एकमेकांविषयी सख्ख्या भावांपेक्षाही जास्त घट्ट प्रेम आणि आदर असणारे प्रबोधनकार आणि कर्मवीर हे दोघे जोवर एकत्र आहेत, तोवर आपला, कारखान्यातून भरमसाठ फायदा उकळण्याचा हेतू साध्य होणार नाही, हे धनजीशेठ कूपरनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी या जोडीत फूट पाडण्याचं कारस्थान ठरवलं. पण ते यशस्वी होणार नव्हतंच.
– – –
मुंबईसारख्या महानगरातून पाडळीसारख्या खेडेगावात संसार थाटणं ही प्रबोधनकारांसाठी कसोटीच होती. एका आडवळणाच्या गावी अद्ययावत छापखाना सुरू करून तो चालवण्याचं दिव्यही त्यांना पार करायचं होतं. पत्रकारिता, छापखाना चालवणं या गोष्टी प्रबोधनकारांसाठी नवीन नव्हत्या. त्यांनी त्यात जम बसवला. सातार्यातून प्रसिद्ध झालेल्या `प्रबोधन`च्या तिसर्या वर्षाच्या पहिल्या अंकापासून ते दिसतं. पण त्यांच्या तब्येतीचे मात्र हाल झाले होते. त्यांची प्रकृती मुळातच तोळामासा. दादरहून पाडळीला छापखान्याची यंत्र पाठवली जात असतानाच, ते टायफॉइड न्युमोनियाने आजारी पडले होते. आजारपणातच त्यांनी `प्रबोधन`चे दुसर्या वर्षाचे शेवटचे अंक काढले. त्यातच ते पाडळीला आलेही.
पाडळीची कोरडी आणि उष्ण हवा प्रबोधनकारांना फारशी मानवली नाही. कुटुंब सोबत असल्यामुळे जेवणाचे हाल नव्हते. तरी दादरच्या तुलनेत सोयीसुविधा काहीच नव्हत्या. मच्छर खूप होते, त्यामुळे मलेरियाचे पेशंट खूप असत. वैद्यकीय उपचारांचीही सोय नव्हती. त्यासाठी सातारा गाठावं लागे. प्रबोधनकारांचे सहकारी दत्तोपंत देशमुख यांनी प्रथमोपचारासाठी छापखान्यातच छोटा दवाखाना सुरू केला होता. आजूबाजूच्या गावातले लोक तिथे प्राथमिक उपचार घ्यायलाही येत. या सगळ्या परिस्थितीत प्रबोधनकारांना आजारांनी घेरलं. १६ एप्रिल १९२४च्या अंकात प्रबोधनकारांच्या आजारपणामुळे अंक दोन दिवस उशिरा प्रसिद्ध होत असल्याची नोंद आहे. त्याच अंकात आणखीही एक चौकट छापून आलीय, ती अशी,
छत्रपती प्रतापसिंह यांची पदच्युती आणि रंगो बापूजी यांचा संघर्ष याविषयीची कागदपत्रं प्रबोधन`मध्ये आधीपासूनच नियमित प्रसिद्ध होत होती. ती सातार्याशी संबंधित असल्यामुळे आणि पानांची संख्या वाढलेली असल्यामुळे `प्रबोधन`च्या सातारा मुक्कामी ऐतिहासिक संदर्भ `प्रबोधन`मध्ये नियमित छापले जात होते. ते प्रबोधनकारांच्या आजारपणामुळे दोन अंकात प्रसिद्ध झाले नव्हते. पुढच्या १ मेच्या अंकातही त्यांच्या आजारपणाचा उल्लेख आहे. तो असा, `चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वत्र श्रीशिवजयंती साजरी करण्यात आली. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे श्री. ठाकरे यांना यंदा या उत्सवांत कोठे कसलाही भाग घेता आला नाही. याबद्दल दिलगिरी वाटते. सातारकर बांधवांच्या प्रेमळ आग्रहाचा हिरमोड होऊ नये म्हणून उत्सवाच्या सभेत फक्त दहाच मिनिटे श्री. ठाकरे यानी भाषण केले.
याच काळात घडलेली एक घटना प्रा. महावीर मुळे यांच्या सत्यशोधक प्रबोधनकार आणि कर्मवीर या पुस्तकात नोंदवलेली आहे. ती कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याशी संबंधित आहे. पाडळी हे गाव जरंडेश्वर आणि नांदगिरी या दोन डोंगरांच्यामध्ये वसलेलं आहे. पैकी नांदगिरीच्या डोंगरावर एका गुहेमध्ये जैन तीर्थंकर पार्श्वनाथांची मूर्ती आहे. एका नागपंचमीला कर्मवीर अण्णा त्यांची छर्यांची रायफल घेऊन नांदगिरीच्या डोंगरावर गेले होते. डोंगरावर असताना त्यांनी अगदी सहजच रायफलीचा चाप ओढला. तो नेमका झाडावर लटकलेल्या मधमाश्यांच्या आग्या मोहळावर लागला. भयंकर मधमाशांच्या थव्याने बेसावध असणार्या अण्णांवर जीवघेणा हल्ला केला. ते बेशुद्ध झाले. देवदर्शनासाठी आणि शेतावर जाण्यासाठी तिथे आलेल्या लोकांनी अण्णांना उचलून घरी आणलं. अण्णांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना काय करावं कळेना! त्यांनी रडत रडतच प्रबोधनकारांच्या छापखान्याकडे धाव घेतली. त्या प्रबोधनकारांना म्हणाल्या, तुम्ही माझे भाऊ आहात. माझ्या सौभाग्याच्या रक्षणाची जबाबदारी आता तुमची.
प्रबोधनकारांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी आपल्या जिवाभावाच्या मित्रावरचं संकट दूर करण्यासाठी धावपळ करून सातार्याहून डॉक्टरांना बोलावून आणलं. डॉक्टरांनी खूप वेळ प्रयत्न करून अण्णांच्या शरीरातले मधमाशांचे शेकडो काटे काढले. त्यानंतर दुसर्या दिवशी सकाळी अण्णा शुद्धीवर आले. ते शुद्धीवर येताच लक्ष्मीबाई प्रबोधनकारांना म्हणाल्या, तुम्ही माझं सौभाग्य वाचवलं. मी तुमची जन्मभर ऋणी राहीन. त्यावर प्रबोधनकार म्हणाले, वहिनी, या भल्या माणसाकडून भव्य दिव्य अलौकिक कार्य घडणार आहे, म्हणूनच परमेश्वराने त्याला वाचवलं. सातार्यातील रयत शिक्षण संस्थेच्या मुख्यायलात लक्ष्मीबाई पाटील यांचा पुतळा आहे. त्यांच्या अनावरण सोहळ्यात अण्णांचे सुपुत्र आप्पासाहेब पाटील यांनी ही आठवण सांगितली होती.
असं एकमेकांविषयी सख्ख्या भावांपेक्षाही जास्त घट्ट प्रेम आणि आदर असणारे प्रबोधनकार आणि कर्मवीर हे दोघे जोवर एकत्र आहेत, तोवर आपला, कारखान्यातून भरमसाठ फायदा उकळण्याचा हेतू साध्य होणार नाही, हे धनजीशेठ कूपरनी ओळखलं होतं. त्यामुळे त्यांनी या जोडीत फूट पाडण्याचं कारस्थान ठरवलं. प्रबोधनकार परतीचे दोर कापून सातार्यात आलेले असल्यामुळे त्यांचा निरुपाय झालेला आहे आणि त्यामुळे आपण सांगू तसंच ते करतील, अशी धनजीशेठना खात्री वाटत होती.
एकदा सकाळीच धनजीशेठ यांनी पाडळीच्या छापखान्यावर प्रबोधनकारांसाठी गाडी पाठवली. अर्जंट काम आहे, ताबडतोब सातार्याला यावं, असा निरोप त्यांनी पाठवला. सातार्याला धनजीशेठचा तेव्हा दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झालेला हंटवर्थ हा बंगला आणि त्यांची हापूस आंब्यांची मोठी कूपर बाग प्रसिद्ध होती. प्रबोधनकार बंगल्यावर पोहोचल्यावर धनजीशेठने त्यांना फळबागेत नेलं. शनिमाहात्म्य या पुस्तकात प्रबोधनकारांनी याचं ढंगदार वर्णन केलंय.
पारशी म्हणे केशवासी ।
चला मोटारीत फिरावयासी ।
अति रम्य फळबागेशी ।
तेथे सर्व विदित होईल ।।
शनिमाहात्म्या`त पुढे प्रबोधनकार लिहितात, `फळबागेत काय घडले हे वाचकांना विदित करण्याच प्रसंग हा नव्हे. परंतु भांडवलशाहीच्या बाह्य झकपक लखाकीच्या आत काय किमतीचे ब्रम्हांड असते, याचा मला तेथे निश्चित थांग लागला आणि मी निषेधपूर्वक त्याचा धिक्कार केला. पुढे सातारा सोडताना आणि पुण्यातून `प्रबोधन`चं प्रकाशन सुरू केल्यानंतर या काळातल्या घडामोडींवर प्रबोधनकारांनी दोन लेख लिहिले आहेत. त्यातही त्यांनी सविस्तर लिहिलेलं नाही. `साप्ताहिक लोकहितवादी`मध्ये त्यांनी यावर लेख लिहिला होता, असा संदर्भ सापडतो. पण `लोकहितवादी`चे अंक अजूनतरी उपलब्ध झालेले नाहीत.
पण हा प्रसंग घडून गेल्यानंतर जवळपास पन्नास वर्षांनी आत्मचरित्र माझी जीवनगाथा`मध्ये प्रबोधनकारांनी याविषयीचे तपशील नोंदवले आहेत. ते त्यांच्याच शब्दात वाचू या. `कूपरने भाऊरावाविरुद्ध मला गठवण्याची एक गुप्त योजना आखली. एक दिवस अगदी सकाळीच मला सातारला येण्याबद्दल आपली गाडी पाठविली. अर्जंट काम आहे. ताबडतोब यावे, असा निरोप. मला त्याने त्याच्या फळबागेत नेले. मला खूप उंचशा हरभर्याच्या झाडावर चढविले. आपला परस्परांचा ऋणानुबंध आमरणचसा काय पण वंशपरंपरेने टिकावा ही माझी इच्छा, असे जवळच वहात असलेल्या पाटातले पाणी हातात घेऊन शपथ घेतल्यासारखे त्याने केले. नंतर भाऊरावाविषयी अनेक खर्याखोट्या गोष्टींनी माझे मन दूषित करून, मी त्याच्या संसर्गापासून दूर रहावे, असा आग्रह चालविला. भाऊरावला उखडण्याच्या योजनेचेही धागेदोरे त्याने मला सांगितले. फक्त मी त्याला (म्हणजे भाऊरावांना) कसल्याही अवस्थेत पाठिंबा न देण्याची शपथ घ्यावी, म्हणजे झाले. `विचार करून काय ते सांगतो, उद्या आपण पुन्हा भेटू, अशा आश्वासनावर मी ती कटबाज मुलाखत आटोपती घेतली.’
धनजीशेठने कितीही प्रयत्न केले तरी प्रबोधनकार आणि कर्मवीर या जोडीत फूट पडण्याची शक्यता नव्हती. कोणत्याही कारस्थानाने प्रबोधनकारांच्या कर्मवीरांवरचा विश्वासाला तडा जाणार नव्हता. त्यामुळे फळबागेतली भेट संपवून प्रबोधनकार पाडळीला येऊन थेट कर्मवीर अण्णांनाच भेटले. इथे येताच ते त्यांना रेल्वे लायनीवर फिरायला घेऊन गेले, असा उल्लेख आहे. इथे रेल्वे लाइन म्हणजे रुळांच्या कडेकडेने असणारा मोकळा भाग असावा. रेल्वे लाइन म्हणजे रेल्वेवाल्यांना राहण्यासाठी बनवलेली कॉलनी असाही बोलीभाषेतला अर्थ आहे. पण तशी कॉलनी पाडळीजवळ होती की नाही, हे कळण्यास मार्ग नाही. फिरताना प्रबोधनकारांनी कर्मवीरांना काय झालं ते सविस्तर सांगितलं.
कर्मवीर अण्णांना हे अनपेक्षित नव्हतंच. ते म्हणाले, हे असं होणारच, याची मला कल्पना होतीच. कारण गेला पंधरवडाभर किर्लोस्करातून माझ्याबरोबर आलेल्या प्रत्येक इसमालाही माझ्याविरुद्ध चेतवण्याचा कूपरचा खटाटोप कसा चालला आहे. हे त्या लोकांनीच माझ्या कानांवर वेळोवेळी घातलेले आहे. मी तसा सुकासुकी जाणारा माणूस नाही. त्याच्या पाठीचे हातभर सालटे सोलून मगच जाईन. कर्मवीर अण्णांनी स्वतःचा मनसुबा स्पष्टच सांगितला. त्यांना प्रबोधनकारांचाही एक घाव दोन तुकडे करण्याचा स्वभाव माहीत होता. त्यामुळे कर्मवीरांनी प्रबोधनकारांना आग्रह केला की तुम्ही हातघाईवर येऊ नका, तुम्ही मात्र आत्ताच त्याला दुखवू नका. होय होयवर टांगता ठेवा.
नांगरांच्या किमतीवरून सुरू झालेला संघर्ष आता थांबण्याचं नाव घेत नव्हता. हा संघर्ष प्रामुख्याने धनजीशेठ कूपर आणि कर्मवीर अण्णांमध्ये असला तरी प्रबोधनकार त्यातील एक टाळता येण्याजोगा भाग होतेच. प्रबोधनकार आपल्या स्वभावाला मुरड घालून कर्मवीरांच्या आग्रहाचा मान ठेवून शांत राहिले. पण ते आतून दुखावले होते. त्यांनी शनिमाहात्म्या`त लिहिलं तसा निषेधपूर्वक धिक्कार करूनही ते शांत झालेले दिसत नाहीत. या काळातल्या मनस्थितीविषयी प्रबोधनकार`शनिमाहात्म्या`त लिहितात, `बाह्यत्कारी मी कितीही उमेद दाखविली, तरी अंतर्यामी मी फार निराश बनलो होतो. पाडळी म्हणजे माझ्यासाठी अक्षरशः तामसनिंदा बनली. माझा माणसांवरील विश्वासच उडाला. सारे जग मला मधुमुखविषघट दिसू लागेल. यातलं मधुमुखविषघट हे वर्णन खरं तर धनजीशेठ कूपर यांचं आहे. ते वरवर गोड बोलत असले तरी प्रत्यक्षात प्रचंड कुटिलपणे वागले. त्यांच्या वागण्यामुळे प्रबोधनकारांना सगळ्या जगावरचा विश्वासच उडाला, पण कर्मवीरांवरचा विश्वास मात्र भक्कम होता.