व्यंगचित्रे नेहमीच समाजाला मार्गदर्शक ठरली आहेत. हुकूमशहा हिटलरला देखील व्यंगचित्रांची दखल घ्यावी लागली, एवढी ताकद व्यंगचित्रात असते. हुकूमशहा नेहमीच वृत्तपत्रे व मीडिया यांना घाबरतात, त्याहीपेक्षा जास्त व्यंगचित्रांना ते घाबरतात. सध्या देशात अघोषित आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील काळात काही इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनलवर देखील सरकारने बंदी आणल्याचे देखील आपण पाहिलेले आहे. सर्वच अभिव्यक्तींना दाबण्याचा कार्यक्रम सरधोपटपणे चालू आहे.
नुकतेच प्रसिद्ध व्यंगचित्रकार सतीश आचार्य यांना देखील मुंबईतील कायदा सुव्यवस्था यंत्रणेकडून भांडवलदार उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करणार्या व्यंगचित्रासंदर्भात नोटीस बजावली गेली. आचार्य यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदींचे प्रिय भांडवलदार अदानी यांच्यावर तसेच माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील संघर्षावर काही व्यंगचित्रे काढली होती. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड व्हायरल झाली.
एकनाथ शिंदे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली आणि गद्दारी करून आमदारांना पळवून नेले आणि भाजपाबरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. परंतु २०२४च्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जास्त जागा मिळाल्यानंतरही शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले होते. त्यानंतर ते भाजपच्या सांगण्याप्रमाणे नाईलाजामुळे सत्तेत उपमुख्यमंत्रीपदावर सहभागी झाले. सतीश आचार्य यांनी सहा व्यंगचित्रांमधून शिंदे यांची अवस्था नोंदवली आहे. या व्यंगचित्रांत शिंदे आधी भाजपच्या दबावाला न जुमानता किमान ठाम उभे असलेले दिसतात, नंतर मात्र ते मोदींपुढे भुईसपाट झाल्याचे दाखविले आहे. अगदी सत्य परिस्थितीवर हे व्यंगचित्र बोलते. कोणाही सुज्ञ व्यक्तीला हे व्यंगचित्र भावणारे आहे.
दुसरे व्यंगचित्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे. २०२४च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी त्यांनीही काका शरद पवारांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी पक्ष फोडला व चिन्ह पळविले. निवडणुकीत मात्र त्यांनी प्रचारात शरद पवारांच्या फोटोचा वापर केला. यावर सुप्रीम कोर्टाने शरद पवारांच्या फोटो न वापरता आपला पक्ष वाढवावा, अशी सूचना अजित पवारांना केली होती. हेच सतीश आचार्य यांनी व्यंगचित्रांमधून दर्शविले आहे. यात दोन व्यंगचित्रे त्यांनी काढली आहेत, एका व्यंगचित्रात शरद पवारांनी अजित पवारांना कडेवर घेतले आहे. तर दुसर्या चित्रात शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यावर अजित पवार लटकत असलेले दिसतात. याच चित्रात मागून ‘स्वत:च्या पायावर उभा राहा,’ असा सल्ला दिला आहे. तो अजित पवारांना नक्कीच टोचेल, परंतु सत्य आहे.
तिसर्या व्यंगचित्रात गौतम अदानी ऐटीत उभा राहिला असून त्याच्यावर कोणताही हल्ला होऊ नये याची दक्षता घेत सरकार, भाजपा, पोलीस, सीबीआय, ईडी, आयटी, सेबी, गोदी मीडिया, आयटी सेल या सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घालून कडे करत त्याला कव्हर दिले आहे . हे सर्व ‘एक’ आहेत, म्हणून अदानी ‘सेफ’ आहे, अशी ही मांडणी आहे. ‘एक है तो सेफ है’ या भाजपने दिलेल्या निवडणूक नार्याचा संदर्भ तिला आहे. ‘एक कोण आहेत?‘ व ‘सेफ कोण आहे?’ याचे विश्लेषण या व्यंगचित्रातून आचार्यांनी अगदी काही सूचकपणे केले आहे. व्यंगचित्रात कोर्टाचा हात दाखवत ’काऊंट मी इन!’ असे शब्द दिले आहेत.
यापूर्वीही सतीश आचार्य यांनी देशाच्या एकात्मतेची, निसर्गप्रेमाची, आपुलकीची, बंधुभावाची, समतावादी, मानवतावादी विचारांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्याचप्रमाणे शेतकरी आंदोलन तोडण्याचे काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महिला कुस्तीपटूंवर आणलेला राजकीय दबाव, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बालकांना रिकाम्या पत्रावळीवर आशेवर ठेवलेले आहे अशा आशयाचे व्यंगचित्र, अशी एक ना अनेक राजकीय व्यंगचित्रे आजची परिस्थिती दर्शविणारी काढली आहेत, ती अत्यंत प्रभावी आहेत.
आचार्य यांना नोटीस देणे म्हणजे अभिव्यक्त होणार्या कलाकारांना दाबण्याचा व लोकशाही संपवण्याचाच भाजप व सत्ताधार्यांचा डाव आहे. आचार्य यांनी मात्र सरकारच्या मर्जीतल्या पोलिसांना एका व्यंगचित्रकाराने कमीत कमी शब्दांत उत्तर द्यावे तसे दिले आहे. ते म्हणतात, ’अरे वा, मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था एवढी छान आहे की पोलिसांना आता व्यंगचित्राकडे लक्ष द्यायला वेळ मिळत आहे!’ ही आचार्यांची टिप्पणी सर्व काही बोलून जाते.
– डॉ. प्रवीण मस्तुद