फक्त ३९ आमदार बरोबर आहेत म्हणून शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हावर हक्क सांगता येत नाही. त्यासाठी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या २८२ सदस्यांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. तो पाठिंबा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. जोपर्यंत अपात्र आमदारांचा निकाल लागत नाही, तोपर्यंत चिन्हासंबंधी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी चर्चा करावी असा कॅव्हेट भारतीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेने दाखल केला आहे. मूळ शिवसेना आणि धनुष्यबाण आमचेच आहेत, असा दावा करणार्या शिंदे समर्थकांना आठवण करून द्यावीशी वाटते की शिवसेनेच्या घटनेप्रमाणे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत या घटनेत बदल केला तरच हे चिन्ह बदलता येईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडे २५९८ नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. आठ राष्ट्रीय पक्ष तर ५० प्रादेशिक पक्ष आहेत. पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे निवडणुकांआधी एखादे लक्ष्य गाठण्यासाठी विरोधकांना अडचण निर्माण करण्यासाठी पक्ष निघतात. पण निवडणूक संपल्यानंतर किंवा काही काळानंतर अशा पक्षांचे अस्तित्वच शिल्लक राहात नाही. त्यांची चिन्हेही बदलत असतात. अशा राजकीय पक्षांना निवडणूक आयोग बेदखल करते.
पण शिवसेना हा निवडणूक आयोगाने मान्यता दिलेला प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत, तर पदाधिकार्यांना निवडणूक आयोगाची मान्यता आहे. शिवसेना पक्षाच्या शेवटच्या संघटनात्मक निवडणूका २०१८ साली झाल्या होत्या. त्याची नोंद केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आहे. त्यानंतर शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत कुठलाही बदल झाला नसून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व निर्विवाद आणि आव्हानरहित आहे, असे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.
निवडणूक चिन्ह द्यायचं की गोठवायचं, हा निर्णय निवडणूक आयोग घेते. समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाचा वाद जेव्हा झाला होता, तेव्हा मुलायम सिंह विरुद्ध अखिलेश सिंग यांच्या वादात अखिलेश यांना त्या पक्षाचे सायकल हे मूळ चिन्ह मिळाले. परंतु रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाच्या बाबतीत पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान व काका पासवान यांच्यात वाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्या पक्षाचे चिन्ह गोठवले होते.
१९७२ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विघटन होऊन दोन गट पडले होते. जगजीवनरामांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (जे) आणि सी. सुब्रह्मण्यम यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी ‘बैलगाडी’ या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे दावा सांगितला. त्यावेळेस देशातील बर्याच राज्यात काँग्रेस सत्तेवर होती. निवडणूक आयोगाने जगजीवनराम यांच्या बाजूने निकाल दिला. या वादात धूर्त राजकारणी इंदिरा गांधी यांनी हाताचा पंजा ही निशाणी घेतली. कारण राष्ट्रपतीपदाची आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लागल्या होत्या.
१९८५च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बर्याच उमेदवारांना ‘मशाल’ चिन्ह मिळाले होते. मुंबईच्या खेरवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणारे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांना मशाल चिन्ह मिळाले होते. विधानसभा निवडणूक प्रचाराची पहिली सभा खेरवाडी मतदारसंघात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. त्यावेळी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला धगधगती मशाल ठेवली होती.
त्यानंतर १९८८ साली केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांची नोंदणी करावयाचे ठरवले. त्याआधी एक घटना घडली. तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी घटनादुरुस्ती केली. लोकशाही सार्वभौम देशाच्या पुढे ‘धर्मनिरपेक्ष समाजवादी लोकशाही’ अशा वाक्याची पुस्ती जोडली. निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांच्या लोकांना आपल्या पक्षघटनेमध्ये या वाक्याचा समावेश करायला सांगितले. सर्व राजकीय पक्षांनी नव्याने नोंदणी करायला सुरुवात केली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी राजकीय पक्ष म्हणून शिवसेना पक्षाची नोंदणी करावी असा निर्णय घेतला. आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत. राजकीय सत्तेद्वारे आपण जनतेचे प्रश्न सोडवू शकतो, निर्णय अमलात आणता येतात, अशी त्यामागे भूमिका होती.
त्यानंतर शिवसेनाप्रमुखांनी घटना तयार करण्यासाठी शिवसेना नेते सुभाष देसाई, अॅड. बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी यांची समिती नेमली. त्याला शिवसेना ज्येष्ठ नेते मनोहर जोशी सरांचे मार्गदर्शन होते. विविध राजकीय पक्षांच्या घटना मिळवल्या. त्याचे शिवसेनाप्रमुखांसमोर वाचन केले. शिवसेनाप्रमुखांनी काही बदल सुचविले, सूचना दिल्या, त्या तंतोतंत पाळून तयार केलेला घटनेचा मसुदा घेऊन दिल्लीत सुभाष देसाई पुन्हा गेले. दिल्लीत ते आठवडाभर राहिले. सर्व संबंधित कागदपत्रे सादर करून प्रक्रिया पूर्ण केली आणि शिवसेनेची राजकीय पक्ष म्हणून अधिकृत नोंदणी झाली. शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह मिळाले, त्याची थोडक्यात गोष्ट अशी आहे. तोपर्यंत शिवसेना निवडणूक लढवत होती आणि प्रत्येक निवडणुकीत वेगळे निवडणूक चिन्ह असायचे, कोणतेही एक निवडणूक चिन्ह नव्हते.
१९ जून, १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना झाली. १९६७-६८ साली ज्या महानगरपालिका निवडणूक झाल्या, त्यावेळी सेनेला अधिकृत चिन्ह नव्हते. कधी ढाल-तलवार, तर कधी मशाल, कुणाला कपबशी तर कुणाला इंजिन असे चिन्ह घेऊन शिवसेना उमेदवार निवडणूक लढवत होते. विधानसभा-लोकसभा निवडणुकीत वेगवेगळे चिन्ह घेऊन उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. अगदी १९८५ विधानसभा निवडणुकीत देखील सेना उमेदवारांना वेगवेगळी चिन्हे मिळाली होती. १९७१च्या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे प्रि. वामनराव महाडिक यांची निवडणूक निशाणी ‘उगवता सूर्य’ ही होती. ते विजयी झाले आणि महाडिकांच्या रूपाने शिवसेनेचा वाघ विधानसभेत पोहोचला.
शिवसेना भाजप युतीने १९८९ साली झालेली लोकसभा निवडणूक प्रथमच एकत्र लढवली. त्यात शिवसेनेचे चार खासदार निवडून आले. विद्याधर गोखले आणि वामनराव महाडिक हे मुंबईतून, तर मोरेश्वर सावे, संभाजीनगरमधून आणि अशोक देशमुख हे परभणीतून निवडून आले. पण निवडणूक आयोगाने वामनराव महाडिक यांना अपक्ष म्हणून प्रमाणपत्र दिले. वामनराव हे शिवसेनेचे खासदार आहेत, त्यांनी शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, याची कागदपत्रे निवडणूक आयोगाला सादर केली गेली. वकिलांनी कायद्याचा कीस काढला. शिवसेनेला संघर्षही करावा लागला. परंतु त्यांना पटवून देण्यात शिवसेना यशस्वी झाली आणि मग वामनराव शिवसेनेचे खासदार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. या चार खासदारांचा आकडा आणि मिळालेल्या मतांच्या टक्केवारीमुळे शिवसेनेला ‘धनुष्यबाण’ हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळाले. त्यानंतरच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा आदी निवडणुकांमध्ये ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह घेऊन शिवसेनेच्या उमेदवारांनी आजपर्यंत निवडणूक लढवली आहे. त्यामुळे शिवसेना आणि ‘धनुष्यबाण’ हे वेगळे करताच येणार नाही. शिवसेना न्यायालयीन लढाई हरली तरी ती जनतेच्या न्यायालयात मात्र निश्चितपणे विजयी होईल!
शिवसेना ही वस्तू नाही की कुणी चोरून नेऊ शकेल आणि धनुष्यबाणही शिवसेनेचाच आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. कायद्याच्या दृष्टीने आणि घटनेत जे काही नमूद आहे त्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेचाच आहे. तर मतदार पक्षाचे चिन्ह पाहून मत देतात तसे ते उमेदवाराचे ‘चिन्ह’ कसे आहे ते तपासून बघतात. त्यामुळे ‘धनुष्यबाण’ शिवसेनेचाच असा ठाम विश्वास शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे हे योग्यच आहे.