आपल्याला अनोळखी नंबरवरून फोन आला की तो मुळात घेता कामा नये. त्यावर अनेकदा टेलिकॉलर्स असतात. शिवाय गोड बोलून फसवणूक करणारेही असतात. भाबडी माणसं बर्याचदा फोनवरून सांगितलेल्या माहितीवर विश्वास ठेवतात आणि तिथेच फसवणूक होते. पण, हा सगळा प्रकार घडत असतो तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीचा प्रत्येक शब्द खरा मानतो; अर्थात हे कशामुळे घडते, तर आपल्या ब्लाइंड ट्रस्टमुळे, अर्थात आंधळ्या विश्वासामुळे.
नाशिकच्या रामभाऊंच्या बाबतीत असेच काहीसे घडले. दोन महिन्यापूर्वीच रामभाऊ वाघ राज्य सरकारच्या एका खात्यातून निवृत्त झाले होते. पूर्वी कामाच्या गडबडीमुळे त्यांना फिरण्यासाठी वेळ मिळायचा नाही. आता निवृत्तीनंतर त्यांनी काही पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन केले होते. सोमवारची दुपार होती. पर्यटनाचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी ते पत्नीसोबत ट्रॅव्हल कंपनीच्या कार्यालयात जाण्यासाठी निघणार होते. घराचा दरवाजा उघडून ते गाडीकडे निघाले, तेव्हा त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली, तो फोन अनोळखी नंबरवरून आलेला होता. काही कामाचा फोन असेल म्हणून त्यांनी तो उचलला, तेव्हा समोरची व्यक्ती म्हणाली, तुमच्या मोबाईल नंबरवरून अनेक प्रकारच्या जाहिराती अनेक लोकांना पाठवल्या जात आहेत? तुम्ही त्या उत्पादनाचे बेकायदेशीरपणे मार्वेâटिंग करता आहात, हे समोर आले आहे आहे. त्यावर रामभाऊ म्हणाले, अहो, माझ्याकडे एकच मोबाईल नंबर आहे, अनेक वर्षांपासून तो मी वापरत आहे, त्यावरून असे काहीच केले जात नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यावर पलीकडचा माणूस म्हणाला, अहो साहेब, तसे काही नाही, तुम्ही एक काम करा, तुम्हाला पोलीस अधिकारी धर्माधिकारी यांचा नंबर पाठवतो, त्यांच्याबरोबर बोलून घ्या अन्यथा तुमच्यावर या प्रकाराबद्दल गुन्हा दाखल होईल. त्यामध्ये तुम्हाला लगेच अटक केली जाऊ शकते, हे लक्षात ठेवा. रामभाऊ हादरले, घाबरले. हा सगळा प्रकार काय सुरू आहे, हेच त्यांना समजत नव्हते, समोरची व्यक्ती खरं बोलते आहे, या कल्पनेने रामभाऊंची भीतीने गाळण उडाली होती.
समोरच्या व्यक्तीने तुम्ही फोन ठेवू नका, मी पोलीस अधिकारी धर्माधिकारी साहेबांना कॉन्फरन्स कॉलवर घेतो, असे सांगितले. हे तथाकथित धर्माधिकारी साहेब फोनवर आले आणि त्यांनी रामभाऊंना त्यांचे पूर्ण नाव, पत्ता, जन्म तारीख, अशी माहिती विचारली. फोनवर बोलणारे साहेब असा काही आवाज लावून बोलत होते की त्यांच्या आवाजातल्या पोलिसी जरबेमुळे रामभाऊ घाबरून गेले होते. तुमच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात आठ तक्रारी आहेत, पोलीस तुमचा शोध घेत आहेत, त्यांच्या रडारवर तुम्ही आहात, त्यामुळे तुम्ही माझ्याशी या फोनवर संपर्क साधू नका, सगळे फोन रेकॉर्ड होतात, हे लक्षात ठेवा. तुम्हाला यामधून सहीसलामत बाहेर पडायचे असेल तर तुम्हाला माझा दुसरा नंबर व्हॉट्सअपवर पाठवतो, त्यावर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता, असे सांगून या साहेबांनी फोन बंद केला.
हा सगळा प्रकार रामभाऊंना अचंबित करणारा होता, त्यांची तहानभूक त्यामुळे हरवली होती. पर्यटनाचा प्लॅन देखील त्यांनी रद्दच केला. आपल्या नावाने नवीन सिम घेऊन हा उद्योग कसा झाला, याचा विचार ते करत होते, अशा प्रकारासाठी त्याचा वापर झाला तरी कसा याचा शोध घेण्यासाठी ते डोके चालवत होते, पण त्यांना काहीच आठवत नव्हते.
आपल्याला या प्रकारामधून बाहेर पडायला हवे, असा विचार करत असतानाच त्यांना व्हॉट्सअपवर अनोळखी नंबरवरून फोन आला, समोरची व्यक्ती म्हणाली, मी अमितसिंग बोलतोय. मी वकील म्हणून काम करतो, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, माहित आहे ना? तुम्हाला पत्ता पाठवला आहे, त्या पोलीस स्टेशनला तुम्ही आला नाहीत, म्हणून तुमच्यावर एक गुन्हा दाखल होणार आहे. तुम्ही पोलिसांना सहकार्य करत नाही म्हणून ते पाऊल उचलावे लागत आहे. तुम्हाला माहिती देण्यासाठी फोन केला होता, असे सांगून तो फोन बंद झाला. त्याला एक मिनिट होते ना होते तोच रामभाऊंना पुन्हा एकदा व्हॉट्सअपवर फोन आला, आपण पोलीस अधिकारी धर्माधिकारी बोलत आहोत, असं सांगून पलिकडचा माणूस म्हणाला, तुमचे प्रकरण मिटवायचे असेल तर तुम्ही ४० हजार रुपये तुम्हाला सांगतो त्या नंबरला ट्रान्सफर करा, तसे जर केले नाही तर तुमच्या घराचा पत्ता आहेच, त्याचे लोकेशन देखील माहीत आहे, पोलीस येतील घरी, पुढे ते अटक करतील आणि प्रकरण वाढेल, अर्थात तुम्ही ठरवा काय करायचे ते. हे प्रकरण घरात सांगितले तर आपली बदनामी होईल, नातेवाईक आपल्याबरोबर बोलणार नाहीत, समाज आपलीकडे वेगळ्या नजरेने पाहील, म्हणून रामभाऊंनी हे प्रकरण कोणाला सांगितले नाही.
आपणच एक पाऊल पुढे टाकू आणि यामधून सुटका करून घेऊ असा विचार रामभाऊंनी करून त्याने दिलेल्या नंबरला २० हजार रुपये दोन वेळा ट्रान्सफर केले. रामभाऊ सरकारी नोकरीत होते, त्यामुळे त्यांना चांगली पेन्शन होती, नोकरीमधील पीएफ, ग्रॅच्युईटीचे पैसे मिळाले होते, त्यामुळे पैसे गेले तरी चालेल, पण या प्रकरणातून आपली सुटका होईल आणि कारवाई थांबेल, असा विचार रामभाऊंनी केला होता. आता पैसे दिले म्हणजे प्रकरण निवळले असा त्यांचा समज झाला होता. दुसर्या दिवशी पुन्हा पोलीस निरीक्षक धर्माधिकारी यांचा त्यांना फोन आला, तुमच्या त्या नंबरवरून आणखीन काही ठिकाणी बेकायदेशीरपणे मार्केटिंग करण्यात आले आहे, त्यामध्ये तुमच्यावर बाहेरच्या राज्यात १२ गुन्हे नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे तुम्ही नक्की अडचणीत येणार आहात, असे त्यांना सांगितले. त्यावर भांबावलेल्या रामभाऊंनी, यामधून बाहेर पडता येईल का? काय करता येईल, ते बघा, असे त्यांना विचारले. त्यावर सगळे प्रकरण मिटवायचे असेल तर पाच लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर तुम्हाला वेगवेगळ्या राज्यांतले पोलीस येऊन अटक करू शकतात, हे विसरू नका, असे रामभाऊंना सांगितले.
रामभाऊंच्या नावाने जे फोन करण्यात आले होते, त्यामध्ये त्यांचे नाव दिसत असणारा स्क्रीन शॉटचे फोटो त्यांना व्हॉट्सअपवर आले होते, त्यानंतर रामभाऊंनी त्यांना दोन लाख रुपये दिले. पुन्हा त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली होती, हा प्रकार काहीतरी अजब दिसतोय, म्हणून त्यासाठी सायबर तज्ज्ञाची मदत घेण्याचे त्यांनी ठरवले.
इंटरनेटवर त्याने सायबर तज्ज्ञ शोधण्यास सुरूवात केली, तेव्हा एक मोबाईल नंबर सापडला, त्यावर त्यांनी फोन केला आणि आपल्याबाबत घडलेला प्रकार सविस्तर सांगितला. त्यावर संदीप जी. असे नाव असणारा तो तज्ज्ञ रामभाऊंना म्हणाला, सर तुम्ही उगाचच पैसे दिलेत, यामधून मी तुम्हाला सहीसलामत बाहेर काढू शकतो. फक्त त्यासाठी आपल्याला येणारा खर्च हा ११ लाख रुपये इतका असू शकतो. माझी कोलकात्यामध्ये सायबर सुरक्षा देणारी कंपनी आहे, तुम्हाला त्याची लिंक पाठवतो, असे सांगून त्याने रामभाऊंना ती पाठवली. रामभाऊंना आपण ज्या सायबरतज्ज्ञाकडे काम दिले आहे, त्यावर विश्वास बसला होता, म्हणून त्याने संदीपने दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरले. त्यानंतर रामभाऊंना येणारे फोन बंद झाले. दोन महिन्यांनी पुन्हा एकदा त्यांना फोन आला, तुमच्यावर असणार्या तीन केसेस अजून बंद झालेल्या नाहीत, त्यासाठी एक लाख रुपये द्यावे लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला पोलीस अटक करतील. बघा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे, रामभाऊंना हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला, म्हणून त्यांनी आतापर्यंत घडलेली हकीकत त्यांच्या मुलीला सांगितली. ते सगळे ऐकून तिच्या पायाखालची वाळू सरकली होती. आपली बदनामी होईल, या भीतीपोटी रामभाऊंनी घरात कुणालाही न सांगता त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून यामधून सुटका करून घेण्यासाठी त्यांना पैसे दिले होते. रामभाऊंच्या मुलींनी या सगळ्या प्रकाराची पोलिसात तक्रार केली, तेव्हा हा सगळा फसवणुकीचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले होते. पोलिसांनी याचा तपास केला तेव्हा ज्या नंबरवरून रामभाऊंना फोन आले होते, ते दिल्लीच्या परिसरातील असल्याचे समोर आले. रामभाऊंनी पैसे ज्या बँकेत भरले होते, ते खाते फिरोजाबादमध्ये असल्याचे समोर आले होते.
पोलिसांचे नाव पुढे करून रामभाऊंची फसवणूक करण्याचा प्रकार घडला होता. आपली बदनामी होईल, या भीतीपोटी त्यांनी हा विषय घरात कुणाला सांगितला नव्हता, त्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते आणि ते या प्रकाराला बळी पडले होते.
हे लक्षात ठेवा
१) मोबाईलवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आला तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्यांच्याबरोबर जी बातचीत होईल, त्यावर विश्वास ठेवू नका.
२) फोनवर कुणी पैशाची मागणी करत असेल तर त्याची कल्पना घरातील मंडळींना द्या. न सांगता कुणाबरोबर कोणताही व्यवहार करू नका.
३) फोनवर झालेल्या संवादाला वास्तवतेचा आधार नसतो, त्यामुळे काल्पनिक प्रसंग सांगून फसवणूक करण्याचे प्रकार घडू शकतात.
४) पोलिसांचे नाव सांगून कोणी बोलत असेल तर आपल्या घराच्या जवळ असणार्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्याची माहिती द्यावी. पोलीस कधीही अधिकृतपणे पैशाचा व्यवहार करत नाहीत, हे कायम लक्षात ठेवा.
५) अनोळखी व्यक्तीशी बोलताना आपली माहिती सांगण्याचे कटाक्षाने टाळा.