कालच नेहमीच्या दुकानात फेरी झाली. नाताळ व नववर्षाच्या स्वागतासाठी निरनिराळ्या भेटवस्तू व खाऊच्या पाकिटांनी दुकान ओसंडून वाहात होते. आपण कितीही पाश्चिमात्यांची कौतुकं असं म्हटलं तरी आपल्या मुळातल्या उत्सवप्रिय संस्कृतीने आता नाताळ व नववर्ष पूर्वसंध्येला अगदी आपलेसे केले आहे, नाही का? मुख्यत्वे लाल पांढर्या व हिरव्या रंगसंगतीने सजलेल्या अनेक सजावटीच्या वस्तू, ख्रिसमस ट्री, सांताक्लॉजचे मुखवटे वगैरे वस्तूंच्या बरोबरीने ढीग लागला होता तो निरनिराळ्या चॉकलेटच्या डब्यांचा. लहानमोठे रंगीबेरंगी व चमकदार चॉकलेटचे डबे लहानांनाच काय, पण मोठ्यांनाही भुरळ घालत होते जणू!
चॉकलेट म्हटले की सर्वात आधी डोळ्यापुढे येते ते कॅडबरी! आमच्या लहानपणी शेखरमामा घरी यायचा तो कायम फाइव्ह स्टार किंवा डेअरी मिल्कचे कमीतकमी दोन चॉकलेट घेऊन, त्या जांभळ्या किंवा सोनेरी चांद्याच एवढ्या आवडायच्या की विचारता सोय नाही; अर्थात त्यांच्याकडे लक्ष आतमधलं चॉकलेट पोटात गेल्यानंतरच जायचं! लहानमोठे पार्ले किंवा अमुलचे विविध प्रकार मिळायचे ते येताजाता खाल्ले जायचे, पण कॅडबरी खास क्षणांसाठी राखीव असायचे जणू! काही विशेष घडलं, चांगले मार्क मिळाले वगैरे की आईबाबांकडून बक्षीस म्हणून मिळणार्या त्या चॉकलेटची चव अजूनही तरळते जिभेवर व पुढे चालण्यास प्रोत्साहन देते! माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करायला लागल्यावर परदेशी चॉकलेटशी परिचय झाला. कोणी परदेशवारी करून आले की हमखास मिळणार्या एखाददुसर्या चॉलकेटचं पण फार अप्रुप वाटे आधी. आता तर या गोष्टी सहजसाध्य झाल्या आहेत, ओमसाठी दरवेळी परदेशातून चॉकलेटचे डबे आणणारा हिरेशकाका त्याचा लाडका होण्यामागे त्या चॉकलेटचा मोठाच हात असावा!
या सगळ्या देशीविदेशी चॉकलेटच्या चवींमध्ये कुमीआजीने एकदा घरी बनविलेल्या चॉकलेटला मात्र मी कधीच विसरू शकणार नाही. बाकी साहित्याबरोबर तिचं आमच्यावरचं प्रेमच उतरलं होतं त्यात हे नक्की. तसं बघितलं तर घरगुती चॉकलेटची तुलना बाहेरच्या चॉकलेटशी होऊ शकत नसली, तरी बनविण्याचा आनंद ती नक्कीच देतात. फार काही लागत नाही, चहाचे ६ चमचे कोको पावडर, १ वाटी साखर, अर्धी वाटी दुधाची पावडर नि अर्धी वाटी बिनमिठाचं लोणी. कोको पावडर व मिल्क पावडर एकत्र मिसळून घ्यायचं, दुसरीकडे साखर बुडेल एवढे पाणी घालून तिचा एकतारी पाक बनवायचा. पाकात पावडरींचं मिश्रण मिसळून मग त्यात लोणी घालायचं व घोटायचं. मंद आचेवर सगळं छान एकजीव होऊन भांड्याच्या कडा सोडू लागलं की तूप लावलेल्या ताटात मिश्रण थापून मग हव्या त्या आकाराच्या वड्या कापायच्या. बहुतेकांना चॉकलेट आवडतं ते त्याच्या मऊ मुलायम स्पर्शासाठी व त्या खास चवीसाठी. चित्तवृत्ती प्रफुल्लित करते ती चव, मनावर आलेली मरगळ क्षणात घालवते आणि आनंदाची एक सुखद भावना निर्माण करते! गंमत म्हणजे हे सगळं साधत ते मूळच्या कडू असलेल्या कोकोमुळे. कोकोच्या बियांमध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे जगभरात चॉकलेटचे एवढे चाहते आहेत. विचार करा, हीच कडू चव नुसतीच खावी लागली तर कितीजणांना आवडेल? फारच कमीजण ती सहन करू शकतील, नाही का?
बरेचदा महत्त्वाची व मुद्द्याची गोष्ट पण अशीच कटू असते व ती समोरचा स्वीकारू शकतोच असे नाही. त्यावेळी फसवणुकीच्या उद्देशाने नाही पण एकमेकांच्या भावभावनांचा आदर राखत तीच गोष्ट बाकी अनुभवांच्या बोलांचे किंवा पुढील चांगल्या परिणामांचे दाखले देत चॉकलेटसारखी गोड बनवून दिली, तर नक्कीच फायद्याचे ठरते नाही का? माताजी सांगतात की कितीही सत्य असलं तरी जे कटू असेल ते बोलून दुखवू नका. मात्र कधीकधी आपल्याच व्यक्तीच्या फायद्यासाठी ते सत्य सांगणे आवश्यक ठरते, त्यावेळी या चॉकलेटचा मार्ग अनुसरायला हरकत नसावी. अनेकदा ही कृष्णशिष्टाई दोघांनाही ध्येयापर्यंत पोहोचायला मदत करते हे नक्की.
एक विनोदी किस्सा आठवतोय, पहिल्यांदाच नवी कोरी महागडी कार स्वत: चालवत बाहेर घेऊन गेलेली पत्नी थोड्या वेळात पतीला फोन करते. दोन गोष्टी सांगायच्या आहेत म्हणे, आधी चांगली सांगते, आपल्या नव्या गाडीच्या एअरबॅग्ज खूपच छान काम करताहेत म्हणे! गाडीचा झालेला अपघात सांगताना तिने वापरलेली शक्कल त्या नवर्याला जागेवरच मोठा धक्का देणार नाही. अर्थात परिस्थिती स्वीकारणे व त्यावर मात करणे हे गरजेचे असते व त्यासाठी मन सैरभैर न होऊ देणे फारच आवश्यक असते. स्वत:ला जसे इतरांनी वागवलेले आवडेल तसेच आपण इतरांशी वागावे म्हणजे नकळत दोन्ही मनांची शक्ती वाढते व कटुतेच्या पलीकडचा गोडवा महत्त्वाचा वाटून आनंद निर्माण होतो आयुष्यात… अगदी जिभेवर विरघळणार्या
चॉकलेटच्या वडीसारखाच… कधी संपू नये असा वाटणारा…
सर्वांना नाताळ व नववर्षानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा!
– वैभव भाल्डे