मागच्या आठवड्यात आमच्या सुलतानाला खाली फिरायला घेऊन गेले होते, तेव्हा शेजारच्या मंजिरी वहिनी भेटल्या. मला म्हणाल्या, ‘अगं तू काय करते आहेस या थंडीत?’
मी सांगितलं- थंडीचे लाडू.
त्यांनी माझ्याकडे वेड्यासारखं बघितलं आणि म्हणाल्या- तसं नाही गं. म्हणजे नाही का, थंडीच्या दिवसात भरपूर प्रदर्शनं लागलेली असतात, गाण्याचे कार्यक्रम असतात, खरेदीसाठी केवढ्या तरी ऑफर्स असतात. माझी तर खरेदीची यादीसुद्धा तयार आहे.
मी तर यातील काहीच ठरवले नव्हते. म्हणजे आम्ही एवढे मागासलेले निघालो की आम्ही चक्क नाताळच्या सुट्टीत कुठे फिरायला जायची सुद्धा काहीच योजना आखली नाही हो. म्हणजे मंजिरी वहिनी भेटल्या नसत्या तर मला माझ्या अगाध अज्ञानाची जाणीवच झाली नसती. आम्ही म्हणजे अगदी ट्रेंडपेक्षा वेगळेच जाणारे ठरलो असतो. आता मला सुद्धा नाताळच्या सुट्टीत कुठे जायचे, कुठली प्रदर्शने बघायची, कुठे खरेदी करायची याची तयारी करून ठेवावी लागेल, हा विचार मनात आला. वहिनी म्हणत होत्या तसं खरंच या मौसमात केवढ्या ऑफर्स असतात ना. म्हणजे कपडे म्हणू नका, जोडे, चमड्याच्या वस्तू, दागदागिने- अगदी फिरायला जाण्यासाठी टूर कंपन्यांच्या सुद्धा ऑफर्स असतात. माझ्यासारख्या सामान्य माणसाचा एव्हढा विचार करून या ऑफर्स येतात, या नुसत्या विचारानेच माझे मन भरून येते.
या महिन्यात काय काय ऑफर्स आहेत हे बघण्यासाठी मी वर्तमानपत्र उघडले. असेही हल्ली पहिली तीनचार पानं माझ्यासारख्या फक्त ऑफर्स आणि भविष्य यासाठी वृत्तपत्र लावणार्या लोकांचा विचार करूनच भरलेली असतात. बातम्यांमध्ये काहीच स्वारस्य नसल्याने त्या चौथ्या पाचव्या पानापासून सुरु होतात. तर त्यात माझ्या पर्सला झेपतील आणि न झेपतील अशा कित्येक ऑफर्स होत्या.
त्यात सराफाची जाहिरात होती. अरे हो, सराफ नाही म्हणायचं. डाऊन मार्केट लगता है. ज्वेलर्सच्या जाहिराती होत्या. नाताळच्या मुहूर्तावर करा आमच्याकडे सोने खरेदी आणि मिळवा विशेष सवलत. सवलत काय तर घडणावळीवर तीन टक्के सूट. जुने दागिने देऊन नवीन हिर्याचे दागिने घेतले तर अजून दोन टक्के सूट. मला एक कळत नाही, दिवसामाजी एवढी सोने, चांदी, हिर्यांची खरेदी होते. शिवाय मुगल आणि इंग्रज भारतातून एवढे हिरे घेऊन गेले म्हणतात. मग, तरीही आम्हाला विकायला अजून एव्हढे हिरे शिल्लक आहेत?
सांताक्लॉजला घरी येताना हिर्याचं दुकान लागतं काय? सांताक्लॉजने आणलं तर ठीक, नाहीतर घरच्या सांताक्लॉजला सांगावे लागेल.
बिल्डर्सच्या सुद्धा नवीन वर्षाची भेट म्हणून ऑफर्स होत्या. यांचं एक बरं असतं. वर्षभर कसल्या तरी ऑफर्स असतातच. पाडवा, दसरा, दिवाळी, इंग्रजी नवीन वर्ष, आर्थिक नवीन वर्ष असं कशाचंही वावडं नाही. ३१ डिसेंबरपर्यंत घर बुक केलं तर कार फ्री अशी ऑफर होती. जाहिरातसुद्धा छान होती. ‘आमचं घर, आजीचं घर.’ फोटोही दिला होता तो सुंदर होता. एकदम दाट झाडीतील आजीचं घर असावं तसंच होतं. मी म्हटलं, आहे काय ते तरी बघावं. जाहिरातीत सोशल मीडिया पेजची लिंक दिलेली होती. ती लिंक मोबाईलवर उघडली. त्यावर सुंदर व्हिडीओ दिला होता. प्रशस्त बंगला, अंगण, ओटा सगळं खरंच आजीच्या घरासारखं. किंमत काय असेल याची उत्सुकता वाटली. तर गावाच्या बाहेर २५ किलोमीटरवर असलेल्या घराची किंमत होती ५ करोड रुपये. डोळ्यांसमोर अंधारीच आली. किंमत जास्त वाटते असे खाली लिहिणारच होते तर एकीने आधीच लिहिलेलं दिसलं. घर आजीच्या घरासारखं आहे हे खरं, पण किंमत बघून आजी ढगात जाईल त्याचं काय?
नंतरच्या जाहिराती सुपरमार्केटच्या ऑफर्स सांगणार्या होत्या. म्हणजे २ रुपये किलो कांदे, ३० रुपयात ५ किलो गहू, २० रुपयात २ किलो साखर वगैरे. मी म्हटलं, उगीच लोक महागाईची तक्रार करीत असतात. बघा, किती स्वस्त हवं अजून! कपडे बदलून लगेच त्या सुपरमार्केटमध्ये गेले. ५ किलो गहू, २ किलो कांदे, २ किलो साखर वगैरे घेतलं. बिल केलं तर त्यांनी सांगितलेल्या किमतीपेक्षा कितीतरी जास्त भरलं. मी एक हुशारी केलेलीच होती. पेपर बरोबर नेलेला होता. त्यांना म्हटलं, तुम्ही मला फसवू शकत नाही, हे बघा पेपरमधील तुमची जाहिरात. तर ते म्हणाले, तुम्हीच बघा. या सगळ्या ऑफर्सच्या खाली मुंगीच्या पावलाएवढ्या बारीक अक्षरात लिहिलेलं होतं, ३००० रुपयांच्या खरेदीवर वरील वस्तू त्या किंमतीत उपलब्ध. अशी कशी मी वेंधळी, चष्मा लावूनही मुंगीच्या पावलाएवढी अक्षरं दिसली नाहीत, म्हणजे काय?
मग ठरवलं, वर्तमानपत्रावर विश्वास न ठेवता मार्केटमध्ये प्रत्यक्ष जायचं. तिथे तर सगळं डोळ्यांनी बघून मग ठरवता येईल ना.
काय मनाला भुरळ पाडणार्या ऑफर्स होत्या हो. कपड्यांची तर काय विविधता. दुकानदार जोरात ओरडून ओरडून ‘या या’ म्हणून बोलावत होते. एकजण जोरात ओरडत होता, या या, आमच्याकडे सगळ्या साइझेसचे ड्रेसेस फक्त ५०० रुपयात, स्मॉल, मिडीयम- आणि नंतर माझ्याकडे बघून म्हणाला- लार्ज असे सगळे साइझेस. या या.
एवढा राग आला ना मला. मी तर त्या पावलीच मार्वेâटमधून परत येणार होते. पण अहोंना मागच्या कित्येक महिन्यांपासून रुमाल आणि मोजे घ्यायचे होते.
ऑफर्स येण्याचीच वाट बघत होते. म्हटलं, आता ऑफर्स आहेतच, तर करूया रुमाल आणि मोज्यांची खरेदी. पण काय सांगू, माझ्या मनाप्रमाणे मोजे आणि रुमाल मिळतच नव्हते. मग प्रदर्शन चालू होतं म्हणून त्यातून मुलांना जोडे आणि कपडे घेतले. माझी पर्स २-४ महिन्यात खराबच झाली असती म्हणून ती घेतली. तर त्यावर एक रुमाल फ्रीच मिळाला. यांना म्हटलंदेखील, ‘बघा, झाली की नाही तुमची अर्धी खरेदी.’
खरेदी करून दमल्यामुळे मधल्या वेळेत हॉटेलमध्ये जेवण झालं. हजार पाचशे वाचवण्यासाठी दिवसभर खरेदी करत होतो, तेव्हढेच हॉटेलवर खर्च केलेले होते. हिशेब बरोबर झाला. पण तरीही अजून मन काही भरलं नव्हतं.
आता सगळ्यांना काही ना काही घेतलं तर सुलतानाची काहीतरी खरेदी व्हायला हवी की नाही? तोदेखील घरातील सभासद आहे. म्हणून मग त्याच्यासाठी पायमोजे घेतले. थोडा खाऊदेखील घेतला.
पुरुषांचं सगळं अजबच असतं. त्यांच्या ऑफरही तशाच. ५ शर्ट्स घेतले की ३ फ्री. आम्ही खुश झालो. म्हटलं चांगली आहे ऑफर. दुकानात ही गर्दी. त्यातून पहिले ५ शर्टच निवडता येईनात. जे आवडले त्यात आपल्या मापाचा नाही आणि जे मापाचे आहेत ते आवडेनात. ५ निवडताना ही मारामारी तर फ्रीवाले निवडायला रात्रच व्हायची. म्हणून ते न घेताच बाहेर पडलो.
बॅगा, पर्सेस, चप्पला, कपडे, चष्मे, भेटीच्या वस्तू सगळ्यावर ऑफर्स. सगळं मार्केट पालथं घालूनही अजून काहीतरी शिल्लक राहिलंय असं वाटत होतं. आज घेतलं नाही तर पुन्हा कधीच मिळणार नाही, या अहमहमिकेने लोकांची खरेदी चालली होती.
त्यातच दिसलं ज्योतिषाचं दुकान. ट्रेन्डला अनुसरून ज्योतिषाने सुद्धा नवीन स्कीम काढलेली होती. आजच आमच्याकडे या आणि तपासून बघा आपल्या मृत्यूची तारीख. कॉम्बो पॅकेज घेतलं तर मृत्यूनंतरची नोंदणी आम्ही इथेच करून घेतो. म्हणजे कदाचित असे असावे की आता एवीतेवी मृत्यूची तारीख समजणारच आहे तर अॅडव्हान्समध्ये मृत्यूनोंदणीचं पॅकेज घेऊन टाकावं. इकडे मृत्यू झाला की तिकडे मृत्यूचं प्रमाणपत्र घरच्यांच्या हातात. मला तर वाटतं की अजून एकदोन पॅकेज वाढवायला वाव आहे. म्हणजे अजून ५०० रुपये भरले तर सरणावर साध्या लाकडाऐवजी चंदनाची लाकडं. अजून ५०० भरले तर प्रेतावरती घालायला सिल्कची चादर आणि निशिगंध गुलाबाची फुलं. माझं तर ऊर भरूनच आलं. क्षणार्धात आपल्या मृत्यूची तारीख बुक करून टाकावी की काय असे वाटले, पण समजा माझ्या मृत्यूच्या आधी ज्योतिषाचाच मृत्यू झाला तर काय, असा विचार मनात आला आणि मी मोठ्या कष्टाने हा मोह बाजूला ठेवला.
तान्ह्या बाळापासून म्हातार्या माणसापर्यंत सगळ्यांसाठी काहीतरी होतंच. आमचं सगळं बघून झालेलं होतं. भरलेल्या पिशव्या आणि रिकामी पर्स असं सगळं घेऊन आम्ही परतलो. तेवढ्यात बिल्डिंगमधील एकीला जुळं झालं म्हणून सांगणारा तिच्या आईचा फोन आला. इथेही ऑफरच होती म्हणजे. एकावर एक फ्री.
दरवर्षी या ऑफर्सच्या जंजाळात सापडायचं नाही असं ठरवते आणि दरवर्षी नेमाने बाजारात जातेच. काय आहे हे बघण्याची उत्सुकता वाटतेच. माणसाचं मन मोठं विचित्र आहे. विशेष करून भारतीय माणसाचं. १०० रुपयांच्या वस्तूवर एक रुपयाचं काही प्रâी मिळणार असं जरी समजलं तरी माणसं ती घ्यायला धावतात. आपल्याकडे जे आहे त्यापेक्षा अजून जास्त मिळतंय ही भावनाच माणसाला ऊर्जा देऊन जाते आणि त्या भावनेचा व्यापारी फायदा घेतो. ऑफर्स म्हणजे खरं तर या भावनेला घातलेला हात असतो. कितीही व्यवहारी असला तरी माणूस त्यात अडकतोच. जोवर माणूस आणि भावना आहेत, तोवर ऑफर्सचा बाजार मांडला जाणार हे सत्यही आहेच.