माणूस विचित्र प्राणी आहे. त्याला घरी हॉटेलसारखे अन्न हवे असते आणि हॉटेलमध्ये घरच्यासारखे. विशेषतः परदेशात किंवा अन्य राज्यात गेलेले पर्यटक अगदी घरच्यासारखे जेवण आहे नाही, असे म्हणत ताव मारतात. वास्तविक बाहेरगावी गेल्यावर तिथले खास पदार्थ चाखून पाहावेत, वेगळा अनुभव असतो. पण आधी म्हटले तसे, माणूस विचित्र आहे. आता हे सर्व रामायण सांगायचे कारण काय? तर एक गोष्ट कळली… हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये प्रामुख्याने मागवली जाणारी डिश कोणती असेल? पिझ्झा? फ्राईड राइस? बर्गर? नाही… खिचडी!!!
हॉटेलमध्ये जाऊन तिथली डाळखिचडी आवर्जून खाणारे खवैये आहेत. नवल वाटायची गरज नाही. कारण आत्ताच एका सर्वेक्षणात दिसून आलेय की लॉकडाऊन आणि नंतरच्या काळात जास्तीत जास्त मागवली गेलेली डिश कोणती होती, तर बिर्याणी. तांदूळ बेस्ड पदार्थ लोकांना जास्त आवडतात. विशेषतः तब्येत बरी नाही, खूप प्रवास करून आलोय, उदास वाटतेय, अशा वेळी खिचडी, भात, पुलाव हे पदार्थ अधिक खाल्ले जातात. तुम्ही तुमचे पाहा ना? आजारपण सोडा… अगदी मनापासून आवडीचा असा सोपा, सुटसुटीत पदार्थ काय? खिचडी…
एकूण भारतात भात लोकप्रिय आहे. माणसाला लहानपणी अन्नाची ओळख होते ती खिमट/खिचडी यातून. मग हळूहळू तो प्रवास चालू होतो. अर्थात नंतर त्याला वाट्टेल ते आचरट फाटे फुटतात ते सोडा. आजही मराठी माणसाच्या मनात घर करून असणारा पदार्थ काय? तर वरण भात, खिचडी, पेज, आटवल, मेतकूट भात, दही भात, जोडीला मग काहीही चालते अथवा काहीही नको. वाफाळणारा भात ताटात, त्यावर साधे वरण, असल्यास तूप, लिंबू आणि एखादी लोणचे फोड… मराठी आत्मा सुखावला पाहिजेच. मराठी सोडा, बंगाली/ ओरिया खीचूरी, तामीळ पोंगल भात, गुजराथी खिचडी, उत्तर प्रदेश येथील तेहरी हे खिचडीचे प्रकार. थंडीत लोहरी सणाच्या वेळी पंजाबमध्ये उडदाची डाळ घालून खिचडी होते. आपल्याकडे पण हिवाळ्यात मूग खिचडी आवर्जून खाल्ली जाते.
तांदूळ किंवा तांदूळजन्य पदार्थ माणसाला का आवडतात? याला शास्त्रीय कारणे आहेत. पण आपल्याला त्यात जायचे नाही. काय बघायचे आहे तर खिचडी!!!
पूर्ण भारतात खिचडी असंख्य प्रकारे होते. पण मूळ घटक दोन, तांदूळ आणि डाळ. डाळ कोणतीही असू शकते, मूग, मसूर, तूर, काहीही.
गलेलठ्ठ पराठा तुपात लोण्यात माखवून खाणार्या पंजाब-हरियाणा इथे पण खिचडी नेहमी होते. हे सांगायचे कारण की भात हा फक्त दक्षिण भारत आणि किनारपट्टीमध्ये खाल्ला जातो, असा आजही अनेकांचा समज आहे. पण ते चूक आहे. अगदी उत्तरपूर्व भारत, लडाख, हिमाचल, काश्मीर इथे भात हे प्रमुख अन्न आहे. किंबहुना आशिया खंडात तांदूळ प्रथम असतो. कोरिया, जपान, थायलंड इथले अन्न पाहा, सर्व प्रामुख्याने तांदूळ बेस्ड. अर्थात त्यांच्याकडे मासे आणि अन्य प्राणीजन्य पदार्थ पण असतात.
काही वर्षे आधी भाताला फार वाईट दिवस आले होते. भाताने मधुमेह वाढतो, वजन वाढते, असे अपसमज प्रचलित होऊन बिचारा तांदूळ हद्दपार झाला होता. अर्थात ते नंतर बर्यापैकी दूर झाले. तर मुद्दा काय होता? खिचडी.
आपण घरी केलेली खिचडी हॉटेलसारखी होत नाही. बरोबर! तोच तांदूळ, तीच डाळ पण तिथे मिळणारी खिचडी वेगळीच असते. असे का? इथे हॉटेलमधील काम आणि अर्थकारण समजून घेतले पाहिजे. आपण घरी खिचडी कशी करतो? डाळ-तांदूळ एकत्र आणि मग फोडणीत ते शिजवायचे? बरोबर?
आणि इथेच मेख आहे. हॉटेलात शेकडो खाणारे येतात. प्रत्येकाची चव, आवड वेगवेगळी. रस्त्याच्या कडेची छोटी हॉटेल्स, धाबे असतात तिथे तर आणखीन घाई असते. त्यामुळे ऑर्डर आली की मग त्यानुसार पदार्थ फोडणीत परतून दिला जातो. खिचडीत लागणारा भात आधीच तयार असतो आणि डाळ पण. (तुम्ही डाळ फ्राय मागवा अथवा डाळ तडका, पाचव्या मिनिटाला समोर येते ती याचमुळे) तर ऑर्डर आली की दोन्ही एकत्र करून मसाले फोडणी देऊन दिली जाते. जैन किंवा तत्सम असतील तर कांदा-लसूणविरहित… ज्यांना तिखट हवीय त्यांना तशी… कोणाला पातळ हवीय तर कोणाला सुक्की, तसतशी खिचडी पेश होते. हुशार लोकांनी यात शाही खिचडी आणून ती दुप्पट किमतीला देणे सुरू केलंय… वरून काजू, मनुके, चेरी शिंपडून चार मटार टाकून देतात…
तर नमनाला घडाभर तेल झाले, आता अगदी हॉटेलसारखी खिचडी कशी करायची ते बघू…
साहित्य : – तुकडा किंवा अख्खा बासमती १ वाटी
– मूग/ मसूर/ तूर या सर्व अथवा कोणतीही डाळ १ वाटी
– छोटा कांदा बारीक चिरून, आले लसूण, चिरून, हिरवी मिरची हवी असल्यास, किचन किंग मसाला (इथे कोणताही पारंपरिक मसाला वापरायचा नाही. कृती अगदी बेसिक आणि सुटसुटीत हवी. अगदी हॉटेलसारखी…)
तूप आणि बाजारातील बटर.
राई, हिंग आणि अख्खे गरम मसाले (आवडीने).
कृती : तांदूळ बोटचेपा शिजवून घ्यावा. आणि निथळत ठेवावा. डाळ पण तशीच शिजवावी. मऊ मेण करू नये. कढईत तूप घालून, राई, हिंग, दालचिनी, मिरी (अगदी थोडे) घालून ते तडतडू देऊन, मग बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी करावा. कांदा वापरणे ऐच्छिक आहे. आता आले लसूण आणि हळद, किचन किंग मसाला.. व्यवस्थित परतून तांदूळ व डाळ घालावी. मीठ घालून जितके घट्ट अथवा पातळ हवे, तसे करावे.
मंद आगीवर पाचेक मिनिटे शिजवून घ्यावे. आणि आता महत्त्वाची पायरी.
फोडणीच्या पळीत, बटर आणि थोडे तेल घालून त्यात बारीक चिरलेला लसूण लाल करावा, मग त्यात सुक्या लाल मिरच्या व कोथिंबीर घालून ही फोडणी खिचडीत पटकन ओतून झाकण ठेवावे.
हॉटेलसारखी खिचडी तय्यार. आणखीन कलाकुसर हवी तर काजुबिजू घालून घरातल्या लोकांना खुश करता येते. अजून क्लृप्ती हवी, तर हॉटेलचे पार्सल डबे असतात, त्यात खिचडी भरून, पार्सल बाहेरून मागवले असे दाखवता येते. खास करून घरचे जेवण नक्को, खिचडी यिक असे म्हणणारी तरुण जनता असेल तर… कारण काहीही झाले तरी, वो जिस कॉलेज में गये हैं, उधरके हम सिर्फ प्राचार्य नहीं तो ट्रस्टी भी है… बरोबर..
तर अशी खिचडी करा आणि मस्त खा…