• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

श्री शिवरामपंत फडणीस

- ज्ञानेश सोनार (मोठी माणसं)

Nitin Phanse by Nitin Phanse
July 21, 2022
in मोठी माणसं
0

आपल्या खास व्यंगचित्र शैलीने सार्‍या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणारे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस येत्या २९ जुलै रोजी ९८व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यंगचित्र कारकीर्दीचा आणि व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा प्रसिद्ध व्यंगचित्रकार ज्ञानेश सोनार यांचा विशेष लेख…
– – –

नावातच ऐतिहासिक बाज असलेले मराठीतील थोर व्यंगचित्रकार. त्यांना शतकासाठी आता फक्त दोन धावांची गरज आहे, जी ते सहजी ब्रशच्या फटकार्‍यांनी पूर्ण करणार आहेत. त्यांना झुकणे, थकणे, वाकणे माहीतच नाही. शिडशिडीत अंगकाठी, स्टायलिश ड्रेसेस- कधी जॅकेट कधी कोट वा विंडचीटर. अंतरकरांच्या मोहिनी मासिक व दिवाळी अंकांसाठी विनोदी मुखपृष्ठ इंट्रोड्युस करणारे मराठीतील ते पहिले व्यंगचित्रकार. मुळात कोल्हापूरच्या मातीतले रियालिस्टिक पेंटिंग्जची आणि लॅन्डस्केप्सची आवड असणारे, परंतु नकळत व्यंगचित्रांकडे वळलेले. त्यात अनंत अंतरकरांचा हात मोठा आहे, असं फडणीस सांगतात. त्यांच्या मुखपृष्ठ रेखाटनाला जवळपास ७० वर्षे झालीत, पण त्यातली अवीट गोडी मराठी माणसांना अजूनही भुलविते. याचे कारण निर्मळ विनोद, शब्द नसलेले. रंगीबेरंगी कपडे घालणारा बावळट पण सुंदर तरुण व त्याची बॉब कट किंवा बुचडा बांधलेली सतत कामात व्यग्र असलेली पदर खोचलेली बायको. मोजक्या माफक रेषा, सुंदर रंगसंगतीतली, गोबर्‍या गालाची, किंचित नकटी वाटणारी, भुंग्यासारखे काळेशार डोळे असलेली तरुणी व मिस्कील पंच यामुळे त्यांची ‘हसरी गॅलरी’ जेव्हा जनमानसात प्रदर्शनरूपाने अवतरली, त्या वेळेला चित्र पाहण्यासाठी लोक अक्षरशः नंबर लावीत. असा चमत्कार फक्त पु.लं.च्या ‘बटाट्याच्या चाळी’ने घडविला होता. शि.दं.च्या चित्रांचे विषय व रेखाटने ही घरातील आबालवृद्धांना पाहता येतील इतकी निर्मळ असतात. हसर्‍या गॅलरीची प्रदर्शने भरविणे, ती सुद्धा महाराष्ट्रात वा बेंगलोर, दिल्ली, हैदराबाद सारख्या मेट्रो सिटीत भरविणे, हे खूप जिकरीचे असे. मोठमोठ्या पेट्या त्यासाठी वापराव्या लागत. पण न थकता ही हसरी गॅलरी भारतातच काय, पण परदेशात सुद्धा चक्कर मारुन आलीय.. अनेक अमराठी प्रांतातल्या लोकांनी ही प्रदर्शने पाहिली. हसत आनंद घेतला. चित्रांत शब्दच नसल्याने भाषेची अडचण कुणालाच कधी जाणवली नाही… फक्त हसू आणि हसू.
आता इतकी सुंदर चित्रे फक्त मासिकातून किंवा दिवाळी अंकांतूनच रेंगाळली असती तर… पण शि.द. यांनी तसे केले नाही. आमच्या लहानपणच्या बालभारतीमध्ये दीनानाथ दलालांची कथाचित्रे असत, तर नव्या पिढीची गणिताची पुस्तकं शि.दं.नी सचित्र केली. केळी, सफरचंद, पेरू, टरबुजं बेरीज-वजाबाकीत वावरू लागली. तसेच कुत्री, मांजरं गुणाकार-भागाकार वा पाढे मोजू लागली. हा नवा उपक्रम होता. अत्यंत सोप्या पद्धतीने रेखाटने करून गणितासारखा कंटाळवाणा, रूक्ष विषय त्यांनी सोपा केला. तसेच विज्ञानाची, मॅनेजमेंट, कायद्याची पुस्तकेही त्यांनी रेखाटने करून प्रेक्षणीय केली. महाराष्ट्राचे सुदैव असे की अनेक मोठ्या व्यंगचित्रकारांची स्वतःची चित्रशैली आहे. त्यात सर्वश्री दीनानाथ दलाल, वसंत सरवटे, मंगेश तेंडुलकर, शि. द. फडणीस, बाळासाहेब ठाकरे, श्याम जोशी, चंद्रशेखर पत्की आदींच्या पंक्तीत माझाही पाट मांडायला हरकत नाही. परिणामी प्रत्येकाला त्याच्या मुक्त शैलीने काम करता आले व वाचकांना भरपूर आनंदही घेता आला.
एक छोटासा किस्सा. सुरुवातीला व्यंगचित्रं घेऊन मी पुण्याला अनेक संपादकांकडे जायचो. प्रत्येक वेळी वाटायचे की शि. द. फडणीसांना डोळ्यांनी पाहावे. एके वर्षी त्यांचा सुभाष नगरमधील पत्ता शोधत त्यांच्या घराजवळ पोहोचलो. दार ठोठावले ते स्वयंपाकघराचे होते, तिथून एक सात-आठ वर्षांची गोड चिमुरडी पुढे आली आणि तिने विचारले, ‘काय हवे?’
‘तुझे पप्पा आहेत का मी ज्ञानेश सोनार, व्यंगचित्रकार, नाशिकवरून त्यांना भेटायला आलो आहे!’
गालाला बोट लावून प्रश्नार्थक पाहात ती म्हणाली, ‘पप्पा तर घरी नाहीयेत, पण थांबा हं, आलेच मी!’ ती घरात गेली आणि स्लेट पाटी व पेन्सिल घेऊन आली, म्हणाली, ‘यावर तुमचे नाव लिहा, म्हणजे पप्पा आले की मी त्यांना दाखवेन!’ वय लहान असल्याने बहुतेक ती अक्षरशत्रू होती. मी पाटीवर नाव लिहिले. चारनंतर माझी कामे आटोपल्यावर मी पुन्हा एकदा शि.दं.ना भेटायला गेलो. शि.दं.नीच दार उघडले. मी वाकून नमस्कार केला. त्यांनी त्यांच्या छोट्या बैठकीच्या खोलीतल्या खुर्चीवर बसविले. स्वतः बसले व सकाळची स्लेट पाटी काढून म्हणाले, ‘हे तुम्हीच लिहिलेत ना?’
मी हो म्हणालो.
‘माझी मुलगी सकाळपासून दहा वेळा मला आठवण देत होती की नाशिकचे एक चित्रकार येणार आहेत. त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. कुठे जायचे नाही. ते पुन्हा येणार आहेत. म्हणून मी बापडा दुपारपासून तुमची वाट पाहत बसलो आहे!’ त्यांनी हसतच सांगितले. एवढ्यात दारातून सौ. शकुंतला फडणीसही डोकावल्या. शकुंतला ताई अत्यंत सुंदर विनोदी कथा लिहायच्या. लेखिका म्हणून त्यांचे नाव सर्वांना चांगले परिचित होते. एवढ्या मोठ्या व्यंगचित्रकाराशी गप्पा मारायला मिळाल्या व त्यांची ओरिजिनल चित्रे पाहायला मिळाली. खूप आनंद झाला. नंतर वेळोवेळी पुण्याला त्यांच्या गाठीभेटी झाल्या, गप्पा झाल्या, अनेक कार्यक्रमात त्यांची प्रात्यक्षिकेही पाहायला मिळाली.
आम्ही चार-पाच चित्रकार प्रात्यक्षिके करण्यात माहीर होतो. ज्यावेळी गप्पा होत, त्यावेळी त्यांनी आग्रहाने सांगितले, तुमच्या हक्कांबद्दल सावध राहा. तुमच्या चित्राची कॉपी कुणी केली, वा परवानगीशिवाय त्याचा वापर केला तर तो कायदेशीर गुन्हा आहे. त्यावर त्यांनी काही अनुभव सांगितले. म्हणाले, मला हा कायदा शोधून तपासावा लागला. अनेक संपादक अंकात छापण्यासाठी वा जाहिरातीसाठी माझी चित्र बिनदिक्कत वापरत असत. यासाठी मला खूप झगडावे लागले आहे.
खरोखरीच प्रत्यक्षात मला या कायद्याच्या माहितीची फार मोठी मदत झाली. नाशिकच्या एका मोठ्या कंपनीने कंपनीत लावण्यासाठी काही चित्रांची ऑर्डर मला दिली. मी आठ दिवस राबून त्यांची स्क्रिबल्स (रफ्स) तयार करून संबंधित अधिकार्‍यास दिली. त्या बहाद्दराने एका चित्रकाराकडून ती रंगवून घेऊन मोठमोठे बॅनर तयार केले व कंपनीत लावून सुद्धा टाकले. माझ्या चित्रशैलीची अनेक वाचकांना ओळख असल्याने काही कामगारांनी मला कळवले की तुमची चित्रे फार सुंदर आहेत. कंपनीत मोठमोठे बॅनर्स लागलेत. मला फार आश्चर्य वाटले. म्हणून त्या अधिकार्‍याला मी विचारले, की अहो चित्रांचं काय झालं? लबाडीने तो म्हणाला, अजून निर्णय व्हायचा आहे. जनरल मॅनेजरला अजून दाखवली नाहीत. मी जे ऐकले होते ते त्यांना सांगितल्यावर ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. यावर वकीलामार्फत मी रीतसर नोटीस पाठविली. कंपनी प्रतिष्ठित व एथिक्स सांभाळणारी होती. त्यांनी त्यांच्या वकिलांना माझी नोटीस दाखवली. वकिलांनी म्हटले, चित्रांची नक्कल हा गुन्हा आहे. कंपनीने मी मागणी केलेली रक्कम चेकने पाठवून दिली. मात्र अनेकदा आमचेच व्यंगचित्रकार आमच्या कल्पनांचे पुनरुज्जीवन (सही सही कॉपी) करून स्वतःच्या नावावर छापतात. असे अनेकदा घडते. पण ‘घर की मुर्गी दाल बराबर’ म्हणून दुर्लक्ष करावे लागते.
वसंत सरवटे व फडणीस लहानपणापासूनचे मित्र. दोघेही कोल्हापूरचे. सरवटे यांच्या अखेरीपर्यंत उभयतांची मैत्री टिकली. विलेपार्ले इथे मोठे व्यंगचित्रकार संमेलन झाले. अध्यक्ष सरवटे होते. त्यानिमित्त आम्हा चार पाच जणांचा मुक्काम त्यांच्या घरीच होता. वसंतरावांच्या पत्नी अत्यंत सुगरण. त्यांनी आम्हाला खूप चवदार असे मच्छीचे भोजन दिले. मुक्कामाला आमच्यासमवेत शि.द. सुद्धा होते. इतर वेळी माफक बोलणारे वसंतराव गप्पांमध्ये मात्र चांगले रमायचे. नाशिकला आले की मला फोनवर सांगायचे, ज्ञानेश मी येतोय. माझ्या घराची गच्ची मोठी होती. तेथे ‘रंगीत’ जेवणाचा थाट मांडलेला असे. कधी रामदास फुटाणेंसारखे मित्र, कधी एखादा संपादक वा चंद्रकांत महामिने, किशोर पाठक यांच्यासारखे कवी-लेखक त्यात असायचे… वसंतरावांच्या घरी जेवण झाल्यावर, रात्री भरपूर गप्पा झाल्यावर आम्ही झोपलो. पहाटे पहाटे मला जाग आली. पाहतो तो काय शि.द. चक्क व्यायाम करीत होते… त्यांच्या दीर्घ आयुष्याचे रहस्य नियमित व्यायाम हे आहे असे मी ऐकून आहे.
१९८३ला कोल्हापूरला पहिले व्यंगचित्र संमेलन झाले. ‘आम्ही रसिक’ या संस्थेने ते आयोजित केले होते. डॉ. अविनाश जोशी, रवींद्र उबेरॉय, गोकुळचे अरुण नरके आदी प्रतिष्ठित संगोजक होते. उद्घाटन जे.जे.चे डीन बाबुराव सडवेलकर यांच्या हस्ते झाले. सकाळचे सत्र खूप हसरे झाले. शि. द. फडणीसांची रेखाटने पाहायला मिळणे मजेशीर होते. प्रभाकर भाटलेकर, विजय पराडकर, प्रभाकर सिन्नरकर, प्रभाकर झळके आदी व्यंगचित्रकारांनी व्यंगचित्र प्रात्यक्षिके करून प्रेक्षकांना लोटपोट हसविले. त्या सत्रात मी अनेक कॅरिकेचेस केली, ती दाद देऊन गेली.
चार वाजता समारोप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होता. दीड दोन हजार कोल्हापूरकर पटांगणात दाटीवाटीने बसलेले होते. मोठे स्टेज होते. बाळासाहेबांबद्दल खूप खूप आकर्षण लोकांना होते. सव्वा चार वाजता साहेब पाच पंचवीस शिवसैनिकांबरोबर पोहोचले व थेट स्टेजवर आले. टाळ्यांचा कडकडाट झाला. बाकी औपचारिक कार्यक्रम झाल्यावर बाळासाहेबांनी अत्यंत विनोदी भाषण केले. त्यात त्यांचा स्पष्टपणा, खमकेपणा प्रकर्षाने जाणवत होता. मराठी माणूस, मराठी अस्मिता, राजकीय पुढारी, मंत्री यांच्यावर मिस्किल टिप्पणी करण्यावर त्यांनी भर दिला. मुंबईतून परागंदा होऊ पाहणारा मराठी माणूस बाळासाहेबांच्या शिवसेनेने एकत्र आणला. त्याच्यातली सुप्त ऊर्जा जागृत केली, हे ठणकावून सांगितले. प्रेक्षकांनी बाळासाहेबांना प्रात्यक्षिक करून दाखवायचा आग्रह केला. तितक्यात सकाळच्या काही प्रेक्षकांनी साहेबांचे कॅरिकेचर ज्ञानेश सोनारांनी काढावे असाही आग्रह धरला. आम्ही सगळे व्यंगचित्रकार फडणीस यांच्याबरोबर बसलो होतो. माझ्या नावाचा पुकारा झाला. फडणीस मला म्हणाले, सोनार जा आणि बाजी मारून या. तुम्ही दोनपाच मिनिटांत कॅरिकेचर करू लागलात की माझ्या ऊरात धडकी भरते!’
ते बोलले त्यात तथ्य होते, कारण हुबेहूब कॅरिकेचर आले नाही, तर हसे होते हे फडणीस यांना ठाऊक होते. माझं कॅरिकेचरिंग त्यांनी पाहिलेलं होतं. मी स्टेजवर गेलो. वाकून साहेबांना नमस्कार केला. बाळासाहेबांनी छान पोज दिली. मी अंदाजे दोन-तीन मिनिटांत साहेबांचे कॅरिकेचर केले. प्रचंड टाळ्या पडल्या. साहेबांनी कौतुकाने माझी पाठ थोपटली. त्यानंतर साहेबांनी चर्चिल, हिटलर, नेहरू, इंदिराजी, यशवंतराव, गुलझारीलाल नंदा, आचार्य अत्रे आदी नेत्यांची अत्यंत सुंदर कॅरिकेचर्स रेखाटली. त्यावर खुमासदार भाष्य केले. साहेबांचा स्ट्रोक म्हणजे एक अवर्णनीय आनंदाचा क्षण असे.
शि.दं.नी १९४९ साली जे.जे.मधून कमर्शियल आर्टचा कोर्स पूर्ण केला. तरी त्यांची ओढ थोडीफार कार्टून काढण्याकडे होती. त्यावेळी अंतरकरांची हंस व मोहिनी मासिके मुंबईतून निघत. एका स्पर्धेत फडणीसांनी गंमतीखातर पाठवलेल्या एका कार्टूनला अंतरकरांनी बक्षीसही दिले होते. फडणीसांचा हा छंद पाहून जेजेमधील एक प्राध्यापक त्यांना म्हणाले की, फडणीस व्यंगचित्रे काढू नका, अशाने तुमचा हात बिघडेल. तो इतका बिघडला की ते महाराष्ट्रातले नामवंत व्यंगचित्रकार झाले. याच जे.जे.मध्ये आर. के. लक्ष्मण यांना प्रवेश मिळाला नव्हता, म्हणून ते व्यंगचित्रकार झाले. प्रवेश मिळता तर मी कटिंग पेस्टिंग करत बसलो असतो. मला प्रवेश नाकारणार्‍या डीनचा मी आभारी आहे, असे आरके मिस्कीलपणे म्हणाले होते. आणि हे दुसरे चिरंजीव प्रवेश मिळूनही मोठे व्यंगचित्रकार झालेच. कॅनडातील माँट्रियलच्या व्यंगचित्र प्रदर्शनात त्यांची बिना शब्दांची चित्रे खूप नावाजली गेली. जर्मनी, न्यूयॉर्क येथे हसरी गॅलरी प्रदर्शने खूप गाजली. चित्रप्रदर्शनावरील करमणूक कर माफ व्हावा म्हणून सरकारकडे त्यांनी खूप पाठपुरावा केला आणि तो कायदा यथाकाल पासही झाला. त्याचा फायदा अनेक चित्रकारांना मिळाला. देशविदेशात त्यांना अनेक सन्मान मिळाले, परंतु पद्मभूषण, पद्मविभूषणसारखा मोठा राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळायलाच होता. ही डिझर्व्ह सच फेलिसीटेशन्स.
अर्थात यात लोकप्रतिनिधी, साहित्यिक, महाराष्ट्र सरकारची उदासीनता स्पष्ट दिसते. दलाल असोत, मुळगावकर असोत वा एस. एम. पंडित असोत- किती प्रचंड काम या लोकांनी केलेलं आहे. ही सगळी नावे लोकोत्तर आहेत, इतिहास घडवणारी आहेत. सध्या सन्मानांची किंमत येरागबाळ्यांना ते वाटले गेल्याने खूपच खालावली आहे.
श्रीमान शि. द. फडणीसांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आता आम्ही पिटातली व महाराष्ट्रभरातील मंडळी त्यांची शतकोत्तर भरारी पाहण्यासाठी उत्सुक आहोत.
शुभं भवतु…

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे…

Next Post

मनाचा कॅनव्हास मोठा असलेला कलावंत

Next Post

मनाचा कॅनव्हास मोठा असलेला कलावंत

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.