राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी बागेत उप्पीट खात विचारात गढले असता माझा लाडका परमप्रिय मानलेला मित्र पोक्या त्यांना तिथे भेटला. जुनी ओळख असल्यामुळे त्याने विचारपूस केली. तेव्हा तोंडावर उसने हसू आणत त्यांनी सारे काही आलबेल असल्याचं सांगितलं. त्यांनी बॅग उघडली तेव्हा पोक्याला त्यात त्यांची मोठी डायरी दिसली. ते म्हणाले, जरा लक्ष ठेव. मी पाच मिनिटांत येतो. ते गेल्यावर पोक्याने ती बॅग उघडून डायरी बाहेर काढली. त्यात त्यांनी गेल्या काही दिवसांची रोजनिशी लिहिली होती. पोक्याने पटापट मोबाइलवर प्रत्येक पानाचे फोटो काढून घेतले आणि डायरी बॅगेत ठेवून दिली. त्यानंतर ते दोघे हॉटेलात चहा प्यायला निघून गेले. त्या डायरीतील ती महत्त्वाची पानं मला तिथे बसल्या बसल्या सेंड केली. ती तुमच्या माहितीसाठी देत आहे. त्यांचे वेशांतर, दाढीवाल्यांना भेटणे, सुरत-गुजरात-गौहाटी प्रवास, बॅगांचे वाटप इत्यादी तपशीलाचा मजकूर सर्वांना माहीत असल्यामुळे तो पाठवत नाही. मात्र त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची कारकीर्द सुरू झाल्यानंतर त्यांनी लिहिलेली डायरी हृदयाला पाझर फोडणारी आहे. प्रत्यक्षच वाचा-
आज सकाळपासून माझं सांत्वन करणारे फोन सार्या मुंबई-महाराष्ट्रातूनच नव्हे तर अख्ख्या भारतातून आणि जगातून येताहेत. सगळ्यांचा टोन एकच. झालं गेलं विसरून जा. ही जगरहाटी आहे. जे घडायचं आहे ते घडणारच. नियती अटळ असते. जे वाट्याला आलंय ते भोगलंच पाहिजे. सॅड साँग ऐकू नका. गेलेलं माणूस आणि पद काही परत येत नाही. कृपया प्रेमभंग झाल्यासारखी दाढी वाढवू नका. नाहीतर वाण नाही पण गुण लागला असं काहीतरी म्हणतात तसं होईल. तरीही त्यानंतर मी दोन दिवस दाढी केली नाही.
विधानसभेत दाढीवाल्यांच्या बाजूलाच दुय्यम स्थानावर बसलो. पूर्वीच्या नेहमीच्या सवयीमुळे मीच मुख्यमंत्री असल्यासारखा वागत होतो. त्यातूनच माईकची खेचाखेची झाली. त्यांना चिठ्ठ्या-चपाट्या सरकवणं सुरू झालं. दाढीवालेच बोलत होते. अधूनमधून मी प्रॉम्टिंग करत होतो. मुख्य नटाला दुय्यम नटाची भूमिका द्यावी आणि त्याने ती निमूटपणे सहन करावी असा सारा प्रकार होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही माझं स्थान दुय्यम उपटसुंभासारखं होतं. मंत्रिमंडळाने धडाधड घेतलेले निर्णय मीच श्रेष्ठींच्या सांगण्यावरून त्यांना लिहून दिले होते आणि ते आपणच घेतल्यासारखे वाचत होते. ही अशी उपर्याची भूमिका किती दिवस घ्यावी लागणार आहे कोण जाणे!
असं उटपटांग वागणं मी यापूर्वी कधीही केलं नाही. जे निर्णय त्यावेळी घेतले ते स्वत:च्या मर्जीनुसार आणि मोदींच्या आदेशानुसार. तेव्हाचा माझा मुख्यमंत्रीपदाचा थाट काही औरच होता. माझ्या पक्षातील नावडत्या मंत्र्यांना मंत्रीपदं नाकारून मी आधीच नामोहरम केलं होतं. आमच्या पक्षाचे जे मंत्री सोबत होते तेही काही सरळ नव्हते. त्यांना मी ओळखून होतो. पण दाढीवाले माझ्याशी अदबीने वागत. तेव्हापासून त्यांच्यात आणि माझ्यात रेशीमगाठीचं नातं होतं, ते दिवसेंदिवस घट्ट होत गेलं.
पुढे तीन पक्षाचं सरकार आलं. मी विरोधी पक्षनेता झालो. सभागृहात घसा आणि शिरा ताणून सरकारवर तोंडसुख घेऊ लागलो. दाढीवाले महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री झाले. तरीही आमच्या मैत्रीत अडीच वर्षांत खंड पडला नाही. तेव्हा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळेल अशी दाट आशा होती. पण त्यांच्याच पक्षातल्या विरोधी गटाने त्यांना मुख्यमंत्रीपद किंवा उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही, म्हणून तेव्हापासून ते नाराज होते. त्यांची नाराजी मी ओळखली आणि तेव्हापासून त्यांना कोपच्यात घेतलं. त्यांच्या अंगात भडकलेल्या क्रोधाग्नीत मी जास्तीत जास्त तेल, तूप हवन करत होतो. तेव्हापासूनच आम्ही वेशांतर करून गुप्त स्थळी भेटत होतो. चार-पाचदा मीही दाढी आणि गॉगल लावला होता. त्यांच्या मनात त्यांच्या नेतृत्वाविषयी जेवढं विष कालवता येईल तेवढे कालवत होतो. हळूहळू तुमच्या आमदारांमध्येही ही विषवल्ली पसरू द्या, मग आपण काय करू शकतो हे तुमच्या वरिष्ठांना आपोआप कळेल, असं त्यांचं ब्रेनवॉशिंग केलं. तुम्ही तुमच्या नेतृत्त्वाला आव्हान देऊन वेगळा गट स्थापून बंड करा. तुमची सगळी व्यवस्था मी गुप्तपणे दुसर्या राज्यात करतो. पैशाची चिंता करू नका. पंधरा-वीस दिवस तुमच्या धाकात असलेल्या आमदारांना घेऊन परराज्यात सहल आयोजित करू आणि तीही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये. याला गद्दारी नव्हे तर उठाव म्हणतात, हे त्यांना पटवून दिलं आणि मासा आमच्या जाळ्यात सापडला. मागोमाग छोटे मासेही आले. मग काय मजाच मजा. एवढं सगळं करून मी पुन्हा नामानिराळा राहण्याचं नाटक केलं. तरीही भांडं फुटलंच. पण आता आम्हाला कुणालाच पर्वा नव्हती. जे जसं ठरवलं होतं ते तसंच्या तसं शपथविधीपर्यंत पार पडलं. फक्त माझं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं आणि उपमुख्यमंत्रीपदाचा कटोरा हाती आला.
आज त्यामुळेच जो तो माझी अवहेलना करतोय. आमच्याच पक्षातले विरोधी गटातले आमदार, सहकारी खासगीत चर्चा करताना दात विचकत या अवहेलनेबद्दल टिंगल-टवाळी करत असतात. मी ते मुकाटपणे सहन करत असतो. मुख्यमंत्री असताना आणि नसतानाही एक काळ मी तडाखेबंद तोंडफाटक्या वक्तृत्त्वाने काय गाजवला होता, तो काळ आज आठवतो. आज उपमुख्यमंत्री म्हणून मला सभागृहात फारसं बोलताही येत नाही. फक्त दाढीवाल्यांचा प्रॉम्प्टर आणि पीएसारखीच माझी भूमिका आहे. तरीही मी हसर्या मुखवट्याने वावरत असतो. दाढीवाल्यावर पाळत ठेवणं हे माझं आता मुख्य काम आहे. त्यांचे बहुतेक आमदार ईडीची भीती दाखवल्यामुळेच आले आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. आमच्याबरोबर आलात तर सर्व गुन्हे माफ होतील या आश्वासनामुळे प्रतापरावांसारखा अवसान गळालेला मोहरा हाती लागला, तिथे इतरांची काय कथा! पण एवढा मोठ्या संख्येचा आमदारांचा गेम करूनही पदरी करवंटीच येणार असेल तर दरम्यानच्या काळात मी केलेल्या तंगडतोडीचा फायदा तरी काय, असा प्रश्न मला पडतो, तेव्हा माझी सहचारिणी आणि भारताची भावी उषा उत्थप, माय बिलोव्ह्ड अमृता मला धीर देताना म्हणते की आता जरी तुम्ही उपमुख्यमंत्री असलात तरी ही तुमची एक केंद्रीय टेस्ट आहे. त्यात तुम्ही उत्तीर्ण झालात की तुमची दिल्लीच्या मंत्रिमंडळात वर्णी लागेल. आता त्याच आशेवर मी दाढीवाल्यांबरोबर दिवस ढकलतो आहे.