• मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय

    रूळांवरून घसरलेल्या देशाचे काय होणार?

    बारसू पाकिस्तानात आहे काय?

    आता राष्ट्रीय जनगणना कधी?

    पुढे काय होणार?

    इतिहास क्षमा करणार नाही!

    मोहे डिग्री दिखाओ जी डिग्री दिखाओ!

    Trending Tags

  • कारण राजकारण

    जातगणना : एक चुनावी जुमला!

    मिट्टी में मिला देंगे ते ट्रम्पप्रणीत शस्त्रसंधी?

    टीव्हीवरचं लांच्छनास्पद ऑपरेशन धुडगूस!

    पंतप्रधान लागले प्रचाराला, प्रश्न विचारायचे कोणाला?

    जातनिहाय जनगणना, लबाडाघरचे आमंत्रण!

    आताही समस्या दिल्लीतच आहे, श्रीमान मोदीजी!

  • भाष्य

    नाय, नो, नेव्हर…

    सोमीताईचा सल्ला

    नाय, नो, नेव्हर…

    ‘मेडिक्लेम’वर बोलू काही…

    स्वस्तात डॉक्टर मिळतील कसे?

    नाय, नो, नेव्हर…

    Trending Tags

  • मनोरंजन

    दोघींच्या अस्तित्वाचं स्मशाननाट्य!

    पडद्यावरचा खरा नायक

    पडद्यावरचा खरा नायक

    सुपरहिट बालनाट्याचा पुनर्जन्म!

    पहिली ‘विनोदवीरांगना’!

    रखडलेल्या लग्नाची गोष्ट!

    वन अँड ओन्ली भारत कुमार

    वन अँड ओन्ली भारत कुमार

  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक
No Result
View All Result
No Result
View All Result

दूरदर्शन पर्व २

- पुरुषोत्तम बेर्डे (ब्रेक के बाद)

चित्रसेन चित्रे by चित्रसेन चित्रे
April 21, 2022
in ब्रेक के बाद
0

त्या काळातले दूरदर्शनचे कार्यक्रम म्हणजे पर्वणी होती. आता उगाचच लोक असं म्हणतात की काही पर्याय नव्हता म्हणून जबरदस्तीने पाहिले जायचे. पण तसं नव्हतं. उलट त्या काळात ज्या संकल्पना राबवल्या गेल्या त्या आजच्या तथाकथित चॅनल्सना अजिबात झेपणार्‍या नाहीत. कारण तेवढी प्रगल्भता या आजच्या लोकांमध्ये क्वचितच सापडते. आणि असली तरी ‘टीआरपी’ खाली जाईल या नावाखाली चांगले कार्यक्रम रिजेक्ट केले जातात किंवा त्याना ओके दिला जात नाही.
– – –

एखादं पर्व संपलं तरी त्याचे पडसाद कित्येक दिवस, महिने, वर्षे उमटतच असतात, इतकं ते पर्व मनांत बसलेलं असतं. १९७६ ते १९७८ या दोन अडीच वर्षांत मी डीडीमध्ये (दूरदर्शन केंद्र) ग्राफिक डिझायनर म्हणून काम केले, तेही काँट्रॅक्ट बेसिसवर. त्यावेळी तिथे कॅज्युअल म्हणून नोकरीवर घेण्याची पद्धत होती. दर पंधरा दिवसांनी, एक दिवस ‘ब्रेक’ देऊन काँट्रॅक्ट वाढवले जाई. त्या एक दिवसाच्या ‘ब्रेक के बाद’ पुनः पुढचे पंधरा दिवस नवे काँट्रॅक्ट. कधी कधी तर हा ब्रेक पंधरा दिवसांचा असे. पण पुनः नव्याने घेतले जाई. त्यामुळे तिथे परमनंट असलेले आणि नसलेले, म्हणजे कॅज्युअल्स, असे दोन भाग आपोआप पडलेले असत. त्यात काही ‘आत्मप्रौढी परमनंट’ लोक कॅज्युअल स्टाफकडे नेहमी मागासवर्गीय असल्यासारखे बघत. त्यांना उगाचच आपण ‘परमनंट’, म्हणजे कोणीतरी आहोत असे वाटून ते हाताखालच्या किंवा बरोबरच्या स्टाफकडे तुच्छतेने पाहात. मला या गोष्टींचा विशेष फरक पडत नव्हता, कारण माझा तिथे राहण्याचा उद्देशच वेगळा होता. मी जेजेमधून चांगल्या मेरिटमधून पास होऊन कमर्शियल आर्टिस्ट म्हणून बाहेर पडलो होतो. आणि सिल्व्हर मेडलिस्टही होतो. थोडा स्ट्रगल केला असता तर कुठेही चांगली नोकरी मला मिळाली असती. पण मला त्यात इंटरेस्ट नव्हता; मला इंटरेस्ट होता तो या नवीन तंत्रात, जो पुढे मला सिनेमासाठी उपयोगी पडणार होता. मी तिथेच तग धरून राहायचे ठरवले. गंमत म्हणजे माझे काम तिथल्या निर्मात्यांना खूपच आवडत असे, आणि त्या कामाची चर्चाही होत असे. ते काम म्हणजे, मी तिथल्या, महिन्यातून एकदा होणार्‍या नाटकांची, शॉर्टफिल्मची किंवा इंग्रजी कार्यक्रमांची जी पोस्टर किंवा प्रसिद्धी बाहेरच्या बोर्डसाठी किंवा बातम्यांच्या आधी किंवा एखाद्या प्रसिद्ध कार्यक्रमाआधी करीत असे, ती खूपच आवडत असे आणि त्याचा रिझल्टही चांगला असे; त्यामुळे तिथले याकुब सईद, विनायक चासकर, सुहासिनी मुळगांवकर, शुक्ला दास, वीरेन्द्र शर्मा ही निर्माते मंडळी माझ्यावर जाम खूश होती. अगदी अ‍ॅड एजन्सीच्या दर्जाचे काम मी तिथे करीत असे आणि त्याची खूप चर्चाही होत असे. त्यामुळे दर महिन्याला माझे काँट्रॅक्ट वाढत होते आणि माझ्या शिक्षणात भर पडत होती. जे शिक्षण घेण्यासाठी कदाचित मला पुढे तीन वर्षे पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिकावे लागले असते, ते तिथून शिकून आलेल्या लोकांच्या सहवासात केवळ विद्यार्थी बनून राहिल्यामुळे मिळाले.
ग्राऊंड फ्लोअरला अगदी ‘ए’ स्टुडिओच्या बाजूला लागून आमचे ग्राफिक सेक्शन होते. त्यामुळे ‘ए’ ‘बी’ आणि ‘सी’ या तिन्ही स्टुडिओंना ते सेक्शन कनेक्टिंग होते. त्याच्या बाजूला, एक फोटोग्राफीचे डार्क रूम होते आणि पुढे कपडेपट होता. कपडेपटाच्या पुढे सेटिंगचे ‘आर्ट डिपार्टमेंट’ आणि त्याच्या मागे पुढे काही निर्मात्यांच्या केबिन्स होत्या. त्या सर्वांना आमच्या सेक्शनच्या दारावरून जावे लागे, त्यामुळे जाता येता आमच्या सेक्शनमध्ये डोकावून जाणे हा तिथल्या सहायक निर्मात्यांचा म्हणजे प्रॉडक्शन असिस्टंट लोकांचा रोजचा विधिनियम होता. अर्धा अधिक स्टाफ हा त्या काळच्या नाटक सिनेमात कार्यरत होता. त्यात मराठी गुजराती, हिन्दी रंगभूमीवरील कलाकार असत आणि त्यांना आमच्या सेक्शनकडे काम हमखास असे, त्यामुळे त्या सर्वांशी आमचा चांगलाच परिचय होता.
सेटिंग डिपार्टमेंटचे बहुतेक वर्कर्स मराठी होते आणि त्याचा बॉस होता बिजोन दासगुप्ता. जाड टाचांच्या उंच बुटांचा ‘टॉक टॉक’ आवाज करीत चालायचा. सतत इंग्रजी बोलून समोरच्याला जेरीस आणायचा. ज्येष्ठ कलादिग्दर्शक एम. एस. सत्यू त्याचे गुरु होते. त्यामुळे संधी मिळताच तो त्यांच्याबद्दलचे किस्से सांगायचा आणि मग अमक्या वेळी काय झाले, तमक्या वेळी काय झाले, सत्यजित राय कसे भेटले, मी काय बोललो. ते काय बोलले, असं सतत चालायचं. एक स्टोरी तो तीन तीन वेळा सांगायचा. अगोदर सांगितले आहे हे त्याच्या लक्षातच यायचे नाही. तरी पण बोलणं अतिशय गोड आणि फर्ड्या इंग्रजीत असल्यामुळे, चला, त्या निमित्ताने इंग्रजी कानावर पडते ना, म्हणून आम्ही ऐकून घ्यायचो. आमच्या सेक्शनमधले राजा स्वामी, बबन दळवी वगैरे समोर असले तर ठीक, त्यांना इंग्रजी तर कळायचेच पण सिनेमाबद्दल माहितीही बरीच होती. मात्र चुकून माकून कधी मो पा, म्हणजे मोहन पाटील असला तर तो फक्त मान हलवायचा, कारण मो पा म्हणजे वर्षातून एखाद दुसरा शब्द बोलणारा, तर बिजॉन हा दिवसाला हजारो शब्द उच्चारणारा. अखेर बिजॉनच्या हे लक्षात आले की तो निघून जायचा.
कॅज्युअल लोकांबरोबर तो फार बोलत नसे, त्यामुळे मी कधी एकटा तिथे असलो तर ‘नोबडी इज देअर?‘ असे विचारून निघून जायचा.
एकेकाळी याच डिपार्टमेंटचे प्रमुख असलेले विनायक चासकर हे प्रमोशन मिळून निर्माते झाले. मुळातच एनएसडी दिल्लीचे विद्यार्थी असलेले चासकर हे या संधीची वाटच पाहात होते. दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे नेपथ्य करून त्यांनी तोपर्यंत चांगलेच नाव कमावले होते. अत्यंत रुबाबदार असे व्यक्तिमत्व होते चासकरांचे. भरगच्च कुरळे केस, जाड चश्मा, सतत फास्ट वैदर्भीय बोलणे, नागपूरकर असल्याचा अभिमान आणि हसतमुख, असे चासकर, प्रचंड विनोदी असल्यासारखे सतत जोक मारीत असत, शिवाय कुणी हसो वा ना हसो, आपल्या जोकवर प्रचंड खुश होऊन स्वत: मात्र गडगडाटी हास्य करीत आणि विरंगुळ्याच्या वेळी, कँटीनमध्ये अथवा टॉवरखाली, कधी मधी पाइपने धूम्रपान करीत. त्यांच्याकडे नाटक, नाट्यावलोकन आणि गजरा हे कार्यक्रम असत. त्यांची क्रेडिट लिस्ट आणि पोस्टर्स मी करीत असे. ते माझ्यावर प्रचंड खूश होते. मी इंग्रजी डिपार्टमेंटचा असूनही त्यांनी आमच्या हेड्सकडून मला खास मागून घेतले होते. त्या काळात आमच्या ‘या मंडळी सादर करू या’ या हौशी संस्थेतर्फे आम्ही छबिलदासमध्ये एकांकिका करीत होतो, आणि माझी नाटकेही अजून यायची होती. त्यामुळे मला डीडीमध्ये, काही रंगकर्मी सोडले तर तसे कोणी जास्त खास ओळखत नव्हते. पण चासकरांना जेव्हा हे कळले तेव्हा ते माझ्याकडे जास्त आदराने पाहू लागले. नंतर ‘अलवरा डाकू’ आले, ‘टुरटुर’ आले, त्यानंतर तर त्यांची माझी दोस्तीच झाली. पण तोपर्यंत मी डीडी सोडले होते. मात्र त्यानंतर मला त्यांनी ‘गजरा’साठी आणि पुढे ‘अलवरा डाकू’साठी खास सन्मानाने बोलवले आणि संपूर्ण नाटक शूट केले.
कलादिग्दर्शन सेक्शनमधले गोरखनाथ कडू, सुभाष शिर्के, देसाई, राणे वगैरे मंडळी चांगलेच मित्र झाले होते. कुठच्या ना कुठच्या कारणाने ही मंडळी बाहेरही भेटत. पुढे काही वर्षानंतर मी ‘सर आले धावून‘ हे नाटक बसवत होतो. त्यात लक्ष्मीकांतची अत्यंत गंभीर भूमिका होती. किंबहुना त्यासाठीच त्याने ते नाटक केले होते. त्यात अनेक नवीन कलाकार होते, विजय मिश्र, संदीप पाठक, सुशील इनामदार, चंद्रकांत कणसे, राजेश चिटणीस वगैरे… आणि लक्ष्मीकांतच्या मुलीच्या भूमिकेसाठी पल्लवी शिर्के म्हणून एक अत्यंत देखणी अशी मुलगी होती. तिच्याशी बोलता बोलता मला कळले की तिचे वडील अचानक दिवंगत झालेत आणि तरीही ती अत्यंत फ्रेश होऊन ती भूमिका छान निभावत होती. मी सहज तिच्या वडिलांची चौकशी केली, काय झालं? कुठे काम करीत होते? वगैरे… तिने जे सांगितले ते ऐकून मी थक्क झालो. डीडीमध्ये आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणार्‍या सुभाष शिर्केची ती मुलगी आणि तो तिथला माझा खास मित्र होता. बरीच वर्षे भेटलाही नव्हता. त्याचीच मुलगी इतकी टॅलेंटेड आहे, आणि ती माझ्या नाटकात आहे याचा मला आनंदही झाला. अत्यंत हसतमुख आणि फ्रेश असलेल्या सुभाषची तितकीच फ्रेश मुलगी छान काम करीत होती. मी तिला म्हटले, तू इथून पुढे तुझे नाव पल्लवी शिर्के न लावता ‘पल्लवी सुभाष’ असे लाव आणि वडिलांचं नाव आणि त्यांचा आशीर्वाद तुझ्याबरोबर सतत ठेव. तिने ऐकलं.. आज ती ‘पल्लवी सुभाष’ या नावाने मराठी मालिका, चित्रपट आणि जाहिरातीत मॉडेलिंग करून गाजतेय, शिवाय सध्या हिन्दी मालिकाही करीत असते.
त्या काळातले दूरदर्शनचे कार्यक्रम म्हणजे पर्वणी होती. आता उगाचच लोक म्हणतात की काही पर्याय नव्हता म्हणून जबरदस्तीने पाहिले जायचे. पण तसं नव्हतं. उलट त्या काळात ज्या संकल्पना राबवल्या गेल्या त्या आजच्या चॅनल्सना अजिबात झेपणार्‍या नाहीत. कारण तेवढी प्रगल्भता या लोकांमध्ये क्वचितच सापडते. आणि असली तरी ‘टीआरपी’ खाली जाईल या नावाखाली चांगले कार्यक्रम रिजेक्ट केले जातात किंवा त्यांना ओके दिला जात नाही.
‘प्रतिभा आणि प्रतिमा’ हा दर रविवारी सकाळी होणारा एक तासाचा शो, अत्यंत प्रतिभावंत लोक तिथे येऊन सादर करीत आणि तितकेच दर्जेदार लोक तो घरी बसून पाहात. सुरुवातीला केशव केळकर त्या कार्यक्रमाचे निर्माते होते. अत्यंत समृद्ध असं ते व्यक्तिमत्व होतं. त्यांचे सहायकही एकापेक्षा एक होते. विनय धुमाळे, विनय आपटे, विजया जोगळेकर, अरुण काकतकर, किरण चित्रे (पुढे हे सर्व स्वतंत्र निर्माते म्हणून काम करू लागले)… या सर्वांना साहित्य, संस्कृती आणि एकंदर कलात्मक विश्वाची चांगल्यापैकी ओळख होती. त्यामुळे अत्यंत दिग्गज लोक आपली प्रतिभा सादर करायला दूरदर्शनवर येत, कधी मुलाखतीतून तर कधी आविष्कारातून हा कार्यक्रम सादर होई. केशव केळकर हे सहायक स्टेशन डायरेक्टरही होते. त्यामुळे ते टॉवरखाली अथवा कँटीनमध्ये कमीच दिसत. मात्र त्यांची केबिन प्रतिभावंतांच्या हजेरीत फुलून निघालेली दिसून येई. तीच गत ‘आकाशानंद’ अर्थात आबा देशपांडे यांची. त्यांनी ‘ज्ञानदीप’सारखा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय केला. त्याच्या अनेक शाखा गावागावात तयार झाल्या. अनेक नवोदित रंगकर्मींना आबा देशपांडेनी कलाकार म्हणून संधी दिली आणि संघर्षाच्या काळात त्या रंगकर्मीना आर्थिक बळही दिले. मला आठवते, लक्ष्मीकांत बेर्डे, विजय कदम आणि तत्कालीन रंगकर्मींनी ज्ञानदीप कार्यक्रमात कामं करून एका बाजूने पैसे कमावले आणि दुसर्‍या बाजूने नाटकात भरपूर स्ट्रगल चालू ठेवले.
सुहासिनी मुळगांवकर यांनी स्वत:वर व आपल्या कामावर भरपूर प्रेम केले. अत्यंत दर्जेदार असे काव्य संगीतमय कार्यक्रम सुहासिनीबाईंनी सादर केले. त्यांना स्वत:ला संगीताची उत्तम जाण तर होतीच, पण त्या गायच्याही सुंदर. कधीही इकडून तिकडे जाताना डीडीमध्ये त्या शांतपणे गेल्या नाहीत, सतत गाणे गुणगुणणे सुरूच असायचे. ‘सुंदर माझे घर’ हा त्यांचा मुख्य कार्यक्रम असला तरी संधी मिळताच त्या ‘अष्टनायिका’सारखा कार्यक्रमही द्यायच्या. या कार्यक्रमासाठी त्यांनी ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे यांना पाचारण करून त्यांच्या अत्यंत काव्यमय चित्रशैलीचा वापर कार्यक्रमात केला. या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनीही मला खास बोलावून घेतले.
विजया जोगळेकरांनी तर अगदी पुढची पायरी गाठली. ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ मालिका सुरू करून डीडीच्या लोकप्रियतेचा कळस गाठला. हा मराठी कार्यक्रम गुजराती, सिंधी, दाक्षिणात्यही पाहात असत. दिलीप प्रभावळकर आणि बाळ कर्वे त्यातल्या ‘काऊ’ आणि ‘मोरू’सकट घराघरात पोहोचले. ‘काऊ’ ही चिमणरावाची हाक कितीतरी कुटुंबांची जिव्हाळ्याची हाक ठरली. डीडीमध्ये ‘सी’ स्टुडिओत ‘चिमणराव गुंडयाभाऊ’चा सेट लागत असे. शूटिंगच्या दिवसांमध्ये दूरदर्शन केंद्रातलं वातावरण, कार्यक्रम ‘कृष्णधवल’ असला तरीही, रंगीत होत असे. पुढे विनय धुमाळेनी हीच कास्ट घेऊन याच नावाने चित्रपट काढला आणि दूरदर्शनचे बरेच तंत्रज्ञ त्यात घेतले. तो जवळ जवळ सर्वांचा पहिलाच ब्रेक होता.
विनय धुमाळे, विनय आपटे, अरुण काकतकर, किरण चित्रे, विनायक चासकर या लोकांचे कार्यक्रम तर चांगले असयचेच, पण ही मंडळीसुद्धा भन्नाटच होती. प्रत्येकाला कर्तृत्वाचा एक वेगळाच अहंकार होता. तसा तो त्यांना शोभतही होता. विनय धुमाळेंना तर त्यांच्या वाङ्मयीन वाचनाचा प्रचंड अभिमान. भारतीय आणि परदेशी वाचन अफाट. मला एकदा त्याने विचारले, ‘काय काय वाचतोस? ‘मी आपले बोलून गेलो, ‘पु.ल. पु.भा., व.पु., वि.वा.,’
‘बस्स?’.. त्याला परदेशी लेखक अपेक्षित होते, पण मी ‘अर्नाळकर, काकोडकर’.. म्हणताच विनयचा चेहराच बदलला.. पुढे मी ‘इसापनीती’पर्यन्त पोहोचायच्या आत विनय ‘येतो हां जरा..’ म्हणून तिथून पळाला. सगळ्यांनी भरपूर वाचावं, समृद्ध व्हावं हा त्याचा आग्रह असे.
अरुण काकतकरांशी बोलल्यावरही असंच काहीसं व्हायचं. त्यांचे कार्यक्रमही सायन्स फिक्शन्सवर असायचे, तर कधी ‘शब्दांच्या पलिकडले’सारखे अत्यंत काव्यमय आणि दर्जेदार. तसंच त्यांच्याशी बोलतानाही व्हायचं. जरा आपण काही चुकीचं बोललो की ते ओरिजनल माहिती रेफरन्ससकट दाखवून आपल्याला निरुत्तर करायचे. ही सर्व तयारी त्यांच्या कार्यक्रमातही दिसायची.
किरण चित्रे यांच्याशीही तासन्तास गप्पा व्हायच्या, विषय मराठी साहित्य हा असायचा किंवा नाटक. त्यामुळे बर्‍याच गोष्टी माहिती असायच्या. या सर्व लोकांचे कार्यक्रम दीर्घकाळ स्मरणात राहणारे ठरले, कारण या लोकांचा व्यासंग आणि कर्तृत्व हे एकत्र जात होते. आजही हे कार्यक्रम क्लासिक म्हणून ‘सह्याद्रीच्या खुणा’ या नावाने प्रकाशित होतात.
दूरदर्शनवरील निर्माता विनय आपटे आणि बातम्या सांगणारी स्मिता तळवलकर, यांच्याबरोबरची दोस्ती दूरदर्शनमध्ये सुरू झाली, ती नाटक, सिनेमा करीत त्यांच्या अखेरच्या काळापर्यंत कायम राहिली. विनय नेहमी ‘बॉस’सारखा वागत असे, किंबहुना मी त्याला तो मान नेहमीच देत असे. तर स्मिता ही मैत्रीण न राहता सदैव एक ‘मित्र’ म्हणूनच वावरली. मी तिची ओळख, ‘हा आमचा मित्र ‘स्मिता तळवलकर’ अशीच करून देत असे. कारण तिची एकूण धडाडी पुरुषालाही लाजवील अशीच असायची.
मराठी रंगभूमीवरील असंख्य कलाकारांच्या ओळखी दूरदर्शनमध्येच एकेकाळी झाल्या. चारूशीला साबळे, प्रदीप भिडे, विलास वंजारी, मीना गोखले, सुधीर कोसके. त्यातला प्रदीप भिडे हा एक उत्तम निवेदक आणि बातम्या सांगण्यावर प्रभुत्व. पुढे त्याचा अभिनेता आणि समीक्षक म्हणून प्रवास झाला तरी डीडीच्या पार्श्वभूमीवर आपल्या आवाजाची जादू प्रदीपने अनेक वर्षे या माध्यमावर चालवली. विलास वंजारी हा अत्यंत धडपड्या रंगकर्मी, पण अल्पायुषी ठरला. तर चारुशीलाने पुढे माझ्या ‘भस्म’ सिनेमात प्रमुख भूमिका केली. आणि सुधीर कोसके माझ्या ‘अलवारा डाकू’ नाटकात तर होताच, पण, पुढे आम्ही जाहिरात संस्था काढली त्यात तो ‘पार्टनर’ही होता. तसेच आणखी एक खास विद्वान तिथे ‘न्यूज सेक्शन’मध्ये काम करीत होता, त्यांचं नाव अवधूत परळकर; साहित्याची जाण, नाटक सिनेमाचा उत्तम समीक्षक, पण त्याने केलेली टीका कधीही त्याच्या मैत्रीच्या आड आली नाही. अत्यंत तिरकस आणि गोड भाषेत अवधूत एखाद्या कलाकृतीला भंगारात काढतो, तेही त्याच्या विशिष्ट हसण्याच्या शैलीत, तर कधी सोन्याने मढवतो. त्याने सगळंच चांगलं म्हणावं असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्या वाटेला जाऊ नका. मात्र तुम्ही काही वेगळं केलेलं असेल तर त्याला कसं वाटलं जरूर विचारा, मी आजही विचारतो. वर्षातून एकदा ‘बॉडी चेकिंग’ करावं, तसं आपल्या कलाकृती एकदा अवधूत परळकरला दाखवून घ्याव्यात व त्याचे रिपोर्ट घेऊन आत्मपरीक्षण करावे.
दूरदर्शनमध्ये गुजराती रंगभूमीवरचे बरेच कलाकार काम करीत होते. अजित वाच्छानी, सनत व्यास, अरविंद मर्चन्ट ही मंडळी बर्‍यापैकी मराठी बोलायची आणि मराठी माणसांवर आणि मराठी नाटकांवरही प्रेम करणारी होती. अजित वाच्छानी तर पुढे हिंदी सिनेमात खूप मोठा अभिनेता म्हणून पुढे आला. दूरदर्शन केंद्राला मी कॉलेजची उपमा देतो, त्याला आणखी एक कारण आहे; इथे आतल्या आत अनेक जोड्या जमल्या, निखळ मैत्रीपासून ते लग्नबंधनापर्यंत. चारूशीला आणि अजित वाच्छानी ही लग्नबंधनात अडकलेली त्यातली एक जोडी.

पहिला ब्रेक

दूरदर्शन केंद्रात अडीच तीन वर्षे झाल्यानंतर मला सतत वाटू लागले, आता बास, आता वेगळं काहीतरी करायला हवं. मी संधी शोधत होतो. पण ती अशी येईल असं वाटलं नव्हतं.
कित्येक वर्षे कॅज्युअल म्हणून घासत असलेले तिथले कर्मचारी परमनंट होत नव्हते, त्यांना कोणी वाली नव्हता. नुसतं काम एके काम. पण नाईलाजाने ते करत होते. मीही त्यात होतो, पण अलीकडे माझ्या मनात एक नाटक घोळत होतं आणि ते केव्हाही स्फोट होऊन बाहेर येईल असे वाटत होतं. तोपर्यंत माझ्या चार एकांकिका आणि आमची ‘या मंडळी सादर करू या’ ही संस्था हळूहळू आकार घेत होती. तेवढ्यात सुमन बजाज-कालरा नामक एक इंग्रजी विभागाची निर्माती, आमच्या सेक्शनची हेड म्हणून आला आणि तिने आमच्या सेक्शनचे, कलाकारांचे स्वच्छंद आयुष्य आणि काम करण्याची पद्धत बदलायची ठरवली. आम्ही अर्धा वेळ वँâटीनमध्ये किंवा टॉवरखाली काढत असलो तरी कामाला कुठेही कमी नव्हतो. कधी कुणाचे काम अडले नव्हते. पण तरीही तिने फतवा काढला. दिवसभरात जे काम करता ते रजिस्टरमध्ये लिहून ठेवायचे आणि त्यावर सही घ्यायची. हा असला कारकुनी कायदा कोणालाच मानवला नाही. तरीही काही लोकांनी तो पाळायला सुरुवात केली. तीन चार कॅज्युअल आर्टिस्ट होते, त्यांनी तर विविध रंगांचे पेन वापरुन रजिस्टर सुशोभित करून तिच्यावर इंप्रेशन मारण्याचा प्रयत्नही केला.
मी मात्र हे सर्व करायचं नाही असं ठरवलं. ही कारकुनी करायला इथं आलो नाही, करणारही नाही, ही माझी ठाम भूमिका होती. तीच बबन दळवी आणि राजा स्वामी यांची होती, पण ते दोघे परमनंट होते, मी कॅज्युअल. मी कॅज्युअल असून रजिस्टर भरत नाही आणि सहीसाठीही येत नाही, हे बघून सुमन बजाज यांचा पारा चढला. आधीच ही बाई पेडर रोडवर राहणारी, हाय फाय आणि सतत अ‍ॅटिट्यूडमध्ये असलेली. तिने मला बोलवून घेतले आणि मी रजिस्टर भरत नाही म्हणून फायर करायला सुरुवात केली. तेही इंग्रजीत. मी सौम्य भाषेत माझी भूमिका मांडत होतो, पण तिने एकदम ‘तुम घाटी लोक..’ वगैरे बोलायला सुरुवात केल्याबरोबर माझं टाळकं सटकलं. मी शुद्ध मराठी भाषेत तिला सुनवायला सुरुवात केली आणि सभ्य शिव्याही घातल्या. तिने काँट्रॅक्ट रद्द करायची धमकी दिली. मी तिच्या तोंडावर शुद्ध मराठीत ‘खड्ड्यात गेलं तुझं काँट्रॅक्ट आणि तूसुद्धा’ असं सांगून तिथून ताडताड निघालो. कोणालाही न भेटता, सरळ जवळच असलेल्या ‘सत्यम शिवम सुंदरम’ या तीन एकत्र थेटरात जाऊन १२, तीन, आणि सहाचे सलग तीन शो बघत बसलो. त्यानंतर माझा राग जरा शांत झाला. तो माझा दूरदर्शन केंद्रातला शेवटचा दिवस होता.

ब्रेक के बाद

पुढे काय करायचे प्रश्नच नव्हता.. मनातलं नाटक लिहायला घेतलं.. नाटकाचं नाव होतं, ‘अलवरा डाकू’ (१९७८). ते प्रचंड गाजलं.. तोपर्यंत मी, सुधीर कोसके आणि रघुवीर कुल आम्ही एकत्र येऊन एक अ‍ॅड एजन्सी काढली. चार वर्षे मन लावून व्यवसाय केला आणि त्यानंतर संधी मिळाली व्यावसायिक नाटक करायची, पहिलं व्यावसायिक नाटक केलं.. ‘टुरटुर (१९८३)..
जे.जे.ने माझ्यातला कमर्शियल आर्टिस्ट घडवला. त्यांतर दूरदर्शनने त्यावर यथायोग्य संस्कार केले आणि ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेने पाया रचून ‘चौरंग’ (१९८३ ते १९९५) या माझ्या नाट्यसंस्थेने ‘टुरटुर’मार्गे मला व्यावसायिक रंगभूमीचे दार उघडून दिले. ज्यातून प्रवेश करून मी अखेर माझा पहिला ‘हमाल दे धमाल’ (१९८९) हा सिनेमा करण्यापर्यंत मजल मारली.. जो माझा दूरदर्शनमध्ये जाण्याचा अंतिम उद्देश होता.

Previous Post

विश्वासाचे भांडवल गमावले!

Next Post

नाम बडे और दर्शन खोटे

Related Posts

स्थितप्रज्ञ प्रशांत दळवी
ब्रेक के बाद

स्थितप्रज्ञ प्रशांत दळवी

July 28, 2022
ब्रेक के बाद

सव्यसाची : पद्मश्री वामन केंद्रे

July 14, 2022
मुंगी उडाली आकाशी
ब्रेक के बाद

मुंगी उडाली आकाशी

June 30, 2022
शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ
ब्रेक के बाद

शंभर नंबरी सराफ – अशोक सराफ

June 1, 2022
Next Post

नाम बडे और दर्शन खोटे

शिवरायांच्या तडाख्यातून मेंगलोर कसेबसे बचावले होते..!

POPULAR NEWS

  • हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुंबई महाराष्ट्राचीच!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या आयुष्यातला कॅटलिस्ट : जयंत पवार

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Trending
  • Comments
  • Latest
हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

हिंदुस्थानची महासत्तेच्या दिशेने वाटचाल, चीनचे राज्य येणार; बाबा वेन्गाची भविष्यवाणी…

December 26, 2020

मुंबई महाराष्ट्राचीच!

April 15, 2024
नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी!

June 30, 2021

पुत्र व्हावा ऐसा गुंडा!

October 14, 2021
मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

मर्मभेद करणारं व्यंगचित्र साप्ताहिक!

3
मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

मार्मिक’ वाचला की पोट भरायचं!

1
‘आयपीएल’चे फुसके बार !

‘आयपीएल’चे फुसके बार !

1
कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

कुंडीत वटवृक्ष लावायची हौस हवी कशाला?

1

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025

राशीभविष्य

May 15, 2025

बोगस सर्व्हेने सर्व काही लुटले…

May 15, 2025
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

Recent News

नाय, नो, नेव्हर…

May 15, 2025

चल उड जा रे पंछीऽऽऽ

May 15, 2025
No Result
View All Result
  • मुख्य पृष्ठ
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • संपादकीय
  • कारण राजकारण
  • भाष्य
  • मनोरंजन
  • फ्री हिट
  • उचला कुंचला
  • मार्मिक विषयी
    • वर्गणीदार व्हा
    • जुने अंक

© 2020 प्रबोधन प्रकाशन प्रा. लि.