स्वदेशी चळवळीने प्रबोधकारांना नुकत्याच विशीत प्रवेश केलेल्या वयात उत्तम पैलू पाडले. या चळवळीने ते एक जोरदार वक्ते म्हणून लोकप्रिय झाले. त्याचबरोबर एक पत्रकार म्हणूनही ते घडले.
——————–
‘लेखणी – कलम दिसायला किती लहान वस्तू. मूर्ती लहान पण कीर्ती आकाशाला गवसणी घालण्याइतकी अचाट आणि अफाट वाटत नाही. पण तेथेच जगातल्या सर्व आश्चर्याचा महासागर सांभाळून बसला आहे. मानवाच्या प्रगतीला कारण झालेल्या बुद्धिमत्तेचे कोंब प्रथम याच चिमुकल्या जागेत थरारले व शाईच्या वहात्या ओघाबरोबर अवघ्या दुनियेभर भरारले.’
– प्रबोधनकार ठाकरे, प्रबोधन डिसेंबर १९२५
प्रबोधनकार इंग्रजी सहावीत असताना देवासच्या शाळेत परीक्षक म्हणून आलेल्या गनियन साहेबाने विचारलं, पुढे काय व्हायचंय तुला? त्यावर त्यांचं उत्तर होतं, एडिटर. त्याची सुरुवात झाली ती पनवेलला शाळेत असतानाच. तिथे त्यांनी `विद्यार्थी’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं. ते हस्तलिखित नव्हतं, तर त्यासाठीचं छोटं घरगुती प्रेस मशीन त्यांनी तयार केलं होतं. तिथूनच मुंबईच्या `करमणूक’ साप्ताहिकात त्यांचे काही लेख छापून आले होते. मुंबईत पहिल्यांदा आले तेव्हाही `इंदुप्रकाश’सारख्या लोकप्रिय पत्रात ते लिहीत असत. तेव्हाचं त्यांचं लिखाण हौशीच होतं. ते लिहितात, `लेखनावर दमड्या मिळतात हे सूत्र मात्र तेव्हा माझ्या कानात नि मनातही घुसलेले नव्हते नि घुसविलेलेही नव्हते.’ स्वदेशी चळवळीच्या धामधुमीत हे सूत्र त्यांना सापडलं.
ब्रिटिश सरकार, त्यांची नोकरशाही आणि विदेशी वस्तू यांच्याविषयी शक्य तितका तिटकारा निर्माण करण्यासाठी स्वदेशी चळवळीतले आंदोलक इरेला पेटले होते. त्यातून अनेक अल्पजीवी वर्तमानपत्रांची सुरुवात झाली. त्यामुळे या चळवळीने प्रबोधनकारांमधल्या तडफदार वत्तäयाबरोबरच एका हरहुन्नरी पत्रकारालाही जन्म दिला. त्या काळाचं वर्णन करताना प्रबोधनकारांनी लिहिलंय, `मुंबईत रोज नवनवीन शेकडो वर्तमानपत्रे बाहेर पडायची. त्यातली अगदी मोजकीच वाजवी सरकारी डिक्लेरेशनची असायची. पण बहुसंख्य एकदोन आठवड्यांच्या हयातीची काय असत ना, बेलाशक सरकारी कायदे धाब्यावर बसवून बाहेर पडलेली असायची. छापखान्याचे नाव असायचे, नसायचे. असेलच तर त्याचा थांगपत्ता पोलिसांना लागायचा नाही. संपादकाच्या नावाचाही हाच प्रकार. हव्या त्या दिडकी दोन दिडकीवाल्या पत्राची विक्री बोलबोलता व्हायची. सहज चारपाच हजार प्रती तासाभरात विकल्या जायच्या.’
विशेष म्हणजे या व्यवसायात गुजराती तरूण आघाडीवर असायचे. पण वर्तमानपत्रं मराठीच असायची. त्यामुळे त्यांना कायम जोरदार मराठी लिहिणार्यांची गरज असायची. त्यावेळी मुंबईत कागद आणि छपाई सहज उपलब्ध असायची. त्यामुळे १६ पानांचा क्राऊन साइज फॉर्मच्या १००० प्रती काढायच्या तर कम्पोझिंगपासून छपाईपर्यंतचा एकूण खर्च १६ रुपये यायचा. तो एका दिवसात वसूल होऊन चांगला फायदाही मिळायचा. वर्तमानपत्रांच्या वाढत्या प्रभावामुळे सरकारने १८७८च्या वर्नाक्युलर प्रेस अॅक्टची जुनी कलमं पुन्हा अमलात आणली होती. त्यात वर्तमानपत्रं आणि छापखाने जप्त करून संपादक, मुद्रकांवर खटले भरण्याचं सत्र मुंबई, पुण्यापासून सातारा, कराडपर्यंत सुरू केलं होतं. मराठी वर्तमानपत्रांवर सरकारचा डोळा होता. त्यातले केसरी, काळ, भाला, गुराखी, देशसेवक यांच्यावरचे खटले गाजले. पुढे १९०८च्या इंडियन प्रेस अॅक्टने तर या वर्तमानपत्रांचा गळाच आवळला. पण पत्रकार सरकारपेक्षा वरचढ असणारच. त्यांनी त्यातही मार्ग काढले. प्रबोधनकारांच्या शब्दांत पत्रकार `सरकारच्याही घरचे बारसे जेवणारे मगजबाज हिकमती निघाले.’
यातल्या `विहारी’ या साप्ताहिकाची गोष्ट प्रबोधनकारांनी सांगितलीय. त्याचे संपादक भास्कर विष्णू फडके होते. ते रीतसर नोंदणी केलेलं साप्ताहिक होतं. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ या पुस्तकात रा. के. लेले यांनी दिलेल्या माहितीनुसार हे साप्ताहिक टिळकांच्या जहाल राजकारणाचा पुरस्कार करणारं होतं. २६ डिसेंबर १९०४ला त्याचा पहिला अंक निघाला. त्यात वीर सावरकरही लिहीत असत. ते जणू अभिनव भारतचं मुखपत्रच बनलं होतं, असं धनंजय कीर यांनी सावरकर चरित्रातही नोंदवलंय. शिवरामपंत परांजपेंच्या `काळ’मधे `विहारी’ची जाहिरात आली होती. त्यातला पत्ता होता, `फाटक ब्रदर्स बुकसेलर्स, ४०४, ठाकुरद्वार, मुंबई.’
यातले फाटक म्हणजे प्रबोधनकारांनी सांगितलेले फाटककाका होते. रा. के. लेले यांनीही त्यांचं पूर्ण नाव नोंदवलेलं नाहीय. तेही प्रबोधनकारांचा संदर्भ देऊन फाटककाका इतकंच सांगतात. पण दोघेही फाटककाकांनी `भूत’ नावाचं व्यंगचित्र पाक्षिक सुरू केलं होतं, हे सांगतात. १८९४ ते १९०४ अशी दहा वर्षं हे पाक्षिक दर आवस-पुनवेला यायचं. `मराठी वृत्तपत्रांचा इतिहास’ सांगतो की यात राजकीय व सामाजिक विषयांवर सुरेख, मार्मिक, हास्योत्पादक चित्रे व लेख येत. `भांडत आहेत चीन जपान, कोरियाने कापले कान’ हे भूत पत्रातलं व्यंगचित्र विशेष गाजलं होतं.
`भूत’ पाक्षिकापासून मराठी वृत्तसृष्टीशी जोडलेल्या फाटककाकांशी प्रबोधनकारांची ओळख झाली. त्यांचं योगदान प्रबोधनकारांनी सांगितलंय, `मराठी वृत्तपत्रे काढणारे जातीतेच मूळ दरिद्री. आकांक्षा गगनाला ठाव घ्यायची. पण कडोसरीला कपर्दिकही नसायची. साळ्याची गाय, माळ्याचे वासरू हा सारा व्यवहार. आणि नेमक्या त्याच प्रसंगी फाटककाका आपणहून पडेल ते सहाय्य द्यायला हमखास पाठीशी उभे रहायचे. `फाटककाका इतर वर्तमानपत्रांसारखेच `विहारी’च्याही पाठीशी उभे होते. राजापूरचे कवी बंडूनाना पाटणकर यांच्या `मॅझिनीचे बोल’ नावाच्या काही कविताही त्यात प्रसिद्ध झाल्या होत्या. त्याचं निमित्त करून ब्रिटिश सरकारने `विहारी’चे संपादक भास्कर फडकेंना पकडून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालू केला. पण त्यांचा छापखाना सरकारच्या जप्तीत जाऊ नये म्हणून फाटककाकांनी केलेल्या युक्तीचा आंखों देखा हालच प्रबोधनकारांनी सांगितलाय.
फाटककाकांनी गिरगावच्याच कांदेवाडीत खोटानाटा `विहारी प्रेस’ उभा केला. म्हणजे टायपांच्या काही केसी गोळा केल्या. जुन्या बाजारातलं एक मोडकं ट्रेडल आणून ठेवलं. बाहेर मात्र `विहारी प्रेस’ असा मोठा प्रेस उभा केला. दुसरीकडे दामोदर शेट यंदे यांच्या `इंदुप्रकाश’ छापखान्यात `विहारी’ गुपचूप छापण्याची व्यवस्था केली. अपेक्षेनुसार विहारीच्या छापखान्यावर जप्ती आली. त्यासाठी पोलीस बैलगाड्या घेऊन कांदेवाडीत आले. बघ्यांची गर्दी उसळली. पोलिसांनी मालकाची शोधाशोध केली. शेवटी कुलूप तोडलं. आत बघतात तर काय, लिलावात कुणी पाच रुपयेही देणार नाही असं भंगार होतं. गोळा झालेले बघे पोलिसांचीच टिंगल करायला लागले. पोलिसही हसत हसत निघून गेले. असं सगळं करून फाटककाका कधीच कोणत्याही लफड्यात सापडले नाहीत.
स्वदेशी चळवळीतल्या पत्रकारितेच्या भानगडींचं असं रसाळ वर्णन करताना प्रबोधनकारांनी ते स्वतः पत्रकारितेत कसे आले हेही सांगितलंय. तत्त्वविवेचक छापखान्यात त्यांना नोकरी लागली. थोर सत्यशोधक तुकाराम तात्या पडवळ यांनी हा छापखाना सुरू केला होता. संत तुकारामांच्या सर्व उपलब्ध अभंगांची गाथा संपादित आणि प्रकाशित करून त्यांनी महाराष्ट्रावर मोठे उपकार करून ठेवले आहेत. ते महात्मा फुलेंचे सहकारी होते. प्रबोधनकार नोकरीला लागले, त्याआधीच त्रुकाराम तात्यांचं निधन झालं होतं. पण तुकाराम तात्यांचे वारसदार असणार्या यशवंतराव काशिनाथ पडवळ यांनी पुढे प्रबोधनकारांचं पुस्तक `भिक्षुकशाहीचे बंड’ याच छापखान्यात छापून दिलं.
बाळा मुळे नावाचा एक प्रबोधकारांचा जानी दोस्त तत्त्वविवेचक छापखान्यात कामाला होता. तो तिथे असिस्टंट प्रूफरीडर म्हणून काम करत होता. तेव्हा प्रूफरीडरसाठी मुद्रितशोधक असा शब्द नव्हता. व्याकरणाचं काम करणारे म्हणून त्यांना शास्त्री म्हटलं जायचं. छापखान्यात खूप कामं होतं. प्रबोधनकारांनी नोंदवलंय की तिथे लिंगोजी बिर्जे यांचं साप्ताहिक `सत्यशोधक’ आणि न्या. चंदावरकरांचं `इंडियन सोशल रिफॉर्मर’ हे साप्ताहिक छापलं जायचं. वाढत्या कामामुळे तिथे असिस्टंट प्रूफरीडरची जागा निघाली. बाळा मुळेंच्या हेडशास्त्रींकडे प्रबोधनकारांच्या नावाची शिफारस केली. लक्ष्मण नारायण जोशी हे तेव्हाचे प्रसिद्ध कवी, लेखक, नाटककार या छापखान्यात हेडशास्त्री म्हणजे मुख्य प्रूफरीडर होते. त्यांनी प्रबोधनकारांना असिस्टंट शास्त्री म्हणून नेमलं.
आपल्या पहिल्या नोकरीतल्या पहिल्या बॉसविषयी म्हणजे लक्ष्मण जोशींविषयी प्रबोधनकार लिहितात, `तेथे लक्ष्मण नारायण जोशी उर्फ लखूनानांचा सहवास माझ्या वृत्तपत्रीय आणि लेखकीय आकांक्षेला फारच उत्तेजक ठरला. लखूनाना स्वभावाने हौशी, रंगेल आणि मस्करीखोर. दररोज निघणार्या नवनवीन हंगामी वर्तमानपत्रं काढणार्यांचा नि लखूनानांचा पडदानशीन संबंध मला तेथे समजला.’
पडदानशीन म्हणजे नाव न देता लिहिणं. लखूनाना विद्यार्थी असल्यापासून हे काम करत होते. ते पुण्यातून मुंबईच्या वेटरनरी म्हणजे पशुवैद्यकीय कॉलेजात शिकायला होते. वडील पाठवत असलेले पैसे पुरत नसल्यामुळे ते गुराखी आणि इंदुप्रकाश या वर्तमानपत्रांत बेनामी लेखन करत. मार्च १८९९मध्ये जोशींनी गुराखीमध्ये ब्रिटिश सरकारच्या विरोधात लिहिलेले तीन लेख चर्चेत आले. त्यावरून गुराखीवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. खरं तर या लेखांची जबाबदारी संपादक म्हणून संपादक विनायक नारायण भाट्ये यांनी घ्यायला हवी होती. पण त्यांनी जबाबदारी झटकत लखूनानांच्या हस्ताक्षरातले कागदच कोर्टासमोर सादर केले. तरीही भाट्येंना वर्षभराची आणि लखूनानांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. संपादकीय नीतीमत्तेच्या संदर्भात गुराखीच्या या खटल्याची चर्चा नेहमी होत असे. ही सगळी माहिती रा. के. लेले यांनी नोंदवलेली आहे. बाकीचे रस्ते खुंटल्यामुळे लखूनाना पुढे पूर्णपणे वर्तमानपत्रांच्या कामात आले. प्रबोधनकार भेटले तोपर्यंत ते या कामात चांगलेच मुरले होते.
त्या काळात निघणार्या अल्पजीवी वर्तमानपत्रांसाठी लिहिण्याचं काम करण्याची दीक्षा लखूनानांनीच प्रबोधनकारांना दिली. लेख मागण्यासाठी येणार्या अनेकांशी ओळखी करून दिल्या. लखूनानांनी दिलेला सल्ला लखूनानोवाच म्हणून प्रबोधनकारांनी शब्दशः लिहून ठेवलाय, `हे पहा ठाकरे, दोनचार रुपये मिळतात ना एवढ्या कामावर. पुष्कळ झाले. तुमची खानावळ सुटेल. दणकून लिहित जा. आपल्या बापाचे काय जाते? हा एक व्यापारच चालू आहे. आणखी वाहत्या गंगेत घ्यावे हात धुऊन. नाहीतर एरवी तुम्हाआम्हाला विचारतो कोण?’
पंधरा रुपये पगार आणि न चुकता मिळणारे वरकामाचे पंधरावीस रुपये, अशी बर्यापैकी कमाई सुरू होती. त्यात काही जोखीमही नव्हती. कारण लेख राजद्रोही ठरला, संपादकावर वॉरंट निघालं, छापखान्यावर जप्तीची हुकूम आला, तरी नाव नसल्यामुळे लिहिणारे नामानिराळे राहायचे. कारण बहुतेकदा नाव छापलेला संपादक जन्मालाच आलेला नसायचा. छापलेल्या नावाचा छापखाना आणि त्याचा पत्ताही अस्तित्वात नसायचा. पोलिसांची धावपळ व्हायची आणि दुसर्या दिवशी दुसर्या नावाने वर्तमानपत्रं बाजारात आलेलं असायचं. तेव्हा वृत्तपत्रसृष्टीतल्या मराठी-गुजराती लोकांची पक्की एकजूट होती. त्यामुळे कुणाचंही नाव पोलिसांकडे जायचं नाही.
(लेखक प्रबोधनकार डॉट कॉमचे संपादक आहेत.)