टाचणी पडली तरी आवाज येईल अशी शांतता त्या केबिनमध्ये पसरलेली होती. आठ आठ खमके अधिकारी त्या दालनात उपस्थित होते, पण विनाकारण चुळबूळ करण्यापलीकडे त्यांची फारशी उपस्थिती जाणवत देखील नव्हती. खाडकन दरवाजा उघडून कमिशनर साहेब आत शिरले आणि सर्वजण अदबीने उभे राहिले.
’सिट डाऊन जंटलमन…’ शांत स्वरात कमिशनर साहेब म्हणाले आणि प्रत्येकाचा जीव जरा भांड्यात पडला; पण अचानक, ’इतके दिवस बसून काढलेत आपण, त्याचेच तर हे परिणाम आहेत’ ह्या कमिशनर साहेबांच्या पुढच्या वाक्याने प्रत्येकाचा श्वास पुन्हा घशात अडकला. कमिशनर साहेबांचा चेहरा आता शांतपणाचा बुरखा टरकवायला लागला होता. एका करारी, कर्तबगार अधिकार्याची घुसमट चेहर्यावर स्पष्ट जाणवायला लागली होती आणि ती तिथे बसलेल्या प्रत्येकाला अस्वस्थ करत होती.
प्रसिद्ध अभिनेत्री तनयाच्या खुनाची केस सीबीआयकडे सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. पोलीस दलाची मान शरमेने खाली झुकण्यासाठी आता फक्त काही काळ उरला होता. खून होऊन पंधरा दिवस उलटले होते, मात्र पोलिसांना अजून खुनामागचे कारण देखील शोधण्यात यश आले नव्हते. इतर गोष्टींबद्दल न बोललेले बरे. कमिशनर साहेब अस्वस्थपणे समोरचा पृथ्वीचा गोल फिरवत बसले होते आणि इतर अधिकारी एकमेकांच्या चेहर्याकडे अस्वस्थतेने पाहत होते. सुरुवात कोणी करायची हा खरा प्रश्न होता.
’सर, ह्या केसमध्ये आपल्याला लवकरच एखादे लीड मिळण्याची शक्यता…’ शेवटी इन्स्पेक्टर खोपडेंनी धाडस केले.
’शक्यता? खोपडे अहो शक्यता, अशक्यता, संधी ह्यासाठी आपल्याकडे वेळ उरलाय का? मला रिझल्ट हवाय. एखादा ठोस पुरावा हवाय. कुठे आहे तो? अजून दोन दिवसात काही हाताला लागले नाही, तर केस सरळ सीबीआयकडे जाईल. माझ्या संपूर्ण कारकीर्दीत इतका लाजिरवाणा प्रसंग मी अनुभवलेला नाही. आपले पोलीस दल इतके निष्फळ बनत चालले आहे का? साधा फोन वाजला तरी आजकाल दडपण यायला लागते मला की चुकून वरिष्ठांचा तर फोन नाही ना आला?’
’सर, आपण पूर्ण प्रयत्न करतो आहोत. पण…’
’हा ’पण’ आपल्या सगळ्यांना घेऊन बुडणार आहे. तुम्ही लोक काय करणार आहात मला माहिती नाही. माझ्याकडून मी तुम्हाला पुढचे १२ तास सूट देत आहे. ज्याच्यावर संशय वाटेल त्याला उचला, कोणाच्या हव्या त्याच्या घराची झडती घ्या, काय वाटेल ते करा पण मला रिझल्ट द्या!’
’सर.. मी का सुचवू का?’
’बोला अर्नाळकर..’
’सर, ह्या परिस्थितीत मला एकच मार्ग दिसत आहे.’
’कोणता?’
सर, ’त्याला’ परत बोलवा. सस्पेन्शन रद्द करा आणि ही केस त्याच्याकडे सोपवा.’ अर्नाळकरांचे वाक्य संपले आणि दालनातली चुळबुळ पूर्वीपेक्षा जास्त वाढली. ’त्याला’ म्हणजे कोणाला हे दालनातल्या प्रत्येकाला न सांगता उमगले होते.
’अर्नाळकर शुद्धीवर आहात का? अहो, वेळेप्रसंगी मला देखील आवरत नाही तो प्राणी. सीनियरवर हात उचलला म्हणून सस्पेंडेड आहे तो. कल्पना आहे ना तुम्हाला?’
’आपल्याकडे दुसरा कोणता मार्ग शिल्लक आहे का,’ अर्नाळकरांनी सर्वांकडे नजर टाकत विचारले आणि सर्वांच्या माना, ’बघा, ठरवा आता तुम्हीच’ अशा अर्थाने हालत्या झाल्या.
’मी त्याची जबाबदारी घेतो सर!’ खोपडे साहेब ठामपणे म्हणाले आणि कमिशनर साहेबांनी नाईलाजाने मान डोलवली.
– – –
’इन्स्पेक्टर कुशाग्र बुद्धिवंत रिपोर्टिंग सर!!’ कडक आवाज आणि त्या जोडीला कडक सॅल्यूट ठोकला गेला आणि का कोण जाणे, कमिशनर साहेबांना उगाचच मनावरचे ओझे बरेच हलके झाल्यासारखे वाटले. सहा फूट उंची, त्या उंचीला शोभेल असे पीळदार शरीर आणि मुख्य म्हणजे नावाला शोभणारी बुद्धी. डिपार्टमेंटमध्ये एकाच वेळी प्रचंड प्रेम आणि प्रचंड द्वेष लाभलेले व्यक्तिमत्त्व त्यांच्यासमोर उभे होते.
’कुशाग्र, तुझ्या सीनिअर्सच्या रदबदलीवरून मी तुला पुन्हा एकदा संधी देत आहे. आय होप, तू ह्यावेळी स्वतःवर नियंत्रण ठेवशील.’
’येस सर!’
’खरे तर तुझे सस्पेन्शन पूर्ण झाले की मगच तुला पुन्हा कायम करावे असे माझे मत होते.’
’हरकत नाही सर! मी त्यानंतर हजर होईन,’ विनम्रपणे कुशाग्र म्हणाला आणि कमिशनर साहेब चडफडले. बेण्याला आपली अडचण बरोबर माहिती आहे, म्हणून अजून छळतंय.
’नो नो. अगदी तसेच काही नाही. तुम्ही आजच चार्ज घ्या. खोपडे सध्या एका केसवर काम करत आहेत, मी तुला त्यांच्याकडे पाठवतो आहे.’
’तनया मर्डर केस सर?’
’हां… तीच तीच. केस तरी ओपन अँड शट आहे. पण आल्या आल्या तुला एकदम ताण नको म्हणून ह्या साध्या केसवर नेमतो आहे,’ धूर्तपणे कमिशनर साहेब बोलले आणि कुशाग्र फस्सकन हसला.
’ओपन अँड शट? सीबीआयकडे जायची वेळ आलीये ही तुमची साधी सोपी केस सर.’
’यू आर फॉलोइंग?’
’ईच अँड एव्हरी स्टेप सर. ह्या क्षणी डिपार्टमेंटच्या माणसांना जेवढी माहिती आहे तेवढीच माझ्याकडे देखील आहे,’ कुशाग्र तडफेने बोलला आणि कमिशनर साहेबांनी कौतुकाने त्याच्याकडे पाहिले. हा माणूस सन्पेन्शनमध्ये पण निवांत बसला नव्हता तर.
’गुड गुड कुशाग्र. ही केस आपणच सोडवायची आहे. डू युवर बेस्ट!’
– – –
’आदमाने, मला पहिल्यापासून सविस्तर सगळे सांगा…’
’म्हणजे रविवार होता बघा बुद्धिवंत साहेब. आम्ही आपले चौकीत निवांत गप्पा झाडत होतो, अचानक शरद पिसाळांचा फोन आला. शरद पिसाळ म्हणजे अंकुशचे मित्र. अंकुश म्हणजे तनया मॅडमचा नवरा.’
’वंशावळ सोडा आदमाने. मुद्द्यावर या.’
’हां साहेब, तर पिसाळ म्हणाले की तनया मॅडमच्या फार्महाऊसवर खून झालाय तुम्ही ताबडतोब या. खून कोणाचा? तर खुद्द तनया मॅडमचा. आता बोला साहेब.’
’मी काय बोलणार? तुम्हीच काय ते बोलत राहा…’
’मग साहेब मी अर्नाळकर साहेबांना खबर दिली आणि सगळा ग्रूप घेऊन फार्महाऊसला हजर झालो. मॅडमच्या बेडरूममध्ये त्यांचे प्रेत पडलेले होते. गळा आवळून खून झाला होता.’
’आजूबाजूला काही संशयास्पद वस्तू? एखादा पुरावा म्हणता येईल असे काही?
’काहीच नाही साहेब. त्यांच्याच गाऊनच्या बेल्टने त्यांचा गळा आवळलेला होता. तो शेजारीच पडलेला होता.’
’हाताचे ठसे, पायाचे, बुटाचे?’
’काहीही नाही!’
’केसची फाइल घेऊन या आदमाने आणि मी माझे काम संपवेपर्यंत दर अर्ध्या तासाने एक कडक कॉफी!’
आदमानेने आणलेली फाइल हातात घेत कुशाग्रने कॉफीचा मग उचलला आणि पुढचे दोन तास तो आजूबाजूचे जग पूर्ण विसरला.
’तनया सरस्वती’… मालिका विश्वात सध्या गाजत असलेले नाव… त्यात वेगवेगळे स्टंट करून आणि वादग्रस्त विधाने करून सतत चर्चेत राहण्याची सवय वेगळीच. जेवढी प्रसिद्ध तेवढी कुप्रसिद्ध. नुकतीच सरस्वती आणि सैनिकांवर वादग्रस्त टिपणी केल्याने उजव्या विचारसरणीच्या रोषाला प्राप्त ठरली होती. बलात्कार आणि खुनाच्या पाच सात धमक्या देखील मिळाल्या होत्या. प्रकरणात दुसरा संशयित होता अमन खन्ना. तनयाचा एक्स बॉयप्रâेंड. नुकत्याच झालेल्या एका पार्टीत तनयाने त्याला सगळ्यांसमोर कानफडले होते. रस्त्यावरची मुले करतात तशी मारामारी ह्या दोघांनी ’ग्रँड हयात’सारख्या ठिकाणी लाइव्ह करून दाखवली होती. तिसरा संशय होता अंकुशवर, हा तनयाचा सध्याचा नवरा. तनयाची एकूण वर्तणूक आणि पैसा उधळण्याची सवय यावरून दोघांचे चांगलेच बिनसल्याच्या बातम्या होत्या.
सर्व संशयितांची चौकशी पोलिसांनी आपल्या पद्धतीने केली होती. मात्र कोणाच्याच चौकशीत संशयास्पद असे काही आढळले नव्हते. कुशाग्रने पुन्हा एकदा सगळ्यांची चाचपणी स्वत: करायचे ठरवले आणि खोपडे साहेबांनी परवानगी घेऊन तो बाहेर पडला.
– – –
’मॉर्निंग सर..’ अदबीने विश करत अमन खन्ना कुशाग्रच्या शेजारी बसला.
’मॉर्निंग मिस्टर खन्ना.’
सर, राग नका मानू; पण ह्यापूर्वी दोनवेळा मी माझा जवाब नोंदवला आहे. पोलिसांचे असे सतत सेटवर येणे, पेपरात माझे नाव गाजत राहणे माझ्या करिअरसाठी चांगले नाही सर.’
’बरोबर आहे तुमचे खन्ना. पण आमची पण मजबुरी आहे. खुनासारख्या केसमध्ये सतत सगळ्या बाजू पुन्हा पुन्हा पडताळून घ्याव्या लागतात. मला सांगा, रविवारी दिवसभर तुम्ही कुठे होतात?’
’मी ’सजन कर लो मिलन’ या माझ्या नव्या मालिकेच्या सेटवर होतो सर. तुम्ही कोणालाही विचारू शकता. ३६० लोकांचा क्रू आहे सर आमचा. सकाळी आठला शिफ्ट सुरू झाली, ती रात्री दहाला संपली सर.’
’दुपारी तब्बल दोन तास तुम्ही गायब होतात खन्ना,’ करड्या आवाजात कुशाग्र बोलला आणि खन्नाचा चेहरा पांढरा पडला. ’कुठून कशी माहिती काढायची ते मला बरोबर कळते खन्ना.’
’ते मी जरा… मला जरा बरे वाटत नव्हते म्हणून मी व्हॅनिटीमध्ये आराम करायला गेलो होतो.’
’पण तुम्हाला सेटवर न्यायला असिस्टंट डिरेक्टर आला, तेव्हा व्हॅनिटी मोकळी होती खन्ना,’ खन्नाच्या चेहर्याचा रंग आता पूर्ण उडाला होता.
’मी खाजगी कामानिमित्त बाहेर गेलो होतो.’
’मोबाइल व्हॅनिटीमध्ये ठेवून?’
’तो मी गडबडीत विसरलो होतो.’
‘इतकी कसली गडबड होती खन्ना? बाय द वे, त्याचवेळी तुम्हाला कसारा रोडला पाहणारा एक साक्षीदार मला सापडलाय बरं का,’ खन्नाला घामाच्या धारांत भिजत ठेवत कुशाग्र बाहेर पडला.
’सर, तुम्हाला संशय आहे, पुरावा आहे तर उचलायचा ना त्याला.’
’संशय आहे, खात्री नाही आदमाने. तसेही मला कोणी साक्षीदार मिळालेला नाही, मी फक्त खडा टाकला होता,’ आदमानेने कुशाग्रकडे बघत डोक्याला हात मारला.
’घ्या, अंकुशच्या बंगल्यावर गाडी घ्या..’
अंकुशच्या बंगल्यात कुशाग्र शिरला आणि जागीच खिळला. समोरच्या दिवाणखान्यात तनयाचा फोटो लावला होता आणि अंकुश वेगवेगळ्या दुःखी पोझमध्ये कॅमेरामनला सामोरे जात होता. तनयाचा नवरा तिच्या दहापट ’नौटंकी’ होता तर. ड्रेसमधल्या कुशाग्रला पाहून तो एकदम चपापला आणि त्याने पत्रकारांना पिटाळले.
’मी थेट मुद्द्यावर येतो अंकुशराव. रविवारी तुम्ही कुठे होतात?’
’सर, मी शनिवारपासून कॅनडामध्ये होतो. तिथल्या एका रॅम्प शोसाठी तनयाला आमंत्रण होते. त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी तिकडे गेलो होतो,’ अंकुश खरे सांगत होता, कारण पोलिसांनी त्याने दिलेली माहिती व्यवस्थित तपासली होती. शनिवार ते रविवार दुपार तो कॅनडामध्येच होता. तिथल्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, पासपोर्ट एंट्री, त्याचे मोबाइल लोकेशन्स त्याची खात्री देत होते. पण का कोणास ठाऊक, ह्या अंकुशला पाहिल्यापासून कुशाग्रला सतत काहीतरी खटकत होते हे नक्की.
’तुमचे आणि तनयाचे संबंध सध्या ताणल्यासारखे झाले होते, हे खरे आहे का?’
’अफवा होत्या सर सगळ्या. ह्या पत्रकारांना सतत काहीतरी चघळायला हवे असते आणि आम्ही ते पुरवतो.’
’तुमचा कोणावर संशय?’
’आमच्या व्यवसायात अनेक वैरी असतात सर. छोट्याश्या यशाने पण त्यांची जळजळ होत असते. त्यात अमन खन्नासारखे लोक तर सरळ शारीरिक िहंसेवर उतरतात.’ जळजळीतपणे अंकुश म्हणाला आणि कुशाग्रने मान डोलवली.
कुशाग्र बंगल्याबाहेर पडला आणि अचानक काहीतरी आठवल्यासारखा पुन्हा आत वळला.
‘अनयाचा कायदेशीर सल्लागार कोण आहे हो?’ ह्या प्रश्नात अंकुशचा चेहरा पांढरा पडण्यासारखे काय आहे, हे आदमानेला समजेना.
– – –
’अंकुश आज चौथा दिवस…’
’माझा अंदाज बरोबर ठरला, तर तासाभरात खुनी ताब्यात असेल सर,’ सहजपणे कुशाग्र म्हणाला आणि खोपडे साहेब त्याच्या तोंडाकडे पाहत राहिले. अरे, वेडा आहे का हा माणूस? इथे आम्ही दोन आठवडे खुनाचे कारण शोधण्यात घालवले अन हा चार दिवसात खुनी ताब्यात देतोय.
’तुझ्या डोक्यात काय आहे कुशाग्र?’
’सर, मी तनयाच्या वकिलाला भेटलो. काही दिवसांपूर्वी तिने आडून आडून घटस्फोटाच्या प्रोसिजरबद्दल तिच्या वकिलाला विचारले होते. तिच्या कोणा मैत्रिणीसाठी तिला ही माहिती हवी होती म्हणे. पण माझी खात्री आहे, ती अंकुशला घटस्फोट देण्याच्या विचारात होती.’
’कारण?’
’अंकुशचा जुगाराचा नाद, बायकांचा नाद…’
’पण आमच्या तपासात तर असे काही आढळले नाही.’
’हे सगळे शौक तो मुंबईबाहेर करतो सर. मुख्य म्हणजे नेपाळसारख्या देशात जाताना पासपोर्टची गरज नसते. असल्या ठिकाणी कायम मौजमजेला जाणार्या महाभागांची माहिती ठराविक टूर ऑपरेटर बाळगून असतात सर. आपण फक्त योग्य माणूस पकडून चौकशी करायची,’ खोपडेंच्या डोक्यात आता प्रकाश पडला.
’पण कुशाग्र, खून झाला त्या दिवशी अंकुश इथे नव्हता. आम्ही सगळी माहिती तपासून पाहिली.’
’तो खात्रीने तिथेच होता सर. तो खोटे बोलतच नाहीये.’
’मग सुपारी देऊन?’
’नाही सर. पोलीस खुनाच्या जागी पोहोचले, तेव्हा दरवाजा आतून बंद होता. ह्याचा अर्थ खुनी व्यवस्थित किल्लीचा वापर करून घरात घुसला आहे.’
’अंकुशने त्याची किल्ली किंवा डुप्लिकेट किल्ली..’
’शक्य नाही सर. तनयाच्या घराला ’मर्लिन जॅक्सन’चे लॉक आहे. त्याची डुप्लिकेट किल्ली फक्त कंपनीच बनवून देऊ शकते, तेही त्यासाठी अर्ज केल्यानंतर.’
’आणि अंकुशच्या कॅनडाच्या व्हिडिओमध्ये त्याच्या हातात घराच्या किल्ल्यांचा गुच्छ तर स्पष्ट दिसतोय..’
’तेच मला खटकते आहे सर. परदेशात गेल्यावर इकडच्या घराच्या किल्ल्या कोण कशासाठी मिरवेल? मला एक महत्त्वाची शंका आहे, ती मिटली की मग झाले.’ कुशाग्रचे बोलणे संपत असतानाच आदमाने शरद पिसाळला घेऊन आत आले.
’बसा पिसाळ. घाबरू नका. मला फक्त काही माहिती हवी आहे.’
’विचारा ना सर…’ शरद शांतपणे म्हणाला, पण उगाचच त्याला त्याचे पाय थरथरल्यासारखे वाटत होते.
’शरद, तू तुझ्या जबानीत जे सांगितलेस, ते परत एकदा सांगतो?’ त्याच्या जबानीचा कागद पुढे ओढत कुशाग्र म्हणाला.
’सर, रविवारी दुपारी मला अंकुशचा फोन आला. तो सकाळपासून तनयाचा फोन लावत होता, पण ती उचलत नव्हती. शोसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी डिस्कस करणे अत्यावश्यक होते. मग मी स्वत: फार्महाऊसला पोहोचला. ते आतून बंद होते म्हणजे तनया घरात होती. मी बराच वेळ बेल वाजवली, तिला फोन लावले, पण उत्तर नाही. मग मी सगळ्या दारे खिडक्या तपासल्या. सुदैवाने एक खिडकी मला उघडी सापडली आणि मी त्यातून आत शिरलो. सर आत जाऊन बघतो, तर बेडरूममध्ये तनयाचे प्रेत पडलेले..’ त्या आठवणीने आताही त्याचे अंग शहारले.
’एक मिनिट, एक मिनिट शरद… तुझ्या जबानीत तू सांगितले आहेस की मी खिडकीतून आत शिरलो. दोन्ही हात स्वतःभोवती घट्ट लपेटले आणि घरभर तनयाला शोधायला लागलो.’
’अहो काय सांगू सर, संपूर्ण घर एखाद्या प्रâीजसारखे गार पडलेले होते,’ शरदने वाक्य पूर्ण केले आणि कुशाग्रने खाड्कन टिचकी वाजवली.
’आदमाने, चला अंकुशरावांची पालखी उचलू…’ त्याला नक्की काय सापडले ते कोणालाच कळेना.
– – –
‘सर, तुम्हाला वेड लागले आहे का? का अडकवताय मला ह्यात? तनयाचा खून झाला त्या दिवशी रविवारी मी कॅनडात होतो.’
’तनयाचा खून रविवारी झालेलाच नाहीये अंकुश,’ शांतपणे कुशाग्र म्हणाला आणि सर्वजण चकित झाले.’
’कुशाग्र, तू आपल्या फोरेन्सिकला
चॅलेंज देतो आहेस? त्यांचे रिपोर्ट खोटे म्हणत आहेस?’ आता कमिशनर साहेब देखील चक्रावले होते.
’नो सर! त्यांचे रिपोर्ट बरोबर आहेत. पण गंमत अशी आहे की, त्यांचे रिपोर्ट हे परिस्थितीनुरूप आहेत.’
’म्हणजे?’
‘रिगर मॉर्टिस सर. मृत्यूनंतर स्नायूंमध्ये येणार्या ताठरपणावरून मृत्यूची वेळ ठरवली जाते सर. तापमानात वाढ किंवा घट झाली तर ती रिगर मॉर्टिसवर परिणाम करते, आणि त्याचाच परिणाम मृत्यूची वेळ ठरवण्यावरती होतो. अंकुशला हे चांगले माहिती होते. त्याने शुक्रवारी रात्री शांतपणे तनयाचा काटा काढला आणि सकाळी अगदी शांतपणे एयरपोर्टवर पोहोचला. सकाळी निघताना त्याने तनयाच्या फोनवर एक ’प्री शेड्यूल’ पोस्ट लिहिली, जी रविवारी सकाळी आपोआप सोशल मीडियावर प्रकाशित झाली. त्यामुळे सगळ्यांचा असा समज झाला की, तनया रविवारपर्यंत जिवंत होती. जाताना ह्या हुशार अंकुशने घरातले सगळे एअर कंडिशनर फुल स्पीडने लावले आणि अचूक खेळी केली. तनयाच्या मृत्यूच्या वेळेचा अंदाज चुकला आणि हा शिताफीने नामानिराळा राहिला.’
’ग्रेट जॉब कुशाग्र!’
’माझ्यापेक्षा ह्या शरदचे कौतुक करायला हवे. त्याने इतक्या तणावात पण अचूक जबाब दिला. त्याचा जबाब वाचत असतानाच माझी बत्ती अचानक पेटली आणि हे प्रकरण उलगडत गेले.