‘परवा हा रमण आपल्या पिटरच्या बारवर गेला. मोठे गिर्हाईक बघून स्वत: ज्युली सर्व्हिस द्यायला पुढे झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा करता ह्या तरुणाने थेट तुमचे नाव घेतले. ज्युलीने डोके चावले आणि पिटरला पुढे केले. काही माहिती मिळते का ते बघायला पिटर स्वत: त्याच्याशी गप्पा मारायला लागला. बघता बघता त्याने पिटरला बोलण्यात असे काही गुंतवले की बस. मात्र बोलण्यात शास्त्रीचे नाव आले आणि पिटर सावध झाला.’
– – –
जगतपालसारख्या जबरदस्त असामीवर दोन हल्ले झाले आणि गुन्हेगारी विश्व थरारून गेले. जगतपाल म्हणजे काही साधासुधा माणूस नव्हता. आज मुंबईच्या वर्सोव्यापासून ते पोरबंदरच्या सागरी किनार्यापर्यंत त्याचा वचक आणि दहशत राज्य करत होती. पोलिसांपासून मंत्र्यांपर्यंत कायदा व्यवस्था त्याच्या मुठीत होती आणि रस्त्याच्या कडेला बूट पॉलिश करणार्यापासून ते एखाद्या कंपनीच्या सीईओपर्यंतचे लोक त्याच्यासाठी कुठले ना कुठले काम करत होते. मग ते पाळत ठेवण्याचे असो किंवा ड्रग्ज, सोने, गन्स अशा वस्तू इकडून तिकडे सप्लाय करण्याचे असो. इतकी जबरदस्त यंत्रणा ज्याच्यासाठी काम करत होती, त्या जगतपालवर दोन वेळा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. कोणी म्हणत होते की, हे पोलिसांनीच गुन्हेगारी विश्वाला दणका देण्यासाठी उचललेले पाऊल आहे, तर कोणाला ही जगतपालच्या शत्रूची चाल वाटत होती. पण जगतपालच्या मनात आणि मेंदूत नक्की काय चालले होते त्याचा अंदाज कोणालाच नव्हता; अगदी त्याच्या मुलाला, विक्रमला देखील.
‘पप्पा, हे नक्की चाललंय काय? एक सोडून दोन वेळा तुमच्यावर हल्ले झाले आणि आपण साधे याच्यामागे कोण आहे, ते देखील शोधून काढू शकलेलो नाही. अशामुळे धंद्यातल्या लोकांना वेगळा संदेश जातो..’ विक्रम तावातावाने बोलत होता.
‘नवीन रक्त कायम उसळ्या मारत असते विकी बेटा. ‘थंडा कर के खाओ,’ हे कायम लक्षात ठेव!’
‘किती दिवस वाट बघायची अजून? मला खात्री आहे हा आपल्यातलाच कोणीतरी नमक हराम आहे, जो शत्रूला मिळालाय.’
‘कशावरून?’
‘म्हणजे? तुमच्या यायच्या जायच्या वेळा, तुम्ही घरातून कधी, कुठे जाण्यासाठी बाहेर पडणार आहात याची एवढी अचूक माहिती समोरच्या माणसाला मिळेल कशी?’
‘वाह! आम्हाला माहिती नव्हते या एवढ्या रागीट डोक्याला येवढा शांत आणि महत्त्वाचा विचार देखील करता येतो ते…’ हसत हसत जगतपाल म्हणाला आणि विक्रम जास्त वैतागला.
‘आय अॅम सीरियस पप्पा! मी पण माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. आपल्या वर्तुळात एखादी गोष्ट फारशी कधीच लपत नाही. दबक्या आवाजात अशी चर्चा आहे की, शास्त्रीचा मुलगा हिंदुस्तानात परत आलाय..’ विक्रमचे वाक्य संपले आणि जगतपाल ताडकन उभा राहिला. त्याच्या डोळ्यासमोर दोन महिन्यांपूर्वीचा प्रसंग उभा राहिला. आता तो जिथे उभा होता तिथेच त्या दिवशी देखील तो उभा होता; मात्र विकीच्या जागी तेव्हा शास्त्री उभे होते. गेली सतरा वर्षे शास्त्री जगतपालचा हिशेब सांभाळत होते. कधी इकडचा पैसा तिकडे झाला नव्हता. शास्त्रींना होती तेवढी स्वत:च्या कमाईची माहिती खुद्द जगतपालला देखील नव्हती. इतका विश्वासाचा माणूस. पण आज तोच गुन्हेगार म्हणून जगतपाल समोर उभा होता. थोडा थोडका नाही, तर तब्बल सात कोटी रुपयांचा अपहार झाला होता. समोरचे सगळे पुरावे स्पष्टपणे शास्त्रींकडे बोट दाखवत होते. शास्त्री मात्र ’हा गुन्हा मी केला नाही’ एवढेच म्हणत होते.
सतरा वर्षाची प्रामाणिक चाकरी समोर दिसत असताना शास्त्रींना गुन्हेगार मानणे जगतपालच्या मनाला देखील पटत नव्हते. पण शास्त्रींना असेच सोडले असते, तर संघटनेतील माणसांनी त्याचा वेगळा अर्थ काढला असता. शेवटी जगतपालने कठोर निर्णय घेतला आणि शास्त्रींना गुन्हा कबूल करून पैसे परत करण्यासाठी २४ तासांची मुदत देण्यात आली. अन्यथा शास्त्रींची अवस्था तीच होणार होती, जी याआधी प्रत्येक गद्दाराची केली गेली होती. शास्त्री गद्दारीच्या शिक्षेला घाबरले का, ते प्रामाणिक असल्याने हा अपमान सहन करू शकले नाहीत माहिती नाही; पण त्याच रात्री शास्त्रींनी आधी बायकोला गोळी घातली आणि नंतर स्वत: गोळी मारून घेऊन आत्महत्या केली. शास्त्रींनी आत्महत्या केली नाही, तर विक्रम आणि त्याच्या माणसांनी त्यांना गद्दारीची शिक्षा दिली अशी कुजबूज जगतपालच्या कानावर आली; मात्र विक्रमने या सगळ्याचा ठाम इन्कार केला होता.
शास्त्रींचा मुलगा शिकायला जर्मनीत होता. अर्थात ही संधी देखील त्याने स्वत:च्या मेहनतीवर मिळवली होती. मोठ्या कौतुकाने त्याला शैक्षणिक कर्ज घेऊन शास्त्रींनी जर्मनीला रवाना केले होते. विक्रम सांगतो ते खरे असेल तर तो सूडाने पेटलेला असणार हे नक्की. पण आपली एवढी अचूक माहिती त्याला कळवतंय तरी कोण?
‘साहेब पॉल आलाय..’ जगतपालच्या कानाशी लागून त्याच्या माणसाने निरोप दिला.
जगतपालने मान डोलावली आणि सोनेरी केसांचा, धिप्पाड, गोरापान पॉल समोर उभा ठाकला.
‘बोल पॉल…’
‘विक्रम साहेबांनी एक कामगिरी सोपवली होती. त्याचीच माहिती घेऊन आलो आहे..’
‘पटकन बोल पॉल..’ उत्साहाने विक्रम बोलला.
‘विकी साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी शास्त्रीच्या मुलाची माहिती काढली. हा शास्त्रीच्या मुलाचा फोटो. शास्त्री मेल्यावर हा परत आला होता, पण चौथ्याच दिवशी तो जर्मनीला परत गेला. ही त्याच्या पासपोर्टची झेरॉक्स आणि हे त्याचे सध्याचे जर्मनीतले फोटो. तो आजही जर्मनीतच आहे. मी आपल्या जर्मनीतल्या कॉन्टॅक्टशी बोलून खात्री केली आहे. हा अर्ध्या तासापूर्वी त्याने मला पाठवलेला शास्त्रीच्या मुलाचा लाईव्ह व्हिडिओ…’
विक्रम आणि जगतपाल दोघेही गंभीरपणे माहिती ऐकत ते फोटो न्याहाळत होते.
पॉलची माहिती योग्य असेल तर शास्त्री हा अँगलच बाद होत होता. पॉलने आजवर काढलेली कोणतीही माहिती कधी खोटी ठरलेली नव्हती. मग या मुंबईत कोणाची ताकद इतकी वाढली आहे की जगतपालच्या समोर त्याने शड्डू ठोकावा?
—
‘विक्रम साहेब, एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे..’
‘बोल…’
‘फोनवर नको.. मी बंगल्यावर येतो आहे!’
काही वेळातच पॉलची स्वारी पुन्हा एकदा बंगल्यावर हजर झाली.
‘विक्रम साहेब, गेल्या आठवड्यात तुम्ही मला शास्त्रीच्या पोराची माहिती काढायला सांगितली होती.’
‘त्याचे काय आता?’
‘साहेब, माझ्या माणसांनी बातमी आणली आहे की, अजून सुद्धा कोणी ह्या शास्त्रीच्या पोराच्या मागे आहे.’
‘म्हणजे?’
‘एक तरुण आहे, स्वत:चे नाव ‘रमण’ सांगतोय. तो गेले काही दिवस शास्त्रीच्या मुलाची माहिती मिळवायच्या प्रयत्नात आहे. शास्त्रीला कोणी नातेवाईक कधी नव्हतेच. त्यामुळे शास्त्रींच्या परिचयातील, आपल्या व्यवसायातील कोणाला त्यांच्या मुलाची काही माहिती आहे का, याची हा तरूण मोठ्या हुशारीने चौकशी करतो आहे.’
‘कोण आहे हा तरूण?’
‘मी त्याची माहिती काढायला माणसे कामाला लावली आहेत, पण तरूण आपल्या शहरातला नाही हे नक्की. बोलण्या-वागण्यात मोठा हुशार दिसतो. पीटर होता म्हणून टिकला, नाहीतर दुसरा एखादा पोटातली सगळी माहिती ओकून बसला असता.’
‘काय झाले काय नक्की?’
‘परवा हा रमण आपल्या पीटरच्या बारवर गेला. मोठे गिर्हाईक बघून स्वत: ज्युली सर्व्हिस द्यायला पुढे झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा करता या तरुणाने थेट तुमचे नाव घेतले. ज्युलीने डोके चालवले आणि पीटरला पुढे केले. काही माहिती मिळते का ते बघायला पीटर स्वत: त्याच्याशी गप्पा मारायला लागला. बघता बघता त्याने पीटरला बोलण्यात असे काही गुंतवले की बस. मात्र बोलण्यात शास्त्रीचे नाव आले आणि पीटर सावध झाला.’
‘कोणत्या संदर्भात त्याने नाव घेतले होते?’
‘तो म्हणत होता की विक्रमसाहेबांच्या कोणा माणसाने शास्त्रींच्या मुलाच्या शैक्षणिक कर्जासाठी त्याची मदत मागितली होती.’
‘काय फालतूपणा आहे?’
‘साहेब, या माणसाचा त्या सात कोटी रुपयांशी काही संबंध तर नसेल?’ पॉलने अंदाज वर्तवला आणि विक्रम सावध झाला.
—
अचानक समोरच्या खुर्चीत येऊन बसलेल्या त्या फाटक्या माणसाकडे रमणणे तुच्छतेने पाहिले आणि त्याला नजरेनेच ’काय’ असे विचारले.
‘तुला शास्त्रीच्या पोराला भेटायचे आहे ना?’ हातभट्टीचा ऊग्र भपकारा सोडत तो हलक्या आवाजात पुटपुटला आणि रमणच्या चेहर्यावर एकदम सावधगिरी पसरली. तो फाटका माणूस गडबडीने उठला आणि पटकन बाहेर पडला. रमणने पाचशेची नोट टेबलावर फेकली आणि तो देखील त्या माणसाच्या मागे धावला. तरातरा चाललेल्या त्या फाटक्या माणसाला गाठायचा रमण प्रयत्न करत असतानाच तो माणूस अचानक डाव्या हाताला वळला आणि अंधार्या भागाकडे निघाला. मनाचा हिय्या करत रमण देखील त्याच्या मागे निघाला. काही अंतरावर एक पिवळा बल्ब चमकत होता. जवळ जाताच तो एक हातभट्टीचा अड्डा असल्याचे लगेच लक्षात येत होते. अचानक तो माणूस मागे वळला आणि त्याने अत्यंत लाचारीने रमणच्या चेहर्याकडे पाहिले. रमणने त्याच्या हातावर पन्नासची नोट टेकवताच तो समोरच्या गर्दीत नाहीसा झाला. त्याचवेळी रमणच्या खांद्यावर एक मजबूत हात पडला आणि रमण दचकला.
—
समोर बसलेल्या तरुणाचे रमण बारकाईने निरीक्षण करत होता; तर समोरचा तरूण रमणच्या त्याच्यावरून फिरणार्या हिशेबी आणि व्यापारी नजरेला जोखण्याचा प्रयत्न करत होता. काही वेळ हे द्वंद चालले आणि रमणने एकदम हसून हात पुढे केला.
‘मी रमण गुंदेचा..’
‘मी शरद शास्त्री.. शास्त्रींचा मुलगा.’
रमण काही क्षण आश्चर्याने त्याचे निरीक्षण करत राहिला, ‘पण तू तर जर्मनीत असतोस ना?’
‘हो पण आणि नाही पण…’
‘म्हणजे?’
‘इथले मोजके लोक, जे माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळचे आहेत, ते सोडले तर सर्वांना मी जर्मनीत आहे ह्याची खात्री मी पटवून दिली आहे.’
‘ओह! पण असे का?’
‘त्याच्याशी तुमचा संबंध नाही मिस्टर रमण! तुम्ही माझा शोध का घेत आहात?’
‘माफ कर दोस्ता, पण तूच खरा शास्त्रींचा मुलगा आहेस, ही खात्री पटल्याशिवाय मी तुला काही माहिती देऊ शकत नाही!’
शरदने काही क्षण विचार केला आणि खिशातला पासपोर्ट आणि जर्मनीच्या
कॉलेजचे आयडी कार्ड त्याच्यासमोर टाकले. रमणने अत्यंत बारकाईने ते तपासून घेतले आणि मग अत्यंत विश्वासाने तो हसला.
‘शरद, तुझ्या वडिलांनी मृत्यूच्या दोन चार दिवस आधी कधी तुझ्याशी संपर्क साधला होता? त्यावेळी त्यांनी एखादा नंबर, अक्षरे अशी काही तुला सांगितली होती? लक्षात ठेवायला, सांभाळून ठेवायला सांगितली होती?’ रमणच्या प्रश्नाने शरदचा चेहरा एकदम गडबडला आणि रमण एकदम खूश दिसायला लागला.
‘तुम्हाला हे सगळे कसे माहिती?’ भांबावून शरदने विचारले.
रमणने एकदा आजूबाजूला दृष्टी टाकली आणि आपली खुर्ची शरदच्या अजून जवळ सरकवली.
‘माफ कर शरद, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर असे बोलू नये, पण तुझे वडील अत्यंत हुशार असे अफरातफर सम्राट होते.’
‘रमण…’ रागाने थरथरत शरद एकदम उभा राहिला. त्याच्या मुठी वळल्या होत्या आणि डोळे लाल झाले होते.
‘माझे बोलणे पुर्ण ऐकून घे शरद. मग तू तुझा निर्णय घ्यायला मोकळा आहेस. मी जे काही सांगणार आहे, त्यातल्या शब्दाशब्दाचे पुरावे माझ्याकडे आहेत!’
शरद पायातले त्राण गेल्यासारखे खुर्चीत कोसळला आणि रमणने पाण्याचा ग्लास त्याच्यासमोर धरला.
‘शरद, तुझे वडील अनेक वर्षे जगतपालसारख्या माणसाकडे हिशेब सांभाळत होते. सतरा वर्षं नोकरी सांभाळल्यावर अचानक एक दिवस ते पकडले गेले. कुठे काय चूक झाली माहिती नाही, पण ते सापडले. अर्थात सगळ्यांना वाटते, तशी ती त्यांची पहिली अफरातफर नव्हती. जगतपालचा पूर्ण विश्वास मिळवल्यावर गेली बरीच वर्षे ते छोट्या मोठ्या रकमांवर हात मारत होते. असे करता करता त्यांनी जवळपास पन्नास साठ कोटीची माया जमा केली होती. मात्र त्यांच्याकडून आता पहिल्यासारखे काम होत नव्हते, तू देखील सेटल होत होतास. अशावेळी एकच मोठा हात मारावा आणि निवृत्त व्हावे असे त्यांनी ठरवले. गुजरातमध्ये पोरबंदरला आलेले असताना एकदा त्यांची माझ्याशी ओळख झाली. आमचे ऋणानुबंध, कसे काय माहिती पण, इतके घट्ट जुळले की त्यांनी जमवलेली सगळी माया विश्वासाने माझ्या हवाली केली. तिची योग्य ती ’विल्हेवाट’ देखील मी लावली आहे. त्यांचा विश्वास बसावा यासाठी त्या रकमेत मी माझ्याकडचे पंचवीस कोटी देखील जमा केले. आता झालंय असं की अचानक ’तो’ प्रसंग घडला आणि शास्त्रींनी जग सोडले. ज्या ’मलेशियन’ बँकेत हे पैसे आहेत, त्याचा अर्धा पासवर्ड माझ्याकडे आहे आणि अर्धा शास्त्रींकडे. माझा अर्धा पासवर्ड त्यांना आणि त्यांचा अर्धा पासवर्ड मला माहिती नव्हता…’ रमणची कथा ऐकता शरदच्या चेहर्यावरचे भाव भराभर बदलत होते.
‘ओह! आणि यासाठी जिवावर उदार होऊन तुम्ही मला शोधत आहात..’ शरद कुत्सितपणे बोलला.
‘शरदशेठ, पैसा हा पैसा असतो… आणि तो इतका मोठा असेल तर त्यासाठी जीव धोक्यात घालण्यात हरकत काय?’
‘आणि मी तुम्हाला पासवर्ड देण्यास नकार दिला तर? किंवा इथेच तुम्हाला जिवाची भीती घालून तुमचा पासवर्ड काढून घेतला तर?’
‘शास्त्रींचा मुलगा इतका मूर्ख असेल असे वाटले नव्हते मला…’ आता कुत्सित हसत रमण म्हणाला आणि शरद बावरला. रमण इतक्या उघडपणे वावरतोय म्हणजे त्याच्या हातात काहीतरी पत्ते होते हे नक्की.
‘पण मी तुझ्यावर विश्वास का ठेवायचा रमण?’ शरद आता सरळ एकेरीवर आला.
‘तुझी इच्छा.. शास्त्रींचा विश्वास मला तोडायचा नव्हता, अन्यथा शास्त्रींचे ’डेथ सर्टिफिकेट’ बँकेला देऊन मला पासवर्ड बदलून घेता आला असता. पण त्यात माझ्या जिवाला धोका होता, कारण मी सरळ सरळ जगतपालच्या नजेरत आलो असतो. पण हरकत नाही, तुझे विचार असे असतील, तर मला जसा तुझ्यापर्यंत पोचायला वेळ लागला नाही, तसा विक्रमपर्यंत पोचायलाही लागणार नाही!’ रमण ताडकन उठला आणि शरद खदखदा हसायला लागला. रमण ’काय वेड लागले काय ह्याला?’ अशा नजरेने त्याच्याकडे पाहायला लागला.
‘तू विक्रमपर्यंत पोहोचला आहेस रमण!’ शांतपणे शरद म्हणाला.
‘म्हणजे?’
‘मी शास्त्रींचा मुलगा शरद नाहीये रमण. तो खरंच तिकडे जर्मनीत आहे. मी विक्रम.. जगतपालचा मुलगा..’ बोलता बोलता विक्रमने खिशातली बंदूक काढली आणि टेबलावर ठेवली.
‘मला फक्त माझ्या पैशात रस आहे विक्रम.’
‘नक्की नक्की! पण बाकीचा पैसा माझा आहे आणि तो मला हवा आहे.’
‘आणि शरद? वारसदार म्हणून खात्याला त्याचे देखील नाव आहे.’
‘पण आता तर तू म्हणालास की शास्त्रीचे फक्त डेथ सर्टिफिकेट देऊन..’
‘ते मी शरदला जाळ्यात अडकवण्यासाठी सांगत होतो. कारण या खात्याबद्दल त्याला काही माहिती नाही. मला काही करून फक्त तो पासवर्ड हवा होता.’
‘शरद देखील त्याच्या बापापाशी गेला तर?’
‘म्हणजे विक्रम?’
‘ज्याने मला अंगाखांद्यावर खेळवले, त्या शास्त्रीला मी सात कोटीसाठी बायकोसकट ढगात पाठवले. पन्नास कोटीसाठी मुलाला नाही पाठवू शकत?’
‘मला समजले नाही…’
‘रमण, हा विक्रम किती नीच आहे त्याची तुला कल्पना नाही. ज्या सात कोटीचा आरोप शास्त्रीवर लागला, ते मी लांबवले होते. शास्त्रीला ते समजले होते, पण मी त्याच्या पायावर लोळण घेतली आणि जिवाची भीक मागितली. म्हातार्याने मला लहानपणी अंगाखांद्यावर खेळवले होते, विरघळला बिचारा. पण सतरा वर्षे इमानी चाकरी केलेला म्हातारा, माझ्या बापाने काळजाला हात घातला, तर काय करेल? हा विचार मला सतत अस्वस्थ करत होता. शेवटी मी निर्णय घेतला आणि म्हातारा म्हातारीला संपवले आणि पोलिसांच्या मदतीने आत्महत्येचा बनाव रचला. पण म्हातारा माझ्या दोन हात पुढे होता आणि इतके कमावून बसला होता याची कल्पना नव्हती..’ खिदळत विक्रम म्हणाला आणि त्याच क्षणी त्याच्या कानावर एक जोरदार प्रहार झाला आणि तो टेबल सोडून भिंतीवर जाऊन आदळला.
‘शास्त्रींची कमाई तुला अजून समजलेली नाही विक्रम! पोट पाळणे, संसार पाळणे तर आवश्यक होते, पण आपण सतत पापाची कमाई करतोय हे शास्त्रींना कायम मनाला टोचत राहिले. त्यासाठी त्यांनी मार्ग निवडला ’सत्कर्मी’ दानाचा. गेली सतरा वर्षे एक अनाथ मुलगा शास्त्रींच्या पैशाने शिकत राहिला आणि एक दिवस मिलिटरी इंटेलिजन्ससारख्या ठिकाणी पोहोचला. त्याचे नाव रमण दिवाकर शास्त्री.. म्हणजे मी! माझ्याविषयी शास्त्री सोडून कोणालाच माहिती नव्हते, त्यामुळे त्यांच्या मृत्यूची बातमी मला फार उशिरा समजली. ही आत्महत्या नाही ह्याची मला खात्री होती. शेवटी मी माझे बुद्धीचातुर्य पणाला लावले, माझ्या ओळखी वापरल्या आणि सर्व माहिती काढली. तुझ्यावर माझा पहिल्यापासून संशय होता. बापावर हल्ला झाला, तर सहज समोर येशील असे वाटले होते, पण तू तर बिळात लपून राहिलास. शेवटी तुला बाहेर काढायला आणि सत्य वदवून घ्यायला मला हा चक्रव्यूह रचायला लागला,’ बोलता बोलता विक्रमकडे रमणची पाठ झाली आणि विक्रमने चपळाईने खाली पडलेले पिस्तुल उचलले आणि ट्रिगर दाबला. फक्त ट्रिगरचा आवाज झाला आणि विक्रम सुन्नपणे पिस्तुलाकडे पाहत राहिला. पिस्तुल रिकामे होते आणि हातातल्या बंदुकीच्या गोळ्या खेळवत पॉल दारातून आत शिरत होता..