`प्रबोधन`ची सुरवात नेमकी कशासाठी झाली, ही भूमिका प्रबोधनकारांनी पहिल्या अंकात दिली आहे. १६ ऑक्टोबर १९२१ रोजी प्रकाशित झालेल्या पाक्षिकाच्या पहिल्या अंकात प्रबोधनकारांनी याविषयी अगदी सविस्तर लिहिलं आहे.
– – –
पहिल्या अंकात `प्रबोधन` का सुरू केलं, याची भूमिका स्पष्ट करणारे दोन लेख आहेत. पहिला `प्रबोधनचे ध्येय` या नावाचा आहे. त्या लेखाचीच नाही, तर `प्रबोधन`चीच सुरुवात वसंतविहारी यांच्या कवितेने होते. त्यामुळे या कवितेशिवाय `प्रबोधन`वरचं कोणतंही लिखाण पूर्ण होऊ शकत नाही. या कवितेत `प्रबोधन`च्या ध्येयाचं सार आलं आहे.
समाजकार्यी स्वधर्मतत्वी सदा शिलेदार।
प्रजापक्षनवमतसंवादी राजस सरदार।।
विशिष्टपंथप्रवर्तकांची व्यर्थ न करि पूजा।
व्यक्तीचा नच मिंधा, बंदा सत्याच्या काजा।।
विश्व निर्मिले जयें दयाळें त्या जगदीशाला।
भिउनी केवळ, नच अन्याला, लागे कार्याला।।
ही कविता प्रबोधन कोणत्याही एका पक्षाशी जोडलेलं नाही आणि त्याचा पक्ष फक्त लोकांचा असल्याचं स्पष्ट करते. `प्रबोधन` सत्याला धरून राहील आणि एका विश्वनिर्मात्याला सोडून बाकी कुणालाही घाबरणार नाही, असा दावाही ही कविता करते. प्रबोधनकारांनी या लेखात `बुद्धिदाता आणि विघ्नहर्ता श्रीगणेशदेवाच्या चरणी अनन्यभावाने माथा ठेवून` `प्रबोधन`ची सुरुवात केलीय, याचं काहीजणांना आश्चर्य वाटू शकेल. त्याला कारण पुढच्या काळात त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला केलेला विरोध असू शकतो. प्रबोधनकारांनी अभ्यास आणि अनुभव याच्या आधारे आपली विकसित झालेली समज त्या त्या काळात मोकळेपणाने व्यक्त केली आहे. त्यामुळे एकच गोष्ट धरून ठेवणार्या पोथीबाज मठ्ठ पत्रपंडितांसारखं जडत्व त्यांच्या लिखाणात नाही. उलट त्यांच्या लिखाणाला गतिमानता आहे. प्रबोधनकार अस्सल पत्रकारासारखं त्या त्या दिवसावरचं आपलं मत मांडत जातात. तापलेल्या लोखंडावर हातोडा मारून परिस्थितीला आकार देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते विरोधाभासी वाटत असलं तरी महत्त्वाचं ठरतं. अर्थात त्यामुळे त्यात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखी समग्र विचारधारा सापडत नाही. किंवा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि जागृतिकार भगवंतराव पाळेकरांसारखी विचारांची समतोल मांडणी मिळत नाही. तरीही प्रबोधनकारांच्या विचारांचं मोल तसूभरही कमी होत नाही. उलट परिवर्तनाच्या चळवळीत त्यांच्या विचारांनी आपलं काम चोख पार पाडलेलं दिसून येतं. त्यामुळे `प्रबोधन` सुरू करण्यामागच्या उद्दिष्टांमध्ये काळानुरूप काही बदल झालेले आढळतात.
टिळक आगरकर वादात आधी सामाजिक सुधारणा की आधी राजकीय स्वातंत्र्य हा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर महात्मा गांधींनी सामाजिक सुधारणांना स्वातंत्र्य चळवळीचा भाग बनवेपर्यंत प्रत्येक विचारवंताला राजकीय स्वातंत्र्य की सामाजिक सुधारणा यावर आपलं मत स्पष्टपणे मांडणं गरजेचं ठरत होतं. त्यानुसार प्रबोधनकारांनी आपलं स्पष्ट मत सामाजिक सुधारणांच्या पारड्यात टाकलेलं दिसतं. ते लिहितात, `स्वराज्याची लॉटरी म्हणजे मूठभर मोठ्या माशांना बाकीच्या अनंत धाकट्या मासोळ्यांना गिळण्याचा सनदपट्टाच होय, यात आम्हाला संशय वाटत नाही. सामाजिक उच्चनीच भेदभाव, आपण व आपला समाज इतर सर्व समाजांपेक्षा उच्च दर्जाचा मानण्याची नाना फडणिशी आणि धार्मिक क्षेत्रांत भिक्षुकशाहीची दिवसाढवळ्या चालविलेली भांगरेगिरी, या सर्व राष्ट्रविनाशक, समाजविध्वंसक व दास्यप्रवर्तक दोषांचा आमूलाग्र नायनाट झाल्याशिवाय स्वराज्याचे अमृत प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी हिन्दुस्थानाच्या घशांत कोंबले तरी त्यापासून त्याचा लवमात्र उद्धार होणार नाही.` स्वकीयांचं राज्य आलं तरी सामाजिक धार्मिक गुलामगिरी संपत नाही, हे महाराष्ट्राचा इतिहासच सांगतो, असा दावा ते करतात. धार्मिक म्हणजेच सामाजिक गुलामगिरीचा विरोध याचा `प्रबोधन`चं एक महत्त्वाचं ध्येय म्हणून उल्लेख आहे.
`प्रबोधन` हा कट्टर नवमतवादी असल्याचं ते सांगतात. जीर्णमतवाद किंवा पुराणमतवाद्यांकडे दुर्लक्ष करण्याचा इरादा ते व्यक्त करतात. पण त्याच वेळेस हिंदू साम्राज्य उभं करण्याची महत्वाकांक्षाही लपवून ठेवत नाहीत. ते सांगतात, `चालू घडीचा मामला असा आहे की सर्व भेदभावांचा सफाई संन्यास करून हिन्दुजनांनी निरलस भ्रातृभावाने आलेल्या व येणार्या परिस्थितीशी तोंड देऊन आपले हिन्दुत्व, आपले आत्मराज्य, कायम ठेवून हिन्दु साम्राज्याच्या विशाळ आकांक्षांनी हिन्दी राष्ट्राचे विराट हृदय चबचबीत भिजवून सोडले पाहिजे.`
त्यावेळेस `प्रबोधन` कोणत्याही एका विचारधारेचा नसल्याचंही ते स्पष्ट करतात. `प्रबोधन जितका कट्टा नवमतवादी आहे, तितकाच तो पक्का स्वराज्यवादी आहे. जितका राष्ट्रीय वैभवाचा महत्त्वाकांक्षी आहे, तितकाच तो सामाजिक व धार्मिक गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांचा कट्टर द्वेष्टा आहे. महाराष्ट्रात प्रचलित असलेल्या कोणत्याही पक्षाचा प्रबोधन सांप्रदायिक नाही अथवा त्यांच्या मतांचा मिंधा गुलाम नाही. प्रबोधन सत्याचा भोक्ता आहे.` कळप कितीही उच्च ध्येयाने भारलेला का असेना, पण त्याचा भाग न बनण्याचा प्रबोधनचा निर्धार तेव्हाच्या इतर विचारवंतांपेक्षा वेगळा आहे. त्यांना विचारांनी जवळच्या असलेल्या ब्राह्मणेतर चळवळीवर किंवा हिंदू मिशनरी सोसायटीवरही ते टीका करायला मागेपुढे बघत नाहीत. त्यामुळे ते स्वतंत्रपणे एकांडे शिलेदार बनून लढत राहताना दिसतात.
`प्रबोधन`चं एक वर्ष पूर्ण झाल्यावर लिहिलेल्या लेखात ते या भूमिकेचा आढावाही घेतात. ते लिहितात, `देशाच्या स्वराज्य मुमुक्षू अवस्थेत प्रचलित चळवळींकडे एका विशिष्ट चिकित्सक दृष्टीने पाहण्याची एक नवीन दिशा प्रबोधनाने दाखविली आहे. त्यासाठी स्वीकारलेला सत्य प्रतिपादनाचा निर्भीड बाणा महाराष्ट्रीय जनतेच्या पचनी कसा काय पडतो, याची प्रथमतः आम्हाला शंका वाटत होती. परंतु चार पाच अंक निघतात न निघतात तोच आश्रयदात्यांच्या वाढत्या संख्येने त्या शंकेची पूर्ण निवृत्ती झाली.`
दुसर्या प्रकाशन वर्षाच्या शेवटच्या अंकात `प्रबोधन`च्या ध्येयाचा वेगळ्या शब्दांत पुनरुच्चार करताना ते लिहितात, `देशाच्या कानाकोपर्यात जरा कोठे फट झाले की त्यावर चुटकीसारखे डझनवारी कालमांचे लेख खरडण्याचे काम प्रबोधनाचे नव्हे. ठिकठिकाणची बातमीपत्रे किंवा वर्तमानसारे देण्यासाठी प्रबोधनाचा जन्म नव्हे. ते काम आमच्यापेक्षा आमची इतर भावंडे उत्कृष्टपणे पार पाडीत असतातच. देशाच्या परिस्थितीचे रंग आताशा इतके झपाझप बदलत आहेत की कोणता रंग खरा कोणता खोटा, हे निश्चयाने सांगणेसुद्धा धाडसाचे होऊन बसले आहे. अशा अवस्थेंत प्रत्येक महत्त्वाच्या परिस्थितीकडे चिकित्सक दृष्टीने पाहून निश्चित विचारांची निष्पत्ति कशी करावी याची दिशा दाखविण्याचे कार्यच आजपर्यंत प्रबोधन करीत आलेले आहे आणि हेच त्याचे धोरण पुढेही अबाधित राहील.`
पहिल्या अंकातलं संपादकीय तर प्रबोधनकारांनी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजेच सीकेपी समाजाला उद्देशूनच लिहिलेलं दिसतं. त्यांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष काढत त्यांना देशहितासाठी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजाने स्वतःची सुधारणा केली तर महाराष्ट्र सुधारेल आणि देशही सुधारेल, असं सूत्र त्यांनी मांडलंय. त्यानुसार त्यांनी मराठा समाजाने अल्प काळात केलेल्या प्रगतीचं उदाहरणही दिलंय. त्यात प्रत्येक समाजाने आपापली नियतकालिकं काढल्याचा संदर्भ त्यांनी दिलाय, `एकट्या मराठा बांधवांनी चालविलेली साप्ताहिके व मासिके जवळजवळ २५ असून, त्यांचा लोकप्रिय विजयी मराठा लवकरच दैनिक होणार आहे… त्याचप्रमाणे पांचकळशी, भंडारी, वंजारी, तेली, तांबट, लोहार, सुतार, यांनी, फार काय पण, धेड, महार, मांग यांसारख्या आमच्या अवनत देशबांधवांनी आज शेकडो वृत्तपत्रे व मासिके चालवून आपल्या ज्ञातीच्या संघशक्तीला बेसुमार थरारून सोडले आहे.` त्यात सीकेपी मागे पडला आहे आणि सीकेपी समाजातले दोष घालवून जागृती आणण्याचं काम `प्रबोधन` करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. शेवटी ते सीकेपींनी आवाहन करतात, `भरतभूमीच्या सौभाग्याकरितां, हे कायस्थ संघा, तूं जर खरा क्षत्रिय असशील तर पूर्व इतिहासाला स्मरून राष्ट्रीय कामगिरी करण्यासाठी उत्तिष्ठतजाग्रत प्राप्य वरान्निबोधत.`
उत्तिष्ठतजाग्रत प्राप्य वरान्निबोधत, हे `प्रबोधन`चं ब्रीद असल्याचं इथे लक्षात घ्यायला हवं. प्रबोधनकार सांगतात त्याप्रमाणे सीकेपी समाजाची लोकसंख्या तेव्हा ५० हजार असावी. सीकेपी हे स्वतःला क्षत्रिय मानतात. तरीही ते पांढरपेशा आहेत. पत्रव्यवहार आणि कारकुनी हे त्यांचं परंपरागत काम आहे. पण त्यांनी शिवकाळात तलवारीनेही मोठा पराक्रम गाजवलेला आहे. अशा सीकेपी समाजात नवी जागृती निर्माण करण्याचं काम प्रबोधनकारांनी केलं. त्यासाठी त्यांना `प्रबोधन`ची मोठी मदत झाली.
`प्रबोधन`च्या आधीही इंग्रजी बुलेटिन काढून ते सीकेपींना सुधारणांसाठी आवाहन करत होतेच. त्यांनी `प्रबोधन`मधून सीकेपींच्या इतिहासाच्या बदनामीचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. त्यातून सीकेपींमध्ये आपल्या पूर्वजांच्या इतिहासाविषयी स्वाभिमान उभा केला. दादाजी नरसप्रभू, बाजीप्रभू देशपांडे, रंगो बापूजी असे इतिहासातले अनेक आदर्श जवळपास शून्यातून उभे केले. शिवाय दरोडेखोरांशी सामना करताना मृत्युमुखी पडलेल्या प्रभाकर सुळे यांच्या स्मृती जपण्यासाठीही प्रयत्न केले. समाजाच्या संस्थांच्या भोंगळ कारभारावर टीका करून तो लोकाभिमुख करायला भाग पाडलं. लग्नात होणारा खर्च आणि हुंडा पद्धतीविरुद्ध आंदोलन करून त्याला आळा घातला. विधवाविवाह आणि आंतरजातीय विवाहांना चालना दिली. समाजातल्या उत्तम कवी, लेखकांना मंच मिळवून दिला.
सनातन्यांच्या नादी लागलेल्या समाजातल्या काही प्रतिगामी मंडळींचा अपवाद वगळता देशभर पसरलेल्या सीकेपी समाजाने `प्रबोधन`ला चांगला पाठिंबा दिल्याचं आढळतं. सीकेपी समाजातल्या अनेकांनी वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, संपादनाच्या कामातले सहकारी, लेखक, पत्रलेखक म्हणून `प्रबोधन`च्या बर्यावाईट दिवसांत साथ दिली. असा एखाद्या समाजातला एकगठ्ठा वाचक नसताना नियतकालिक चालवणं त्या काळात व्यावहारिकदृष्ट्या शक्य नव्हतं. पूर्वायुष्यात प्रबोधनकारांना सीकेपी समाजाच्या संस्थांकडून वाईट अनुभव आलेले असतानाही त्यांनी या समाजाच्या प्रगतीसाठी लढा दिला. त्यांनी १९४५पासून अखिल भारतीय चां. का. प्रभुहितवर्धक संस्थेसाठी `समाजसेवा` हे मासिक पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ चालवल्याचा संदर्भ सापडतो.