आमच्या टमाट्याच्या चाळीत बाबू साटमाच्या पोराला कविता करण्याचं वेड कसं लागलं ते त्याचं त्याला माहीत. ना त्याचं शाळेत अभ्यासात लक्ष होतं ना कॉलेजात मुलींकडे. पावसाळ्यात मुंबईचे काही रस्ते तुंबतात तसा हा पावसाच्या कवितांनी तुंबायचा. थंडी पडली की थंडीवर कविता, उन्हाळा आला की घामावर कविता; जगातील एक गोष्ट अशी नसेल की बाळू साटमाने ज्याच्यावर कविता केली नसेल. कोरोनावर तर त्याने गेल्या दोन वर्षांत दोन पोती कविता केल्या. कोरोनाने त्या वाचल्या असत्या तर आपले भयंकर विनाशकारी रूप पाहून त्याने आणि त्यांच्या बांधवांनी आत्महत्याच केली असती. चाळीच्या परिसरात तर त्याची एवढी कीर्ती पसरली होती की त्याच्याशी बोलायलाही लोक घाबरायचे. कारण हा कधी कुणावर कविता करेल याची भीती सर्वांना वाटे. त्याने एखाद्या नव्या कवितेला जन्म दिला की स्वतःच्या घराबाहेर उभा राहून मोठ्या आवाजात तो जाहीर कविता वाचन करी. तेव्हा मजल्यावरचे सर्व चाळकरी आपले दरवाजे बंद करून घेत. पण आपल्याच जगात रमणार्या बाळू साटमला त्याची अजिबात पर्वा नसे.
मुली तर त्याच्या थार्यालाही उभ्या रहात नसत. कारण हा कशावरून काय लिहील याचा पत्ता नसे. एकदा आपल्या दारात उभे राहून केस विंचरणार्या सुलूच्या केसाच्या फणीतील गुंतवळा हा दारात उभा असताना याच्या पायाशी आला. त्याने तो फिल्डिंग करताना पायाने चेंडू अडवतात तसा अडवलाच शिवाय हातात घेऊन त्याने आपल्या निरीक्षणशक्तीला चालना देत शीघ्र कविता केली. एवढ्यावरच ही प्रक्रिया थांबली नाही तर स्वतःच्या दारात उभं राहून त्याने ती कविता सुलूला तिच्या घरात ऐकू जाईल इतक्या मोठ्याने वाचून दाखवली. तेव्हापासून सुलूने आजपर्यंत तिच्या दारात उभं राहून कधीही केस विंचरले नाहीत. त्या कवितेत केसांच्या तलमपणापासून केस गळण्याचे दुःख, त्यावरील केशवर्धक तेल, शिकेकाई, शाम्पू यांचाही भरणा केला होता. एखाद्या हेअर ऑइल कंपनीच्या जाहिरातीला ती फीट्ट बसणारी होती. दुसर्याच दिवशी सुलू कॉलेजला जाताना चाळीतल्या वात्रट पोरांनी घोषा लावला सुलू तुझे केस लांब लांब लांब, सुलू तुझ्या केसांना पपा बघतात.
जेव्हा बाळू साटमला साहित्य मुकादमीचा एकशे एक रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा चाळीला त्याची किंमत खर्या अर्थाने कळली. खरं तर ही अखिल भारतीय मराठी साहित्य संस्था बाळूच्या मित्रमंडळींनीच स्थापन केली होती. बाळूच तिचं प्रेरणास्थान होता. यंदाच्या पावसाळ्यात तर बाळूच्या कवितांनी कहर केला. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये आपल्या पावसाळी कवितांच्या संख्येची विक्रमी नोंद व्हावी या हेतूने बाळूने पावसांच्या धुवाधार कवितांचा पाऊस पाडला. सकाळी चारला उठून तो गच्चीत वरून पाऊस कोसळत असताना कविता करत बसायचा. फक्त कागद आणि स्वतः भिजू नये म्हणून आमच्या नाक्यावरच्या केळीवाल्याची भलीमोठी रंगीबेरंगी छत्री त्याने ध्वजस्तंभासारखी फीट्ट करून घेतली होती. पाऊस असला काय आणि नसला काय, त्याचं पावसावरच्या कविता पाडण्याचं काम चालूच असायचं. त्याचं ते मोठमोठ्याने कवितांचे शब्द जुळविण्यासाठी गुणगुणणं, हातवारे करणं हे सुरूच असायचं. पाऊस सुरू झाला की तो आंघोळही तिथेच उरकून घ्यायचा आणि छत्रीत बसून आपल्या कामाला लागायचा. एकदा पहिल्या मजल्यावरची दीपा सकाळी पाठीवर घामोळं आल्यामुळे पहिल्या पावसात भिजायला गच्चीवर आली होती. तेव्हा हे कवीमहाशय कविता लिहायचं सोडून चक्क ‘ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळं’ हे गाणं आपल्याच तंद्रीत मोठ्या आवाजात गाताना बघून दीपा घाबरली. ती परत जाऊ लागताच बाळू किंचाळला, दीपा, ठेहरो. पहाटेपासून कविता करून दमायला झालं. थोडा विरंगुळा म्हणून ही दादांच्या गाण्याची तान घेतली. पण इतक्या सकाळी तू कशाला या मोठय़ा पावसात गच्चीवर आलीस?… बाळूने एक बम्पर टाकलाच.
पावसात भिजल्यावर घामोळं निघून जातं म्हणून भिजायला आले, हे दीपाने सांगताच बाळूने पुन्हा लेखणी सरसावली आणि ती तिकडे भिजत असताना त्याने इकडे छत्रीत ‘असे पावसाळे, असे हे घामोळे’ ही कविता पाच मिनिटांत केली आणि दीपाला ती ऐकू जाईल इतक्या मोठ्याने गाऊनही दाखवली. ती ऐकून लाजून दीपा जी घरी पळाली ती पुन्हा गच्चीवर आली नाही. महानोरांच्या रानातल्या कवितांप्रमाणे पाण्यातल्या कविता हा संग्रह काढण्याचे बाळूच्या मनाने तेव्हाच निश्चित केलं होतं. हे चाळकर्यांना लवकरच समजलं. पावसाच्या किमान एक हजार एकशे एकावन्न कविता लिहायचं त्याचं बजेट होतं. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतींच्या हस्ते त्या कवितासंग्रहाचं प्रकाशन व्हावं ही त्याची इच्छा होती. त्यामुळे प्रसिद्धी तर मिळालीच असती, त्याशिवाय ‘मिनीज बुक ऑफ वर्ल्ड’वाल्यांचं कामही सोपं झालं असतं.
बाळूच्या या कवितांच्या कारखान्याची बातमी हां हां म्हणता परिसरात पसरली आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी फुलांचे गुच्छ घेऊन भर पावसात त्याच्या चाहत्यांच्या रांगा लागल्या. समोरच्या चाळीतली बाळूसारख्याच कवितांचा रतीब घालणारी नवकवयित्री पद्मा ढमढेरे तर एक दिवस रजनीगंधाच्या फुलांचा बुके घेऊन रांगेत उभी होती. तिला म्हणे कविता करण्याचा स्पीड कसा वाढवावा याविषयी कवीराज बाळू साटमाकडून काही मार्गदर्शनपर टीप्स हव्या होत्या. रांगेत तिच्या मागे असलेल्या परबकाकांकडे तिनं आपल्या मनातली व्यथा सांगितल्यावर परबकाका चिडले आणि म्हणाले, चेडवा कविता करणं म्हणजे स्पीडने चकल्या गाळणं नव्हे की भराभर लाडू वळणं नव्हे. त्याला डोस्कं लागतं. प्रतिभा लागते. आम्हाला तर शाळेत असल्यापासून वाटायचं की आपणसुद्धा कविता करून मोठेपणी महाकवी म्हणून प्रसिद्धीस यावं. त्यासाठी कविता करण्याच्या तंत्राची, मोठमोठ्या कवींच्या कविता पाडण्याच्या प्रक्रियेची पुस्तकं वाचली. कागदावर दिवसरात्र प्रॅक्टिस केली, पण कवितेला काही जन्म देऊ शकलो नाही. विषयांच्या मारामारीपासून शब्दांच्या जुळवाजुळवीपर्यंत काहीच जमलं नाही. किती किलो कागद फुकट गेले असतील याचा पत्ताच नाही. शेवटी तो नाद सोडलाच. फक्त योगायोगाने का होईना प्रतिभा नावाची बायको मिळाली आणि पहिल्या मुलीचं नाव कविता ठेवून मोकळा झालो. म्हणून मला बाळूचं कौतुक वाटतं. आता या पावसाळय़ात त्याचं कविताक्रत पूर्ण झालं तर तो ‘मिनीज बुक ऑफ वर्ल्ड’मध्ये जाणार. मग आपल्याला कसला विचारतो तो. म्हणून म्हटलं अगोदरच त्याचं अभिनंदन करावं. त्याला शांतता हा विषय आपण सुचवला तर त्याची नोबेल पारितोषिकासाठीही शिफारस होऊ शकते.. पदमाला ही कल्पना आवडली आणि ती हातातला रजनीगंधाचा गुच्छ गालातल्या गालात मंद हसत कुरवाळू लागली. ते पाहून परबकाका वैतागले. म्हणाले, अगं ती फुलं चुरगाळू नकोस. गच्चीवर गेल्यावर पावसात भिजली तर त्यांची नाजुक काया मान टाकेल ना. परबकाकांची प्रतिभा अजून कोमेजलेली नाही, या कल्पनेने पद्माच्या अंगावर शहारे आले. एवढ्यात मागून कुणीतरी खाकरलं आणि रांग पुढे सरकू लागली. पुढे काय झालं ते पुढल्या वेळी!
– श्रीकांत आंब्रे
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)