कोरोनानंतर थोडा थकवा राहतो, हातपाय दुखतात, हाडं दुखतात, अशक्तपणा येतो, अन्नावरची वासना जाते, एवढंच लोक बोलत राहिले. आता मात्र लक्षात येतं की यातले दीर्घकालीन पोस्ट कोविड आजार गंभीर आहेत, घातक आहेत. या आजारांमुळे ‘कोविडपेक्षा पोस्ट कोविड जड’ असं म्हणण्याची पाळी आली आहे.
—-
काही दिवसांपूर्वीची गोष्ट असेल, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणार्या स्वाती आणि सदानंद या दोघांना कोरोना झाला होता… सुरुवातीला आपल्याला कोरोना झाला असेल असे त्यांना वाटले नाही. किरकोळ थंडी, ताप असेल असा विचार करून त्यांनी नेहमीचे उपचार केले. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दोन दिवसांनी कोरोनाची तपासणी केली आणि त्यात ते दोघेही पॉझिटिव्ह असल्याचे सापडले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पुढल्या १० दिवसांनी ते कोरोनामधून बाहेर पडले आणि त्यांचे नेहमीचे कामाचे रूटीन सुरू झाले. सदानंदाला मधुमेहाचा त्रास सुरुवातीपासून होता. कोरोनावर उपचारासाठी घेतलेल्या औषधांमुळे त्याच्या स्वादुपिंडावर परिणाम होऊन त्याच्या शरीरातील रक्तशर्करेची पातळी वाढली असल्याचे तपासणीदरम्यान त्याच्या लक्षात आले. त्याने वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेतला, तपासण्या करून औषधोपचार सुरू केले, त्यामुळे आज तो ठणठणीत आहे.
आता अशा केसेस आपल्या आसपास अनेक घडल्या असतील. त्यामुळे, हे इथे खासकरून सांगण्यामागचे प्रयोजन काय, असा प्रश्न तुम्हाला पडेल. त्याचे कारण म्हणजे कोरोनाचे विषाणू शरीरातून निघून गेल्यानंतरही त्याच्या हल्ल्यात आपल्या शरीरावर झालेले परिणाम काही लगेच बरे होत नाहीत. काही परिणाम तर कोरोना बरा झाल्यावर दिसून येतात. यांना पोस्ट कोविड सिंड्रोम किंवा कोरोनापश्चात विकार असं म्हटलं जातं. सुरुवातीला या विकारांना गांभीर्याने घेतलं गेलं नाही. कोरोनानंतर थोडा थकवा राहतो, हातपाय दुखतात, हाडं दुखतात, अशक्तपणा येतो, अन्नावरची वासना जाते, एवढंच लोक बोलत राहिले. आता मात्र लक्षात येतं की यातले दीर्घकालीन पोस्ट कोविड आजार गंभीर आहेत, घातक आहेत आणि नाकापेक्षा मोती जड या म्हणीच्या चालीवर कोविडपेक्षा पोस्ट कोविड जड असं म्हणण्याची पाळी आली आहे या आजारांमुळे.
दाहामुळे जडणारे विकार
जेष्ठ आरोग्य विश्लेषक आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात की कोरोनाचे विषाणू शरीरात गेल्यानंतर प्रतिकारप्रणालीमुळे शरीरात मोठ्या प्रमाणात दाह निर्माण होतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनी, यकृताचे आजार असणार्या रुग्णावर त्याचा जास्त परिणाम होतो. कोरोनामधून बरे झाल्यानंतरही दाहप्रक्रियतेतील घटक हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम करतात. त्यामध्ये रक्तप्रवाहात रक्ताच्या गुठळ्या होणे, रक्तदाब वाढणे, अचानक हृदयविकाराचा, पक्षाघाताचा झटका येणे, असे प्रकार होऊ शकतात. कोरोनापश्चात होणार्या अशा विकारांमुळे मृत्यूही ओढवू शकतो. काहीवेळेला कोरोनाचा परिणाम स्वादुपिंडावर देखील होतो. त्यामुळे स्वादुपिंडातून निर्माण होणारे इन्शुलिनचे हार्मोन दबले जातात आणि त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अपरिमित वाढते. ज्यांना मधुमेह आहे, त्यांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. नियमित औषधं घेतल्यामुळे ज्यांचा मधुमेह नियंत्रणात आहे, अशा मंडळींची रक्तशर्करेची पातळी वाढत जाते आणि त्याचा मूत्रपिंड, डोळे, यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. दाह निर्माण करणारे घटक यकृतावर परिणाम करतात, त्यामुळे यकृताचे काम बिघडून त्यामधून कावीळ होण्याचा देखील धोका असतो. मूत्रपिंडावर या दाहाचा परिणाम झाला तर खास करून मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्या मंडळींना मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका असतो. काहीजणांना त्यामुळे दीर्घकाळ डायलिसिसचा आधार घेऊनच जगावे लागू शकते.
कोरोना झाल्यानंतर काहीजणांना न्यूमोनिया झालेला असतो. त्यामुळे फुप्फुसाची प्रसरणक्षमता कमी होते. अशा मंडळींना श्वास घेण्यास त्रास होणे, दम लागणे, असे प्रकार होऊ शकतात. त्यामध्ये काहींना घरी ऑक्सिजन लागू शकतो, तर काहींना दीर्घकाळ ऑक्सिजनचा आधार घेऊन आयुष्य जगावे लागू शकते, असेही डॉ. भोंडवे सांगतात.
प्रतिकारशक्ती दबली जाणे
कोरोनाकाळात मुळातच प्रतिकारशक्ती दाबली जाते. तशात मधुमेह असणार्या रुग्णाला स्टिरॉइड दिले गेले तर त्याला काळी, पांढरी, पिवळी अशा बुरशीजन्य आजाराचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाच्या दुसर्या लाटेदरम्यान हे मोठ्या प्रमाणात दिसून आले. कोरोनापश्चात विकारांमध्ये मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे दिसून आहे आहे. त्यामध्ये चिंता, नैराश्य, विस्मृती, असे आजार जडल्याचे दिसून आले आहे. कोरोना रुग्णांमध्ये याचे प्रमाण सुमारे ७० टक्यांच्या आसपास असल्याचे दिसून आले असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी सांगितले.
खुब्याचा त्रासाकडे दुर्लक्ष नको…
कोरोनाच्या उपचारादरम्यान अनेकजणांना स्टेरॉईड दिले गेल्यामुळे काहीजणांना खुब्याचा त्रास म्हणजे अव्हॅस्क्युलर नेक्रोसिसच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. कोरोनामधून बाहेर पडण्यासाठी अतिप्रमाणात स्टेरॉईडच्या औषधांचे सेवन झाले तर त्यामधून हा त्रास उद्भवत असल्याचे जेष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. अजित दामले सांगतात. यामध्ये खुब्याच्या भागाला रक्तपुरवठा कमी झाला तर तो भाग मृत होऊ शकतो. स्टेरॉईड दिल्याखेरीज कोरोनाचे रूग्ण बरे होत नाहीत, त्याचा परिणाम त्यांच्या खुब्यावर होऊ शकतो. आणि त्यामधून हा आजार निर्माण होतो. या आजाराचे निदान झाल्यानंतर रुग्णांनी मद्यपानापासून दोन हात दूरच राहावे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या सर्व तपासण्या करून घ्याव्यात. त्यामध्ये जर खुबा खराब होत असल्याचे निदान झाले तर त्वरित उपचार सुरू करावेत. त्यामुळे तो खुबा वाचू शकतो. खुब्यामध्ये एक बॉल असतो, त्याला होणारा रक्तपुरवठा कमी झाला की तो भाग मृत होऊ शकतो. त्यामुळे पायावर वजनाचा भार संभाळणे शक्य होत नाही, त्यामधून तीव्र वेदना निर्माण होतात. हाडांमध्ये असणार्या बॉलचा आकार बदलून जातो, त्यामुळे सांध्याचा आकार बदलतो. त्यामुळे पळताना, चालताना, जमिनीवर बसताना तीव्र वेदना सहन कराव्या लागतात. स्टिरॉइडच्या सेवनाबरोबरच, जर कुठे फ्रॅक्चर झाले, किंवा शरीरात हिमोग्लोबिनचा वेगळा प्रकार असेल तरी देखील हा आजार उद्भवू शकतो, असे डॉ. दामले सांगतात. कोविडनंतर तुम्हाला असा काही त्रास जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, ते तुम्हाला महागात पडू शकते.
डोळ्याला नागीण होण्याचे प्रकार
कोरोनाकाळातील उपचारदरम्यान प्रतिकारशक्ती कमी झाल्याने काही जणांना डोळयांच्या भागात नागिणीचा संसर्ग होण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढत असल्याचे दिसून आले आहे. पापणीपासून नागिणीच्या संसर्गाला सुरुवात होते आणि ती डोळ्यामध्ये पसरते. त्यामुळे कोरोना होऊन गेलेल्या मंडळींनी डोळ्याची काळजी घेण्याची गरज असल्याचे प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध जोशी सांगतात. कोरोना होऊन गेलेल्यांमध्ये डोळे येण्याचे प्रकार दिसून येत असले तरी त्याच्या बरोबरीने डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे, खाज सुटणे, चुरचुरणे, चिकटपणा वाटणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत असल्याचे डॉ. जोशी सांगतात.
डोळ्याच्या दृष्टिपटलाला रक्तपुरवठा करणार्या वाहिनीमध्ये रक्ताची गुठळी झाली तर ती वाहिनी बंद पडून दृष्टी कायमची जाऊ शकते. विशेषकरून मधुमेह, उच्च रक्तदाब असणार्या मंडळींना कोरोना होऊन गेला असेल, तर त्यांनी डोळ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करता कामा नये, असे डॉ. जोशी सांगतात. लॉकडाऊनमुळे मुले घरात अडकून पडली आहेत, त्यामुळे त्यांचे टीव्ही, मोबाईलवर वेळ घालवण्याचे प्रमाण वाढले आहे. स्क्रीनटाइम वाढल्यामुळे त्यांना डोळ्याची जळजळ होणे, डोके दुखणे, असे त्रास सुरू झाले असल्याचे डॉ. जोशी यांनी नमूद केले.
आरोग्य विभागाने लक्ष घालावे
कोरोनापश्चात विकार हा कोरोनापेक्षाही तापदायक प्रकार झालेला आहे. कोरोनाकाळात या रोगाच्या धास्तीमुळे सरकारी आरोग्य यंत्रणा मोफत उपचार करते, तात्काळ उपचार मिळू शकतात. पोस्ट कोविड हे चिवट दुखणं आहे. त्यात अनेक प्रकार आहेत. त्यातले म्युकर मायकॉसिससारख्या आजारांवरचे उपचार महाखर्चिक आहेत. आधीच कोरोनाने कोलमडलेला माणूस पोस्ट कोविडने साफ खचून जातो. हे प्राणघातकही ठरू शकतं. त्यामुळे पोस्ट कोविडही कोविडइतक्याच गांभीर्याने घेऊन कोरोना उपचारांचाच एक भाग म्हणून त्याकडे सरकारच्या आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अशा रुग्णांवरच्या उपचारांसाठी प्रत्येक ठिकाणी पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्याची गरज आहे. या केंद्रामध्ये फिजिशियन, सर्जन, हृदय, यकृत, किडनी, अस्थी, नेत्रविकारतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करावी. त्यामुळे त्याठिकाणी येणार्या रुग्णांना होत असणार्या त्रासाचे वेळेत निदान होईल. कोरोनामधून बाहेर पडल्या रुग्णांना त्यांनी उपचार घेतलेल्या केंद्रावर काही दिवसांनी पुन्हा एकदा तपासणीसाठी बोलवायला हवे. बर्याचदा रूग्ण देखील दिलेली औषधे घेण्यात टाळाटाळ करतात. त्यामुळे देखील असे आजार वाढू शकतात.
तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल आणि काही त्रास होत असेल, तर तो कोरोनापश्चात विकार तर नाही ना, याची खात्री करून घ्या. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आयुष्य सुरक्षित करा, असा सल्ला डॉ. भोंडवे यांनी दिला आहे.
– सुधीर साबळे
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)