दहा वर्षांपूर्वी दांडगाईने भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार बनलेले नरेंद्र मोदी आणि रामदेव बाबा छाप मोदी भजन मंडळ काहीही अचाट दावे करत होतं. परदेशातील काळा पैसा परत आणला तर प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रूपये जमा होतील, अशी थाप मोदींनी मारली होती. मोदी पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जायला घाबरतात. त्यामुळे त्यांना कोणी प्रश्न विचारू शकलंच नाही, इतर नेत्यांनी मात्र निर्लज्जपणे ‘हा एक चुनावी जुमला होता’ असं दात विचकून सांगितलं. भारतीय जुमला पार्टीने भारतीयांच्या खात्यात १५ लाख आणले नाहीतच, उलट पेट्रोल-डिझेलपासून सगळ्या वस्तूंच्या महागाईने डोळे पांढरे व्हायची वेळ आली. न खाऊँगा, न खाने दूँगा ही धादांत खोटी घोषणा करणार्या मोदींनी प्रत्यक्षात भ्रष्टाचार अभय योजना जाहीर केली आहे, हे इलेक्टोरल बाँड्सची अपारदर्शक योजना आणि भाजपमध्ये सुरू असलेलं ‘डीलर’ लोकांचं ‘इनकमिंग’ पाहून लक्षात येतं.
एखाद्या शातिर गुन्हेगारांच्या टोळीने नियोजन करावं, तसं या योजनेचं नियोजन काटेकोरपणे केलं जाते. उगाच झाला भ्रष्टाचार म्हणून उघडकीस आणला जात नाही, तर सावज हेरून ते काम केले जाते. एकीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभावाखाली असणारे भाबडे किंवा लबाड माहिती अधिकार कार्यकर्ते जुंपून माहिती खणायची. त्यातूनच आरोप वा चौकशीसाठी एखादे सूत मिळवायचं. ते गवसलं की मग मीडिया व पक्ष कामाला लावून त्याचं भलं मोठं कुंभाड रचायचं, पाळीव पोपटलालांकडून अंदाधुंद आरोपाची राळ उडवायची, असं षडयंत्र अत्यंत प्रभावीपणे वापरून भाजपने आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, महाराष्ट्र सदन घोटाळा, टू जी घोटाळा, कोळसा घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धा घोटाळा अशी झालेल्या-न झालेल्या घोटाळ्यांची मालिका पेटवून काँग्रेसच्या राज्यात देशात जणू जळी स्थळी भ्रष्टाचारच आहे, असा भ्रम निर्माण केला. भाजपची सरकारं मात्र जणू धुतल्या तांदळासारखी. कारण, त्यांच्या घोटाळ्यांविषयी प्रसिद्धीमाध्यमांत ना हाक ना बोंब! ना शोधपत्रकारिता, ना विरोधकांच्या आरोपांना स्थान. व्यापमं, राफेल यांच्यासारखे घोटाळे आणि नोटबंदीसारखा महाघोटाळा झाला की ही भ्रष्टाचारविरोधी फौज चटईखाली लपते.
ही कार्यपद्धती अवलंबून घोटाळ्यांचे आरोप असलेल्या विरोधी पक्षांतल्या मोठ्या नेत्यांना भाजपने शरण आणलं, आपल्या गोठ्यात बांधलं. आदर्श घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ मागे लागलेले अशोक चव्हाण शरण येत नव्हते, आता तेदेखील आता भाजपास शरण गेले. पोपटलाल आणि आरटीआई कार्यकर्ते पक्ष व संघाची आज्ञा शिरसावंद्य मानतात. ‘फायर’ अशी आज्ञा आली तरच कामाला लागतात. यांना भ्रष्टाचाराची चाड वा चीड नसते, ते फक्त मेंदूगहाण निष्ठावंत स्वयंसेवक असतात. या मंडळींच्या उद्योगामुळे भ्रष्टाचारमुक्त विरोधी पक्ष होऊन भ्रष्टाचारीयुक्त भाजप तयार झालेली आहे, त्याचीही त्यांना काही खंत वाटत नाही. त्यांना हेही राष्ट्रकार्यच वाटतं. देव त्यांच्या बुद्धीला सद्गती देवो!
आता देशातील तमाम भ्रष्टाचारी भाजपात सामील झाल्याने आता एक मात्र होईल की यापुढे ह्या फौजेला फारसे काम उरणार नाही व भ्रष्टाचाराचा उगीच बोभाटा देखील होणार नाही. मध्ये मध्ये जय श्रीराम म्हणायचे, हनुमान चालिसा वाचायची व निवांत चरत राहायचे अशी एक नमो भ्रष्टाचार संवर्धन योजना आज अस्तित्वात आली आहे. या नव्या योजनेकडे सर्व पक्षातून कलंकित, भ्रष्ट, गुन्हेगार, बलात्कारी असे अनेक लोक आकर्षित होत आहेत. योजनेतील लकी ड्रॉमध्ये बहुतेकांना मंत्रीपदे मिळतात तर, मोजक्यांना मुख्यमंत्रीपदाची बंपर लॉटरीही लागते. २०१४ ते २०२१ या सात वर्षांत तब्बल राज्य पातळी आणि केंद्र पातळीवर लोकप्रतिनिधीपदाची निवडणूक हरलेल्या किंवा जिंकलेल्या विरोधी पक्षांच्या १७०० नेत्यांनी या स्कीमचा लाभ घेतला आहे. गेल्या दोन वर्षांत तर प्रोत्साहनपर होलसेल पक्षफोडीच्या घटना पाहता हा सतराशेचा आकडा तीन हजारांवर पोहोचला असावा.
२०१४ ते २०२१ या काळात १६३३जणांनी पक्ष बदलल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ह्या सेवाभावी संस्थेने निवडणुकीतील शपथपत्रे तपासून दिली आहे. त्यातील ४२६जण भाजपाच्या कळपात शिरले होते. या संस्थेच्या अहवालानूसार बहुतेक पक्षांतराच्या घटना मूल्याधिष्ठित राजकारणाचा अभावामुळेच झालेल्या आहेत. सत्ता व पदाचे आमिष, भ्रष्टाचारापासून अभय, गंभीर गुन्ह्यापासून अभय, व्यवसाय टिकवणे व अधिकच्या पैशाची हाव यासाठीच पक्षांतरे झालेली आहेत. एक दोन आमदार फुटणे, मोठा गट फुटणे इथपासून ज्यांनी पक्ष स्थापन केला, जे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्यासमोर तो पक्ष दुय्यम भ्रष्ट नेत्याला बहाल करणे, इथपर्यंत पक्षांतराचे अधःपतन झाले आहे, ते लोकशाही शेवटचे आचके देत असल्याचे लक्षण आहे. सत्ताधारी व्हा आणि बिनधास्त राहा हे हुकूमशाहीचे सार्थ वर्णन आज भारतात राजरोस दिसते आहे.
काँग्रेस पक्षाला सततच्या गळतीने सर्वाधिक ग्रासले आहे आणि त्या अर्थाने तो भाजपाने लचके तोडलेला जखमी पक्ष आहे. पण हा पक्ष जखमी अवस्थेत देखील जमेल तितकी लढत भाजपाला देतो आहे. काँग्रेस व सहकारी पक्षांचे हे लढत रहाणे भारतीय लोकशाहीसाठी फार महत्त्वपूर्ण आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर पक्षांतर होऊन देखील काँग्रेस पक्ष जो शाबूत राहिला आहे, तो निव्वळ जनतेच्या मनात खोलवर ठसठसत असलेल्या भाजपावरच्या रागाने शाबूत ठेवलेला आहे. जनता वारंवार काँग्रेसला कोठे ना कोठे मदतीचा हात देत आहे. २०२४ला महाराष्ट्रात देखील जनता महाविकास आघाडीला मदत करणार व भाजपाला गाडणार याचे संकेत देणारी एक सुप्त लाट आहे. त्या लाटेत आयाराम, गयाराम, मिंधे, गद्दार, टिल्ले, टपोरी, पोपटलाल, माजलेले, ठो ठो करणारे असे तमाम एकजात वाहून जाणार आहेत. ही भविष्यवाणी नसून तर तो भाजपाचा अंतर्गत सर्वे आहे. ४८पैकी २० जागा देखील निघणार नाहीत असा अंतर्गत सर्वे महाराष्ट्रातील भाजपाची ‘आदर्श’ स्थिती दाखवणारा नाही. मध्य प्रदेशातही आक्रित घडेल अशी अंतर्गत चाहूल लागली आहे. यानंतर वेळ कमी असल्याने भाजपाने इनकमिंगचे दार इमर्जन्सीमध्ये खुलेआम उघडले आहे. महाराष्ट्रात अशोक चव्हाण व मध्य प्रदेशात कमलनाथ या इनकमिंगचे थेट लाभार्थी आहेत.
महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण असे एकाच चव्हाण आडनावाचे चार मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाने दिले. आजवर १५ मुख्यमंत्री देणारा महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष फार खोलवर रूजलेला आहे. तर आजवर एकच मुख्यमंत्री (तो देखील उद्धवजींच्या आशीर्वादाने) देऊ शकलेला भाजप या मातीत रूजलेला नसून शिवसेनेचे खाऊन फक्त सुजलेला आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी जणू एकहाती भाजपा सत्तेत येणार अशा भाकड प्रचाराने गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे मुरब्बी भुलले. तीसपेक्षा जास्त आमदार स्वपक्षातून भाजपामध्ये गेले आणि त्या इनकमिंगच्या भरवशावर देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईनची वल्गना केली. भाजपाची एकहाती सत्ता न आल्याने इनकमिंग केलेले सर्व ना घरचे राहिले ना घाटावरचे! अशोक चव्हाण यांना हा सर्व इतिहास माहीत असून देखील त्यांनी पक्षांतर केले त्यावरून हे पक्षांतर फार वैयक्तिक स्वरूपाचे व ईडीच्या चौकशीच्या अडचणींवर मात करण्यासाठी केलेले पक्षांतर दिसते.
मध्य प्रदेशात कमलनाथ भाजपाचे कमलदास झाले आहेत त्यामागे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर केलेली कारवाई आणि न दिलेली राज्यसभेची उमेदवारी इतकेच कारण दिसते आहे. अशा नेत्यांच्या जाण्यामुळे काँग्रेस पक्षाला मोठे धक्के बसण्याचे दिवस फार आधीच संपले आहेत, इतका तो पक्ष आता या धक्क्यांना सरावलेला आहे. आजच्या काँग्रेस पक्षाचे वैशिष्ट्य हे धक्कातंत्र पचवणारे, दबावाला बळी न पडणारे, मोडेन पण वाकणार नाही असे झाले आहे. तात्पुरते नुकसानकारक असले तरी याचा पक्षाच्या निकोप आणि निरोगी वाढीसाठी नक्कीच फायदा होणार आहे. काँग्रेस पक्ष सहज संपणारा नाही आणि कदाचित २०१४ सालात लोकसभेचा तळ पाहिल्यावर त्यांचा आशादायक प्रवास कूर्मगतीने वरच्या दिशेने सुरू झाला आहे. यंदा काँग्रेस दमदार कामगिरी करेल असे एक्झिट पोल सांगतात, त्यात तथ्य आहे.
भाजपा मात्र फार वेगाने फोफावलेला दिसत असला आणि ताकदवान आणि अजिंक्य दिसत असला तरी भाजपाची वाढ निरोगी व निकोप नसून सुजमट व रोगट आहे. २०१४पासून भाजपामध्ये जे इनकमिंग झाले ते म्हणजे एकाच पायाला हत्तीरोग होऊन फक्त तो एकच पाय अवाढव्य मोठा होण्याचा प्रकार आहे. डासांच्या चावण्याने मलेरिया, डेंग्यू हे रोग जसे होतात तसेच अजून एक भयंकर रोग होतो, ज्यात सुक्ष्म अळ्यांचा शरीरात प्रादुर्भाव झाल्याने रोग्याचे पाय प्रचंड सुजतात. हा रोग हत्तीरोग या नावाने ओळखला जातो. शरीरातील इतर भाग एकदम बारीक, बरेचदा दोनपैकी एक पाय देखील बारीक आणि फक्त रोगग्रस्त एकच पाय अवाढव्य मोठा झाल्याने रोगी व्यक्तीचे आयुष्य खडतर बनते. शरीराचे एकाच ठिकाणचे स्नायू अवास्तव मोठे असण्याचा हा रोगट प्रकार आज फक्त हिंदी पट्ट्यातील सत्तेची सूज आलेल्या भाजपासारखा आहे. संपूर्ण शरीराचे सर्व स्नायू मेहनत करून प्रमाणबद्ध स्वरूपात कमावलेल्या व्यक्तीला शरीरसौष्ठवपटू म्हणून गौरव मिळतो. हत्तीरोगात शरीरात ‘क्युलेक्स विचकि फॅसिएटस’ या अळ्या डास चावल्याने शिरतात, तसेच भाजपामध्ये भ्रष्टाचारात वळवळणार्या अळ्या ईडी चावल्याने शिरतात. बरेचदा स्नायू टरारून फुगावेत म्हणून शरीराला घातक असलेले स्टेरोईड घेतले जातात, तसेच भाजपा आजकाल मिळेल ते स्टेरॉइड घेऊन चारशेपार तब्येत बनवण्याच्या आधीन गेला आहे.
भाजपाचे फोडाफोडीचे राजकारण याआधी काँग्रेस पक्षानेही केले होतेच, ती भारतीय लोकशाहीतील एक काळी बाजू आहे, असं म्हणून विषय सोडून देण्याचा लंगडा युक्तिवाद बर्याचदा सुशिक्षित मतदारांकडून केला जातो. तो चूक आहे. त्या राजकारणात विरोधक नष्ट करण्याचा हिंस्त्रपणा नव्हता. गेल्या दहा वर्षांत मात्र भाजपासाठी एकमेव काम असल्यासारखे देशभर फोडाफोडीचे मशीन अव्याहत सुरू राहिले आहे. त्यामुळेच देशभरात राजकीय अस्थिरता व अराजक निर्माण झाले आहे. विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री जेलमध्ये टाकले जातात, राज्यपालांना अडवणुकीचे काम देऊन पाठवले जाते. महाराष्ट्रात आधी शिवसेना व नंतर अक्षरशः गरज नसताना फोडलेली राष्ट्रवादी अशी जी खिचडी भाजपाने शिजवली व त्यावर अशोकराव चव्हाणांची फोडणी दिली त्याची खरेच भाजपाला गरज होती का? एखादा राजकीय पक्ष पाच वर्ष सत्तेबाहेर राहून नंतर स्वबळावर निवडून येणे अशक्य असते का? अडीच वर्षांत सरकार पाडून इतकी फोडाफोडी करायची व राज्याची फरफट करायची काय गरज? असे प्रश्न चीड आणतात व उत्तर देण्यासाठी सोपे नसतात. म्हणून तर आशिष शेलारांना अशोकरावांसोबत काय डील झाली असे विचारल्यावर ते अनुत्तरित झाल्याने पत्रकारावर वैतागलेले दिसले.
देश चालवणारा पक्ष हा देश घडवणारा असायला हवा, देश बिघडवणारा नको हे जनतेस पक्के ठाऊक असते. २०१४ला विकास व भ्रष्टाचार निर्मूलनासाठी एक सुवर्णसंधी देशाने मोदींना दिली व संशयास्पद पुलवामा हल्ल्यानंतरच्या भावनिक आवाहनास प्रतिसाद म्हणून परत सत्ता दिली. पण, दहा वर्षं फक्त वाढीव घोषणाबाजी व नेहरूंवर टीका करण्यात वाया गेली. दहा वर्षात भाजपाला सत्तेची अशी हवा लागली आहे की तो पक्ष स्वतःस जनतेपेक्षा मोठा समजू लागला आहे. आता तर त्यांना पक्षाबाहेरून आलेले गद्दार, खा खा झालेले गब्बर भांडवलदार, ईडी, गोदी मीडिया, राम मंदिर अशा गोष्टींवर विसंबणे जास्त योग्य वाटते आहे. मोदींची लोकप्रियता खरीच असेल, सरकारची खरोखर कामे असतील, रामलल्लाची कृपा असेल वा नांदेडच्या जनतेची खासदार निवडून देण्याच्या प्रगल्भतेवर विश्वास असेल तर त्यावर विसंबून निवडणुकीत जाण्यापेक्षा अशोक चव्हाणांना आपल्या रथात आणणे भाजपाला आज जास्त गरजेचे का वाटते आहे? कारण २०२४ची लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी निकराची आणि अस्तित्वाची लढाई ठरली आहे. लोकसभेत एकहाती सत्ता आली नाही तर भाजपाचा सगळा हवा भरून फुगवलेला डोलारा व त्यासोबत त्या पक्षाच्या भांडवलदार मित्रांचाही डोलारा एका झटक्यात कोसळून पडेल. भ्रष्टाचारी, गुन्हेगारीचे आरोप असलेले, गद्दार, मिंधे, देश लुटायला निघालेले लुटारू भांडवलदार, महिला कुस्तीपटूंना अपमानित करणारे, बलात्कारी अशांना मोदी सरकार स्थापन होणे गरजेचे आहे. मोदींना सत्तेबाहेर फेकणे ही पीडित, वंचित, गरीब, बेरोजगार, शेतकरी, कामगार यांची गरज आहे. सत्ता, ताकद, मीडिया, धार्मिक भावनांना आवाहन, विकासाच्या भूलथापा, इव्हेंटबाजी, जाहिरातबाजी आणि पैसा याने गरीबांचे मत विकत घेणे सहज शक्य असल्याचे भाजपाचे एक राजकीय गणित आहे. तरीदेखील भारतात मतपेटीवर डल्ला मारणे सोपे नाही. कितीही इनकमिंग केले तरी मोदींचे आऊटगोईंग टळेल याची शाश्वती काही देता येत नाही.