• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हम नहीं सुधरेंगे…

- मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
July 19, 2024
in मर्मभेद
0

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमतापासून दूर ठेवून, त्यांचा चारशे पारचा फुगा फोडणार्‍या मतदारांनी तरीही एनडीए सरकारला पुन्हा संधी दिली. ही भाजपला आणि खासकरून त्यातली मोदी-शहा टोळी यांना सुधारण्याची दिलेली शेवटची संधी होती. सरकार स्थापनेच्या वेळी नीतीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी काही पाठीचा कणा दाखवला असता, तर आज इंडिया आघाडीचे सरकार देश चालवत असते. जनतेने मारलेली ही चपराक लक्षात घेऊन मोदी-शहा वर्तन सुधारतील, अशी अपेक्षा होती. पण सगळे भोपळे फुटले तरी मोदींच्या भ्रमाचा भोपळा काही फुटायला तयार नाही. निकालानंतर फक्त एक दिवस हे गृहस्थ एक जोड कपड्यात वावरले आणि एक दिवस त्यांनी संविधानाला नमस्कार करण्याचे नाटक केले. पुढच्या दिवसापासून ये रे माझ्या मागल्या! यांचे विमान उरले सुरले देश पाहण्यासाठी भरतभूमीवरून उडालेच! मणिपूर जळतंय, जळू दे, बिहारमध्ये धडाधड पूल कोसळतायत, कोसळू दे, पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रात हाहाकार माजवलाय, माजवू दे… मैं तो चला, जिधर चले रस्ता… इकडे भक्तगण आहेतच मोदीजी काय अप्रतिम आंतरराष्ट्रीय डिप्लोमसी करतायत, त्याचे निबंध खरडायला…
तिकडे मोदी रशियात पुतीनला मिठ्या मारत असताना रशियाने युक्रेनमधल्या बालकांच्या रुग्णालयावर हल्ला केला… मोदींच्या तोंडात मिठाची गुळणी… आणि म्हणे वॉर रुकवा दी पापा! भारत रशियावर जेवढा अवलंबून आहे तेवढाच रशिया भारतावर अवलंबून आहे… पण, हे दोन्ही नेत्यांच्या देहबोलीतून प्रकट झालं का? अजिबातच नाही. उलट मोदींनी पुढच्या देशाकडे उड्डाण करताच रशियाने पाकिस्तानबरोबर चुंबाचुंबी सुरू केली दुसर्‍याच दिवशी… ही मोदींची अफाट डिप्लोमसी!… मग ऑस्ट्रियात उभे राहून आपण ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच आलो, हे सांगण्याची आंतरराष्ट्रीय फजिती घडलीच… किमान आपल्या परात्पर कुलदैवताच्या, अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या देशाचं तरी नाव पाठ हवं की नको? देशात आल्याबरोबर गेले कुठे तर अंबानीपुत्राच्या विवाहसोहळ्याला… मणिपूरला जायला ज्यांना वेळ नाही, त्यांना ‘मनी’पूरला बरोबर जाता येते, ही तिखट टीका समाजमाध्यमांवरून झाली, ती अवाजवी कशी म्हणायची!
एकीकडे आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या नावाखाली ही छानछोकी मागच्या पानावरून पुढे सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आणीबाणी लादली जाण्याचा दिवस हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळण्याची घोषणा केली. भाजपला संपूर्ण बहुमत मिळालं तर ते देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न करतील, या मुद्द्याचा यंदाच्या निवडणुकीवर मोठा परिणाम झाला होता. आता केंद्रातल्या नेत्यांपासून महाराष्ट्राच्या गल्लीतल्या ईडीग्रस्त मिंध्यांपर्यंत प्रत्येकजण हे ‘नॅरेटिव्ह’ आहे हे रेटून सांगतो आहे. पण, संघाची विचारधारा, त्यांचा संविधानाला, राष्ट्रध्वजाला असलेला विरोध जगजाहीर आहे. गेल्या १० वर्षांत संविधानाला वळसा घालून किंवा त्यातल्या तरतुदी निष्प्रभ करून विषमतामूलक अनाचारी कायदे रेटण्याचे प्रयत्न या सरकारने केलेच आहेत. यांना बहुमत मिळालं तर काय करतील, याची कल्पना इतरांनी करण्याची गरज नाही; हळद लागण्याच्या आधीच हनीमूनच्या तयारीला लागलेल्या यांच्याच अतिउत्साही नेत्यांनी ते निवडणुकीआधी सांगितलं होतं. त्यात नॅरेटिव्ह कसलं?
आता या तथाकथित नॅरेटिव्हला उत्तर म्हणून तुम्ही संविधान हत्या दिवस पाळणार? तुम्ही? ज्यांनी पहिल्या फटक्यात आणीबाणीला बिनशर्त पाठिंबा दिला होता, त्या परिवाराने संविधानाच्या हत्येचा शोक करायचा हा केवढा मोठा जोक आहे! मग गेल्या १० वर्षांत तुम्ही केलेल्या घोडचुकांचे शोक दिन कसे पाळायचे? पेट्रोल, डिझेल, दारू वगैरे सोयीने वगळणारा किचकट जीएसटी लागू करण्याचा दिवस, नोटबंदी लादण्याचा दिवस, कोरोनाच्या काळात गोरगरिबांना देशोधडीला लावणारा लॉकडाऊन लादण्याचा दिवस, अखलाखच्या हत्येने झुंडबळींचा मार्ग खुला करण्याचा दिवस, शिवाय उत्तर प्रदेशात बुलडोझर दिवस पाळता येईल, दिल्लीत खिळे दिवस पाळता येईल. सीएए आणि शेतकरी कायद्यांचे तर सप्ताह पाळता येतील. वर्षभर शोक करता येतील इतके दिवस तर तुम्ही निर्माण केले आहेत. आता अर्धशतकापूर्वीच्या आणीबाणीच्या शिळ्या कढीला किती ऊत आणणार, ती सौम्य वाटावी इतका उत्मात तर तुम्ही आधीच करून मोकळे झाले आहात.
संसदेत पुरेशी चर्चा न करता फौजदारी कायदे रेटायचा प्रयत्न आणि महाराष्ट्रात जनसुरक्षा कायद्यांसारखे कायदे आणण्याचा प्रयत्न पाहता मागच्या धड्यांमधून आम्ही काहीही शिकणार नाही, तुम्ही आम्हाला बहुमत दिलं नाही, तरी आम्हाला हवी तीच मनमानी आम्ही करणार, असा मुजोर हटवादीपणा सुरू राहणार आहे. तो मोदी आणि त्यांच्या भाजपअंतर्गत टोळक्याने आताही चालवावा हे आश्चर्याचे आहे. कारण, मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पंतप्रधानपदावर तिसर्‍यांदा नको होते, हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळेच त्यांनी अतिशय घाईने भाजपच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होण्याच्या आधीच स्वत:ची एनडीएच्या नेतेपदी निवड करून घेतली आणि जुन्या टीमचंच मंत्रिमंडळ बनवलं. पण, ज्या दोन टेकूंवर त्यांचं सरकार उभं आहे, ते किती काळ त्यांना साथ देणार? या दोन पक्षांच्या मतदारांमध्ये आतापासूनच चलबिचल आहे मोदींना पािठंबा दिल्यामुळे. शेवटी राज्यातला पाया अस्थिर करून ते केंद्राला किती काळ टेकू देणार?
या पार्श्वभूमीवर मोदी आणि कंपनी जराही सुधारणार नसेल, तर महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांपासून त्यांना दुसरा धडा शिकवण्याची सुरुवात मतदार करतीलच…
…भल्या भल्या नाठाळांना वठणीवर आणतात मतदार! मग ते नाठाळ बायॉलॉजिकल असोत की इल्लॉजिकल!

Previous Post

नाय, नो, नेव्हर…

Next Post

अस्वस्थ इतिहासाचे `वर्तमान’

Next Post

अस्वस्थ इतिहासाचे `वर्तमान'

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.