मार्च १९७३मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली. त्याआधी मुंबईत मुस्लीम लीगचे खंडवानी यांनी महानगरपालिकेत वंदे मातरम् म्हणण्यास नकार दिला होता. वंदे मातरम् प्रकरणामुळे वातावरण तापले होते. काँग्रेस या प्रकरणावर मूग गिळून बसली. मग शिवसेनेच्या हातात भावनांना हात घालणारा हा राष्ट्रगीतप्रेमाचा मुद्दा मिळाला. निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा गाजला. वंदे मातरम् न म्हणणार्या व त्यांना पाठीशी घालणार्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेनाही सज्ज झाली.
काँग्रेसने या महानगरपालिका निवडणुकीत सर्व १४० जागांवर उमेदवार दिले. त्यावेळीस बाळासाहेबांनी ‘मार्मिक’मध्ये ‘आम्हाला खात्री आहे’ या अग्रलेखात म्हटले आहे की, आम्ही केलेले कर्म, समाज प्रबोधन, अन्यायाविरुद्ध उठवलेले आवाज आणि राष्ट्रवादी भूमिका हे सर्व जनतेच्या चरणी अर्पण केले आहे. या अग्रलेखात त्यांनी शिवसेनेच्या विजयाची खात्री दिली होती. निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ४५, शिवसेना ३९, जनसंघ १५, समाजवादी ८, अपक्ष व इतर ३३ नगरसेवक असे चित्र होते. निवडणुकीचे निकाल शिवसेनेला अनुकूल लागले. मग शिवसेनेने महापौरपदाची निवडणूक लढवण्याचे ठरवले. महापौरपदाच्या निवडणुकीत सेनेतर्फे सुधीर जोशी तर काँग्रेसतर्फे बी. डी. झुटे हे रिंगणात उतरले. शिवसेनेचे सुधीर जोशी यांना पहिल्याच फेरीत ७६ तर काँग्रेसच्या बी. डी. झुटे यांना अवघी २५ मते मिळाली. सुधीरभाऊंचा विजय झाला. मुंबईच्या महापौरपदी अवघे ३३ वर्षीय तरुण, तडफदार, सुशिक्षित व सुसंस्कृत सुधीर जोशी विराजमान झाले. त्यावेळी ‘झुटे हरले, सच्चे जिंकले’ अशा मथळ्याच्या बातम्या मराठी वृत्तपत्रांतून झळकल्या होत्या.
‘माझी जीवनगाथा’चे प्रकाशन
प्रबोधनकार ठाकरे यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा सांगणारे पुस्तक म्हणजे ‘माझी जीवनगाथा’. ‘माझी जीवनगाथा’ आणि ‘उठ मर्हाठ्या उठ’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन तरुण महापौर सुधीर जोशी यांच्या शुभ हस्ते झाले. या वर्षाची ही महत्त्वाची घटना होय. त्यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. प्रा. धों. वि. देशपांडे, श्री. शं. नवरे, प्रा. अनंत काणेकर, डॉ. हेमचंद्र गुप्ते, धनंजय कीर, स्वतः प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे, सोमय्या पब्लिकेशनचे शांतीशेठ सोमय्या आदी उपस्थित होते. या प्रकाशन समारंभाचे वैशिष्ट्य असे की त्याचे सूत्रसंचालक-निवेदक खुद्द बाळासाहेब ठाकरे होते. वयाच्या ८९व्या वर्षी प्रबोधनकारांनी तब्बल ४० मिनिटे भाषण केले. पत्रकार नारायण आठवले, मनोहर जोशी आणि प्रमोद नवलकर हे प्रवेशद्वाराजवळ पाहुण्यांचे स्वागत करीत होते. दृष्ट लागेल असा हा ऐतिहासिक पुस्तक प्रकाशन सोहळा होता. या सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. ‘माझी जीवनगाथा’ची प्रत विकत घेणार्या पहिल्या दहा वाचकांपैकी मी एक होतो. तेव्हापासून जपून ठेवलेली ती प्रत आजही माझ्या संग्रही आहे.
सप्टेंबरमध्ये पुस्तक प्रकाशन झाले आणि नोव्हेंबरमध्ये प्रबोधनकारांचे देहावसान झाले. अवघ्या दोन महिन्यानंतर ठाकरे कुटुंबावर व शिवसैनिकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. २० नोव्हेंबर १९७३ रोजी दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी कलानगर, वांद्रे येथे त्यांचे निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे शिल्पकार, बंडखोर समाजसुधारक, झुंजार पत्रकार, प्रभावी वक्ते, नाटककार असे अष्टपैलू व्यक्तिमत्व लाभलेले प्रबोधनकार ठाकरे यांना सर्वच वर्तमानपत्रांनी आदरांजली वाहिली. ‘मार्मिक’मध्ये बाळासाहेबांनी ‘प्रबोधनकार गेले’ या अग्रलेखात आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘प्रबोधनकार गेले, आम्ही दादा गेले असे म्हणत नाही. कारण ते जाण्याने केवळ आम्ही पोरके झालो असे नाही. दादा फक्त आमचे नव्हते तर ते सगळ्या महाराष्ट्राचे होते. त्यांनी कधी स्वतःच्या मुलाबाळांचा विचार केला नाही. त्यांनी सार्या मराठी समाजाचा विचार केला. त्यासाठी ते झुंजले, झिजले. त्यांच्या जाण्याने जन्मदाता पिता गेल्याचे दुःख आम्हाला होईल, पण या महाराष्ट्रातील लक्षावधी माणसानांही आज आपले छत्र गेले हे दुःख झाल्याशिवाय राहणार नाही.’ शिवसेना स्थापन करण्यात, शिवसेनेच्या जडणघडणीत प्रबोधनकारांचा सिंहाचा वाटा होता. प्रबोधनकारांच्या निधनाने शिवसैनिकांना अतीव दुःख झाले. शिवसेनेचा आधारवड कोसळला, अशा काहीशा भावना शिवसैनिकांच्या झाल्या.
केंद्रात व राज्यात काँग्रेसचे सरकार होते. १९७३मध्ये महागाई आकाशाला भिडली होती. या महागाईविरुद्ध शिवसेनेने तीव्र आंदोलन केले. मुंबई-पुणे येथील आवश्यक वस्तूंची ने-आण करणारा ट्रक अडवून त्यातील अन्नधान्य गरीबांना वाटले. गहू, तांदूळ, डालडा व्यापार्यांच्या दुकानावर/गोदामावर धाडी टाकून सामान्य जनतेला स्वस्त दरात अन्नधान्य मिळवून दिले. एवढेच काय, पण मटणविक्री दुकानासमोर शिवसैनिकांनी आंदोलन केले आणि मटणाचे भाव खाली आणले. नफेखोर व्यापार्यांना धडा शिकवा असा आदेश शिवसेनाप्रमुखांनी दिल्यामुळे व्यापार्यांची त्रेधातिरपीट उडाली. शिवसेनेच्या या आंदोलनामुळे जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी झाले.
दरम्यान सीमावासीयांच्या लढ्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन केंद्राशी दोन हात करण्यास तयार झाले होते. त्याचाच एक भाग म्हणून आणि केंद्र सरकारचे डोळे उघडावे म्हणून शिवसेनेतर्फे १८ डिसेंबर १९७३ रोजी मुंबई बंदची हाक देण्यात आली. ७० ते ९०च्या दशकात शिवसेनेने पुकारलेल्या प्रत्येक बंदच्या वेळी मुंबईतील कामकाज पूर्णपणे ठप्प असायचे.
याचवर्षी शिवसेनेत संघटनात्मक मोठी घटना घडली. शिवसेनाप्रमुखांनी संघटक प्रमुखपद रद्द करून शिवसेना कार्यकारी मंडळाची स्थापना केली. डॉ. हेमचंद्र गुप्ते, दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, माधव देशपांडे, शाम देशमुख, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी, दत्ता प्रधान आणि लिलाधर डाके हे कार्यकारी मंडळाचे सदस्य होते. ते मंडळ शिवसेनाप्रमुखांचे तसेच संघटनेचे सर्व आदेश सर्वतोपरी अंमलात आणण्यात कटिबद्ध असतील, असे निवेदन शिवसेनाप्रमुखांच्या सहीने सर्व वृत्तपत्रांना प्रसिद्धीसाठी दिले गेले. शिवसेनाप्रमुखांना फिजुल लोकशाही आवडत नव्हती. शिवसेनेत संघटनात्मक ठोस निर्णय घेण्यासाठी कार्यकारी मंडळाची स्थापना झाली. याचा उपयोग पुढे शिवसेना नेतेपद निर्माण करण्यात झाला.