• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

एकजुटीची वज्रमूठ हीच खरी आदरांजली!

- (मर्मभेद २१ जानेवारी २०२३)

Nitin Phanse by Nitin Phanse
January 19, 2023
in संपादकीय
0

आणखी दोन दिवसांनी शिवसेनेचाच नव्हे तर महाराष्ट्राचा एक मंगल दिवस एखाद्या सणासारखा साजरा होणार आहे… देशातील एकमेव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन हा तो स्फूर्तीदायी दिवस असेल. साहेबांना प्रत्यक्ष पाहिलेल्या, त्यांचा मायेचा स्पर्श अनुभवलेल्या, त्यांचे जिव्हाळ्याचे दोन शब्द ऐकलेल्यांच्या मनात त्यांच्या आठवणींचे मोहोळ दाटेल. साहेबांनी उभारलेल्या आंदोलनांमुळे नोकरी मिळालेल्या, मुंबईत, महाराष्ट्रात सन्मानाने, ताठ मानेने जगणे शक्य झालेल्या अनेकांना या दैवताचे स्मरण करून नतमस्तक व्हावेसे वाटेल. त्यांच्या भाषणांमधील जळजळीत स्फुल्लिंगांनी एकेकाळी चेतलेली मने पुन्हा एकदा उसळून उठतील.
शिवतीर्थावर या दिवशी भगवा महासागर उसळेल. साहेबांच्या स्मारकाचे दर्शन घ्यायला गर्दी लोटेल. साहेबांचे पार्थिव याच ठिकाणी ज्वाळांच्या लोटात वेढले जात असल्याचे दृश्य आठवून अनेकांची मने हेलावतील. या दिवशी या ठिकाणी या दिवशी शिवसेनेशी गद्दारी केलेले, आईचे दूध विकणारे मिंधेही सरकारी सुरक्षेच्या गराड्यात येऊन नतमस्तक झाल्याचे नाटक करतील. कोणत्याही सुरक्षेविना आले असते तर ज्यांना शिवसेनाप्रमुखांच्या सच्च्या सैनिकांनी पळता भुई थोडी केली असते, त्यांना इथे नाटकी कढ काढताना पाहण्याचे दुर्भाग्य आपल्या नशिबी आले आहे, म्हणून शिवसैनिक कळवळेल, हळहळेल. पण, शिवसेना आणि संघर्ष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे आपण विसरता कामा नये. मुळात आपली लढवय्यांची संघटना आहे. राजकारणातून समाजकारण साधण्याचा साहेबांचा उद्देश सार्थ करण्यासाठी आपण त्या चिखलात उतरलो आहोत, हे विसरता कामा नये. जे काही करायचे, ते महाराष्ट्राच्या आणि मराठीजनांच्या हितासाठी, हे आपले ब्रीद आहे. त्याचाच मराठीजनांना विसर पाडण्याचे कुटील कारस्थान आज रचले जात आहे. मराठी माणूस एक आहे, तोवर महाराष्ट्राचे तुकडे पाडणे आणि मुंबई महाराष्ट्रापासून हिरावून घेणे शक्य नाही, हे लक्षात घेऊन हा भयंकर डाव टाकण्यात आलेला आहे.
महाराष्ट्रात राज्याच्या, जनतेच्या हितासाठी सगळेच पक्ष आपापल्या परीने प्रयत्नशील असतात. मात्र, मराठी माणसांचे हित सर्वप्रथम हे फक्त आणि फक्त शिवसेनेचे ब्रीद आहे. मराठी माणूस कोणत्याही पक्षाला मतदान करणारा असला, तरी शिवसेनेच्या बाबतीत काहीसा हळवा होतो, तो शिवसेनाप्रमुखांनी त्याला महाराष्ट्रात सन्मान मिळवून दिला म्हणून. म्हणूनच मराठी माणसाचे खच्चीकरण करायचे तर त्यासाठी आधी शिवसेना संपवली पाहिजे, हे लक्षात घेऊन शिवसेनेची दोन शकले करण्याचा प्रयत्न झाला. तो कसा झाला, कोणी केला, कसा केला, हे महाराष्ट्राने, देशाने तर पाहिले आहेच… पण, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांनीही ते पाहिले आहे म्हणतात. ट्रम्प आणि बायडेन एकत्र भेटले की ही विलक्षण क्रांती घडवून आणणार्‍या कोणा दाढीधारी व्यक्तीची चौकशी करतात म्हणे!
हा अंक प्रकाशित होण्याच्या आधी देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे एकमेव स्टार प्रचारक नरेंद्र मोदी मुंबईत येऊन काही फुटकळ कामांची उद्घाटने, लोकार्पण वगैरे करून एक सभा घेऊन गेलेले असतील. या सभेसाठी कोणी किती गर्दी गोळा करायची, याची टार्गेट दिली गेली आहेत आणि तेवढ्या बस भरून आणण्याच्या जबाबदार्‍या सोपवल्या गेल्या आहेत, इतकी मोदींची लोकप्रियता अफाट आहे. मोदींचा दौरा होणार म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार, असे सगळेच राजकीय निरीक्षक मानतात. जिथे निवडणूक नाही तिथे शेतकरी रक्त ओकून मेले तरी मोदी जात नाहीत आणि जिथे निवडणूक आहे, तिथे ग्रामपंचायतीच्या रस्ते खडीकरणाच्या कामाचे लोकार्पण करायलाही सगळा सरकारी तामझाम घेऊन येतात, अर्धवट कामांची उद्घाटने करून जातात, हा त्यांचा आजवरचा लौकिक आहे. तो काही आताही खोटा ठरायचा नाही.
शिवसेनेबरोबर युती करून, शिवसेनाप्रमुखांच्या अफाट लोकप्रियतेवर स्वार होऊन महाराष्ट्राच्या तंबूत शिरलेला भाजपचा ऊंट आता शिवसेनेला त्या तंबूतून बाहेर काढण्याच्या सूडभावनेने पछाडलेला आहे. ज्यांच्या खांद्यावर स्वार होऊन राज्यात प्रवेश मिळवायचा, त्यांनाच संपवायचे, ही त्यांची नीती आहे. शिवसेनाप्रमुखांचे सच्चे वारसदार असलेल्या शिवसेनेला संपवणे शक्य नाही, हे त्यांना कळेलच. त्यांचे डाव त्यांच्यावर उलटवायला शिवसेनेचे शिलेदार सज्ज आहेत. पण, या लढाईत मुंबईचे काय होणार, मुंबईतील मराठीजनांचे काय होणार, हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर मराठीजनांनाच शोधायचे आहे. आमचीच खरी शिवसेना असे सांगणारे गद्दार, फुटीर, खोकेबहाद्दर आपल्या पक्षाचे झाले नाहीत, ते मराठी जनतेचे काय होणार? एका जिल्ह्याच्या एका भागापुरता प्रभाव असलेल्या मनसबदाराची बेडकी फुगून फुगून बैल होणार आहे का? त्यांच्या मागे उभ्या असलेल्या तथाकथित महाशक्तीने मिंध्यांचे शक्तिस्थान असलेल्या ठाणे जिल्ह्यातच त्यांना बेदखल करायला सुरुवात केली आहे. आज त्या डुगडुगत्या फळकुटाचा आसरा घेतलेले उंदीर उद्या महाशक्तीच्या होडग्यात उड्या घेतल्याशिवाय राहणार आहेत का? साहेबांच्या जन्मदिनी त्यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांचा खरा वारसा चालवणारे आम्हीच असे सांगणारे निवडणुका जाहीर झाल्यानंतर उभे राहण्याच्या स्थितीत असतील तरी पुष्कळ आहे आणि त्यांच्या गटात राहिले तर हत्तीवरून साखर वाटावी लागेल, अशी परिस्थिती आहे. यांचे उद्या काय होणार, याचा पत्ता नाही, मंत्रिपद नाहीतर महामंडळ यातले काही मिळाले नाही तर हे बाहेर पडायला तयार, असे असताना हे बाळासाहेबांना अपेक्षित मुंबई आणि महाराष्ट्र घडवणार आहेत का?
मुंबईवर कब्जा करून देशाचे हे आर्थिक इंजीन ताब्यात घ्यायचे, या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या महाशक्तीने विचारपूर्वक टाकलेला डाव उलथवायची जबाबदारी मराठीजनांची आहे आणि महाराष्ट्रावर, मुंबईवर, साहेबांवर प्रेम करणार्‍या सगळ्याच अन्यप्रांतीय महाराष्ट्रीयांची आहे. मराठी माणसाची एकजूट तुटली की महाराष्ट्राचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही, हे लक्षात घेऊन ती एकजूट कायम ठेवण्याची, सर्व प्रकारचे भेद गाडून महाराष्ट्रीय म्हणून शिवसेनेच्या मागे ठाम उभे राहण्याची शपथ घेऊ या. तीच आदरणीय शिवसेनाप्रमुखांना खरी आदरांजली असेल.

Previous Post

नाय नो नेव्हर…

Next Post

`प्रबोधन’ कशासाठी?

Next Post

`प्रबोधन’ कशासाठी?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.