सातार्याचे दैव आणि दैवाचा सतारा! हा लेख प्रबोधनकारांच्या इतिहासविषयक दृष्टिकोनाचं उदाहरण तर आहेच, पण त्याचबरोबर हा लेख प्रबोधनकारांच्या तेजतल्लख शैलीचं उत्तम उदाहरण आहे. म्हणून मागील भागावरून पुढे आज लेखाचा शेवटचा भाग जसाच्या तसा देत आहोत.
– – –
चिरंजीव शाहू महाराज भोसले आज ज्या गादीवर दैवाच्या सातार्यानें अधिष्ठित झाले आहेत, त्याच गादीवरून प्रतापसिंह छत्रपतीला ४ सप्टेंबर १८३९ रोजी रात्री भर १२ वाजतां उघड्या नागड्या स्थितीत हद्दपार व्हावें लागलें आहे, ही गोष्ट नजरेआड केली तरी हृदयफलकावरून पुसून टाकतां येत नाही. ही गादी महाराष्ट्राच्या अनुपमेय स्वार्थत्यागावर राजाराम छत्रपतींच्या हस्ते जरी स्थापन झालेली आहे, तरी तिच्यावरील प्रत्येक छत्रपति पेशव्यांच्या भिक्षुकी कारस्थानाला बळी पडलेला आहे, ही गोष्ट विद्यमान मातुश्री ताराबाईसाहेब यांनी विसरून भागावयाचे नाही: सातारच्या गादीला भिक्षुकी वर्चस्वाचें कायमचें ग्रहण न लागतें तर मुंबईच्या टोपकर बनिया कंपनीला प्रतापसिंह छत्रपतीच्या आंगाला हात लावण्याची काय छाती होती?
ज्या मराठ्यांनी जिंजीचे राजकारण लढवून औरंगजेबासारख्या कर्दनकाळ दैत्याची मुत्सदेगिरी आणि लष्करी डावपेच, डोळ्याचे पाते लवते न लवतें तोंच ठेचून जमीनदोस्त केले, तेच मराठे वीर आपल्या छत्रपतीला पापस्मरण बाळाजीपंत नातू आणि कर्नल ओव्हान्स ह्यांनी दंडाला धरून तक्तावरून खेचून हद्दपार करतांना नामर्द हिजड्याप्रमाणें स्वस्थ कसे आणि का बसले? त्यांच्या तलवारीची पातीं आणि भाल्यांचीं फाळें एकदम अवचित बोथट का पडली? त्रिखंडविश्रुत मराठ्यांचा दरारा त्याच काळरात्रीं कमकुवत कसा झाला? या प्रश्नांची उत्तरें ताराबाई मासाहेब, आपण आपल्या हृदयाला विचारा, म्हणजे आपल्या युवराजाच्या देवाचा सतारा यापुढें कोणत्या शिस्तीनें वळविला पाहिजे याची आपल्याला पूर्ण जाणीव होईल. आजहि आपल्या भोंवती स्वार्थी लाळघोट्या कारस्थान्यांचा गराडा पडलेला आहे. त्यांच्या कारवाईची योग्य वेळीच वाट लावली नाहीं, तर आपल्या युवराजाच्या दैवाच्या सतार्याची वाट उरल्यासारखीच म्हणावी लागेल.
भिक्षुकी वर्चस्वाचें जंतर मंतर आपल्या काळजाला आरपार भिनून तें जर थंडगार पडले असेल, तर ज्या तक्तावर आज आपण एका भाग्यवान युवराजाची स्थापना केली आहे, त्या तक्तापुढे येत्या ४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री आपण शांत चित्तानें चिंतन करीत बसा, म्हणजे त्या तक्ताच्या हृदयांतून पिळवटून बाहेर पडणार्या रक्ताच्या चिळकांड्या आपल्या व आपल्या युवराजाच्या वास्तविक स्थितीची आपणांस पूर्ण कल्पना करून देतील, वेशासंपत्र आप्पासाहेब सांगलीकर आणि चित्पावन आयागो बाळाजीपंत नातू ह्यांच्या उलट्या काळजाच्या धर्मकारणाला आपल्या ऊर्ध्वमुखी राजकारणाची फोडणी देऊन बनिया कंपनीनें त्या तक्ताला दिलेला भडाग्नी जड सृष्टींत आपल्या लौकिकी डोळ्यांना जरी दिसत नसला किंवा आपल्या पूज्यपतीच्या गादीखाली तो भासत नसला, तरी तो विझवण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या हृदयांत चिरकाल विराजमान झालेल्या शिवछत्रपतीच्या शिवतक्ताच्या पुनरुज्जीवनासाठीं, एक दोन नव्हे तर सतत १४ वर्षे विलायतेस रंगो बापूजीनें लढविलेला प्राणांतिक झगडा, आणि सरते शेवटीं सत्तावन साली मर्हाठशाहीनें अवघ्या हिंदुस्थानाला पाठीशीं घालून दिल्लीच्या समरांगणावर केलेला अखेरचा मर्दानी थैमान ह्याचा चित्तवेधक, स्फूर्तिदायक परंतु हृदयाचें पाणी पाणी करणारा खेदजनक इतिहास तें तक्त आपणांला, मासाहेब मोठ्या आवेशानें खास खास कथन करील.
ज्या तक्तावर चिरंजीव शाहूमहाराज आपल्या दैवाच्या सतार्यानें बसले आहेत, त्या तक्ताखालीं ब्राह्मणेतरांच्या सर्वांगीण प्रबोधनाचा प्रश्न अर्धवट मेल्या स्थितींत कण्हत कुंथत पडलेला आहे. त्या तक्ताच्या खालीं प्रतापसिंहाच्या सत्याग्रहाच्या धडाडीबरोबरच भोसले घराण्यांतल्या राजस्त्रियांच्या किंकाळ्या आपल्याला अजून ऐकूं येतील. त्या तक्ताच्या खालीं ब्राह्मणांच्या राष्ट्रद्रोहाबरोबर आप्पासाहेब भोसल्याचा घरभेद, आप्पा शिंदकराचा हारामखोरपणा, तात्या केळकराचे खोटे शिक्के, नागोदेवरावची भिकी सोनारीण, भोरचे पंतसचीव वगैरे अनेक वीररत्नांच्या कारस्थानांचे देखावे, ताराबाई साहेब, आपल्याला त्या रात्रीं स्पष्ट दिसूं लागतील.
छत्रपतीच्या तक्ताला पेशवाई वळणाचें भिक्षुकी ग्रहण कसें लागलें, ब्राह्मण ब्राह्मणेतर वादामुळें अभिमाना ऐवजीं स्वदेशद्रोहाचें बाळकडू मर्हाठे कसे प्याले आणि कायदेबाजीच्या सबबीवर बनिया कंपनीनें सातारच्या पूज्य छत्राचें तीन तेरा आपल्याच लोकांच्या हातून कसे वाजविले, ह्या सर्व गोष्टीचा आपण नीट मननपूर्वक अभ्यास केला आणि त्या दिशेनें युवराजाच्या आत्मप्रबोधनाचा मार्ग आखलांत, तर केवळ काकतालीय न्यायानें घडून आलेल्या आपल्या चिरंजीवांच्या दैवाच्या सतार्याबरोबरच सातार्याचें दैवसुद्धां उदयास येण्याची आशा अजून नष्ट झाली नाहीं, असें आशाखोर मानवी मनाला वाटत असल्यास तो आशावाद खात्रीनें निंद्य गणला जाणार नाहीं, अशी आम्हाला आशा आहे.
इतिहास कसाही उलट सुलट वाचला आणि राजकारणाची तंगडी कशीही उलथापालथी करून चोखाळली तरी एक गोष्ट निर्विवाद आहे कीं, अवघा महाराष्ट्र सातारा राजधानीकडे कांहीं एका वर्णनीय भावनेनेंच नेहमीं पाहत असतो. आज या देवळांतला देव जरी नष्ट झाला असला तरी त्याची भिंताडें आणि रडके बुरूज ह्या देवाची आठवण त्यांच्या हृदयात क्षणोक्षणीं उचंबळवीत असतात. सातारच्या छत्रपतीच्या उच्चाटणाचें पाप जितकें स्वकीयांच्या पदराला बांधता येईल, तितकेंच ते ईस्ट इंडिया कंपनीच्या पाटलोणीलाही भिडवितां येईल. जितक्या प्रमाणांत आमचें देशबंधु या कामीं जबाबदार ठरतील, त्यापेक्षां शतपट प्रमाणांत या पापाचा वाटा ब्रिटिश सरकारच्या मूळमाया कंपनीला अर्थात ब्रिटिश राष्ट्रालाही घ्यावा लागेल.
प्रतापसिंह छत्रपतीचें उच्चाटण हा ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरला कधीही न पुसला जाणारा कलंक आहे, अशा प्रकारचे तत्कालीन ब्रिटिश मुत्सद्यांचे अभिप्राय आज कागदोपत्रीं प्रसिद्ध आहेत. हिंदु लोकांनीं राष्ट्रद्रोह केला, तर ब्रिटिशांनी अन्याय केला, असा या प्रकरणाचा सारांश निघतो. सर्वांचीच त्यावेळीं बुद्धी फिरली, म्हणून शिव छत्रपतीची सातारा राजधानी खालसा होऊन तेथील भोसल्यांना नुसत्या साध्या जहागिरीवर संतुष्ट राहण्याची वेळ आली. आज काळ बदलला आहे. फाटलेल्या मनोवृत्ति सांधण्याचा सर्वत्र प्रयत्न होत आहे. हिंदी व ब्रिटिश लोकांचे संबंध समरस करण्याचे श्लाघ्य प्रयत्न चालू आहेत.
गतेतिहासाचा कसलाहि विकल्प मनांत न आणतां, मराठे वीरांनी गेल्या महायुद्धांत ब्रिटिशांच्या अब्रूसाठीं फ्रान्सच्या समरांगणांवर सांडलेलें रक्त अजून लालबुंद चमकत आहे. अशा परिस्थितींत अखिल मराठ्यांना अमरावतीप्रमाणे प्रिय असलेली सातारा राजधानी जर ह्या नव्या मन्वंतरांत पुनश्च स्वतंत्र मर्हाठी संस्थानाच्या पुनरुज्जीवनाला पात्र होईल, ब्रिटिश न्यायदेवता जर सातार्याच्या शिवछत्रपतीच्या परमप्रिय गादीची पुनर्घटना करील, तर त्यामुळें शिवराया प्रणिपात कराया ब्रिटानियेनें आपल्या उद्यांच्या बादशहाला हिंदुस्थानांत पाठवून जो कृतज्ञ भाव व्यक्त केला, त्या भावनेला काहीं तरी अर्थ आहे, असें महाराष्ट्र समजेल. आज हा विचार कित्येकांना रुचणार नाहीं. अनेकांना ही कल्पित कादंबरी वाटेल. बरेच विचारवंत त्याला स्वप्न म्हणतील. परंतु जेथें जेथें खरें मर्दानी मर्हाटी हृदय धमधमत असेल तेथें तेथें हा सातार्याच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न काळजाला जाऊन भिडल्याशिवाय कधींही राहणार नाहीं, अशी आमची खात्रीं आहे.
भांबुर्ड्याच्या धोंड्यावर कसलें तरी कांहीं तरी स्मारक उभारण्यापेक्षां सातारच्या संस्थानचें जर आज पुनरुज्जीवन होईल, तर महाराष्ट्राप्रमाणेंच ब्रिटानियेलासुद्धा एका महत्पातकाचे प्रायश्चित मोठ्या आबांत घेण्याची मंगल पर्वणी प्राप्त होईल. ब्रिटिशांसारख्या सर्वसमर्थ, धूर्त व कदरबाज राष्ट्राला महाराष्ट्राची जर कांहीं कदर वाटत असेल, मराठ्यांच्या आत्मयज्ञाची त्यांना बूज राखावयाची असेल, तर तिवाठ्या खवाट्यावर दगडाधोंड्यांची स्मारकें उभारण्यापेक्षां म्हैसूर, काशी वगैरे खालसा झालेल्या काहीं संस्थानांचें जसें त्यांनी पुनरुज्जीवन केलें, तद्वत् सातारच्या छत्रपतीचें व त्यांच्या पुरातन तक्ताचें पुनरुज्जीवन केल्यास मर्द मराठ्यांच्या हृदयांत आपलेपणांची भावना जागृत केल्याचें श्रेय त्यांना खास मिळेल. ही अशक्य कोटींतील गोष्ट नव्हे. ही ब्रिटिशांना सहजशक्य गोष्ट आहे. ही न्यायाची मागणी आहे. कृतकर्माचें प्रायाश्चित्त घ्या आणि सत्याची लाज राखा, असा हा उघडाउघड सवाल आहे. रात्रंदिवस शल्याप्रमाणें हृदयांत डाचत असलेल्या अमंगल गतेतिहासाला पुनरुज्जीवनाच्या मंगल कार्यानें पावन करा, असा हा न्याय्य मागणीचा अर्ज आहे. ह्या कामीं ब्राह्मणब्राह्मणेतरांनीं एकवटून कार्याला सुरुवात केल्यास त्यांच्या पूर्वजांनीं छत्रपतीच्या उच्चाटणाचें जें दुष्कृत्य केलें त्याच्या पापापासून त्यांची मुक्तता होईल आणि सातारा ही इतर देशी संस्थानांप्रमाणे पुनरुज्जीवित अशा शिव छत्रपतीची शिवनगरी झाली, तर तो मंगल सोहाळा महाराष्ट्राला त्याचप्रमाणें ब्रिटिश लोकांना मोठ्या अभिमानाचा, सत्यप्रियतेचा आणि न्यायप्रियतेचा म्हणून भावी इतिहासांत रेडियमच्या अक्षरांनीं चिरंजीव होऊन बसेल.
सातार्याची शिवनगरी बनविण्यासाठीं ब्राह्मणांनों, पूर्वग्रहांना विसरून एकनिश्चयानें तुम्ही तयार व्हा; कारण तुमच्या पूर्वजांनीं केलेल्या कर्माचें प्रायश्चित्त तुम्हांला घ्यावयाचें आहे. तें ह्या उमद्या मार्गानें घ्या. यांत सारे जग तुमच्या बुद्धिमत्तेचें कौतुक करील. तुमच्या पापभीरुत्वाची इतिहास ग्वाही देईल. ब्राह्मणेतरांनों, क्षत्रिय मराठ्यांनो, तुम्हांला शिवस्मारक पाहिजे ना? मग त्या भांबुर्ड्याच्या धोंड्यावर डोकी फोडण्यापेक्षां ह्या अभिनव शिवनगरीच्या उद्धारासाठीं तुम्ही आपलीं डोकीं अवश्य चालवा. आज तुम्हांला अस्सल भोसले कुळांतला एक बालवीर दैवाच्या सतार्यानें सातार्याचें दैव गदागदा हालविण्यासाठीं अकस्मात प्राप्त झाला आहे. ह्या संधीचा फायदा घेऊन तुम्ही शिवनगरीचा जर ध्यास घ्याल आणि प्रबोधनाच्या कल्पनेंत खेळणारी ही कल्पनासृष्टी प्रत्यक्ष अस्तित्वांत आणण्याच प्रयत्न कराल, तर बंदिवासाच्या हाल अपेष्टांत काशीला मरण पावलेला प्रतापसिंह छत्रपती आणि त्यांच्या नावासाठीं व तक्तासाठीं अनुपमेय आत्मयज्ञ करणारा रंगोबापूजी ह्यांच्या स्वर्गस्थ आत्म्यांना खात्रीने संतोष वाटेल.
सरतेशेवटीं ब्रिटिश राजकर्त्यांना आमची अशी विनंति आहे कीं, सातार्याच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रश्न आपण आतांही जर न सोडविला तर सत्य, न्याय आणि माणुसकी या तीनही तत्त्वांच्या दृष्टीनें ती एक मोठी नामुष्कीची गोष्ट होईल, असें छातीठोक विधान करण्यापुरता पुरावा गतेतिहासातूंन आम्ही लागेल तितका काढून देऊ. ब्रिटिशांना महाराष्ट्राच्या मनोभावनेची जर कांहीं दरकार असेल तर त्यांनी हा शिवनगरीचा प्रश्न अवश्य विचारांत घ्यावा. सद्दीच्या जोरावर छत्रपतींचे तहनामे रद्दी ठरविले गेले. जाऊं द्या. तत्कालीन रेसिदंटांनी गव्हर्नरांची मनें, ब्राह्मणांच्या चिथावणीनें, कलुषित केली; करूं द्या. रंगोबापूजींच्या १४ वर्षांच्या विलायती वनवासाला यश आलें नाहीं; न येऊं द्या. अनेक ब्रिटिश मुत्सद्यांची न्यायबुद्धी व सत्यप्रियता त्या वेळीं वांझोटी ठरली; ठरूं द्या. भूतकाळ मेला; मरूं द्या.
भविष्याकडे लक्ष द्या. भूतकाळाच्या भूतांना वर्तमानकाळात गति देऊन, भविष्यकाळाला उज्ज्वल करा. शिवरायाला नुसता मुजरा करूं नका; त्यांचे जिवंत स्मारक करा. प्रतापसिंह छत्रपतीची पदच्युतता म्हणजे अखिल महाराष्ट्राच्या काळजांत खोल घुसलेला आंग्रेजी जंबिया आहे. तो एक अन्याय आहे. ती एक सत्याची बेगुमान मुस्कटदाबी आहे. तो जंबिया आतां खेचून काढा. तो महाराष्ट्राचा अपमान आतां पुसून टाका. लढाईंत जिंकलेलें टिपू वाघाचें राज्य ज्या ब्रिटिश सरकारनें वडेयार हिंदू घराण्याला परत देऊन म्हैसूरचें राज्य पुनरुज्जीवित केलें; काशीच्या राज्याची पुनर्घटना केली, त्याच ब्रिटानियेला शिवरायाचें मूळ तक्त पुनरुज्जीवित करायला फारसें कठीण नाहीं. ब्रिटानिये! तुझ्यासाठीं मराठ्यांनीं आपलीं उमलती जवान पिढी युरपच्या रणयज्ञांत बळी दिली आहे, हे विसरूं नकोस. तुझ्या उद्याच्या नृपतीनें व हिंदुस्थानाच्या बादशहानें आमच्या शिवदेवापुढे टोपी काढून मुजरा केला आहे, हें लक्षांत घेऊन, सातारच्या अन्यायाचे परिमार्जन करायला ह्या वेळीं तूं तुझ्या इतिहासप्रसिद्ध न्यायबुद्धीचा उपयोग धोरणानें करशील अशी आशा आहे.
(लेख समाप्त)