श्रीलंकेत सध्या अराजक माजलेलं आहे. ज्या सरकारला लोकांनी बहुमताने निवडून दिलं होतं, त्याच सरकारच्या मंत्र्यांना लोक शोधतायत. ज्यांच्याबद्दल ‘शेर पाला है’ असं सिंहली भाषेत बोललं जायचं, त्याच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना त्यांच्या राजवाड्यासारख्या निवासस्थानासकट जाळून टाकण्याचा जनतेचा मनसुबा होता… भारतात असं काही होणं शक्य नाही, अशी अनेकांची समजूत आहे. त्यांचं इतिहासाचं आकलन एकतर पाच हजार वर्षांपूर्वीच्या काळातलं आहे किंवा गेल्या आठ वर्षांतलं. त्यामुळे अवघ्या ५३ वर्षांपूर्वी या देशात काय झालं होतं, काय परिस्थिती होती, हे त्यांना माहिती असणं शक्य नाही. १९६९ सालीही अराजकसदृश परिस्थिती होती आणि देश वेगवेगळ्या कारणांनी खदखदत होता… इथे बाळासाहेबांच्या कुंचल्यातून उतरलेलं क्रूर आणि राक्षसी अराजक पाहा… घाबरलेल्या भारतीय माणसाला ते कोणत्याही क्षणी येण्याची धास्ती दाखवत होतं… हे अराजक काही काळापुरतं का होईना १९७५ साली आलंच होतं आणि तेव्हा जनतेने सर्वसत्ताधीश इंदिराजींचाही पराभव केला होता… आज महागाई आणि धार्मिक विद्वेष यांच्या भडक्याने या अराजकाला पुन्हा जाग आली असेल…