत नाही, बायडेन यांना गरज नसेल तर ते अमेरिकेत पण स्वतंत्रपणे लढू शकतात!
□ नाशकात शिवसैनिकांचा मुख्यमंत्री शिंदेंना प्रसाद.
■ या असत्यनारायणांना तीर्थप्रसाद तर सगळीकडेच मिळणार आहे…
□ काही निवृत्त न्यायमूर्ती देशद्रोही टोळीतील आहेत. त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. : कायदामंत्री किरेन रिजिजू यांची धमकी.
■ गावगुंडांसारख्या धमक्या देणारा कायदामंत्री या देशाला लाभला, हे दुसरे दुर्दैव… पहिले आणखी मोठे आहे… आपले दिव्य सरकार म्हणजेच देश या समजातून आधी बाहेर या… नाहीतर अख्खी जनता त्या टोळीत जाईल आता.
□ राज्यात एक लाख लोकांमागे फक्त १६९ पोलीस.
■ त्यातले राजकीय पुढार्यांच्या आणि गावगणंगांच्या बंदोबस्ताला किती जुंपले जातात, ते पाहता सर्वसामान्यांसाठी किती उरत असतील?
□ कमळाबाईने मिंधेंच्या हातात दिला बाबाजी का ठुल्लू, विधानसभा निवडणुकीत अवघ्या ४८ जागा देणार.
■ प्रत्यक्ष निवडणूक येईल तेव्हा चार आठ दिल्या तरी पुष्कळ आणि त्यातलीही एखादी निवडून आली तरी जल्लोषच करायला हवा मिंध्यांनी!
□ अदानी प्रकरणात पुरावे असतील, तर कोर्टात जा : गृहमंत्री अमित शाह.
■ हातात कसलेही पुरावे नसताना जे सरकार ईडी आणि सीबीआयचे भुभू विरोधकांवर सोडतं आणि नंतर न्यायालयात हमखास कानपिचक्या खातं, त्या सरकारचे गृहमंत्री हे ग्यान देताहेत… कलियुग कलियुग म्हणतात ते हेच!
□ बार्शीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डोळे फोडले, बोटे छाटली.
■ पण, आरोपी काही विशिष्ट धर्माचे नाहीत, त्यामुळे कुठे काही खळबळ नाही. नाहीतर एव्हाना सगळा देश डोक्यावर घेतला असता सगळ्या गोदी मीडियाने.