स्थळ : भाजप मनतपासणी केंद्र… भाजपने आपले आणि पाठिंबा असलेले काही नेते तिथे केवळ त्यांच्या मनाची तपासणी करून संशय दूर करण्यासाठी पाठवले आहेत. त्यात सर्कीट सोमय्या, नवनीत राणा, रवी राणा, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, नारायण राणे, रामदास आठवले इत्यादींचा समावेश आहे. डॉ. नितीन गडकरी प्रत्येकाची तपासणी करत आहेत. वॉर्डात सर्वांचा एकच गोंधळ सुरू आहे.
डॉ. गडकरी : सायलेन्स… सायलेन्स. तुम्हा सर्वांना इथे का आणलं आहे याची तुम्हाला कल्पना आहेच. तुमच्या काही तपासण्या करायच्या आहेत. मी काही प्रश्न विचारीन, त्याची बरोबर उत्तरे द्या. त्यावरून तुमच्या मानसिक तब्येतीबद्दल काही अनुमान काढून वर मोदींना रिपोर्ट पाठवीन. सोमय्या तुम्ही पुढे या.
(सोमय्या डान्स करत समोर येतात.)
सोमय्या : तिरकीट था, किरकिट था, ताधिंधिंना ईडीकट तिन्ना, बोला डॉक्टर, मी आपली काय सेवा करू? तुम्हाला रस्ताकामातल्या भ्रष्टाचाराच्या फायली दाखवू का? की आतापर्यंत कोणत्या कंत्राटदाराने किती पैसे खाल्ले याची यादी देऊ की सदोष बांधकामांचे फोटो दाखवू?
डॉ. गडकरी : काही नको. गाल दाखवा. (सर्कीट जीभ दाखवतात) जीभ कशाला दाखवता? गाल दाखवा गाल. तुमच्या त्या गालाची इन्व्हेस्टिगेशन करायची ऑर्डर आहे मोदींची. डोकं पण तपासायला सांगितलंय.
सोमय्या : डोक्याचा आणि गालांचा काय संबंध साहेब! अशाने मला वेड लागेल हो.
डॉ. गडकरी : ते दिसतंच आहे. आता जीभ दाखवा. फारच चुरुचुरु बोलतेय ती. त्यापेक्षा भरतनाट्यम शिकून घ्या आणि यापुढे थोडे शहाण्यासारखे वागा.
सोमय्या : म्हणजे, मला वेडा समजलात की काय?
डॉ. गडकरी : तुम्ही बाजूला जाऊन बसा.
नवनीत राणा : गडकरी सर, मी शिकवीन सोमय्यांना डान्स. माझे तेलुगू सिनेमातले डान्स पाहिलेच असतील तुम्ही आणि सोमय्या साहेबांकडे नाचाचे अंग आहे. साधा राग आला तरी किती थयथयाट करतात ते. मलाही नाही बाई एवढा थयथयाट करता येत.
डॉ. गडकरी : बाई, तुमच्या आणि त्यांच्या थयथयाटाचे नंतर पाहू आपण, पण त्या दिवशी लीलावतीमध्ये त्या स्कॅन मशीनमध्ये चाललेलं तुमच्या डोक्याचं ते फोटोसेशन नेमकं कशासाठी होतं हो?
नवनीत : अय्यो, मला काहीच माहीत नाही साहेब. मी गुंगीत होते ना. डोळ्यांपुढे सारखी ती तुरुंगातली मळकट चादर येत होती आणि त्या सोमय्या भावजींच्या गालावर झालेली ती लाल जखम. तुमच्या मराठीत ती गझल आहे ना ती मला खूप आवडते. ‘जखमा अशा सुगंधी झाल्यात काळजालाऽऽऽ
डॉ. गडकरी : बाई, मी काय विचारतोय आणि तुम्ही काय सांगताय. तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना?
नवनीत : तेव्हा ते त्या मशीनमध्ये घातलं होतं. माझी अख्खी बॉडी फोटोसेशनसाठी मशीनमध्ये घातल्याचं मी नंतर व्हिडीओत पाहिलं. बहुतेक त्यांना माझ्या तल्लख मेंदूचा सिटीस्कॅन रिपोर्ट हवा असेल.
डॉ. गडकरी : नशीब, लवकरच समजलं ते. तुम्ही खासदार झालात म्हणजे तुम्हाला वाटेल ते बडबडण्याची परवानगी नाही मिळाली. स्वत:ला कोण समजता हो तुम्ही? अहो, लोकांनाही समजतंय की ही बाई मानसिक रुग्ण झालीय. वेळीच सावरा बाई, वेळीच सावरा. तुम्हाला माहीत नाहीत आमच्या पक्षातले लोक कसे आहेत ते.
नारायणराव : गडकरी साहेब, बाईंवर अन्याय झाला आहे. त्यांना दिलासा द्यायचा सोडून तुम्ही त्यांनाच उलटसुलट प्रश्न विचारता? त्यांचा प्रत्येक शब्द आपण भाजपवाल्यांनी उचलून धरायला हवा.
डॉ. गडकरी : आपल्या पक्षातल्या आणखीही काही नेत्यांच्या डोक्याचा सिटी स्कॅन करून घेण्याची शिफारस मी मोदींना करणार आहे.
फडणवीस : हा अन्याय आहे गडकरी साहेब. नवनीत वहिनी जे काही करत आहेत ते आपल्या पक्षाच्या आणि माझ्या स्वत:च्या फायद्याचंच आहे. ‘मी पुन्हा येईन’ ही माझी भीष्म नव्हे, देवेंद्र प्रतिज्ञा जर प्रत्यक्षात यायची असेल तर नवनीत वहिनींना आपल्या पक्षाने फुल बॅकिंग दिलं पाहिजे. मी अमृतालाही सांगितलंय तुझी असेल नसेल तेवढी बुद्धी पणाला लाव आणि नवनीत वहिनींना सपोर्ट होईल अशा पोस्ट सोशल मीडियावर दर दिवशी टाक.
डॉ. गडकरी : अहो, नाना अशाने पक्षाची मतं वाढणार नाहीत तर कमी होतील. केवळ शिवसेनेला आणि महाआघाडीला शिव्या दिल्या की भाजपची मतं वाढतील, हा तुमचा गैरसमज आहे. तो दूर करण्यासाठीच तुमची डोकी तपासण्यासाठी मोदींनी मला इथे पाठवलं आहे. आठवले साहेब, तुम्हालाही नवनीतजींना भेटल्याशिवाय राहवलं नाही. तुम्ही त्यांना समजावलंत की पाठिंबा दिलात?
रामदास आठवले : मी त्यांना ऐकवायला गेलो होतो त्यांच्यावर केलेली चारोळी, पण त्या चारोळीचा झाला अॅटमबॉम्ब, तो पाहून त्या पळाल्या लांब लांब.
डॉ. गडकरी : हे म्हणजे फारच झालं.
रामदास आठवले : हे म्हणजेच फार झालं, डोकं गारेगार झालं, असंबद्ध बडबड करूनसुद्धा भाषण मसालेदार झालं.
डॉ. गडकरी : तुम्ही या प्रवीण दरेकरजी. तुमच्याकडेसुद्धा एक काम होतं.
दरेकर : मुंबई बँकेत फिक्स डिपॉझिट ठेवायचंय का?
डॉ. गडकरी : एवढे पैसे नाहीत बाबा सध्या माझ्याकडे. नोटबंदीतही नव्हते. मला सांगा, तुम्ही यापूर्वी शाळेत असताना वत्तृâत्वस्पर्धेत किती बक्षीसं मिळवली होती?
दरेकर : एकही नाही.
डॉ. गडकरी : मग कॉलेजात?
दरेकर : प्रश्नच नाही.
डॉ. गडकरी : मग आता तुम्हाला फडणवीसांस्ाारखा नॉनस्टॉप कंठ फुटला कसा? शिवसेना आणि महाआघाडीविरुद्ध बोलताना बाकी कसलंही तारतम्य न बाळगता, खरं खोटं न पाहाता सरळ तोंडाचा पट्टा चालवता तुम्ही चॅनलवर. लोक मूर्ख नसतात प्रवीणजी. गेले पंधरा दिवस या राणा दाम्पत्याने काय तमाशा चालवलाय या महाराष्ट्रात जनता त्यांच्याबद्दल काय बोलते ते घराघरात जाऊन ऐका प्रवीणजी. अशाने पक्षाची बेअब्रू होते. त्या शेलारांना सांगण्यात अर्थच नाही. स्वयंभू शहाणे म्हणतात त्यांना पक्षात. मी शेवटचं सांगतो, पक्षावरील जनतेचा विश्वास वाढायचा असेल तर डोकं जागेवर ठेवून बोला. नाहीतर राम मंदिर बांधण्याआधी पक्षफंडातून मनोरुग्णालय बांधण्याची वेळ येईल. या आता. सोमय्या, नाचत जाऊ नका.