`लोकांना खवळून सोडायचे असले, संतप्त करायचे असले, तरी स्वतः वक्त्याने आपल्या मनोविकारांना दाबात ठेवून, शांतपणानेच बोलत रहावे. लोकांच्या मनोविकारांना भडकविण्याची कामगिरी गोळीबाराच्या वेळी बंदुकांच्या फैरी झडतात त्याप्रमाणे आपल्या मुद्देसूद शब्दयोजनेच्या ठोसदार नि पल्लेदार फेकांवरच सोपवावी.’
– – –
आजही वक्त्यांना वक्तृत्वशास्त्र या विषयावर मार्गदर्शन करणारं पुस्तक शोधायला गेल्यास फारसं काही हाती लागत नाही. अशावेळेस प्रबोधनकार १९१८ साली वक्तृत्वशास्त्र या विषयाचा सांगोपांग आढावा घेणारं ३१० पानांचं पुस्तक लिहितात, हे आश्चर्य वाटण्याजोगंच आहे. अनेक वर्षं सामाजिक विषयांवर लिहिण्याचा अनुभव असूनही त्यांनी त्यांना आवडणार्या विषयावरच लिहायचं ठरवलं. प्रसारमाध्यमं आजच्यासारखी विकसित झालेली नसताना वक्तृत्व हेच तेव्हा आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्याचं सर्वात महत्त्वाचं माध्यम होतं. पण भारतात हे माध्यम नव्यानेच लोकांमध्ये रूजत होतं. त्याच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्याची गरज होती. ती गरज वक्तृत्वशास्त्र या ग्रंथाने भागवली होती.
वासुकाका जोशींनी चित्रशाळेच्या दर्जाला साजेशी निर्मिती करत अवघ्या सहा महिन्यांत पुस्तक बाजारात आणलं. चित्रशाळेचे गाजलेले चित्रकार जुवेकर यांनी स्वामी विवेकानंदांचं भाषण करतानाचा चित्र कव्हरसाठी वापरलं होतं. वक्तृत्वाच्या जोरावर जगभर प्रभाव पाडणारे विवेकानंद तेव्हा प्रत्येक वक्त्यासाठी आदर्शच होते. जातव्यवस्थेने धर्मप्रचाराचा अधिकार नाकारलेल्या कायस्थ समाजात जन्मूनही जगालाच नाही तर भारतालाही हिंदू धर्म शिकवणार्या विवेकानंदांचा प्रभाव प्रबोधनकारांवर होताच. त्यांच्या लिखाणातून तो अनेकदा दिसून येतो. `उत्तिष्ठित जाग्रत प्राप्य वरान्निबोधत` हे विवेकानंदांनी रूढ केलेलं उपनिषदांमधलं सूत्र `प्रबोधन`चं ब्रीदवाक्य होतं. प्रबोधनच्या पहिल्या अग्रलेखांचा मथळाही हे ब्रीदवाक्यच होतं.
या ग्रंथाचे दोन भाग होते. पहिल्या खंडात १३ प्रकरणं होती. तर दुसर्या खंडात ८ प्रकरणं होती. हे सविस्तर पुस्तक अनेक वर्षं दुर्मिळ होतं. त्यामुळे ते नव्याने प्रकाशित करण्याचं प्रबोधनकारांनी ठरवलं. पण मध्ये ५२ वर्षांचा अवधी गेला होता. या काळात प्रबोधनकारांनी वक्तृत्वाच्या जोरावर अनेक चळवळी गाजवल्या होत्या. महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलालाही वळण लावण्यात हातभार लावला होता. त्या नव्या अनुभवाच्या आधारावर बदललेल्या काळाला साजेसं नवं वक्तृत्वशास्त्र त्यांनी मांडलं. त्यामुळे १९७० साली लिहिलेलं `वक्तृत्व कला आणि साधना` हे त्यांचं एक नवंच पुस्तक आकाराला आलं.
नव्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत ते लिहितात, `प्रस्तुतचे वक्तृत्व कला आणि साधना ही वक्तृत्वशास्त्राची ५२ वर्षांनंतर निघणारी दुसरी आवृत्ती म्हणण्यापेक्षा वक्तृत्व विषयाच्या सांगोपांग चर्चेसाठी देशकालवर्तमानानुसार अगदी नव्यानेच केलेला दुसरा प्रयत्न, असे म्हणणे वाजवी ठरेल. वक्तृत्वाच्या क्षेत्रांत मायक्रोफोन नि रेडियो यंत्राचा प्रवेश झाल्यामुळे तर वक्तृत्वविषयक जुन्या नियमांत आरपार बदल झाला. प्रस्तुतच्या पुस्तकात वक्तृत्वाची शैली कमावतांनाच, शीलसंवर्धनाच्या आणि भाषाशैलीच्या केलेल्या अनेक सूचना उदयोन्मुख तरुण पिढीला मार्गदर्शक ठरतील असा मला विश्वास वाटतो. या पुस्तकाची रचना करताना माझा ६० वर्षांचा `वक्ता` या नात्याचा अनुभव नि तपश्चर्या मी ओतली आहे.`
आपल्या आवडीच्या विषयावरच्या पुस्तकाची पूर्णपणे नवी आवृत्ती ५२ वर्षांनी प्रकाशित होण्याचं समाधान प्रबोधनकारांनी या प्रस्तावनेत व्यक्त केलंय. त्याशिवाय तीन ऋणानुबंधही सांगितलेत. या पुस्तकाचा अखेरचा भाग पूर्ण करत असताना प्रबोधनकारांची दृष्टी अचानक मंदावली आणि नंतर तर पूर्णपणे अंधपणाच आला. अशा वेळेस पुस्तकाची मुद्रणं तपासण्याचं काम ज्येष्ठ संपादक पंढरीनाथ सावंत यांनी केल्याचं त्यांनी नोंदवलंय, `अशा बिकट अडचणीच्या प्रसंगी माझे शिष्य श्री. पंढरीनाथ सावंत यांनी ते काम नेकीने सफाईदार पार पाडले.` पुढे दीर्घकाळ साप्ताहिक मार्मिकचे कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी पार पाडणारे पंढरीनाथ सावंत यांच्याशिवाय इतर कुणाचाच उल्लेख प्रबोधनकारांनी कधी शिष्य म्हणून केला नाही. तो मोठाच गौरव आहे.
शिवाय एका वर्षाच्या आंधळेपणातून सुटका करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. श्रीधर विठ्ठल ओक यांच्याविषयीही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केलीय. प्रबोधनकारांची गेलेली दृष्टी परत आणण्याचा चमत्कार त्यांनी तीनदा केला होता. तिसरा ऋणानुबंध आहे तो निर्णयसागर प्रेसशी. निर्णयसागरचे संस्थापक जावजी दादाजी चौधरी यांच्या घराण्याशी असलेल्या जुन्या संबंधांचा संदर्भ इथे होता. त्यांच्याशी संबंधित रामचंद्र येसू शेडगे आणि मॅनेजर पांडुरंग मोरे यांचा उल्लेख अनुक्रमणिकेत आहे.
एकूण चौदा प्रकरणात प्रबोधनकारांनी वक्तृत्वाचे धडे दिले आहेत. सुरुवातीला वक्तृत्व हे शास्त्र आहे की कला, याची चर्चा करताना कुणालाही वक्तृत्व शिकता येऊ शकतं, यावर उदाहरणं देऊन भर दिला आहे. त्यात ते वक्तृत्वाचं महत्व सांगतात, `वक्तृत्वाचा जागतिक इतिहास पाहिला तर ज्या ज्या राष्ट्रांत लोकशाही प्रस्थापित झाली, तेथे तेथे वक्तृत्वाला खरा जोमदार बहर आला. लोकशाहीतच वक्तृत्वकलेचा उत्कृष्ट उत्कर्ष होत असतो… कलेचे शास्त्र म्हणून या पुस्तकाचा महत्वाकांक्षी उमेदवारांना पूर्वी (सन १९१८) पुष्कळ उपयोग झाला आणि चालू लोकशाही जमान्यात तर होईलच होईल, असा मला आत्मविश्वास वाटतो.`
दुसरं प्रकरण आवाजाचे आरोग्य आणि महत्व असं आहे. त्यात वक्त्याने आवाजासाठी गवयासारखा रियाज करण्याचा सल्ला दिलाय. आवाज नरड्यातून काढू नये तर तो पट्टीच्या गायकासारखा बेंबीतून यायला हवा, असं ते सांगतात. तिसरं प्रकरण आरोह अवरोहांचा विचार करणारं आहे. कोणत्या भावना व्यक्त करण्यासाठी कशा प्रकारे आवाज वर खाली न्यावा, याची माहिती अभ्यासासाठीच्या उतार्यांसह दिली आहे.
त्यापुढचं चौथं प्रकरण विराम म्हणजे पॉझ या दुर्लक्षित गोष्टीवरचं आहे. मुळातून वाचावं असं हे प्रकरण आहे. त्याच्या सुरवातीलाच १९१८च्या `वक्तृत्वशास्त्र` पुस्तकावरच्या बॅ. मुकुंदराव जयकरांच्या अभिप्रायातला एक भाग दिला आहे, तो असा, `आपल्या पुस्तकात ज्या अनेक उपयुक्त सूचना देण्यात आल्या आहेत. त्यापैकी माझ्या अनुभवाने तीन सूचना मला फारच आवडल्या. पहिली, भाषणांच्या तडाखेबंद गतीविषयी विद्यार्थ्यांना केलेली धोक्याची सूचना. दुसरी, सोप्या नि सरळ भाषाशैलीची आवश्यकता आणि तिसरी, बीचरच्या उद्धृत केलेल्या उक्तीतील सनातन सत्य– धैर्य हाच वक्तृत्वाचा मूळ पाया. हिंदुस्थानात या एकाच सद्गुणाची पूर्वीपेक्षा आज फार मोठी जरुरी आहे.`
शब्दांवरचे आघात म्हणजे एम्फसिस या विषयावरचं प्रकरणही असंच उपयुक्त आहे. त्यात शास्त्रीय नियम सांगतानाही वेगळंच मर्म सांगतात, `लिहिण्यात काय अथवा बोलण्यात काय, हृदयाची प्रामाणिक तळमळ, व्यासंगाचा नि व्यवहारी अनुभवांचा आत्मविश्वास, हे बिनमोल वक्तृत्वाचे भांडवल आहे.` वाचन या सहाव्या प्रकरणात ग्रंथांचं अभिवाचन, धार्मिक ग्रंथांचं वाचन, कवितांचं वाचन शिवाय निवेदने वाचण्याची पद्धत याची चर्चा केली आहे. शिवाय कोणती पुस्तकं वाचायला हवीत. वक्तृत्वासाठी पाठांतराची गरज असल्याचं आग्रही मत ते सातव्या प्रकरणात व्यक्त करतात. त्यात पुस्तकांची निवड या विषयावर ते लिहितात, `मित्रांची निवड करताना जितकी दक्षता ठेवावी लागते, तितकीच किंबहुना विशेष दक्षता ग्रंथनिवडीच्या कामी राखली पाहिजे. ग्रंथ आपले जीवस्य कंठस्य मित्र आहेत. आपल्या लहरीप्रमाणे केव्हाही त्यांना हाती धरता येते किंवा स्वस्थ बसा म्हणून सांगितले तरी त्यांना राग येत नाही. पुन्हा उचललेल तरी सेवेत रेसभर अंतर पडायचे नाही.`
शस्त्रास्त्रांच्या खणाखणीपेक्षाही शब्दांचे सामर्थ्य प्रचंड असते, असं सांगणारं शब्दांचे सामर्थ्य हे प्रकरण महत्त्वाचंच आहे. पण त्यापुढचं बालबोध शब्दयोजना हे प्रकरण एकूणच भाषाव्यवहारावर प्रबोधनकारांचे विचार सांगतं. त्यांचा आग्रह साधेपणा आणि सोपेपणा यावर आहे. विद्वत्ताप्रचुर शब्दांना ते नाकारतात. संस्कृतविरोधी वारकरी संतांनी केलेल्या बंडाचं कौतुक करतात. सावरकरांच्या भाषाशुद्धीला विरोध करतात, `साध्यासुध्या मर्हाठी लोकभाषेची शुद्धी करण्याच्या दिमाखाने तिच्यावर संस्कृतचा जो आततायी बलात्कार होत आहे, त्यामुळे एकनाथ नामदेवांच्या, तुकाराम रामदासांच्या सोज्वळ मराठीला भिकारडे धेडगुजरी रूप येत चालले आहे.` सोप्या भाषेसाठी ते संत तुकाराम आणि विनोबा भावे यांचं उदाहरण देतात. तर साध्या भाषेत वक्तृत्वासाठी लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि साने गुरुजी यांचा आदर्श सांगितला आहे.
संभाषण चातुर्याच्या दहाव्या प्रकरणात त्यांनी गांधीजींच्या खासगी बैठकीतल्या संभाषणांची फारच स्तुती केलेली दिसते. ते लिहितात, `जो कोणी एकदा त्यांच्या जवळ गेला आणि संभाषणाच्या मोहिनीत सापडला, त्याला ते आपणासारिखे तात्काळ करीत असत. आगाऊ खूप तयारी करून विरोधाला गेलेले अनेक पाश्चात्य विरोधक त्यांचे भक्त होऊनच परतलेले आहेत.` यात त्यांनी गोष्टी सांगण्याच्या कौशल्याचीही चर्चा केली आहे.
मनोविकास आणि आत्मविश्वास ही पुढची दोन प्रकरणं फारच महत्त्वाची आहेत. त्यात वत्तäयासाठी कोणते गुण आवश्यक आहेत, हे सविस्तर लिहिलं आहे. त्यात आत्मविश्वास, इच्छाशक्ती, एकाग्रता, स्मरणशक्ती याबरोबर शील संवर्धन आणि आस्था-कळकळ या गोष्टींचा सर्वाधिक आग्रह आहे. ते लिहितात, `कळकळीच्या वत्तäयाला वक्तृत्वाचे धडे घ्यावे लागत नाहीत. त्याच्या हावभावांत, शब्दाशब्दांत आणि स्वरोच्चारात तिचे प्रतिबिंब पडते.` तेरावं अभिनयाचं प्रकरण अगदी प्रॅक्टिकल सूचना करतं. वक्तृत्वात विविध भावना व्यक्त करताना कोणते अवयव कशाप्रकारे वापरावेत, हे सविस्तर सांगितलंय. व्याख्यानाची तयारी कशी करायची इथपासून टाचणवहीची गरज काय, असेही विषय यात आहेत.
शेवटचं चौदावं प्रकरण या सगळ्यावर कळस करतं. प्रकरणाचं शीर्षकच आहे, मैदान मारून सभेचा फड जिंकावा लागतो. भाषणाला जाताना सभेचं ठिकाण, श्रोते यांची माहिती मिळवण्याची गरज, कोणते कार्यक्रम टाळायला हवेत, व्याख्यानाचे टप्पे या विषयांवर मार्गदर्शन केलं आहे. पण त्यात वक्तृत्वाच्या ठाकरी शैलीचं सारही येतं. ते असं, `लोकांना खवळून सोडायचे असले, संतप्त करायचे असले, तरी स्वतः वक्त्याने आपल्या मनोविकारांना दाबात ठेवून, शांतपणानेच बोलत रहावे. लोकांच्या मनोविकारांना भडकविण्याची कामगिरी गोळीबाराच्या वेळी बंदुकांच्या फैरी झडतात त्याप्रमाणे आपल्या मुद्देसूद शब्दयोजनेच्या ठोसदार नि पल्लेदार फेकांवरच सोपवावी. वक्ता पाहावा तर शांत वृत्तीने, आवाजाचा ताण किंवा कढ किंचितही न वाढवता बोलतो आहे आणि तिकडे लोक मात्र विलक्षण भावनांनी खवळले आहेत, असा देखावा जो निर्माण करील, त्यानेच त्या सभेत मैदान मारून फड जिंकला असे समजावे. लोकहिताची सहृदयी तळमळ ज्याला असते, असेच वक्ते हा चमत्कार घडवू शकतात.`