• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

माझी रोबोटिक मुलाखत

- सुरेशचंद्र वाघ (कथा)

Nitin Phanse by Nitin Phanse
December 20, 2024
in भाष्य
0

प्रबोधन, गोरेगाव आणि मार्मिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यसेवक वसंत तावडे कथा स्पर्धेतील उत्तेजनार्थ पुरस्कार विजेती कथा…
– – –

मोठ्या चिकाटीने परिश्रम करून मी लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर आज माझा एबीसी बँकेतील प्रोबेशनेरी ऑफिसरपदाचा इंटरव्ह्यू होता. आईने तर कालच संध्याकाळी घरातील बाप्पापुढे पेढे ठेऊन सर्वांचे तोंड गोड केले होते.
बाबा म्हणाले, ‘अगं, किती घाई ती. ‘लाडली बहना’सारखे देवाला आधीच लालूच दाखवून इंटरव्ह्यूत सिलेक्ट करायला भाग पाडणार आहेस का त्याला?’
‘अहो, आता नवस करायचे दिवस गेले. डायरेक्ट एखादी नवी लाडकी स्कीम सुरू करायची आणि देवाला देखील आपल्यापुढे मान तुकवायला भाग पाडायचे,’ आई हसून म्हणाली.
तेवढ्यात माझी लाडली बहना मुक्ता पण हसण्यात सामील झाली आणि हात धुवून घेत मला लाडिकपणे म्हणाली, ‘मी लाडकी बहीण आहे ना तुझी! माझ्या खात्यात गुगल पे ने पंधराशे रुपये चटकन जमा कर पाहू. बाप्पा तुला उद्या नक्कीच अपॉइंटमेंट लेटरसहित आशीर्वाद देईल.’
‘मुक्ता, अगं… नोकरी लागून पगार तर मिळू देत. पहिल्या सॅलरीलाच काय दर महिन्याला पंधराशे तुझ्या खात्यात जमा करीन मी,’ राज्य सरकारप्रमाणेच मी तिला आश्वासन दिले.
‘उद्या येताना चितळ्यांकडून उकडीचे एकवीस मोदक घेऊनच घरी ये तू. मला खात्री आहे तू सिलेक्ट होशील याची,’ बाप्पाच्या आधी बाबांनीच फर्माईश केली.
‘आणि भरवशाच्या म्हशीला टोणगा झाला तर,’ मी म्हणालो.
‘शुभ बोल नार्‍याऽऽऽ’ आई माझ्याकडे डोळे मोठे करून म्हणाली, ‘नन्नाचा पाढा म्हणायची तुझी सवय अजूनही काही जात नाही.’
‘अगं आई, तुला माहित नाही. मुलाखतीला संगणकीय पॅनल असून माझी मुलाखत यंत्रमानव घेणार आहे असे आम्हाला आठ दिवसांपूर्वीच कळवण्यात आले आहे. त्यामुळे मुलाखत अगदी कठीण होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे.’
‘असू देत. आपल्या बाप्पाला उकडीचेच नव्हे तर माव्याचे एकवीस, खव्याचे एकवीस, पिस्त्याचे एकवीस, बदाम, गुलकंद आणि आंब्याचे एकवीस असे सर्व चवीढवींचे मोदक पेश करू. काय बिशाद आहे त्याची तुला मुलाखतीत नापास करण्याची,’ आईने हातवारे करीत म्हटले.
‘अगं… सारणाचे तळीव मोदक कशी विसरलीस तू,’ मुक्ता म्हणाली, ‘मी तर म्हणते मुलाखत घेणार्‍या त्या यंत्रमानवाला देखील जंबो मोदक घेऊन जा बरोबर. मोदक ठासून भरायचे त्याच्या तोंडात. म्हणजे तोबरा भरला की प्रश्न विचारायला संधीच द्यायची नाही त्याला. मोदक पे मोदक… मोदक पे मोदक. तुला अपॉइंटमेंट लेटर मिळालेच म्हणून समज.’ सगळेजण धम्माल हसायला लागले.
खरं तर यंत्रमानव मुलाखत घेणार या कल्पनेनेच मी दडपून गेलो होतो. यांचे काय जातं जोकवर जोक करायला.
‘तुम्हाला माहित आहे का? जपानमध्ये एका कारखान्यात सुपरव्हिजन करणार्‍या मुकादम यंत्रमानवाने कामचुकार कामगाराच्या थोबाडीत मारली होती म्हणे,’ मी सिरीयसली म्हणालो.
‘अरे तो मुकादम होता. त्याचं कामंच दम देण्याचं होतं,’ बाबा म्हणाले,’ मास्तर रोबो असेल तर कान पिरगळणारच किंवा छडीचा प्रसाद देणारच. तुझी मुलाखत घेणारा रोबो तुला फक्त प्रश्न विचारणार… प्रश्नांचा भडीमार करणार. तुझे नाव, तुझं वय, तुझं शिक्षण, अवांतर ज्ञान, बँकिंगमधली माहिती, झालंच तर अनुभव विचारणार.’
‘बाबा अहो ते खरं. पण मी चुकीचं उत्तर दिलं तर काय सांगावं माझ्या कानशिलात लगावली म्हणजे?’ मी म्हणालो, ‘हे यंत्रमानव स्मार्ट असतात आणि खूप संवेदनशील देखील असतात म्हणे.’
‘बन्याऽऽऽ बन्याऽऽऽ उगीच घाबरायचं सोंग आणू नकोस. तू लब्बाड आहेस. ढोंग करतोस भ्यायल्याचे,’ मुक्ता माझ्याकडे रोखून म्हणाली, ‘तुला मी चांगलीच ओळखते. तुझी इंटरव्ह्यूची तयारी पक्की झालेलीच आहे.’
ते खरंच होतं. मुलाखतीची तयारी मी जोरदार केलीच होती. त्यासाठी बँकिंग क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण देणार्‍या एका नामवंत संस्थेच्या कार्यशाळेतून मी मुलाखतीचे धडे घेतले होते. मॉक इंटरव्ह्यूचा देखील ऑनलाइन सराव केला होता. त्यांच्याकडे यंत्रमानव नसला तरी तो मुलाखत कशी घेईल आणि आपण त्याला कसा प्रतिसाद द्यायचा याचे धडे आम्हाला देण्यात आले होते.
बँकांमधून संगणकीकरण ज्या वेगात झालं तितकंच वेळोवेळी आधुनिकीकरण झालं. नव्या संकल्पना राबवल्या गेल्या. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवे प्रयोग झाले. एटीएम आले, पासबुक प्रिंटर आला, नोट काऊंटिंग मशीन आले, चेक कलेक्टिंग मशीन आले, ऑनलाईन बँकिंग करणारे अ‍ॅप आले, डिजिटल व्यवहार सुरू झाले. त्यात यंत्रमानव म्हणजे रोबो देखील आले. पुढारलेल्या चीन-जपानमध्ये तर शेकडोंनी कामे रोबोटिक यंत्रणेवरच चालतात.
मुलाखतीच्या तयारीसाठी माझी खरंच खूप धावपळ झाली.
आम्हाला कार्यशाळेत मुलाखतीसाठी कोणता पोशाख घालून जायचा याचंही मार्गदर्शन करण्यात आलं होतं. व्यावसायिक आणि औपचारिक पोशाख घालणे अत्यंत गरजेचे असते. कारण आपण त्या पदासाठी योग्य असल्याचा प्रभाव पाडणे तितकेच महत्वाचे असते. त्यानुसार मी नेव्ही ब्ल्यू रंगाचा सूट निवडला होता. हलक्या फिकट निळ्या रंगाचा फुल बाह्यांचा शर्ट, सूटला शोभिवंत दिसेल असा क्लासिक पॅटर्नचा टाय, सूटशी जुळणारी मॅचिंग पँट, बेल्ट, उत्तम पाॅलिश केलेले चकचकीत बूट, हातात घड्याळ अशी एकूण तयारी केली होती.
मुलाखतीच्या दिवशी निघताना आईने मला बळे बळे दहीभात खायला लावला. परीक्षेच्या वेळेला ‘पिझ्झा’ खाऊन ‘भेज्या’ ब्लॉक होतो असं ती ठासून म्हणते. निघताना बाप्पाबरोबर आईबाबांच्या पाया पडलो. बाबांनी शुभं भवतु म्हटलं. आईच्या डोळ्यात तर कौतुकाचे अश्रू दाटले होते. मुक्तानं ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची दोन बोटं आणि अंगठा दाखवून बेस्ट ऑफ लक करीत म्हटलं, ‘सुटाबुटात आत्ताच मला तू बँकेतला चीफ जनरल मॅनेजर वाटतोस.’
‘करा… टिंगल करा… घरात नाही परात आणि लग्नाआधी वरात,’ मी हसून म्हणालो.
मुलाखतीची व्यवस्था बीकेसीतील एबीसी बँकेच्या केंद्रीय कार्यालयात होती. मी मेट्रोने तिथेच उतरलो. बीकेसी हे देशाचे केंद्रीय वाणिज्यिक व्यापार आणि विकास केंद्र. चालताना आजूबाजूचा परिसर पाहून मी थक्क झालो. तिथे एकाहून एक प्रचंड आकाराच्या आणि उंचीच्या भव्य आलिशान इमारती उभ्या आहेत. त्यात अनेक सरकारी व खाजगी बँकांची मुख्य कार्यालये, केंद्र सरकारची महत्वाची कार्यालये, नीता अंबानी सांस्कृतिक केंद्र, जिओ मॉल बाहेरून पाहूनच डोळे दिपून गेले.
एबीसी बँकेच्या २१ मजली इमारतीत प्रवेश करताना सिक्युरिटीने माझी कागदपत्रे आणि सुरक्षा तपासणी केली. इमारतीत चौकशी काउंटरवर मी मुलाखतीच्या विभागाची चौकशी केली. मला १५व्या मजल्यावर जायला सांगण्यात आले. एकूण आठ लिफ्टस होत्या. त्यात मुंबईतील रेल्वेच्या स्लो आणि फास्ट लोकलप्रमाणे काही स्लो आणि काही फास्ट लिफ्ट होत्या. पंधराव्या मजल्यावर जायला फास्ट लिफ्ट होती. झटपट मी लिफ्टने पंधराव्या मजल्यावरील लॉबीमध्ये पोचलो. तिथे प्रतीक्षा हॉलमध्ये माझ्यासारखे अनेक उमेदवार प्रतीक्षा करीत बसले होते.
हा हॉल देखील संगणकीकरणाचा एक उत्तम नमुना होता. बँकेच्या हॉलमध्ये शिरताच दारात ग्राहकाला जशी टोकन मशीनमधून टोकन क्रमांकची स्लिप घ्यावी लागते, तसेच मला माझी प्रवेशिका स्कॅन करून टोकन घ्यावे लागले. समोर मुलाखतीसाठी कक्ष क्रमांक एक, दोन, तीन असे इलेक्ट्रॉनिक साइन बोर्ड्स दिसत होते. त्यावर टोकन नंबर दिसणार होते. माझा टोकन क्रमांक ३६ होता. इथेच शुभाशुभ घटनेची पाल मनात चुकचुकली. एक मन म्हणाले, आलिया भोगासी असावे सादर. दैवावर भार ठेवोनिया. तर दुसरे मन म्हणाले, बेटा ३६ गुणी आहेस. भाग्यवान आहेस. कॅरी ऑन. एकीकडे मन:चक्षूपुढे अंगात आलेली यल्लमा देवी अंधभक्ताप्रमाणे घुमताना दिसली, तर दुसर्‍याच क्षणी डॉ. दाभोळकर अंधविश्वासावर मार्गदर्शन करताना दिसले.
चकित करणारी गोष्ट म्हणजे बँकेत ग्राहकमित्र असतो तशी इथे एक मार्गदर्शक यंत्रकन्या हॉलमध्ये फिरत होती. बार्बीची जपानी बाहुलीच जणू. निळेभोर भिरभिरणारे मिचमिचे बोलके डोळे. लालचुटुक ओठ, चेहर्‍यावर मिश्किल हास्य, रेखीव आखीव शरीरसौष्ठव. येणार्‍या प्रत्येक उमेदवाराचे दिलखुलास हसून आणि एयर होस्टेससारखा भारतीय नमस्कार करून स्वागत करीत होती. ती फुलाफुलांचे नक्षीकाम केलेली सुंदरशी साडी नेसली होती. मला पहाताच तिने खळखळून हसत नमस्कार केला आणि एका मोकळ्या खुर्चीकडे निर्देश करून बसायला सांगितले. काल्पनिक दडपणाने माझा घसा कोरडा पडला आहे हे तिने चटकन ओळखले. त्याक्षणीच बिसलेरीची पाण्याची बाटली आणून माझ्यापुढे धरली. मी तिला थॅन्क्स म्हणताच खांदे उडवून ‘माय प्लेझर’ असे म्हणून तिने स्मित केले.
हॉलमध्ये नजर टाकताच एकेका उमेदवाराचा काय रुबाब वर्णावा. विविध रंगाचे आणि शेडचे सूट, टाय, बूट, दाढी मिशांचे शेप, काहींच्या डोळ्यावर भिंगांचे चष्मे. पेहराव असा की बोहल्यावर चढायच्या पवित्र्यात असलेले लग्नाळू नवरदेवच जणू. मुलाखतीला आलेल्या उमेदवार तरुणी देखील वधूच्या किंवा करीनापासून कंगनापर्यंत फॅशन शोच्या आवेशात आल्या होत्या. काहीजणी सुंदर आकर्षक रंगांच्या साड्या, हलक्या रंगांचे मॅचिंग ब्लाऊज तर काहीजणी टी शर्ट आणि जीन्समध्ये होत्या. काहीजणी स्कर्ट, ब्लेझर तर काही सलवार कुर्ता पाजामा अशा पेहरावात पेश होत्या. याशिवाय आकर्षक हेयर स्टाईल, कानात इयरिंग्ज, गळ्यात चमकदार नेकलेस, टो असलेले हिल्स असे सारे काही. हॉलमध्ये सुगंधाच्या अनेक ब्रँड्सचे परफ्यूमस् आपापला दरवळ उधळत होते.
मी खुर्चीवर बसल्यावर थोडा शांत झालो. मनात विचार सुरू झाले. आता हे रोबो साहेब आपली मुलाखत घेताना काय काय विचारतील. थोडी उजळणी करू या का? देशाची अर्थव्यवस्था, आजघडीचा देशाचा जीडीपी म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पन्न, ग्राहक किंमत निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक, घाऊक किंमत निर्देशांक, सेन्सेक्स, निफ्टी, देशाचा राखीव परकीय चलनसाठा, देशाचा महसूल, चालू खात्याची शिल्लक, व्यापार तूट, बेरोजगारी दर, महागाई निर्देशांक इत्यादी विषयांनी माझ्या मेंदूत गोंधळ सुरू केला. खरंच प्रश्न काय विचारतील याचा काहीच नेम नव्हता. भूक निर्देशांक, गरिबी निर्देशांक, कुपोषित देशांमध्ये आपली स्थिती, जागतिक आनंद निर्देशांक, सुखाचा निर्देशांक, कृतज्ञतेचा निर्देशांक हे असले आणखी काही प्रश्न देखील विचारले तर? कालचीच बातमी ताजी होती. भारताचा नवा लज्जास्पद विक्रम. सर्वाधिक प्लॅस्टिकचे प्रदूषण करणारा देश हा आपला भारत देश. पेपर अवघड असला आणि काहीच आठवेना झाले की जी मन:स्थिती असते तशी माझी अवस्था झाली. अखेर मी स्वतःला सावरण्यासाठी मन एकाग्र करीत गायत्री मंत्र, अथर्वशीर्ष, हनुमान चालीसा, मनाचे श्लोक म्हणायला सुरुवात केली. पण त्यातही लक्ष लागेना.
मुलाखतीला केव्हाच सुरुवात झाली होती. कक्ष क्रमांक एकमधून मुलाखत देऊन एक उमेदवार हसत हसत बाहेर पडत होता. एक्झिटच्या दारातून बाहेर पडताना आमच्याकडे पहात त्याने प्रथम उजव्या हाताचा अंगठा दाखवीत ‘वेल डन’ असा मुलाखत छान झाल्याचा इशारा केला. आणि मग अंगठा व तर्जनीचं बोट जुळवून मुलाखत घेणार्‍या रोबो मॅडम खूप सुंदर असल्याचा हावभाव केला. अरेच्या, म्हणजे मुलाखत घ्यायला महिला रोबो अधिकारी देखील होत्या तर. साधारणपणे मुलाखतीतून बाहेर पडणार्‍या उमेदवारांकडून जी माहिती मिळत होती, त्यात प्रत्येक कक्षामध्ये तीन जपानी रोबोंचे पॅनल होते असा फीडबॅक मिळाला. त्यात दोन पुरुष रोबो व एक महिला रोबो होते. काही उमेदवार मुलाखत मनाजोगी न झाल्याने गोंधळल्यासारखे चेहरे पाडून बाहेर पडत होते तर काहींच्या चेहेर्‍यावर मुलाखत उत्तम झाल्याचे समाधान दिसत होते. त्यांना विचारले जाणारे एकेक अवघड प्रश्न ऐकून प्रतीक्षा करणार्‍या आम्हा मंडळींमध्ये चलबिचल होत होती. नोटाबंदीपासून जीएसटीपर्यंत तर शेतकर्‍यांच्या आंदोलनापासून अगदी देशातल्या महिला अत्याचारापर्यंत प्रश्नांना धरबंध नसल्यासारखा भडीमार करीत होते. काय सांगावे? मला राम मंदिराबद्दल विचारलं तर… मी मनातल्या मनात रामरक्षा म्हणत श्रीरामाचा धावा करायला सुरुवात केली.
हे करीत असतानाच त्या स्वागतिका यंत्रकन्येने जवळ येऊन मला सावध केले आणि माझा मुलाखतीचा ३६ क्रमांक कक्ष क्रमांक तीनवरील साईन बोर्डवर झळकताना दिसत आहे म्हणून तातडीची सूचना केली. मी घाईघाईत उठलो आणि मुलाखतीच्या कक्षाजवळ जाताच त्याचे सरकते दार स्वयंचलित पद्धतीने उघडले गेले. मी आत प्रवेश केला आणि मला आतील जे दृश्य दिसले ते पाहून मी थक्क झालो. भव्य आलिशान एसी हॉलमध्ये पुढे मोठा प्रशस्त मेज होता. त्यावर सुंदर डिझाईनचा टेबल क्लॉथ पसरलेला होता. टेबलावर रंगीबेरंगी आकर्षक डेलिया फुलांचा फ्लॉवरपॉट, पेन स्टँड,
लेटरपॅड, एक लॅपटॉप मांडलेला होता. जास्मिनच्या मंद सुगंधी दरवळीने हॉलमधील वातावरण प्रसन्न वाटत होते.
टेबलामागे तीन उंच रिव्हॉलव्हिंग खुर्च्यांमध्ये अधिकारीपदावरचे दोन यंत्रमानव व एक यंत्रस्त्री स्थानापन्न बसलेले दिसत होते. दोघे जपानी बाहुले रुबाबदार सुटाबुटात होते तर बाहुलाबाईंनी उंची साडी परिधान केलेली होती. तिघांच्या चेहेर्‍यावर छानसे स्मित होतं. मिचमिच्या डोळ्यांचे गोरेपान दिसणारे हे अधिकारी यांत्रिक असले तरी त्यांच्या हालचाली सजीव माणसासारख्याच सुबक होत्या. आपल्यासारखे हाडामांसाचे वाटत असले तरी फरक एवढाच की त्यांच्या डोक्यावर छोटेखानी अँटिना होते.
सावध होऊन मी ‘गुड मॉर्निंग सर… गुड मॉर्निंग मॅम… मे आय कमिन?’ असे अदबीने म्हणताच सर्वांनी चक्क भारतीय नमस्कार करून मला समोरच्या खुर्चीत बसायला सांगितले. मी खुर्चीत अगदी अदबीने बसताच बार्बीसारख्या आकर्षक दिसणार्‍या बाहुलाबाई मॅडम म्हणाल्या, ‘तुझ्या लेखी परीक्षेत इंग्रजीतील नैपुण्य उत्तम दिसते आहे. तुझी मातृभाषा मराठी आहे हे समजले. तर आपण मराठीतच बोलूया.’
हे ऐकून माझ्या अंगावर मूठभर मांस चढल्यासारखे वाटले आणि माझी भीड चेपून आत्मविश्वासही वाढला. ‘जय महाराष्ट्र… जय भवानी’ अर्थात हे मी मनात म्हणालो. मुख्य रोबो अधिकारी मध्ये बसलेले होते. त्यांनी माझ्याकडे निरखून पहात म्हटले, ‘तुझा परिचय दे पाहू.’ मी माझे नाव, पत्ता, वय, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, वैयक्तिक नैपुण्य, आवड निवड, छंद यांची घोकून पाठांतर केलेली माहिती फडाफडा सांगितली.
आमच्यात पुढे झालेले संवाद असे.
‘बँकेत काउंटरवर सेवा देताना पहिले पथ्य कोणते पाळावे? याबद्दल तू काय सांगशील?’
‘सर, बँकेत काम करताना ‘सुहास्य सेवा’ किंवा ‘सर्व्हिस विथ स्माईल’ हा ग्राहकाशी जोडणारा महत्वाचा दुवा आहे. फक्त काउंटरवरच नव्हे तर कोणत्याही पदावर हसून सेवा देणे हे संबंधित कर्मचार्‍याचे किंवा अधिकार्‍याचे कर्तव्यच आहे.’
‘बँकेत संगणकीकरणाबरोबर यंत्रमानवाचा हस्तक्षेप कितपत योग्य आहे.’
‘सर, माझ्या माहितीप्रमाणे रिझर्व्ह बँकेने ग्राहक सेवेसंबंधात अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात फक्त १० टक्के कर्मचारी हसून सेवा देतात तर ७० टक्के कर्मचारी कपाळावर १०० टक्के आठ्या पाडून बोलतात असे निरीक्षण नोंदवले आहे. उरलेले २० टक्के कर्मचारी चक्क कामचुकार असतात. ते अजिबात काम करीत नाहीत. त्यामुळे संगणकीकरणात आधुनिकीकरणाबरोबरच यांत्रिकीकरण करणे तितकेच आवश्यक झाले. कार्यक्षम कामासाठी यंत्रमानव हा उत्तम पर्याय आहे.’
माझे हे उत्तर तिघांना पटलेले दिसले कारण एकशे ऐंशी अंशाच्या कोनातून एकमेकांकडे हसून पहात त्यांनी माना डोलावल्या.
‘पण बँकेत जर सर्वत्र आमच्यासारखे यंत्रमानव काम करू लागले तर मग तुमची गरजच काय,’ मुख्य रोबो अधिकार्‍यांनी विचारले.
‘सर, आपल्या देशात बँका, सरकारी कार्यालये आणि विविध क्षेत्रात संगणकीकरण झाले, तेव्हा रोजगार व नोकर्‍यांवर परिणाम होईल म्हणून अनेक कर्मचारी संघटना व राजकीय पक्षांनी याला विरोध केला होता. पण माहिती तंत्रज्ञानासारखी नवी क्षेत्रे उदयाला आली. इतर रियल इस्टेट, ऑटोमोबाईल, पर्यटन, ऑनलाईन रिटेल शॉपिंग, परिवहन यासारखी अनेक क्षेत्रे देखील विस्तारत गेली. त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या. मध्यम आणि उच्च मध्यमवर्गात उल्लेखनीय वाढ झाली.’
‘तू ज्या बँकेची मुलाखत द्यायला आला आहेस त्या बँकेत अधिकारी झालास तर तुझे पुढील स्वप्न काय आहे?’
‘सर, बँकेची भरभराट व्हावी या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन मी काम करीत राहीन. एखाद्या दिवशी रोबो बनून मुलाखत घेणे आणि उमेदवारांना ‘तुम्ही रोबो झालात तर काय कराल?’ असे प्रश्न विचारण्यास मलाही आवडेल.’ यावर मनमुराद हसताना पुन्हा मान डोलावून तिघांनी मला दाद दिली. हसताना त्यांचे शुभ्र सुंदर दात चमकदार मोत्यासारखे दिसत होते.
यानंतर रोबो मॅडमनी मला काही प्रश्न विचारले.
‘तुझे जन्म गाव कोणते?’
‘पुणे मॅडम.’
‘पुणे कशासाठी प्रसिद्ध आहे?’
‘पुणे तिथे काय उणे हे शब्दशः खरे आहे,’ मी म्हणालो, ‘पुणे विद्येचे माहेरघर आहे. पुण्याला ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणतात. पुण्याला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. पुणे औद्योगिक केंद्र आहे. पुण्याचे हवामान आल्हाददायक आहे. पुणे निसर्गरम्य शहर आहे. कला आणि महाराष्ट्राची संस्कृती येथे जपली व जोपासली जाते.’
‘पुण्याच्या खाद्यसंस्कृतीबद्दल तू काय सांगशील?’
‘मॅम, पुण्याची खाद्यसंस्कृती वैविध्यपूर्ण आहे. येथे पारंपारिक मराठी जेवणाबरोबरच विविध भारतीय, पाश्चिमात्य खाद्यपदार्थ उपलब्ध असतात. चितळ्यांची बाकरवडी, जोशी वडेवाले, बेडेकर मिसळ, काका हलवाई, बादशाहीतील खेकडा भजी, डेक्कनवरील पिठलं भाकर, वैशालीतील इडल्या डोसे, गुडलकचा इराणी चहा आणि मस्कापाव यांची मोठी यादी होईल. याशिवाय केएफसी, मॅकडोनाल्ड, पिझ्झा हट, फास्ट फूडने सारे पुणे व्यापले आहे. पंचतारांकित हॉटेल्सही अनेक आहेत. पुणे तिथे काय उणे?’
‘पण ‘पुणे तिथे सर्वच उणे’ असं म्हणून काहीजण हिणवतात,’ रोबो मॅम हसून म्हणाल्या.
‘मॅम, यात परस्परविरोधी दृष्टिकोन आहे. पुण्याच्या काही समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी हे वाक्य जरूर लागू पडते. वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण, महागाई, पायाभूत सुविधांवरील ताण यांसारख्या समस्या या वाक्यातून अधोरेखित होतात. नकारात्मक पैलू असणारी मंडळी नेहेमीच पुण्यावर टीका करतात. पण या समस्या आपल्या देशात सगळीकडेच आहेत,’ मी म्हणालो.
माझी मुलाखत योग्य दिशेने सरकत होती. पुढले प्रश्न रोबो अधिकारी क्र. २ विचारणार होते. ते नक्कीच बँकेतील प्रत्यक्ष चालणारे व्यवहार याबद्दल प्रश्न विचारतील अशी अपेक्षा होती. त्यासाठी ते माझ्याकडे निरखून पहात असतानाच अचानक वीज गेली आणि हॉलमध्ये सर्वत्र अंधार झाला. तीनही रोबोंच्या हालचाली थांबल्या असाव्यात असा मला संशय आला, कारण त्यांच्यात बोलण्याची देवाण घेवाण होत असल्याची काहीच चाहूल लागत नव्हती. अगदी पिन ड्रॉप सायलेन्स होता. माझी चुळबुळ चालू असतानाच पाचेक मिनिटात पुन्हा वीज परतली. सर्वत्र लख्ख उजेड पडला. पण मला तिघेही रोबो अधिकारी चेहेर्‍यावर गोंधळल्यासारखे दिसत होते. त्यानंतर ते एकमेकांशी कुठल्याशा तरी अवघड चमत्कारिक सांकेतिक भाषेत बोलायला लागले. ते माझ्या समजण्यापलीकडचे होते. बहुदा संगणकातील मशीन कोडमधील प्रोग्रामिंग भाषा असावी.
पुढे घडले ते अघटितच. तिघेही जागेवरून उठले आणि त्यांनी माझा ब्लेझर व शर्ट काढून मला उघडे केले.
‘अहो, काय करताय हे,’ मी बुचकळ्यात पडून विचारले.
‘आम्ही आमचे नेमून दिलेले काम करतोय,’ मॅडम रोबो म्हणाल्या.
आणि मग त्या सर्वांनी मिळून एखाद्या पेशंटला उचलून ऑपरेशन टेबलवर ठेवावे तसे मुलाखतीच्या टेबलावर मला आडवे केले. गांगरून गेल्यामुळे मला काहीच कळेना. माझ्या तोंडून शब्दही फुटेना.
‘सॉरी श्री. काणेकर… एवढ्यात लाईट गेल्यामुळे सर्व्हर डाऊन झाला होता. त्यामुळे आमचे काम बंद पडले होते. तुम्ही आता शांत पडून रहा पाहू,’ मुख्य रोबो अधिकारी.
‘अहो पण माझ्या मुलाखतीचे काय ?’ मी त्यांना भांबावून पुन्हा विचारले.
‘कसली मुलाखत?’ त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आणि म्हणाले, ‘मी डॉक्टर झडपे, हृदयरोगतज्ज्ञ… हे… हे… डॉक्टर खोपडे, मेंदू शल्यविशारद… आणि ह्या डॉक्टर नाडे… नाडीवैद्य. आम्हाला सॉफ्टवेयरने जो प्रोग्रॅम लिहून दिला आहे त्याप्रमाणे तुमची तपासणी करण्याचा आदेश आहे. तुम्ही अगदी निपचित पडा बरं,’ डॉक्टर झडपे म्हणाले.
प्रोबेशनरी अधिकार्‍याची मुलाखत टाकून आता हीच रोबो मंडळी मेडिकल तपासणीची भाषा करू लागली. याशिवाय स्वत:ला डॉक्टर म्हणवून घेत आहेत. हे सारे काय गौडबंगाल झालं. मी पेशंटसारखा वर आढ्याकडे बघत पडून राहिलो खरा… पण न जाणे यांनी तपासणी करता करता शस्त्रक्रियेचा निर्णय घेऊन माझ्या छातीची चिरफाड केली किंवा मेंदूचे चिरून कापे करायला सुरुवात केली तर काय घ्या, ह्या कल्पनेनेच मी घाबरून गेलो.
यांच्या हातात शल्यक्रियेची प्रत्यक्ष शस्त्रे नव्हती हे खरे. पण त्यांच्या दाही बोटांमध्ये शस्त्रक्रिया करण्याचे कौशल्य असावे. शेवटी ही मंडळी यंत्रमानव असल्याने सॉफ्टवेअर आणि हार्डवेयर दोन्हीमध्ये ते कार्यकुशल असणारच. त्यांच्या तावडीतून माझी सुटका होणे चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखेच अवघड होते.
डॉ. नाडे या रोबो मॅडमनी माझा हात हातात घेऊन एखाद्या कुशल वैद्यासारखी तल्लीन होऊन माझी नाडी तपासायला सुरुवात केली. तर हृदयरोग तज्ज्ञ डॉ. झडपेंनी माझ्या छातीवरून स्टेथस्कोपसारखा आपला उजवा हात फिरवायला सुरुवात केली. ते माझी स्वयंचलित अँजियोग्राफी करीत आहेत असे काहीसे अस्पष्ट ऐकायला मिळाले. डॉक्टर खोपडेंनी माझ्या डोक्यावरून आणि मस्तकावरून दोन्ही हात फिरवायला सुरुवात केली. माझ्या कवटीचे स्कॅनिंग होत आहे असा मला भास झाला. एकूणच तिघांनी माझ्या त्रिमितीय तपासणीतून सखोल निरीक्षण केले. पंधरा मिनिटे हे दिव्य चालूच होते. यानंतर तिन्ही डॉक्टर एका बाजूला गेले. त्यांनी माझे रोगनिदान म्हणजे डायग्नोसिसवर गंभीरपणे चर्चा सुरू केली. त्यांचे चेहरे चिंताग्रस्त दिसत होते. काहीतरी भयंकर रोगाचे नाव सांगून माझी चिरफाड करण्याचा तर हे निर्णय घेणार नाहीत ना? टेबलावर पडलेल्या अवस्थेत मी रामरक्षा म्हटली. मग मारुतीचा धावा करीत मारुतीस्तोत्र म्हणायला सुरुवात केली. वाचव रे बाबा. तुला चांदीची गदा देईन असा नवसही केला. मग काही अघटित घडून मृत्यू येऊ नये म्हणून महामृत्युंजय मंत्राचे पारायण सुरू केले. भगवान शंकराला अकराशे एक बेलाच्या पानांचा दही तूप लोण्यासहित अभिषेक करीन असे आश्वासनही दिले.
तिघांच्यात जी चर्चा झाली ती माझ्या कानावर पडत होती. ती अशी…
‘डॉ. झडपे… पेशंटची नाडी नीट लागत नाही.’ नाडीवैद्य मॅडम म्हणाल्या, ‘नाडीचे ठोके अनियमित आहेत. प्रत्येक चार ठोक्यांनंतर एक ठोका मिसिंग म्हणजे चुकतो आहे. तोंडपाठ नसल्याने अडखळत रामरक्षा म्हणावी तसे ठोके पडत आहेत.’
नाडीवरून अशी काही माहिती तपासता येते हे ऐकून मी चकित झालो.
यानंतर डॉ. झडपे म्हणाले, ‘मी पेशंटच्या हृदयाचे सर्व कप्पे तपासले. त्यातील एकूण एक झडपा तपासल्या. रक्तवाहिन्यांचे आकुंचन प्रसरण यावर मारुतीस्तोत्राचा परिणाम झाला असावा. कारण रक्त महाविद्युल्लतेपरी कोटीच्या कोटी उड्डाणे घेत सळसळत आहे. त्यामुळे ईसीजी पण खवळल्यासारखा खालीवर होतो आहे.’
मेंदूतज्ज्ञ डॉ. खोपडे तर म्हणाले, ‘मी पेशंटच्या मेंदूचे सिटीस्कॅन केले. मेंदू, मज्जारज्जू, नसा आणि स्नायू यांचे त्रिमितीय इमेजिंग खोलवर तपासले. त्याच्या मेंदूवर महामृत्युंजय मंत्राचे कवच घट्ट बसलेले दिसते. त्यामुळे रोगनिदान करण्यात अडथळे येत आहेत. तिघा डॉक्टरांनी नंतर मला गायत्रीमंत्र म्हणायचा आदेश दिला. गायत्री मंत्राचा जप सुरू करताच माझे मन एकाग्र झाले. त्याची सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन परिणामतः माझा बीपी नॉर्मल, पल्स रेट नॉर्मल, ईसीजी नॉर्मल, टू डी एको नॉर्मल असे सर्वकाही नॉर्मल झाले. मनाचे शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक स्तर समसमान झाले. मन शांत तसेच चिंतामुक्त झाले.
यानंतर सर्व काही ‘ऑल वेल’ असे म्हणून त्यांनी मला उठून माझ्या खुर्चीत बसायला सांगितले. मी माझा शर्ट, ब्लेझर आवरून नीट घातले. विस्कटलेल्या केसांचा भांग नीट केला. खुर्चीत बसलो.
डॉ. झडपेंनी पेन स्टँडमधून पेन काढला. लेटरपॅड पुढे ओढला आणि त्यावर डॉक्टरांना शोभेल अशा गिचमिड अक्षरात काहीतरी लिहून खाली सही केली. साहजिकच त्यांनी माझे रोगनिदान आणि औषधाचे प्रिस्क्रिप्शन लिहून दिले होते. पण इतक्यात पुन्हा वीज गेली. अंधार पडला. हे सारे यंत्रमानव अर्थात बंद पडले. आता पुढे काय वाढून ठेवले आहे याचा मी गांभीर्याने विचार करायला लागलो. मात्र मी एक केले. अंधारात चाचपडत मी तो लेटर पॅडमधला कागद फाडून घेतला आणि व्यवस्थित घडी घालून कोटाच्या आतल्या खिशात ठेवला.
थोड्या वेळात वीज आली. अर्थात या काळात यंत्रमानवांचा सर्व्हर डाऊन झालाच होता. वीज येताच ही यांत्रिक मंडळी पुन्हा वेगळाच अभिनय करू लागली. त्यांचे प्रोग्रामिंग म्हणजे कार्यप्रणाली बदलली होती. आधीचे मुख्य अधिकारी कोर्टातल्या मुख्य न्यायाधीशाच्या आविर्भावात मधल्या खुर्चीत बसले. डावीकडे मॅडम आरोपीच्या वकील म्हणून पेश झाल्या. दुसरे रोबो सरकारी वकील म्हणून पेश झाले. आणि ही सारी मंडळी माझ्याकडे गुन्हेगार आरोपी असल्यासारखी भेदक नजरेने पाहू लागली. एकूणच मी सावध झालो आणि झटपट मनाशी काही पक्का निर्णय घेऊन वार्‍यासारखा वेगात केबिनच्या बाहेर पडलो.
केबिनचा स्वयंचलित दरवाजा बंद झाला होता. सुटलो बुवा, मनाशी म्हणालो.
इकडे प्रतीक्षा हॉलमध्ये थांबलेल्या उमेदवारांना उद्देशून एक बँक पदाधिकारी मोठ्याने सूचना देत होते, ‘काही अपरिहार्य कारणामुळे आजच्या राहिलेल्या मुलाखती उद्यावर ढकलल्या आहेत. ज्यांच्या मुलाखती व्हायच्या आहेत त्यांनी उद्या याचवेळी इथे मुलाखतीसाठी हजर राहावे. आज ज्यांच्या मुलाखती झाल्या आहेत त्यांना ई मेलने त्यांचा निकाल कळविण्यात येईल. धन्यवाद.’
मी आल्या पावली घरी जायला निघालो. मेट्रोत बसलो. सवयीने मी मोबाईल उघडला. अनेक व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पहाता पहाता ‘जी मेल’चा अ‍ॅपही उघडला आणि आश्चर्याचा धक्काच बसला. प्रायमरी मेसेजमध्ये टॉपलाच प्रोबेशनरी अधिकारी म्हणून माझी निवड झाल्याचा शुभ मेसेज होता. मी त्वरित मोर्चा प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाकडे वळविला. खास माव्याचे मोदक गणपतीला अर्पण करून आणि पुढल्या भेटीत महाप्रसादाचे आश्वासन देत घरी आलो. आई, बाबा आणि लाडकी बहीण मुक्ता यांना मी प्रोबेशनेरी अधिकारी झाल्याचे ऐकून केवढा मोठा आनंद झाला. तिघांनी कुलदेवतेपासून आणखी बर्‍याच देवांना नवस केले होते, त्यांची यादी सांगत बसत नाही. सारे नवस फेडण्यात माझा पहिला पगार खर्ची पडणार होता.
रात्री झोपण्यापूर्वी मुलाखतीच्या दुसर्‍या टप्प्यात डॉ. झडपेंनी दिलेला प्रिस्क्रिप्शनचा कागद मी उत्सुकतेने उघडला. त्यात रोगनिदान करताना त्यांनी खालील विधान केले होते. श्री. काणेकरांची बँक प्रोबेशनरी अधिकार्‍याच्या पदासाठी त्रिमितीय नाडी तपासणी केली. त्यात खालील बाबी आढळून आल्या. काणेकरांना जमा खर्चातील डेबिट क्रेडिटबद्दल ‘ओ की ठो’ माहित नाही. बँकेतील डे बुक, कॅश बुक, लेजर कीपिंग कशाशी खातात याबाबत त्यांना काडीचाही गंध नाही. बॅलन्स शीट, नफा तोटा पत्रक यांची त्यांना सुतराम कल्पना नाही. नाडीचिकित्सेत प्रोबेशनरी अधिकार्‍याच्या परीक्षेत मी नापास झालो होतो.
हे सर्व वाचून मी कपाळावर हात मारून घेतला आणि कागदाचे बारीक… बारीक… तुकडे करून त्यांना कचर्‍याची टोपली दाखवली.
दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात पुढल्याच पानावर लक्षवेधी बातमी छापून आली होती, एबीसी बँकेच्या प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या मुलाखती घेण्यासाठी नेमणूक केलेल्या यंत्रमानवांमध्ये तांत्रिक बिघाड. दुरुस्तीसाठी आयसीयूमध्ये अ‍ॅडमिट.
अधिक चौकशी अंती असे समजले की जपानहून इम्पोर्ट केलेल्या सदर यंत्रमानवांची निर्मिती बहुउद्देशीय कारणांसाठी करण्यात आली होती. हे यंत्रमानव घरकाम, हेअर कटिंग, रिसेप्शनिस्ट, सुपरवायझर, रंगारी, स्टोअरकीपर, मेडिकल प्रॅक्टिशनर, अ‍ॅडव्होकेट, लायब्रेरियन, मुलाखती घेणे, पत्रकार इत्यादी विविध भूमिकातील कामे पार पाडतात. काल प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या मुलाखती घेताना वीज पुरवठ्यात आलेल्या अडथळ्यांमुळे सर्व्हर डाऊन झाला की त्यांची संगणक आज्ञावली बदलत गेली आणि त्यांना नेमून दिलेल्या कामाचे स्वरूपही बदलत गेले. आता दुरुस्तीसाठी त्यांची पाठवणूक आयआयटी पवई जवळील जपानी वर्कशॉपमध्ये करण्यात आली असून सध्या त्यांना इंटेंसिव्ह केअर युनिटमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आले आहे.

– सुरेशचंद्र वाघ

Previous Post

गिरणगावाचे बायोपिक

Next Post

चॉकलेटची कथा…

Next Post

चॉकलेटची कथा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.