मांगच्या टायमाले म्या तुमाले सांगलं होतं का म्होरच्या टायमाले गावाकडचे भूतं सांगन म्हनून. आता आपन गावाकडं जातो ना तवा ध्यानात येते का आपल्या मनात असेल गाव नाहीच राहीलं आता. हरेकाच्या मनात एक गाव असते न गावाकडं गेलं का गाव थे दिसतच नाही. हरेकाले जानवते का आपल्या कायजात आपन पयले पाह्यलेल्या अन् जगलेल्या गावाची कबर बांधली हाय. म्हनजे आपन पाह्यलेल्या गावाचं तसंबी भूतंच झालं हाय. समृद्ध शेतीनं अन् श्वासानं मुसमुसलेले गावं आता इतिहासजमा झालेले हायत. तो गावायचा भूतकाळ हाय न वर्तमानात आपन पाह्यलेल्या गावायचा भूतच उरलेला हाय. ज्यायचा भविष्यकाळ काहीच नसते ते भूत असते. गावायचं तसं होएल हाय. आता गावात राह्यते कोन? म्हतारे… ज्यायले निस्ता वर्तमान हाय. वर्तमानबी कवा संपनार देवा, असा हाय. त्यायले भविष्य नाही अन् असनच भविष्य त हाडं-गव-या मशानात गेलेलं हाय. असेच म्हतारे गावात रायते. ते म्हतारे अन् गावं आमचा भूतकाळ झाला हाय. आमचा भविष्यकाळ आमाले शह्यरच वाटते. जास्त चांगलं भविष्य पाह्यजेन असन त जास्त मोठं शहर, महानगर अन् एकदमच इज्ज्वल भविष्यकाळ म्हनजे अमेरिका!
आता तरुनायले भविष्य असलं पाह्यजेन अन् थे चांगलं असलं पाह्यजेन म्हून त्यायच्या कुंडलीत गावं नकोच… आमच्या गावच्या पाटलाले नातू झाला. त्याची कुंडली तवाच्या तवाच करून घेतली. सटवाईनं त्याचं भविष्य लिहाच्या वकताले ज्योतिषी त्याची कुंडली मांडत होता. ज्योतिषी म्हने याचं भविष्य उज्ज्वल हाय. हा गावातच राह्यनार हाय अन् सोन्यात खेयनार हाय… पाटील म्हने हे असं कसं? भविष्य उज्ज्वल अन् गावात? काहीतबी चुकत हाय तुमचं. कुंडलीत तुमच्या गावा लेहला असन त तुमाले भविष्य कसं असनं?
गावात आता भूतकाळात जमा होएल म्हतारे रायतेत अन् त्यायच्या डोक्यात सतत समृद्ध गावाच्या कहान्या रेंगायत हायतेत. तसं गाव पुना नाही होऊ शकनार का, याचा थे इचार करतेत. हेच गाव, हेच जिमीन अन् हेच नदी होती अन् आता का झालं? याच जमिनीतून सोने की चिडीया बसेरा करत होती अन् नदीतून अमृत वहात होतं तवा हेच गाव देनारं होतं, दाता होतं, देशाचं भवितव्य हातं, अव्वल होतं… सारं तसंच हाय; पन काहेतबी बिनसलं हाय, बिघडलं हाय तवा आपन पुना ते तसंच गाव करू शकू… खातं-पितं गाव, नांदतं गाव, किसनाचं गोकुळ गाव! या म्हता-याच्या डोयात हेच सपन रायते. तस्या त्यायच्या जगन्याच्या नांदत्या गावाच्या ताज्या आठवनी हायत. मंग हे म्हतारे भूतावानी रात रात जागतेत. भटकतेत. कोनालेतबी झोंबतेत… म्हनजे कोने गावाकडं गेला का त्याले पकडून लंबी रीलच लावतेत आमच्या टायमाले गाव कसं होतं त्याची… आता ज्याले भूत झपाटू शकते त्याले झाड म्हनतेत. म्हंजे भूत काही सा-यायलेच झपाटू किंवा दिसू शकते असं नाही. एखाद्याच्या नावराशी असते अन् थो या बाबत जरा सेंसीटिव्ह असते त्याले आमच्या इकडं ‘झाड’ म्हनतेत. त्यालेच भूत दिसते न त्यालेच धरते. म्हंजे इलेक्ट्रीसिटीच्या भाषेत सांगाचं झालं त, ‘ही इज गुड कंडक्टर ऑफ भूत’ म्हनजे भुताचा करंट तो चांगला वाहून नेनार असते. अस्यायच्या आंगात मंग भूत येते. आमच्यासारके काही हायत त्यायले ख-या गावायचे सपन तसेच पडत असते. असा गाव होता अन् या देसाच्या राष्ट्रपित्याले हेच वाटत होतं का असा स्वयंपूर्न गावच या देशाचं भवितव्य हाय. एकेक गाव म्हंजे एक देश हाय… या म्हता-याच्या डोक्यातला या गावाच्या सपनासकट ते म्हतारे आमच्यासारक्या ‘झाडा’यले झपाटतेत. हे म्हतारे आमच्या आंगात येतेत. आमालेबी वाटते की तसा खाता-पिता गाव आपन निर्मान केला पाह्यजेन. आमी मंग ते लोकायले सांगा लागतो. गाव असा असला पाह्यजे, गाव तसा असला पाह्यजे. गाव म्हनजे या देशाचं भवितव्य असलं पाह्यजेन… तवा बाकीचे आमच्याकडं विचित्र नजरेनं पाह्यतेत अन् मंग आपसात काहीतबी कानाफुसी करतेत. आमच्या बद्दल त्यायच्या डोयात कीव अन् कायजी दिसू लागते. त्यायले वाटते, वाटते कायले? त्यायचं ठाम मतच झालेलं असते का याले गावाच्या भूतकाळ होएल म्हाता-यानं झपाटलं हाय. म्हता-यानं याचं झाड धरलं हाय. आता ह्या नाही याच्यातून याले धरलेला म्हताराच बोलत हाय. याले आताच बरा केला पाह्यजे. याची सुटका केली पाह्यजे. तसं नाही झालं त याचा अन् आपल्या देशाचा भविष्यकाळ खराबं व्हाचा… काहूनका, ह्या अखून काही लोकायले झपाटनं अन् असं गावझपाटलेपन वाढतच गेलं त आपन निर्मान केलेल्या शहरकेंद्री विकासाचं का?
मंग हे लोक आमच्यासारख्या झपाटलेल्यायले बरा करन्याच्या मांग लागतेत. भगत-बाबा आनले जातेत. भूत कहाडाले गावाकडं भगत असते. थो येते अन् मंग अंगारे-धुपारे करते. आग पेटवते. थ्या कुंडात कोंबड्याच्या अन् कावळ्याच्या पिसापासून कायकाय जायते अन् मंग झाडाले (ज्याच्या आंगात भूत आलं हाय थो) झाडफुक करतेत. झाडफुक म्हनजे मंत्र म्हनून त्याच्या कानात, डोयात फुका मारते जोरानं. त्याले झाडूनं नाहीत मोराच्या पिसाच्या झाडूनं मारते. हमेशाच निस्त झाडून मारून भूत काही जात नाही त मंग आमचा भगत त्याले बेदम मारते. लातानं तुडवते. याले झाडनं म्हनते. सुरुवात मातर त्याले आमीष दाखवन्यापासून होते. म्हनजे त्या आनागत येएल भुताची पयले वळख करून घेते. भूत आपली ओळख पटकनं नाही सांगत. झपाटनारं भूत हे प्रसिद्धीपराङ्मुख की का म्हनते तसं असते. भुताचं आपलं असं काही फेसबुक अकाऊंट नसते किंवा आज मी अमक्याले झपाटलं, म्हनून कोनच्या व्हाटस्अप ग्रुपवर पोस्ट नाही टाकात न मंग बाकीचे भूतं त्याच्यावर वांझोट्या लाईक नाही टाकत… त्याच्यापायी आंगात येएल भूत कईच आपलं नाव पटकन् नाही सांगतं. भगत मारहान करते तवा थो आपलं नाव सांगते. ‘मी तेल्याचा रमेस व्हय’, असं तो भूत सांगते आखरीले तवा भगत घामाजोकय झालेला रायते. तो मंग मोहाची पावशेर मारून पुना कामी लागते. लोकायकडं छाती कहाडून पाह्यते अन् म्हनते, ‘पाहा कसा सिधा केला याले… हंऽऽम्, तेल्याचा रमेस का? त्या गावपिपयावरचा?’ भूत आता एकदम मानसायलं रायते. शहानं झालेलं रायते त थे एकदम ‘हो’ म्हनते. काहूनका भगत आपल्याले चटका देवू शकते, हे भुताले समजते. त्याच्यापायी मंग भूत पटापट भगत इचारनं थे सांगते अन् भगत सांगन त्याले हो म्हनून मोकया होते. त्याच्यापायी भगत सटासट त्याले सोटे लावत एक एक सवाल करते, ‘हंऽऽम् त रमस्या लेका आत्महत्या करून मेला होता ना तू? अर्जुनीच्या झाडाले गयफास लावून घेतला होता ना तू?’ त थे भूत लगेच हो म्हनते. आता रमस्या मेल्याचा ह्या किस्सा तीस-चायीस सालाच्या पयलचा असते; पन तवापासून रमस्याचं भूत असतेच गावात. गावात असं कोनी अॅबनॉर्मली मेलं का त्याचंच भूत होते असं नाही, गावात कोनीबी मेला का त्याचं भूत होतच असते. फकस्त नैसर्गिक मरन येएल मान्साची काही स्टोरी नसनं त त्याचं जे का भूत असते थे लय दिवस नाही रायत, ते वातावरनात डिझॉल होते, असं आमचा जगू आबा सांगते.
…त सांगाचा मतलब ह्याच का अस्या पद्धतीनं भूत कहाडतेत आंगातून. त्याच्यासाटी एकदम मारहानच नाही करत. त्या झाडाले (भूतानं झपाटेल मानसाले) आधी संधी देते. म्हनजे भुताले इचारते का तुले का पाह्यजेन? का हाय का भूत तवाच होते मानूस मेल्यावर जवा त्याच्या काही इच्छा राहून गेल्या असतीन. म्हनजे त्याच्या वासना शिल्लक असतीन त मंग त्याचं भूत होते न अपु-या वासना पु-या करन्यासाटी थो असे झाडं पकडते, झपाटते असं जगू आबानं लय पूर्वीच सांगून ठिवलं हाय. (आता जगू आबा हे एंटीटी हाय. ते कोंच्याबी युगात असतेच.) त मंग त्या भूताच्या वासना भगत इचारते, ‘रमस्या, तुले दारू पाह्यजेन का?’, ‘तुले मटन खाचं हाय का?’, ‘तुले पोरीचा शौक हाय का?’ भूत मंग तेच्यातलं एखांदं सिलेक्ट करते. कोंबडी म्हनलं त्यानं त मंग ज्याले झपाटलं त्याच्या घरचे त्या भगताले कोंबडी देते. भगत त्या भुताले बाटलीत बंद करते अन् मंग हे कोंबडी कापून पिपयाच्या झाडाखाली ठेवून द्याची असते. ते काम राती बारा वाजता कराचं असयते म्हून ते भगतच करते. पिपयाच्या झाडाखाली राती ठेवलेली कोंबडी कईच दिवसा दिसत नाही, तिचे अवशेषही नाही. भूत अवघी कोंबडी एका घासात कसी खाते हे भगत सांगते. भगताच्या घराजवय मातर कोंबडीचे पीसं दिसतेत!
त मंग आमच्या सारख्या गावझपाटल्यायले झाडासाठी कार्पोरेट भगत आनले जातेत. आमाले आमीष दाखवलं जाते, ‘तुले किती पॅकेजची नोकरी पाह्यजे?’, ‘अंबानीकडं पाह्यजे का अदानीकडं पाह्यजे?’, ‘बायकोपन पॅकेजवाली नको का?’, ‘गोदरीमुक्त न झालेल्या गावात राहाचं का पॉश न्युयॉर्कमंध?’ असं इचारलं जाते. मंथली दनक्यात पॅकेजच्या मोहात लय झनायचे हे गावाचे भूत झाड सोडून जातेत. गावझपाटलेपन उतरते अन् गावात टुमदार कौलारू घरापेक्षा तो शहरात वन बीएचके अन् थोबी विसाव्या मजल्यावरचा फ्लॅट प्रीफर करते. त्याच्या फ्लॅटची बिल्डींग गावच्या पिपयापेक्षा, वडापेक्षा लय म्हंजे लयच उंच असते. त्याच्यापायी गावाचे भूतं त्यायले झपाटूच नाही शकत अन् एकदा समजलं लोकायले का याले गावबाधा होत असते त थे आप्त-स्नेही त्याले गावाकडं जावूच देत नाही… गावात मंग जिवंत भूतं म्हातार्याच्या रूपात नांदत रायते, आपन झपाटू असं झाड येईन गावाकडं याची वाट पाह्यत रायते.
गावकडच्या भुताच्या कथा अठीच संपलेल्या नाही, त्या त अठी सुरू झालेल्या हायत!
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक, संपादक व सामाजिक कार्यकर्ते आहेत)