हे व्यंगचित्र ज्या काळातले आहे, तो १९७४चा कालखंड भारतातला अतिशय अस्वस्थ कालखंड होता. एकीकडे गुजरातमध्ये विद्यार्थ्यांनी नवनिर्माण आंदोलन सुरू केलं होतं, दुसरीकडे बिहारमध्ये गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्त्वाखाली उठाव सुरू झाला होता. रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला गेला होता… बर्याच अंशी नंतर बर्याच काळाने झालेल्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनासारखी परिस्थिती होती आणि त्यानंतर जी काही फळं भारताला भोगावी लागली, तीही जवळपास सारखीच आहेत… तेव्हाही पडद्यामागे चाव्या फिरवणारे हात एका तथाकथित सांस्कृतिक संघटनेचे होते आणि अण्णांचे आंदोलनही याच मंडळींनी हायजॅक केले होते… राजकीय नेत्यांनी भारतमातेचा लिलाव पुकारला आहे, दु:शासनाप्रमाणे तिच्या केसांना धरून ते बोली लावत आहेत आणि षंढ जनता तो लिलाव हतबलतेने पाहात आहे, असं प्रक्षोभक चित्र इथे बाळासाहेबांनी रेखाटलं आहे. इथल्या दोन्ही चेहर्यांचा जबरदस्त जिवंतपणा पाहण्यासारखा आहे. तेव्हा किमान लिलाव होतो आहे, इतकं पाहण्याची तरी शुद्ध जनतेत तेव्हा होती… तिची हतबलता नंतर मतपेटीतून व्यक्त झाली… आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला अशी काही द्वेषाची भूल पाजण्यात आलेली आहे की उघडपणे अख्ख्या देशाला एका बदनाम व्यापार्याच्या (उद्योगपती नव्हे) झोळीत टाकण्याचा उद्योग सुरू आहे आणि या लिलावाकडे जनतेचं लक्षच नाही… हतबलता निर्माण होण्याचीही शक्यता नाही, तिथे उद्रेक कुठून होईल?