मध्यंतरी हॉट चिप्सच्या दुकानात गेलेलो. किती वेगवेगळ्या प्रकारचे वेफर्स विकतात ते लोक! बापरे! बटाट्यापासून कार्ल्यापर्यंत कशाचेही! मुख्य म्हणजे प्रत्येकाची आपापली एक छान चव असते. त्या सगळ्या तिखटामिठाच्या वेफर्सच्या मांदीयाळीत एक फिक्का गोड पण मधुर पदार्थ मात्र हमखास माझं लक्ष वेधतो, मोठ्या वाटीच्या आकाराची कमळफुलं!! नसतील खाल्ली ना, तर जरूर खाऊन बघा, आवडतील.
मी त्या दुकानात पहिल्यांदा नाही बरं खाल्ली ती कमळफुलं. लहानपणीची फार छान आठवण गुंतलीये त्यात. आजीची ऑफिसमधली एक केरळी सहकारी होती. त्या मावशीने आम्ही लहान असताना मुद्दाम घरी येऊन बनवून दिलेली. तो सगळा प्रसंग व ती चव अजूनही लक्षात आहे. काय तो घमघमाट नी त्या आकाराचं तर एवढं अप्रुप वाटलेलं ना की काय सांगू!! त्या मावशींनी सांगितल्याप्रमाणे नंतर आजीनेही हौसेनी प्रयोग केला, पण फुलं काही सुटत नव्हती साच्यापासून. नंतर लक्षात आलं की साचा पूर्ण पिठात बुडवल्याने गडबड झाली सगळी! सगळी मेख तिथेच आहे बरं, एकदा का हे तंत्र जमले की बाकी पदार्थ तसा सोप्पा आहे! साहित्य पण तसं फार विशेष काही नाही लागत. वाटीभर तांदळाच्या पिठासाठी प्रत्येकी पाव वाटी मैदा आणि पिठीसाखर, एक अंडे, चवीला मीठ, पाणी. तळायला आवडीनुसार तेल किंवा तूप. अंड्याचा बलक चांगला फेसून त्यात तांदळाची पिठी, मैदा, साखर आणि मीठ मिसळायचं. थोडं थोडं पाणी मिसळत भज्यांच्या पिठापेक्षा जरा घट्ट, पण पळीवाढं पीठ भिजवायचं नी जरावेळ मुरू द्यायचं. मग ह्या कमळफुलांचा खास साचा मिळतो तो घेऊन तळणासाठी तापवलेल्या तुपात बुडवायचा व नंतर तो अर्धा बुडेल एवढाच भिजवलेल्या पिठात बुडवून अलगदपणे तळायला तुपात धरायचा. फूल किंचित कडक झाले की साच्याला धक्का देऊन ते सोडवायचे नी पूर्ण तळले गेले की बाहेर काढायचे.
जो साचा आकार देतो त्यालाही योग्य वेळी सोडता आलं तरच ही कमळफुलं जन्मतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्या साच्याबद्दल कृतज्ञता म्हणून त्याचा आकार मोठ्या हौसेने बाळगतात. जणू मात्र त्याला पक्क धरण्याचा प्रयत्न केला की साचाही पुन्हा स्वच्छ करेपर्यंत निकामी ठरतो व फुलं तर तयारच होत नाहीत!
आपणही कळत नकळत आपल्याला घडविणार्या अनेक गोष्टींना, अनुभवांना कवटाळून बसण्यापेक्षा त्यातला बोध घेऊन योग्य वेळीच पुढची वाट चोखाळली तर आयुष्य जास्त चांगलं घडतं, खर्या अर्थाने त्या परिस्थितीचा हेतू सफल होतो, नाही का? आसक्ती मग ती चांगल्याही गोष्टीची असली तरी वाईटच ठरते! अनासक्तीच्या वाटेवर, ती सुरुवातीला खडतर वाटली तरी नंतर आपोआप, मन:शांतीचे नंदनवन फुलते. दक्षिण भारताच्या प्रवासादरम्यान माताजी श्री सारदादेवींना कोण्या राजाने आपलं भांडार उघडून दिलं, घ्या म्हणे काय हवं ते. सोन्यानाण्यांनी हिरेमाणकांनी भरलेला तो खजिना पाहून माताजींचे उरच दडपले, नको बाबा यातलं काहीच मला. पण त्या राजाच्या अतिआग्रहाखातर माताजींनी राधूला म्हटले बघ बाई, तुला काही हवे असेल तर मागून घे. माताजी सांगतात की तिने मागण्यासाठी तोंड उघडेपर्यंतही माझा जीव कासावीस झाला, आता काय मागते ही मुलगी? मात्र राधूने जेव्हा म्हटले की मला ह्यातले काही नको. पाटीवरची लेखणी द्या एक, तेव्हा माताजींच्या जीवात जीव आला. नको रे बाबा म्हणे ती आसक्ती व तो मायेचा बाजार. अर्थात त्या राजाने मन:पूर्वक पाहुणचार केला असेल व तो कृपेचा धनी झाला असेलच. श्री ठाकूरही माती व पैसा एकसमान म्हणत व साधं सुपारीचं खांड जरी हातात राहिलं तरी ते त्यांना सहन होत नसे!
अर्थात या दैवी गोष्टींची आपण सर्वसामान्यांनी कशी हो सांगड घालायची? संसार म्हटला की सगळेच लागते, नाही का? जरूरीपुरता पैसाअडका, धनधान्य तर हाताशी लागतंच; पण ते सगळं म्हणजेच माझं जीवन आहे असा विचार न करता परमेश्वराकडे पोहोचण्याच्या वाटेवरच्या साधनांतील ती काही साधनं आहेत असा विचार केला तर मनोबुद्धीवरचा त्या आसक्तीचा अंमल जरा कमी होतो. मला मिळालेल्या सुखसाधनांपैकी काही भाग का होईना पण मी समाजाला देऊ शकलो तर नक्कीच मला मिळणारे समाधान त्या उपभोगापेक्षा वरचढ ठरते. आपली संस्कृती आपली परंपरा हेच शिकवते नाही का? एक तीळही म्हणे सातजणांत वाटून खावा. अर्थात शब्दश: जरी हे शक्य नसले तरी वाटून खाण्यातले सुख नक्कीच मौलिक ठरते. ज्या ठिकाणी निरपेक्षतेनी सुखसाधनांबरोबरच प्रेम, जिव्हाळा, संवेदना तसेच वेळ वाटला जातो ना, तिथे नकळतपणे मन:स्वास्थ्याची, मन:शांतीची वर्णी लागते अन् तीच तर पायरी ठरते सुफळ संपूर्ण मानवजन्माच्या पूर्तीची… ईश्वरार्पण होणार्या अनासक्त कमलपुष्पासारखी निर्मळ तर या खायच्या कमळफुलांसारखी मधुर!