लग्न झाल्याची खूण म्हणून बायकांना मंगळसूत्र घालावं लागत असेल, तर पुरूषांनाही काहीतरी सौभाग्यखूण घालायला द्यायला हवी ना?
– क्षमा गोळवलकर, सोलापूर
मी तर म्हणतो पुरूषांनाही मंगळसूत्रच घाला ना. पण सुरूवात आपल्याच ‘परिवारातल्या’ पुरूषांपासून करा.. नाहीतर आपली संस्कृती, परंपरा मोडली म्हणून तुमच्याच ‘परिवारातले’ पुरूष भावना दुखावून घेतील… मग तुम्हाला ‘क्षमा’ नाही… कळलं का ‘गोळवलकर’ ताई?
संतोषराव, टु बी ऑर नॉट टु बी इज द क्वेश्चन… डु यू हॅव द आन्सर?
– रोहित कुलकर्णी, छ. संभाजीनगर
येस डेफिनेटली आय हॅव अन्सर… पण योग्य वेळ आली की उत्तर देईन… (कोणा ‘अभ्यासू’ नेत्याप्रमाणे पॉलिटिकल उत्तर नाहीये… इंग्लिशमध्ये प्रश्न विचारलायत ना… सो, इंग्लिशचा अभ्यास करतो… उत्तर देण्याएवढं इंग्लिश आलं की उत्तर देतो… तोवर वाट बघूया… तुम्हीबी आणि मी बी!)
संतोषराव, व्हॅलेंटाईन डे घरीच झाला की?…
– मंगेश पाचपुते, सोनई
व्हॅलेंटाईन डे आपल्याच घरी, आपल्या व्हॅलेंटाईनबरोबर साजरा करा. बाकी ३६४ दिवससुद्धा… आपल्याच घरी, आपल्याच
व्हॅलेंटाइनबरोबर काढा. तुमच्या मनात आहे तसं करू नका… नाहीतर ३६५ दिवस घराबाहेर काढायला लागतील… आणि दुसर्यांचा हेवा करत, असंच विचारत फिरावं लागेल, ‘काय व्हॅलेंटाईन डे घरीच का?’
मी तिला रोज इनबॉक्समध्ये जाऊन ‘जेवण झालं का’ हे न चुकता विचारतो… ती माझ्या प्रेमाला प्रतिसाद देईल ना संतोष भाऊ?
– प्रथमेश शिंदे, सातारा
जेवण झालं का? या प्रश्नानंतर ‘काही उरलंय का? येऊ का?’ असे उपप्रश्न येतील, असं तिला वाटलं तर प्रतिसाद मिळणार नाही. एक काम करा. तिला डायरेक्ट विचारा ‘भांडी घासायला येऊ का?’ या प्रश्नावर प्रतिसाद नाही आला तर मला विचारा.
आपल्याकडे पैसे मागायचे असतात तेव्हा रोज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाइटचे मेसेज आणि कोणाकोणाचे सुविचार फॉरवर्ड करणारे मित्र पैसे परत करायची वेळ आल्यावर नॉट रिचेबल कसे होतात?
– आमीर शेख, गोवंडी
असे लोक रिकामटेकडे असतात. पैसे मिळाल्यावर ते बिचारे बिझी होतात. आणि तुम्हाला वाटते ते नॉट रिचेबल झाले. आपण ‘आमीर’ आहात, त्यातून ‘शेख’, म्हणजे तुमच्याकडे पैसा असणारच आणि मेसेज वाचायला वेळच वेळ आहे. तुम्ही मला पैसे देत जा. मी रिचेबल राहीन.. मेसेज करत जाईन. (बाकी काही नाही. तुमचे दु:ख मला बघवत नाही.)
कोट्यधीश कसं बनावं, हे सांगणारी पुस्तकं लिहिणारे, पैसे घेऊन प्रेरणादायी व्याख्यानं देणारे लोक स्वत: कोट्यधीश का नसतात? त्यांचा सल्ला त्यांच्यावरच लागू पडत नाही काय?
– सई परचुरे, अंधेरी
हे म्हणजे स्वच्छतेचं आवाहन करणार्यांनी स्वतः खरा कचरा काढावा, गरिबांबद्दल बोलणार्यांनी स्वतः गरीब असावं, सूट बूट घालून गांधीजींसमोर नाक घासणार्यांनी स्वतः पंचा नेसून फिरावं अशी अपेक्षा करण्यासारखं आहे. (कोट्याधीशांना लिखाण करताना, व्याख्यान देताना आणि कोणाच्या ‘प्रश्नांची उत्तरं देताना’ पाहिलंय का? तरी मला तुम्ही कोट्याधीश होण्याबद्दल प्रश्न विचारताय?)
व्हॅलेंटाइन डेला तिला धडधडत्या हृदयाने भेटलो. प्रपोझ करणार इतक्यात ती म्हणाली, तू किती चांगला आहेस. तुला चांगली मुलगी मिळू शकते. तू सिंगल कसा? आता काय बोलू?
– यश निगडे, भोसरी
बोलायचं असेल तर, ती तुम्हाला ‘चांगला’ म्हणाली याबद्दल तिला थँक्यू बोला. उगाच तिला प्रपोज करून तिला ‘खरं बोलायला’ भाग पाडू नका. (ही जिला ओळखत नाही अशी अनोळखी मुलगी शोधा आणि तिने ‘तुम्हाला ओळखण्याआधीच’ प्रपोज करा. पण आधी ती सिंगल आहे की नाही याची खात्री करून घ्या. नाहीतर ती तुमच्याबद्दल ‘खरं खरं’ बोलायची.)
आईवडिलांबरोबर मुलं इतका काळ राहतात, त्यांच्यातलं नातं पाहतात, तरी पुढे जाऊन स्वत: लग्न कसं करतात?
– अब्रार मणियार, गोवंडी
‘जे’ पाहिलेलं नसतं (आई-वडिलांचे लग्न) ‘ते’ करण्याची मुलांना उत्सुकता असते. काही मुलांना ‘ते’ जमतं (लग्न करायला). ज्यांना जमत नाही (लग्न करायला) ते लिव्ह इनमध्ये राहतात. ज्यांना ‘काहीच जमत नाही’ ते असे प्रश्न विचारतात.