शिवी देणे किंवा गालिप्रदान यात दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्तिसमूह अपेक्षित असतात. दोन व्यक्ती किंवा दोन गटांमधील हा ‘शिवा शिवी’चा खेळ अतिशय श्रवणीय व मनोरंजक असतो. खेड्यापाड्यांमधून शिवीश्रवणाचा लाभ सतत होत असतो. शहरांमधील ‘सिव्हील लाईन्स’मध्ये मात्र हा लाभ नसतो… सांगताहेत ज्येष्ठ लेखक द. तु. नंदापुरे.
– – –
‘शिव्यांचे व्याकरण’ हे शीर्षक पाहून असंख्य वाचक बंधु-भगिनींना नक्कीच वाटेल की याचा लेखक हा कुणीतरी ‘खेडूत शाळामास्तर’ असला पाहिजे. कारण शिव्या देण्याचे काम बहुधा खेडूत लोकांनाच जमते. आणि व्याकरणाच्या फंदात केवळ शाळामास्तरच पडतात, असा त्यांचा (पक्का) गैरसमज असू शकतो. ‘खेडूत शाळामास्तर’ हे माझे वर्णन अक्षरश: खरे आहे. परंतु ती मला ‘शिवी’ वाटेल. मला वाटते, सगळ्यांनी मला ‘शिव्यांचे आद्य व्याकरणकार’ समजावे. कारण शिव्यांमध्ये व्याकरण शोधण्याचा प्रयत्न अद्याप कुणीही केला नसेल. (असे मला वाटते.)
‘शिवी’ हा शब्द कसा व्युत्पन्न झाला हे कळत नाही. बहुधा तो तद्भव शब्द नसून मराठी देशी शब्द असावा. शिवीला संस्कृत किंवा हिंदीमध्ये ‘गाली’ म्हणतात. संस्कृतात अनेकदा गालिदान किंवा गालिप्रदान असा शब्दप्रयोग येतो. मराठीतही ‘शिवीगाळ’ असा शब्दप्रयोग होतो. त्यातील ‘गाळी’ म्हणजेच ‘गाली’ होय.
मी जेव्हा ‘शिव्यांचे व्याकरण’ शोधू लागलो, तेव्हा प्रथम शिव्यांना व्याकरणात कुठे स्थान मिळेल ते पाहू लागलो. मराठी व्याकरणाची पुस्तके पाहता पाहता मला एका ठिकाणी शिव्यांना स्थान देणारी एक छोटीशी फट आढळली. व्याकरणातील ‘विशेषण’ प्रकरणात तशी फट आहे. व्याकरणात विशेषणांचे गुण विशेषण आणि संख्या विशेषण असे दोन प्रकार आहेत. (हे तुम्ही बहुधा सहावी-सातवीत शिकले असालच.)
गुण विशेषणांमध्येच दुर्गुण विशेषण किंवा अवगुण विशेषण असा उपप्रकार समाविष्ट केला की शिव्यांना व्याकरणात अवश्य स्थान मिळू शकते. (नवीन व्याकरण-लेखकांनी हे लक्षात घ्यावे अशी विनम्र सूचना.)
‘शिवी’ची व्याख्या
व्यक्ती, समाज, प्राणी, वस्तू किंवा कामे यांचे दुर्गुण-अवगुण दर्शविणार्या क्रोध व तिरस्कारयुक्त शब्दांना ‘शिवी’ म्हणतात. क्रोध, संताप, तिरस्कार नसल्यास त्यांना निंदा म्हणतात. अर्थात ‘शिवी’ हा समोरासमोर दिली जाते, तर निंदा (किंवा नालस्ती) माघारी, अनुपस्थितीत केली जाते.
शिव्यांचे प्रकार
शिव्यांचे ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात.
१) सभ्य शिव्या : (शिव्यांना सभ्य म्हणणे हासुद्धा एक प्रचंड विनोद आहे.) ज्या शिवीवाचक शब्दांचा उच्चार उघडपणे लोकांसमोर किंवा लिखाणात करता येतो किंवा लिखाणात ते शब्द वापरले जातात त्या ‘सभ्य शिव्या’ होत.
२) असभ्य शिव्या : ज्या शिव्यांचा उच्चार करणे असभ्य व असंस्कृतपणाचे मानतात, त्या असभ्य शिव्या. या असभ्य शिव्यांनाच ग्राम्य, अर्वाच्य, अश्लील किंवा इरसाल शिव्या असेही म्हणतात. अशा शिव्या लिखाणात वापरत नाहीत. त्याऐवजी XXXX अशा फुल्यांचा वापर ‘सभ्य लोक’ करतात. परंतु आजकाल बरेच वास्तववादी लेखक (लेखिका नाही) वास्तवतेच्या नावाखाली सर्रास अश्लील, इरसाल शिव्यांचा वापर लिखाणात करतात. त्याद्वारे साहित्यात ‘अपूर्व क्राती’ घडल्याच्या बोंबाही ठोकतात.
अर्थात या ठिकाणी फक्त सभ्य आणि लिहिण्यायोग्य शिव्यांचेच व्याकरण सांगण्यात येईल.
शिव्यांची निर्मिती
शिवी देणे किंवा गालिप्रदान यात दोन व्यक्ती किंवा दोन व्यक्तिसमूह अपेक्षित असतात. दोन व्यक्ती किंवा दोन गटांमधील हा ‘शिवा शिवी’चा खेळ अतिशय श्रवणीय व मनोरंजक असतो. खेड्यापाड्यांमधून शिवीश्रवणाचा लाभ सतत होत असतो. शहरांमधील ‘सिव्हील लाईन्स’मध्ये मात्र हा लाभ नसतो. परंतु झोपडपट्टींमध्ये अर्वाच्य, अश्लील गालिदान सतत चालू असते. (त्यात रुची असणारांनी वेळोवेळी झोपडपट्टीत चकरा मारून गालीश्रवणाचा लाभ अवश्य घ्यावा.)
शिव्या का देतात?
व्यक्ती-व्यक्तींमध्ये किंवा समूहा-समूहांमध्ये कोणत्या तरी कारणाने राग, द्वेष, मस्तर, हेवा, आकस, क्रोध, संताप, तिरस्कार इ. भावना निर्माण होतात. त्या भावनांचे प्रकटीकरण शिव्यांद्वारे होते. म्हणजेच शिव्यांच्या निर्मितीसाठी भांडण, तंटा किंवा झगड्यांची गरज असते. त्या झगड्यांमध्येच संतप्त मनातून वरील भावना शिव्यांद्वारे प्रकट होतात.
आता आपण सभ्य शिव्यांचे काही उपप्रकार पाहूया.
१) जातीवाचक शिव्या : दोन व्यक्ती किंवा समूहांच्या भांडणात सर्वप्रथम प्रतिपक्षाच्या जातीचा अपमानकारक उल्लेख करतात. उदा. कुणबट, ब्राह्मण्या, कुंभार्या इ. (एक महत्त्वाची सूचना- जातीवाचक शिव्या देणे हा दखलपात्र गुन्हा आहे. जातीवाचक शिव्या दिल्यास पोलिसी झंझट मागे लागण्याचा फार संभव असतो. त्यामुळे शहाण्यांनी अशा शिव्या देण्याचा मूर्खपणा चुकूनही करू नये.)
२) कुलवाचक शिव्या : एकाच जातीच्या व्यक्तींचा झगडा असल्यास त्यात परस्परांच्या कुळांचा निंदाजनक उल्लेख करतात. उदा. देशमुखडा, धोत्र्या (धोतरे ऐवजी), कोल्ह्या (कोल्हे ऐवजी), देशपांड्या इ.
३) शारीरिक व्यंगदर्शक शिव्या : झगड्यात शारीरिक व्यंग दर्शविणार्या अपशब्दांचा देखील वापर करतात. उदा. आंधळ्या, भोकन्या, चकन्या, टकल्या, लंगड्या, फेंगडा, ठेंगू, बूटबैंगण, लंबू, लांबटांग्या, ठुसका, फेंदर्या, ढेरपोट्या, बहिरा, नकटा इ.
४) मातापित्यांचे व्यंगदर्शक शिव्या : शिव्या देणारे लोक बहुधा असंस्कृतच असतात. परंतु त्यातही जे आणखी निम्नश्रेणीचे असतात ते परस्परांच्या मातापित्यांच्या व्यंगाचा उल्लेख करतात. उदा. आंधळीच्या, नकटीच्या, ढेरपोट्याच्या, वाकडतोंड्याच्या, वातडलीच्या इ.
५) प्राणीवाचक शिव्या : अनेकदा व्यक्तींच्या स्वभावानुसार त्यांना प्राणीवाचक शिव्या देतात. हा शिव्यांचा अत्यंत सभ्य प्रकार मानला जातो. उदा. मूर्ख या अर्थी गाढव, गधा, बैल. आधाशीपणासाठी लांडगा, डुक्कर, धूर्तपणासाठी कोल्हा इ.
(प्राणीवाचक विशेषणे प्रशंसापरदेखील आहेत. उदा. गरीब, परोपकारी व मायाळू गाय, शूर व पराक्रमी वाघ किंवा सिंह इ. परंतु या शिव्या नव्हेत.)
६) व्यावसायिक प्रतिकात्मक शिव्या : जातवार धंदा वा व्यवसाय करणारांना त्या धंद्यातील प्रतिकात्मक वस्तूंचा उल्लेख करून शिव्या घालण्याची देखील प्रथा आहे. उदा. शेतकरी (कुणब्यास) नांगर्या, माळ्यास कांदा, न्हाव्यास वस्तरा, सोनार- हातोडी, लोहार- भाता, व्यापारी (दुकानदार)- तराजू, काटा- गोटा. (आजकाल राजकारणी क्षेत्रात मराठा-देशमुखांना ‘सागवान’, इतरांना ‘आडजात’ अशा ‘जंगली’ शिव्या आमच्या विदर्भात रूढ झाल्यात.)
शिव्यांचे हे ठळक प्रकार आहेत. आता आपण शिव्यांचे प्रत्यय पाहूया.
१) ‘या’कारान्त : उदा. मास्तर- मास्तर्या, याप्रमाणेच डॉक्टर्या, कुंभार्या, सोनार्या, लोहार्या, चांभार्या इ.
२) ‘डा’कारान्त ; ‘या’कारान्त शिव्यांमध्ये रागाची तीव्रता दिसत नाही. क्रोधभरित शिव्यांसाठी ‘डा’ प्रत्यय मात्र सर्वत्र रूढ आहे. उदा. मास्तरडा, डॉक्टरडा, वकीलडा, कुंभारडा, सोनारडा, ब्राह्मनाड्या, कोमटाड्या इ.
मुख्यत: शिव्या या ‘डा’कारान्तच असतात. आचार्य अत्रे यांनी खूप वर्षांपूर्वी पाणिनीय व्याकरण सूत्रांच्या धर्तीवर ‘तिरस्कारार्थ ड्यच’ असे शिवी सूत्र बनवले.
‘डा’ प्रत्यय केवळ व्यक्ती किंवा समाजालाच लागते असे नाही तर निर्जीव वस्तूंना किंवा क्रियांनाही तिरस्कार किंवा तुच्छता दर्शविण्यासाठी वापरतात. उदा. बांक- बांकडा, लेप (रजई)- लेपडं, रुपया- रुपड्डा. विदर्भात स्त्रियांच्या तोंडी त्यांच्या नित्यकामा पुढीलप्रमाणे तुच्छतादर्शक शब्द (शिव्या) असतात. उदा. घरकाम- कामोडा, पाणी भरणे- पानोडा, कपडे धुणे- धुनोडा, भांडी घासणे- भांडोडा, स्वयंपाक- खानोडा इ.
३) ‘म’कारान्त : ज्या वस्तू, प्राणी किंवा व्यक्तींची नावे ‘ड’कारान्त आहेत, त्यांना शिवीवाचक ‘म’ प्रत्यय लावतात. उदा. घोडा- घोडम, खोड- खोडम, घोडे, खोडे या आडनावांनाही घोड्या, खोडम्या असे म्हणतात.
४) ‘ट’कारान्त : कुणबी- कुणबट, मांग- मांगटा.
५) ‘गोटा’ प्रत्ययान्त : काही जातींना ‘गोटा’ प्रत्ययान्त शिव्या देतात. उदा. तेली- तेलगोटा, बारी- बारगोटा, माळी- माळगोटा, म्हाली (न्हावी)- महालगोटा इ.
६) ‘लाडू’ प्रत्ययान्त : विदर्भात, मराठवाड्यात बहुतेक सर्वत्र शेती, व्यापार व सावकारी करणारा सधन ‘कोमटी’ समाज आहे. मूळात हा समाज तेलगू भाषिक होता. त्यांचा तुच्छतादर्शक उल्लेख इतर लोक ‘कोमट लाडू’ या शब्दाने करतात. इतर कोणत्याही जातींसाठी ‘लाडू’ लावीत नाहीत. ‘लाडू’ हा केवळ कोमट्यांसाठीच राखीव आहे. (सूचना- जातीवाचक शिव्या देताना देशमुख लाडू, कुणबी लाडू, ब्राह्मण लाडू, माळी लाडू, सोनार लाडू असे चुकीचे शिवीप्रयोग वापरू नयेत. ती ‘ग्रॅमेटिक मिस्टेक’ होईल.)
असे हे शिव्यांचे प्रकरण.
याच निमित्ताने ‘व्याकरणांच्या शिव्या’ हाही एक मनोरंजक प्रकार पाहूया. हा किस्सा आहे अव्वल इंग्रजी अमदानीतला. पुण्याला एक इंग्लीश मामलेदार होते. त्यांना मराठी भाषा शिकावी असे वाटले. एक मराठी शिक्षक त्यांना मराठी शिकवीत होते. एका आठवड्यात त्यांचे मराठी व्याकरणाचे अध्ययन चालू होते. ते त्या शिक्षकाकडे पायी जात होते. त्या काळात इंग्लीश लोकांबद्दल भारतीय लोकांना खूप तिरस्कार वाटत होता. इंग्रज अधिकारी क्वचित रस्त्याने जाताना दिसले की बायाबापड्यांच्या शिव्यांना ऊत येई. इंग्लीश बाया-माणसे दिसली की, त्यांना ‘बुहारा, बुहारतोंड्या, पांढरपाया, दळभद्रा, अपशकुनी, नाटोड्या’ अशा एक ना दोन हजार शिव्या स्त्रियांच्या तोंडी येत. इंग्रज लोकांना या बाया आपल्या शिव्या देतात एवढे समजत होते, पण त्याचा अर्थ कळत नव्हता. त्यांना प्रत्युत्तर कसे द्यावे हे समजत नव्हते.
एक दिवस आपले हे मामलेदार साहेब शहरातून जात होते. एका चौकातल्या विहिरीवर दहा-पंधरा बाया पाणी भरत होत्या. त्या साहेबास पाहताच त्या भगिनींनी आपले नेहमीचे गालिदान चालू केले. नेहमी मुकाट्याने जाणारे साहेब त्यावेळी मात्र तेथेच धीटपणे उभे राहिले आणि प्रत्येकीकडे बोट दाखवून म्हणू लागले, ‘तू नाम आहेस, सर्वनाम आहेस. ती क्रिया विशेषण आहे आणि पलीकडची ती संधी आहे. संधी, संधी, संधी. नुसती संधी नाही तर तू स्वरसंधी आहेस. तू व्यंजनसंधी आहेस. केवळ संधी नाही तर तू तद्धित आहेस. ही मध्यमपद लोभी आहे. ती द्विगु आहे. यू आर संधी हंड्रेड टाइम्स. यू आर संधी मोअर दॅन हंड्रेड टाइम्स. तू कर्मधारय आहेस. ती तत्पुरुष आहे. काय समजलीस?’
मामलेदार साहेबाचा तो तोंडाचा पट्टा पाहून सर्व पाणीभर्या बाया गांगरल्या. त्यांना ते काहीच समजले नाही. सगळ्याजणींनी आपापल्या घागर्या घेऊन घराकडे धूम ठोकली. दुसर्या बायांनी विचारल्यावर त्या सांगू लागल्या, ‘माय माय माय, त्यो साहेब काय काय बोलला माय. जे बोलू नव्हंय ते बोलला माय. सांगूशा वाटत नाही. ऐकूशा वाटत नाही.’
अशा रितीने त्या साहेबाने त्या बायांची बोलती बंद केली. पुन्हा त्या बाया कधी त्या साहेबाच्या वाटेस गेल्या नाहीत. त्या शिवराळ बायांच्या श्िाव्यांना साहेबाने समर्थपणे तोंड देऊन त्या बायांची तोंडे कायमची बंद केली. शिव्यांना प्रत्युत्तर देण्याकरिता व्याकरणाचा असा ‘शिवराळ’ उपयोग करण्याचा अभूतपूर्व प्रकार आपल्या महाराष्ट्रात होऊन गेला. असे आहे शिव्यांचे व्याकरण आणि व्याकरणाच्या शिव्या.
(मो. ८३०८९३९३६३)