कोरोनाकाळात टाळेबंदीमुळे सर्वांनाच वेळ मिळाला होता. अशातच एका मित्राने काही जुन्या जाहिरातींच्या यूट्यूबच्या लिंक्स पाठवल्या. त्या जाहिरातीच लहानपणी मुख्य कार्यक्रमापेक्षाही जास्त आवडायच्या!! त्यातलीच एक, धारा तेलाची. लहानसं निरागस लेकरू घरी सगळे रागवतात म्हणून रूसतं व जमेल तसं दप्तर सांभाळत रेल्वे स्टेशनवर जातं. कावरीबावरी नजर एक जागा शोधते व बाकड्यावर बसतो तो गोंडस मुलगा. त्याला ओळखणारे एक आजोबा येऊन विचारतात की कारे, एकटाच कुठे आणि का निघालास? सगळे रागावतात म्हणे मला मी चाल्लोय दुसरीकडे. मग ते आजोबा त्याला सांगतात की पण घरी तर आज जिलबी बनतेय!! जिलबीचं नाव घेताचं चेहेर्यावर असं काही हसू खुलतं आणि डोळ्यात अशी काही चमक येते की बघत राहावं!! पठ्ठा त्या जिलबीच्या मोहापायी तयार होतो आणि आजोबांबरोबर सायकलवर बसून घरी येतो. घरी गरमागरम जिलबी तयार असते. ते बघून हा मुलगा रूसवा विसरतो आणि सगळाच आनंदीआनंद पसरतो!! धाराच्या तेलाबरोबरच लक्षात राहतो तो लहान निरागस मुलगा आणि अर्थात जिलबी!!
भारतात सर्वत्र व इतर आशियाई देशांतही पूर्वापार बनणारा हा बहुदा सर्वांचाच आवडता गोड पदार्थ. रस्त्याच्या कडेला जशी एखाद्या गाडीवर जिलबी खाण्यासाठी गर्दी होते तशीच पंचतारांकीत ठिकाणीही जिलबीच्या स्टॉलवर गर्दी होतेच. त्या त्या ठिकाणचे काही ना काही वैशिष्ट्य असले तरी प्रत्येक गावचा एकेक नावाजलेला जिलबीवाला असतोच. मला आठवतंय, अलिबागला वर्मांकडची जिलबी फार छान मिळायची आमच्या लहानपणी. सांगितलं की खास तुपातली द्यायचे ते काढून, आता पुरोहित आहेतच!! पुण्यात चितळे व काका हलवाईंची, नागपूरला हल्दीरामची, नाशिकच्या बुधा हलवायाची तसंच धुळ्याच्या छत्रभुज नानजीकडची पण फार छान असते नाही का मंडळी जिलबी! अर्थात बाकी ठिकाणीही असणारच कोणी तरी विशेष हलवाई. सध्या अशी दुकानं बंद असली तरी फार कठीण नाहीये बरं जिलबी खाणं, अर्थातच बनवणं हो!!
घरी बनवलेली जिलबी म्हटलं की आमच्या शेठकाकूंची आठवण अनिवार्य!! बिनरक्ताच्या नात्यांमधले हे एक हक्काचे कुटुंब. जिलबी घरी बनवून गरमागरम खाऊ घालण्याचा काकूंचा उत्साह दांडगा, अर्थात सगळेच पदार्थ करायची व खाऊ घालायची आवड आणि आम्ही शेजारीच राहात असल्याने सगळ्यावर आमचे नाव तर असायचेच!! काकूंच्याच शब्दात सांगायचं तर, काही कठीण नसते हो जिलबी बनवणे. तयारी पाहिजे थोडी, आयत्यावेळी नाही व्हायची. अर्थात आजकाल इन्स्टंट जिलबी बनवतात लोकं पण आमची पारंपरिक पद्धत बरं.
एक वाटी मैद्याला प्रत्येकी एक चहाचा चमचा बारीक रवा, बेसन व दही घेऊन कोमट पाण्यात भज्याच्या पिठासारखं भिजवायचं नी कमीत कमी सातआठ तास आंबू द्यायचं. नंतर आवडीनुसार पिठात खाण्याचा रंग मिसळून पसरट कढईत तूप घालून त्यात जिलब्या तळायच्या आणि गरम जिलबी साखरेच्या एकतारी पाकात सोडायची. जिलबी पाकात मुरली की पाकातून बाहेर काढायची. पुढे काय ते घरातले बाकीचे करतातच, चट्टामट्टा हो त्या ताज्या कुरकुरीत व पाकाची गोड चव मिळालेल्या जिलबीचा!!
पाकात पडेपर्यंत मूळ जिलबीला स्वत:ची खास अशी काही चव नसते, कुरकुरीतपणा व पोकळपणा या दोन गोष्टी असतात आणि पाक शब्दशः आत शिरतो या जिलबीत. जिलबीचा तुकडा चोखून बघा, पाक जसाच्या तसा उतरतो जिभेवर!! याच गोष्टीमुळे जिलबी बाकी पाकातल्या पदार्थांपेक्षा वेगळी वाटते मला. स्वत:मध्ये पाक मुरवून ती गोडी पोहोचवणारे गुलाबजाम किंवा लाडवांसारखे प्रकार वेगळे. जिलबी मात्र तो शुद्ध पाक जसाच्या तसा सांभाळते व पोहोचवते खाणार्यापर्यंत!!
माणूसपणाच्या वाटचालीत आपल्याला ज्येष्ठांकडून लाभणारी अनेक तत्त्वं अशीच मूळ स्वरूपात पुढे देण्याने आपणही त्या शृंखलेचे वाटेकरी ठरतो. ज्ञान, सहिष्णुता, प्रेम जेही मला लाभलंय ते तसंच्या तसं जर प्रवाहित केलं ना, तर त्याची अव्याहत शक्ती मला तर मिळतेच, पण पुढे पोहोचवल्याचे पुण्यही पदरी पडते.
शिकागोच्या व्याख्यानाच्या वेळी किंवा इतरही अनेक वेळी स्वामी विवेकानंद सांगतात की ‘मी केवळ माध्यम होतो, बोलाविता धनी तर साक्षात ठाकूर म्हणजेच रामकृष्ण परमहंस होते. त्यांच्या विचारांना मी शब्दांत मांडले एवढेच काय ते माझे!!’ हीच परंपरा अनेक वर्ष रामकृष्ण भावधारेत सुरू आहे म्हणूनच हे साहित्य वाचताना किंवा ऐकताना त्यातले मूळ तत्व एकच असल्याची खूण पटते. कोणताही विषय किंवा कोणताही वक्ता म्हणूनच मूळ स्त्रोतातून मिळालेली ओंजळच आपल्याकडे रिती करतोय याचे समाधान असते. यथामती यथाशक्ती परंतु मूळ तत्वात फेरफार किंवा तडजोड न करता आपणही आपल्या सर्वांगीण समृद्ध परंपरेचा वारसा जपण्यात व तो पुढे पोहोचवण्यातच या मानवी जन्माचा व नरदेहाचा वापर केला तर हे आयुष्य उजळून निघेल नाही का? जिलबीसारखंच… उजळ केशरी रंगाचं व पाकाच्या गोडव्याने भरलेलं नी चकाकणारंही!!