तुम्हाला काही गोष्टी जमवण्याचा छंद आहे का? म्हणजे नाणी, पोस्टाची तिकिटे, स्टिकर्स, कार्ड, पेन किंवा अशाच एखाद्या गोष्टीचा तुम्ही संग्रह केला आहे का? एखाद्या आवडत्या गोष्टीचा संग्रह करणे ही चांगली गोष्ट आहे, कारण यामुळे त्या क्षेत्रातील तुमचे ज्ञान वाढते आणि तुमची आवड काय आहे, यातून तुमच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलूही त्यातून दिसतात. अशा जपून ठेवलेल्या आठवणी नंतर केव्हाही उघडून पाहताना किती आनंद होतो. नॉस्टॅल्जिक होऊन जातो आपण!
स्क्रॅपबुक ही अशीच एक भन्नाट संग्रहाची कल्पना आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? नाही माहिती? मी एक्स्प्लेन करतो. ही एक वही असते जिच्यात तुम्ही रंगीबेरंगी पाने, कोट्स, फोटो, लेख, स्टिकर्स, फोटो, चिन्हे, टॅटू असं काही बाही चिकटवून ठेवता आणि ते कलात्मक पद्धतीने नियमित भर घालून सजवत असता. सर्जनशील कल्पनाशक्ती वापरून तुम्ही छान संग्रह तयार करु शकता. स्क्रॅपबुक तयार करताना आवडती गोष्ट शोधणे, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, कट करणे, पेस्ट करणे, त्याबद्दल काही ओळींची माहिती लिहिणे, यातून धमाल मजा येते.
माझे मित्र नाणी, नोटा, तिकिटे आणि अशा खूप गोष्टी जमा करायचे. माझे स्क्रॅपबुक मात्र थोडे वेगळे होते बरं का! मी असे काहीतरी जमा करायचो ज्याची आम्हा सर्व मुलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. कळलं का तुम्हाला?… भन्नाट गाड्या! होय, मी गाड्यांची चित्रे गोळा करायचो आणि त्यांच्याबद्दल लिहायचो. मी त्यांचे नाव आणि लाँचची तारीख लिहायचो. माझ्या लहानपणी मासिके आणि वृत्तपत्रे नेहमीच घरी असायची. त्यात नवीन गाड्यांच्या बातम्या येत असत. मी ते वृत्तपत्र घ्यायचो आणि गाड्यांची चित्रे कापायचो आणि ती सगळी चित्रे एकमेकांसोबत रस्त्यावर धावत असल्यासारखी वाटावीत अशी स्क्रॅपबुकमध्ये अरेंज करायचो.
लहानपणी वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या खूप आवडायच्या. त्यांची छोटी मॉडेल जमा करण्याचीही खूप आवड होती. मुलांना गाड्या का आवडतात हे मी नेमकं नाही सांगू शकणार, पण त्या आवडतात हे नक्की. माझ्या स्क्रॅपबुकमध्ये काही आवडती पाने आणि काही आवडत्या कार होत्या. त्यापैकी एक लॅम्बोर्गिनी होती. अगदी बरोबर ओळखलंत, ती गोंडस केशरी किंवा पिवळ्या रंगाची स्पोर्टी कार. आपल्यापैकी बरेचजण त्या गाडीचे चाहते असणार हे नक्की… मी नंतर हॉटव्हील्स आणि इतर मॉडेलच्या कार जमा करायला सुरुवात केली. त्या छोट्या कारच्या प्रतिकृती सेम-टू-सेम दिसायच्या. मााझ्याकडे १५-२० कार होत्या. त्या खूप महाग होत्या, त्यामुळे मी जास्त नाही जमा करु शकलो. चित्रस्वरूपात मात्र भरपूर जमा केल्या होत्या.
तर आता, या सुट्टीत तुम्हाला ज्या विषयात रस आहे त्याची चित्रे जमवण्याचा छंद जोपासू शकता. त्याचे छान स्क्रॅपबुक बनवा. तुम्हालाही त्यातून आनंद मिळेल आणि इतरांनाही दाखवता येईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मोठे व्हाल, तेव्हा तुम्हीही तुमचे स्कॅपबुक पाहून तुम्ही नॉस्टॅल्जिक व्हाल.
चला तर मग लागा कामाला…