डोळ्यांत सांजवेळी, आणू नकोस पाणी… हे गाणं ऐकल्यावर प्रश्न पडला; सकाळी किंवा दुपारी डोळ्यांत पाणी आलं तर चालेल काय?
– तन्मय लेले, पुणे
पाणी कधीही आले तरी चालेल, फक्त आत काही होतेय का ते बघा… कारण उगाच पाणी येणार नाही असंच…
पावसात कुठे अतिवृष्टीमुळे माणसं रडतात, तर कुठे अवर्षणामुळे माणसं रडतात… हा पाऊस इतका दुष्ट कसा?
– वैजयंती कारखानीस, चिपळूण
जैसे ज्याचे कर्म तैसे, फळ देतो रे पाऊस!
नाट्य प्रशिक्षण देणारे विद्यापीठांचे विभाग, एनएसडीसारखं राष्ट्रीय नाट्य विद्यालय, फिल्म इन्स्टिट्यूट किंवा रोशन तनेजांसारखे शिक्षक यांच्याकडे शिक्षण घेतल्यावर माणूस अभिनेता बनू शकतो का?
– आर्यन दळवी, भाईंदर
लिहिता वाचता आलं म्हणजे माणूस लेखक बनतो का???
आचार्य अत्रे यांच्या लेखणीतून उतरलेली कोणती व्यक्तिरेखा साकारायला आवडेल तुम्हाला? आणि का?
– दिनकर येवलेकर, भिगवण
अत्र्यांच्या साहित्याचा माझा एवढा अभ्यास नाहीयेय.
बायको फुरंगटून माहेरी जाईन असं म्हणते, तेव्हा ती धमकी असते की तो दिलासा असतो?
– रामकृष्ण शिंदे, पिंपरी
तुमचे बाहेर काय उद्योग चालू आहेत, यावर अवलंबून आहे.
शादी का लड्डू जो खाए वो पछताए, जो ना खाए वो भी पछताये, असं म्हणतात… कोणता पश्चात्ताप बरा?
– सारिका शेंडे, सीवुड्स
खाल्ल्याशिवाय लाडू कसा आहे हे वर्णन करून कळतं का?… तो खावाच लागतो…
चाराण्याचे तीन आणले काय गं तुम्ही केले? मला वाटलं धन्या ते फुगंच हाय मी पोरास्नी वाटले… अशी उद्बोधक गाणी हल्ली का बरं लिहिली जात नसतील?
– विवेक सोनार, श्रीगोंदा
आता गाण्यातून सांगायची गरज नाही.मोबाईलवर दृश्य आहेत. ते शिक्षण होतच आहे प्रत्यक्ष…
भालजी पेंढारकरांचे ऐतिहासिक सिनेमे कमी बजेटचे होते, कृष्णधवल होते, त्यांच्यातले सेट तकलादू आहेत, हेही दिसायचं- पण ते सच्चे वाटायचे, तो इतिहास जिवंत वाटायचा, ते मावळे खरे वाटायचे- आताच्या बिगबजेट आणि कॉम्प्युटर ग्राफिक्सवाल्या ऐतिहासिक सिनेमांमधून ते समाधान का मिळत नाही?
– ऋता सावंत, केडगाव
सगळं वाण-सामान मिळालं तरी पदार्थ कसा आणि का बनवायचा हा हेतू माहीत नसेल आणि तो हेतू शुद्ध नसेल तर कुठलाही पदार्थ छान बनत नाही.
मुलांनी आईवडिलांनी पसंत केलेल्या जोडीदाराशी लग्न करावं की आपल्या पसंतीच्या जोडीदाराशी लग्न करावं?
– प्रिया व्हर्गीस, श्रीरामपूर
आपण आपली जबाबदारी घ्यावी. आपली गाडी आपण विकत घ्यावी. बरी वाईट असेल ती असेल. ती आपली असते. आपण ती नीटच सांभाळतो.
मुलांना आईवडील ‘वळण’ का लावायला जातात? मुलं ‘सरळ’ असली तर बरंच आहे की!
– अरुंधती मांढरे, वसई
तुमच्या आई-वडिलांनी जरा चुकवलंच आहे, ते कळतंय.
निळू फुले आणि डॉ. श्रीराम लागू हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटांतले उत्तुंग अभिनेते. यांच्या कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडतात? यांची कोणती व्यक्तिरेखा तुम्हाला साकारायला आवडेल?
– अनिता पासलकर, बोरगाव
डॉ. लागू आवडतात मला… त्यांच्या नाटकांतल्या व्यक्तिरेखा फार सुंदर आहेत… ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, ‘मित्र’, ‘सुंदर मी होणार’ यांतल्या भूमिका.
सुखी माणसाचा सदरा तुम्हाला सापडला तर तुम्ही काय कराल?
– पंढरीनाथ पाटील, रोहा
डायरेक्ट हिमालयात तपश्चर्येला जाईन.