• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

टॅटूच्या आभाळातले मराठमोळे पतंगे!

- संदेश कामेरकर (धंदा म्हणजे काय रे भाऊ!)

Nitin Phanse by Nitin Phanse
March 23, 2023
in धंदा म्हणजे काय रे भाऊ!
0
टॅटूच्या आभाळातले मराठमोळे पतंगे!

एक दिवस मोबाईलवर कॉल आला, मैं सलमान बोल रहा हूँ… मी विचारलं, कोण सलमान, उत्तर आलं, सलमान खान, बांद्रा से. तरी मला कळलं नाही. मी विचारलं, अ‍ॅक्टर सलमान खान बोल रहे हैं?, पलीकडून उत्तर आलं, हां. सलमानला बेली पियर्सिंग करायचं होतं. कानाला टोचण्याचं काम सोनार करतात, पण बेंबी टोचणे हे विशेष स्किलचं काम असतं. काम कसं करणार, याची चर्चा करून ते काम माझ्याकडून करून घेतलं. ती बेली पियर्सिंग सलमानने अजूनही ठेवलेली आहे. इथे माझी बॉलीवुडमधे एन्ट्री झाली.
– – –

अनेक फॅशन ट्रेंड्स आले गेले, पण टॅटूची चलती कायम आहे. देवाचं नाव, स्वतःचं नाव, प्रिय व्यक्तीचं नाव ते निरनिराळी रेखाटनं, असा या टॅटूगिरीचा प्रवास आहे. बांद्रा पश्चिम येथील क्रेयॉन्ज टॅटू स्टुडिओ हे सेलिब्रिटी आणि तरुणाईची वर्दळ असलेलं ठिकाण. या स्टुडिओचे जनक आहेत मराठमोळे समीर पतंगे.
पतंगे यांचा जन्म परळचा. आईवडील, पाच वर्षांनी मोठा भाऊ आणि पाच वर्षांनी लहान बहीण असं छोटं आणि सुखी कुटुंब. वडील दत्तात्रेय पतंगे मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये लेबर इन्स्पेक्टर होते. वडिलांची तिन्ही मुलांनी सैन्यात जाऊन देशाची सेवा करावी, अशी होती. मोठा भाऊ सैन्यात गेला तेव्हा त्यांचं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. त्यांच्या दुर्दैवाने म्हणा किंवा समीर यांच्या सुदैवाने म्हणा, समीरना लहान वयातच चष्मा लागला त्यामुळे एअरफोर्समध्ये जाणं रहित झालं. सेंट पॉल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मुक्त विचारांच्या कॅथलिक मुलांसोबत त्यांचे विचार जुळले. त्यांच्यासोबत राहून समीरनाही पाश्चात्य संगीतात रुची निर्माण झाली. ब्रायन अ‍ॅडम्स, बॉन जोवी, गन्स अँड रोजेस यांचा हार्ड रॉक बँड, मेटालिका या हेवी मेटल बँडची गाणी त्यांना आवडत होती. या गाण्यांमध्ये व्यवस्थेविरोधात राग होता. तेथील तरुण पिढी या गायकांच्या गाण्यांची, कपड्यांची आणि अंगावर काढलेल्या टॅटूचे अनुकरण करायची. हेच पाश्चात्य लोण तेव्हा भारतात प्रवेश करत होतं. समीर मुक्त विचारांच्या मुलांसोबत मैत्री करतोय, तर वाईट मार्गाला जाऊन, ड्रग्सच्या आहारी तर जाणार नाही ना अशी भीती घरच्यांना कायम असायची. पण समीर यांचा ग्रूप वाया गेलेला नव्हता. याच मुलांसोबत त्यांना त्यांचा पहिला व्यवसाय मिळाला.
समीर सांगतात, या मुलांच्या बँडबरोबर फिरताना मला लग्नाच्या हॉलमध्ये लाऊडस्पीकर पोहोचवण्याच काम मिळालं, एका दिवसाचे दोनशे रुपये मिळायचे. चित्रकला चांगली असल्यानं चाळीतील अनेक मुलं मुलींना मी टी-शर्टवर डिझाईन पेंट करून द्यायचो. यामुळे वयाच्या तेराव्या वर्षापासून मी स्वतःचा खर्च स्वतः भागवायला लागलो. दहावीच्या परीक्षेनंतरच्या सुटीत एका मित्राने सांगितलं की मी उद्या हातावर टॅटू काढायला व्हीटीला जाणार आहे, तू मला एक डिझाईन काढून दे. तोपर्यंत टॅटू मी फक्त एमटीव्हीवर लागणार्‍या इंग्रजी गाण्यांमध्येच पाहिले होते. मी एका कागदावर डिझाईन काढून दिलं. मित्राने सांगितलं, भारतात फक्त डॉक्टर जहांगीर अर्देशीर कोहियार हे पारशी गृहस्थ टॅटू काढतात. ते व्यवसायाने मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यांना कलेची आवड असल्यामुळे त्यांनी लंडनहून टॅटू काढण्याची कला शिकून घेतली होती. दुसर्‍या दिवशी आम्ही फोर्ट विभागातील नवसारी चेंबर्समधील डॉक्टरांच्या क्लिनिकमधे पोहचलो. क्लिनिकमध्येच एका छोट्याशा जागेत टॅटू स्टुडिओ उभारला होता. मित्राने डॉक्टरांकडे डिझाईनचा पेपर देऊन त्याप्रमाणे टॅटू काढायला सांगितलं. त्यांनी विचारलं, ‘हे इतकं छान डिझाईन कोणी काढलंय?‘ मित्र म्हणाला, हे समीरने काढलंय. डॉक्टरांनी विचारलं तू काय करतोस? मी म्हणालो, नुकतीच बोर्डाची परीक्षा दिलीय. ते म्हणाले तू माझ्याकडे शनिवार-रविवारी काम कर. चित्रे काढून दे. मी दिवसाचे दोनशे रुपये देईन. त्यावेळी मला महिन्याला दीडशे रुपये पॉकेटमनी मिळायचा. त्यापेक्षा दिवसाचा रोजगार जास्त होता. महिन्याला सोळाशे रुपयांची कमाई होती. मी उत्साहाने घरी सांगितलं. पण बाबा भडकले, ‘आपल्याकडे असलं काही चालत नाही.‌‌ आधीच तू उनाड मुलांसोबत फिरतोस, आता असले उद्योग करून आमचं नाक कापू नकोस.’ तेव्हा मला खूप राग आला, वाटलं, स्वावलंबी होण्याची खूप चांगली संधी यांच्या बुरसटलेल्या विचारांमुळे वाया चालली आहे. पण घरच्यांच्या विरोधापुढे मी हात टेकले.
समीरनी अकरावीला रिझवी कॉलेजमध्ये कॉमर्स अ‍ॅडमिशन घेतलं, पण पुस्तकी शिक्षणात मन रमत नव्हतं. कॉमर्स हे आपलं क्षेत्र नाही, हे माहिती होतं. सगळीकडून कोंडमारा होत होता, एक दिवस त्यांनी ठरवलं की आता बास झालं. यापुढे आपल्याला आवडेल तेच करायचं.
मी घरात न सांगता एके दिवशी दंडावर टॅटू काढायला डॉक्टरांकडे गेलो, समीर सांगू लागले, डॉक्टर म्हणाले, सहा महिन्यापूर्वी तूच आला होतास ना? माझी ऑफर अजूनही तशीच आहे. मी टॅटू काढून घरी गेलो, पण घरी सांगण्याची हिंमत होत नव्हती. एक आठवडा मी टॅटू लपवून ठेवला. एक दिवस झोपेत टीशर्टची बाही वर सरकली आणि टॅटू बाबांना दिसला. त्यांनी कमरेत लाथ घातली, मी पलंगावरून खाली पडलो. शेलक्या शिव्या घालत वडील म्हणाले, चालता हो माझ्या घरातून. मी गुपचूप बॅग उचलली आणि घराबाहेर पडलो. दोन दिवस एका मित्राच्या घरी जाऊन राहिलो. मी परतलो नाही म्हणून घरात शोधाशोध सुरू झाली. एक मित्र म्हणाला, अरे, तुझे बाबा तुला सगळीकडे शोधतायत, ते बघ खाली आले आहेत. मी खाली उतरलो आणि बाबांना विचारलं, कोणाला शोधताय? त्यांनी काही न बोलता माझ्या कानाखाली एक सणसणीत ठेवून दिली आणि म्हणाले, चल घरी मुकाट्याने. मी त्यांच्या मागोमाग घरी गेलो. आई म्हणाली, आम्ही रागाने बोललो, म्हणून कोणी घर सोडून जातं का? मी म्हटलं, एका अटीवर घरात थांबेन, मला माझ्या आवडीचं काम करू द्या. मला टॅटू आर्टिस्टकडे नोकरी करायची आहे. तेव्हा, स्वतःवर टॅटू काढायचे नाहीत, अशी अट बाबांनी घातली. मी हो म्हणालो आणि टॅटूच्या दुनियेत माझा प्रवेश झाला.
त्यावेळी ठराविक पद्धतीने टॅटू काढले जायचे. त्यात वेगळेपण आणण्याच्या दृष्टीने डॉक्टरांनी समीरला परदेशी मॅगझिन्स वाचायला दिली. त्यातील फोटोवरून प्रेरणा घेऊन टॅटू काढण्याच्या दृष्टीने समीर चित्रे काढायचे. डिझाईनच्या वेगवेगळ्या प्रतिकृती तयार करून फोल्डरमध्ये ठेवणे आणि ग्राहकांना डिझाइन्स दाखवून आम्ही असे टॅटू काढतो हे काम करणारा आर्टिस्ट कम सेल्समन म्हणून कामाची सुरुवात झाली. वर्ष होऊन गेलं. सुरुवातीला प्रचंड विरोध करणार्‍या आईवडिलांनी नंतर आयुष्यभर पाठराखण केली. कॉमर्समध्ये मात्र समीरचं मन रमत नव्हतं. एका मित्रानं सांगितलं, रचना संसदमध्ये प्रयत्न करून बघ. फाईन आर्ट्सचा वर्ग सुरू होऊन चार महिने झाले होते. समीर तिथल्या प्राजक्ता मॅडमना भेटले, त्या प्रिन्सिपलकडे घेऊन गेल्या. त्यांना चित्रकला आवडली. बॅकलॉग भरून, चांगलं काम करेन, या अटीवर समीरला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. नशिबाने कॉलेजलाही शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे शिक्षण आणि टॅटू डिझाईनचं काम एकाच वेळी सुरू ठेवता आलं.
टॅटू बनवायला पाच सुया एकत्र करून त्याची एक सुई बनवणे, विविध रंगांच्या शाईच्या बाटल्या लावून ठेवणे आणि मशीनचा पूर्ण सेटअप समीर करायचे. मात्र, प्रत्यक्ष टॅटू कसे काढले जातात हे त्यांना माहीत नव्हतं आणि माहिती करून घ्यावंसं वाटलंही नाही. या क्षेत्राकडे ते फक्त पॉकेट मनीच्याच दृष्टीने पाहत होतो. एक दिवस अचानक डॉक्टरांनी समीरना सांगितलं, टॅटू कला शिकून हा व्यवसाय पूर्णपणे तूच चालव. डॉक्टर वयोमानामुळे त्यातून निवृत्त होण्याचा विचार करत होते. त्यांनी उत्तराधिकारी नेमण्यासाठी नेमलेली माणसं त्यांच्या कसोट्यांवर खरी उतरत नव्हती. कोणतंही काम मन लावून करण्याच्या गुणांमुळे समीरला टॅटू कला शिकण्याची संधी मिळाली. त्यांनी डॉक्टरांना गुरू मानलं. त्यांनी टॅटू काढण्याची प्रोसेस शिकवायला सुरुवात केली. समीर म्हणतात, थिअरी समजून घेतली, पण माझ्यासारख्या नवख्या आर्टिस्टकडून आपल्या अंगावर टॅटू काढून घेण्याची रिस्क कोणता ग्राहक घेईल, हा प्रॅक्टिकल प्रश्न होता. एका जवळच्या मित्राला कन्व्हिन्स करून स्टुडिओत घेऊन आलो.
व्हॅसलिन, स्पिरीट, सुया, ग्रीन सोप, शाईच्या बाटल्या, आणि मशीन अशी सगळी तयारी मी आधीच करून ठेवली होती. टॅटू सुई मित्राच्या दंडात टोचली, एक रेष ओढली आणि मी पूर्ण ब्लँक झालो. मला कळेच ना की पुढे काय करायचंय. कागदावर चित्र काढणं आणि जिवंत माणसाच्या अंगावर चित्र काढणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाचं वय, रंग, शारीरिक ठेवण याचा अभ्यास करून सुई किती आत जाईल, ती कशी फिरेल हे ठरवावं लागतं. लोक साधं इंजेक्शन घ्यायला घाबरतात, इथे तर सुई शरीरात खूप वेळ टोचून चित्र काढायचं होतं. मला हे जमेल का या विचाराने हातातून नीडल पुढे जातच नव्हती. नशिबाने डॉक्टर बाजूलाच उभे होते. त्यांनी मला थांबवलं. सुई मित्राच्या स्किनमधून काढताना रक्ताचा ओघळ आला. रक्त पाहून मला कसंतरीच झालं. डॉक्टरांनी मला धीर दिला, म्हणाले, पहिल्याच प्रयत्नात कोणी यशस्वी होत नाही, तू प्रयत्न करत राहा. त्या प्रसंगानंतर डॉक्टर काम कसं करतात हे लक्षपूर्वक पाहायला लागलो. कॉन्फिडन्स वाढल्यावर एकदोन मित्रांना टॅटू काढून दिला, तेव्हा हे काम मला जमू शकेल असं वाटायला लागलं.
एके दिवशी संध्याकाळी स्टुडिओ बंद करत असताना एक मुलगी आली आणि म्हणाली की मला उद्या सकाळी फॉरेनला जायचं आहे, मला आत्ताच्या आत्ता माझ्या उजव्या खांद्यावर एक टॅटू करून हवा आहे. मी सांगितलं आमचे मुख्य आर्टिस्ट रजेवर आहेत आणि मी नवीन आहे. ती म्हणाली, मी रिस्क घ्यायला तयार आहे. आमच्या बुकमधला हसर्‍या सूर्याचा फोटो तिने निवडला. नशिबानं टॅटू चांगला झाला, तिलाही खूप आवडला. दुसर्‍या दिवशी डॉक्टर स्टुडिओमध्ये आल्यावर मी घाबरत त्यांना म्हणालो, तुमची परवानगी न घेता काल मी एका मुलीला टॅटू काढून दिला. त्यांनी विचारलं, कसा झाला टॅटू? मी म्हटलं, त्या मुलीला आवडला. त्यावर ते म्हणाले, व्हेरी गुड! आजपासून माझं काम तूच करत जा मी बॅकसीट घेतो. येणार्‍या पैशांत ऐंशी टक्के त्यांचे आणि वीस टक्के माझे असा व्यवहार ठरला. त्या दिवसानंतर खर्‍या अर्थानं मी पूर्णपणे या व्यवसायाला वाहून घेतलं.
वर्ष होतं २००१. त्या काळात आमचा टॅटू स्टुडिओ भारतात एकमेव असल्याने लोक आम्हाला शोधत यायचे. मी कामाला लागलो तेव्हा आठवड्यातून तीन लोक येत असत, मी टॅटू काढायला लागल्यानंतर ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली. मी सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत काम करायचो. डिझाईन बनवणे, निडल बनवणे, निडल स्टेरिलाइझ करणे हे सगळं मी करायचो. या कामात काय नावीन्य आणता येईल याचा रोज विचार करायचो. टॅटू करताना रक्ताशी संबंध येतो. ग्राहक आणि आर्टिस्ट दोघांनाही संक्रमणाची भीती असते. मी ग्लोव्हज घालायला सुरुवात केली.
टॅटू मशीन वापरण्याच्या पारंपरिक पद्धतीत अनेक बदल केले. तेव्हा ठराविक पॅटर्नच्या ओल्ड स्कूल डिझाइन्सचेच टॅटू काढले जायचे. डॉक्टर हौस म्हणून या क्षेत्रात आले असल्याने त्यांच्या कलेला मर्यादा होत्या; पण मी कलाशाखेचा विद्यार्थी असल्यामुळे फाईन आर्ट्सपासून ते रियलिझमपर्यंत सगळे फंडे वापरून टॅटूमधे प्रयोग करायचो. या प्रयोगांना तरुण पिढीने खूप चांगला प्रतिसाद दिला. मी टॅटू कलेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी फॅशन इंडस्ट्री, कॉर्पोरेट इव्हेंट्सना भेटी देऊ लागलो. आतापर्यंत बोटीवर जाणारे खलाशी आणि हिप्पी लोक हा माझा ग्राहकवर्ग होता, तो माझ्या प्रयत्नाने तरुण मुलं, फॅशन इंडस्ट्रीमधील मॉडेल्स असा होऊ लागला. बॉम्बे टाइम्स आणि अन्य सर्व इंग्रजी माध्यमांनी वेगळ्या क्षेत्रातील तरुण उद्योजक अशी माझी दखल घेतली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये भारतातील सर्वात तरुण टॅटू आर्टिस्ट म्हणून माझं नाव आलं.
अशातच एक दिवस मोबाईलवर कॉल आला, मैं सलमान बोल रहा हूँ… मी विचारलं, कोण सलमान, उत्तर आलं, सलमान खान, बांद्रा से. तरी मला कळलं नाही. मी विचारलं, अ‍ॅक्टर सलमान खान बोल रहे हैं?, पलीकडून उत्तर आलं, हां हां, वही. आप समीर हो ना, कल मैं काम से व्हीटी आ रहा हूँ. अगर आप कल फ्री हो तो बारा बजे मिलता हूँ. मी दुसर्‍या दिवशी सकाळी स्टुडिओत जाऊन सगळी तयारी केली. सलमानला बेली पियर्सिंग करायचं होतं. कानाला टोचण्याचं काम सोनार करतात, पण बेंबी टोचणे हे विशेष स्किलचं काम असतं. सलमान एक वाजता बहिणीसोबत आला, काम कसं करणार, नंतर काय काळजी घ्यायची, याची चर्चा करून ते काम माझ्याकडून करून घेतलं. ती बेली पियर्सिंग सलमानने अजूनही ठेवलेली आहे. इथे माझी बॉलीवुडमधे एन्ट्री झाली. काही दिवसांनी संजय दत्त स्टुडिओत येऊन टॅटू काढून गेला.
काम वाढत होतं. पण डॉक्टर आणि समीर यांच्यात कामाच्या पद्धतीवरून मतभेद निर्माण झाले. डॉक्टरांनी प्रस्ताव दिला, आता आपण एकत्र काम करणं थांबवू या, तू तुझं स्वतंत्र काम कर. समीरना धक्का बसला. पण हेच प्रारब्ध आहे असं समजून ते पुढच्या प्रवासाला लागले. साल होतं २००४. समीरचा त्यांच्या कलेवर विश्वास होता. उपाशी मारणार नाही याची खात्री होती. तनय गज्जर या साऊंड रेकॉर्डिस्ट मित्राने त्याच्या रेकॉर्डिंग स्टुडिओमधील छोटीशी जागा त्यांना दिली. तिथं काम सुरू केलं. सुरुवातीपासून चांगला प्रतिसाद मिळाला. पण लहानशा जागेत मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी यायला कचरत असत म्हणून समीर यांनी त्यांच्या घरी जाऊन सर्व्हिस द्यायला सुरुवात केली. त्याचबरोबर हिंदी सिनेमांमध्ये फेक टॅटू काढायचं कामही मिळू लागलं. त्यात आलिम हा प्रख्यात हेअर ड्रेसर त्यांचा मित्र बनला. त्याच्यासोबत बोलताना, एक दिवस आपला मोठा अद्ययावत स्टुडिओ असेल, आपण या क्षेत्रात कसे बदल करू, अशा भविष्याच्या गप्पा ते मारत होते. मागे मेकअप करत असलेल्या सुनील शेट्टीच्या कानावर ते बोलणं पडलं. तो समीरना म्हणाला, मी तुम्हाला फंडिंग करतो. आपण पार्टनरशिपमध्ये हा बिझनेस करू. बांद्रा, कार्टर रोडला हाकिम आलिम हे सॅलॉन सुरू झालं. त्यात समीरच्या टॅटू स्टुडिओसाठी एक वेगळी जागा तयार करण्यात आली. कल्पकतेला पैशाचं पाठबळ मिळाल्यावर समीर यांनी हा स्टुडिओ अद्ययावत उपकरणांनी सुसज्ज करून घेतला.
हायड्रॉलिक चेअर आल्या, ड्रॉइंग बोर्डला खालून लाईट आले, मोक्याची जागा, हाय फाय इंटेरियरमुळे सोशल स्टेटस वाढलं. कामाचे चार्जेस वाढवले. इथेही अनेक सेलिब्रेटींनी समीरकडून टॅटू काढून घेतले. संजय दत्त, के. एल. राहुल यांच्यासोबत तर चांगली मैत्री झाली.
समीर म्हणतात, या लोकांसोबत काम करताना जाणवतं की ही माणसं इतरांना आदर देतात. मी स्वतंत्र काम करत असलो तरी आलिम यांच्या जागेत माझा स्टुडिओ होता. मीडियाला फक्त माझा इंटरव्ह्यू हवा असायचा तेव्हा ते मध्ये येऊन हजेरी लावत. हळुहळू त्यांनी मला जाचक अटी घालायला सुरुवात केली. फारच असह्य झाल्यावर मी तेथून बाहेर पडलो. २००५मध्ये सुरू केलेला स्टुडिओ अडीच वर्षात सोडला. नुकताच कांदिवलीला फ्लॅट आणि कार विकत घेतली होती. नवीन जागा घ्यायला हातात पैसे नव्हते. तेव्हा निलेशने मला त्याची जागा भाडे न घेता वापरायला दिली. टॅटू काढण्याचं सामान माझ्याकडे होतं, पण खुर्च्या, टेबल, लँप, हे सगळं मी घरातून घेऊन आलो. नशिबाने ग्राहकांसाठी अशी जुळवणी करावी लागली नाही. पहिल्या दिवसापासून ग्राहक येत गेले. यावेळी मी ठरवलं होतं की यापुढे कुणासोबत काम करायचं नाही, जे करायचं ते स्वतःच्या बळावर. मी तिसर्‍यांदा शून्यातून सुरुवात करत होतो. नाव काय द्यावं याचा विचार सुरू होता. त्यावेळी इंक अँड आर्ट, ब्लड इंक अशी नावे प्रचलित होती, मला मात्र माझ्या प्रवासाला साजेसं नाव द्यायचं होतं. मी विचार केला, आपण आज सुयांनी रेखाटन करत असलो तरी चित्रकलेची सुरुवात झाली होती क्रेयॉन्सने. मग हेच नाव व्यवस्ाायाला द्यायचं ठरवलं. ‘क्रेऑन्झ टॅटू स्टुडिओ‘.
आमची जागा लहान असूनही ग्राहक किंवा सेलिब्रिटींनी या गोष्टीची कधीही तक्रार केली नाही, उलट झकास गप्पांची मैफिल जमायची. हृतिक रोशन एकदा अपॉइंटमेंटच्या तासभर आधी आला. माझं काम सुरू होतं म्हणून तो शांतपणे वाट बघत बसला. मीही काम सुरू ठेवलं. पण ज्याच्या हातावर टॅटू काढणं सुरू होतं, तो हृतिकला समोर पाहून बसल्या जागी कोलांट्या घेत होता. मी माझ्या कामाच्या जागेत खूप कंफर्टेबल असतो, इथे मला उत्तम कल्पना सुचतात आणि मी मनाजोगं काम करू शकतो, त्यामुळे मी कुणाच्याही घरी जाऊन काम करणं टाळतो. अपवाद फक्त जेव्हा सुरक्षेच्या कारणास्तव कुणी सेलिब्रिटी येऊ शकत नसेल तेव्हा. निलेशच्या जागेत कोविड काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्य नव्हतं, त्यामुळे मग आम्ही सध्याच्या जागेत स्थलांतर केलं. गंमत म्हणजे २५ वर्षांत व्यवसायाच्या जागा बदलल्या पण २० वर्षांपासून मोबाईल नंबर एकच आहे. त्यामुळे विश्वासार्हता टिकून राहते. टॅटूमध्ये ट्रेंड्स खूप येत गेले. सुरवातीला अगदी छोटासा ठिपका, नाव, मग दोन तीन इंचाचे नाव असं करत करत आता हातभर, अंगभर टॅटू असा ट्रेण्ड आहे. त्रिमितीय रंगीत टॅटू सध्या जास्त पसंत केले जातात. लँडस्केप पॅचवर्क असे खूप प्रकार यात आहेत. २०११ साली टॅटू आर्टिस्टच्या संमेलनाला सिंगापूरला गेलो, तेव्हा जगभरातील टॅटू आर्टिस्ट काम कसं करतात हे पाहिलं. मशीनवरची हाताची पकड, अँगल, बैठक, विशिष्ट शाई आणि यामुळे होणारं अगदी फाइन काम, हे बघून मी भारावलो. त्यानंतर मी स्वतःला डेव्हलप करत गेलो. आता माझी स्वत:ची स्टाईल आहे. दहा आर्टिस्टनी सारखाच टॅटू बनवला तरी त्यातील माझ्या टॅटूचं वेगळेपण ओळखता येईल. दोन हजार रुपयांपासून ते अगदी दोन लाखापर्यंतचे टॅटू मी बनवले आहेत. एक छोटा टॅटू बनवायला साधारण दोन तास लागतात, तर खूप डिटेल काम असेल, तर बर्‍याच सिटिंग्ज असतात, काही वेळा वर्षे देखील लागू शकतात. स्वतःला अपडेट करण्यासाठी, टॅटू काढण्यासाठी आणि टॅटू गॅदरिंगच्या निमित्ताने मी जगातल्या बहुतेक देशांत प्रवास केला आहे. भारतात दर महिन्याला एखाद्या राज्यात प्रवास सुरू असतो. हा प्रवास, मिळालेलं यश सोशल मीडियावर टाकून मी इंडिरेक्ट मार्वेâटिंग करत नाही. मी माझ्या कामातून बोलतो. मी जगभरात फिरतो तेव्हा आपल्या देशाचा प्रतिनिधी असतो. आजही मी स्वतःला नव्या पिढीचा समजतो. तरूण पिढीची कामाची पॅशन, डेडिकेशन यातून मला रोज नवीन गोष्टी शिकता येतात. दीपक तावडे, राज कदम ही मराठी मुलं अनेक वर्षांपासून माझ्यासोबत आहेत. गेल्या २५ वर्षात अनेक मराठी मुलांनी माझ्याकडे शिकून व्यवसाय उभारला. अनेक कॉलेजमित्रांना माझ्यासोबत काम करायला सांगायचो, पण त्यांना टॅटू इंडस्ट्री इतकी मोठी होईल, तिला ग्लॅमर मिळेल, याचा अंदाज नव्हता. तेच मित्र आज भेटल्यावर तेव्हा योग्य निर्णय घेतला नाही म्हणून पस्तावतात.
समीर पतंगे यांनी योग्य वेळी या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला, आणि काळानुसार बदलत गेलो हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

Previous Post

टपल्या आणि टिचक्या

Next Post

माकडांचं शेपूट कापून माणूस…

Next Post

माकडांचं शेपूट कापून माणूस...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.