सातार्यात कॉन्सिलच्या निवडणुकांचा गदारोळ सुरू झाला. प्रबोधनकारांचा पाडळीतला छापखाना त्याचं एक केंद्रच झालं होतं. त्यामुळे त्यांना ध्येयनिष्ठ पुढार्यांचं सत्तेसाठी होत असलेलं अध:पतन जवळून बघता आलं.
– – –
धनजीशेठ कूपर यांनी दाखवलेल्या छापखान्याच्या प्रलोभनाला भुलून प्रबोधनकार सातार्यात पोचले. कूपर मुंबई इलाखा लेजिस्लेटिव कॉन्सिलच्या निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातून ब्राह्मणेतर पक्षातर्फे उभे राहणार होते. त्यामुळे त्यांना एका प्रचारकाची गरज होती. प्रबोधनकारांनी एक प्रभावी वक्ते आणि लेखक म्हणून सातार्यावर ठसा उमटवला होता. त्यामुळे कूपरने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याकरवी प्रबोधनकारांना सातार्यात येण्याची गळ घातली आणि प्रबोधनकार सातार्यात आलेही. हा घटनाक्रम प्रबोधनकारांनी शनिमाहात्म्य या पुस्तकात पोथीतल्या ओव्यांसारखा मस्त नोंदवला आहे.
त्या वैश्याची मानस कन्यका।
तिचे नाव भांडवलिका।
तिचा पण हाचित देखा।
पिता इलेक्शनी यशवंत।।
पैसा त्याचा परमेश्वर।
पारशी शोध करी निरंतर।
लेखणीचा नसता आधार।
पैसा पंगू इलेक्शनी।।
भला भेटला हा लेखकू।
गरजवंत आणि लायकू।
भांडविलेशी जखडून टाकू।
कशास कां कूं करील पै।।
प्रबोधनकारांना मुंबईतून सातार्यात आणण्यामागची कूपरशेठची मानसिकता या ओळींमधून समजते. आधीच्या लेखांमध्ये बघितल्याप्रमाणे सातारा मतदारसंघातून तीन प्रतिनिधी निवडून जाणार होते. त्यापैकी दोन ब्राह्मणेतर पक्षासाठी आणि एक ब्राह्मणांसाठी अशी वाटणी झाली होती. ब्राह्मणांकडून सोमण नावाचे उमेदवार होते. मात्र ब्राह्मणेतरांमधून दोन नावांवर एकमत झालं नाही. त्यामुळे धनजीशाह कूपर, भास्करराव जाधव आणि ए. व्ही. आचरेकर वकील असे तीन उमेदवार मैदानात उतरले. प्रबोधनकारांनी या रणधुमाळीचा अहवाल त्यांच्या आत्मचरित्रात लिहिला आहेच. पण त्या काळातल्या ‘प्रबोधन’च्या अंकांमध्येही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्यातून या निवडणुकीमधलं पुढार्यांचं स्वार्थी राजकारण समोर येतं.
तिघांनीही गावोगाव जोरदार प्रचार सुरू केला होता. सभा होत होत्याच, पण स्वत:ची भूमिका मांडणारी पत्रकं हे त्या काळात प्रचाराचं महत्त्वाचं साधन होतं. प्रबोधनकारांनी पाडळीत नुकताच अद्ययावत छापखाना सुरू केला होता. त्यामुळे तिन्ही उमेदवारांनी आपली पत्रकं तिथे छापायला दिलं. प्रबोधनकारांच्या छापखान्याला सुरूवातीपासूनच काम मिळायला लागलं. तिन्ही उमेदवार प्रबोधनकारांना मानणारे होते. तिघांनीही प्रबोधनकारांवर एक जबाबदारी टाकली होती की या पत्रकांमधला मजकूर दुसर्या उमेदवाराला कळता कामा नये. आपल्या प्रचाराचे मुद्दे इतरांना कळू नयेत, अशी त्यांची इच्छा होती. पण ते शक्य नव्हतं. छापखाना नव्याने उभा राहिला होता. पत्र्याच्या शेडमध्ये सगळं काम खुल्यावरच सुरू असायचं. त्यामुळे तिघांपैकी कुणीही आलं, तरी त्यांना इतरांची पत्रकं सहज नजरेला पडायची.
ब्राह्मणेतर पक्षाचे तिन्ही उमेदवार प्रबोधनकारांना भेटायला छापखान्यात यायचे. भास्करराव जाधव आणि आचरेकर वकील हे दोघे एकमेकांना टाळून सकाळीच यायचे. आचरेकरांनी अमक्या गावी आपल्याला काय शिव्या दिल्या, हे भास्करराव सांगत. तर मीच अस्सल मराठा आणि आचरेकर कमअस्सल, असा प्रचार भास्करराव करतात, अशी तक्रार आचरेकर करत. तर या दोघांनी आपल्याविरुद्ध कसा अपप्रचार चालवला आहे, हे रोज संध्याकाळी कूपरशेठ येऊन सांगत.
या सगळ्यामुळे प्रबोधनकार वैतागले होते. महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराजांचं नाव सांगणारे ब्राह्मणेतर पक्षाचे हे पुढारी एकमेकांशी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन कसे भांडतात, यामुळे ते दुखावले असावेत. तेव्हा त्यांनी झालेली मनोवस्था त्यांनी जीवनगाथेत लिहिली आहे, `सकाळपासून हे त्रिदोषाचे लिगाड माझ्या मागे लागलेले. दादरच्या स्वाध्यायाश्रमातले काव्यशास्त्रविनोदाचे स्फूर्तिदायक वातावरण टाकून कशाला आलो मरायला या स्वयंमन्य पुढार्यांच्या कोंबडझुंजीत, असे मला झाले. इतर काही फायदा झाला नाही, तरी ब्राह्मणेतर पार्टी हे कसले थोतांड आहे, पुढारी कसल्या शेणामेणाचे आहेत आणि महात्मा फुले नि शाहू छत्रपतींच्या नावावर अस्पृश्यांसकट बहुजन समाजांना फक्त आपल्या स्वार्थासाठी ते कसेकसे बनवीत असतात, याचा पुरेपुर शोध नि बोध घेण्याची मात्र नामी संधी मला मिळाली.’
मात्र यापैकी काहीच प्रबोधनात लिहिणार नाही आणि कोणाचीही बाजू घेणार नाही, असं प्रबोधनकारांनी तिन्ही उमेदवारांना स्पष्ट केलं होतं. शिवाय त्यांनी या उमेदवारांच्या प्रसिद्धीपत्रकांमधला आततायी मजकूर सेन्सॉर करायला सुरूवात केली. वैयक्तिक हेवेदावे छापणार नाही, असं उमेदवारांना सांगून ते तसा मजकूर परस्पर गाळू लागले. त्यामुळे आचरेकर आणि भास्करराव यांनी तसा मजकूर असणारी पत्रकं दुसर्या छापखान्यांतून छापायला सुरूवात केली. तसं भास्करराव जाधव यांचं एक पत्रक कूपरशेठ यांनी प्रबोधनकारांना आणून दिलं. त्यात लिहिलं होतं, `सातारा जिल्हा हा बहुतांशी मराठ्यांचा आहे. येथील राज्यकारभार मराठ्यांच्या हक्काचा आहे… मी तुमच्या रक्ताचा, तुमच्या सर्वस्वाचा आहे. तुमचे सुख तेच माझे सुख. तुमचे हित तेच माझे हित. तुमची गरज तीच माझी गरज. तुमचे दु:ख तेच माझे दु:ख. तुमच्या अडचणी त्याच माझ्या अडचणी. असा तुमचा माझा एकजीव आहे… मराठ्यांची मते मराठ्यांसच मिळाली पाहिजेत.’
धनजीशेठ कूपर हे ब्राह्मणेतर पक्षाचे असले तरी पारशी होते. आचरेकर वकील हे अस्सल मराठे नाहीत, असा प्रचार भास्करराव जाधव करत होते. छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारातही सत्यशोधकी तत्त्वनिष्ठेचं प्रदर्शन घडवणार्या भास्कररावांचं सत्तेसाठी झालेलं असं अध:पतन बघून प्रबोधनकार दुखावले. खरं तर ते भडकलेच. त्यांनी यापूर्वीच ‘प्रबोधन’मधून ब्राह्मणेतर चळवळीची चिकित्सा केली होती. ब्राह्मणेतर चळवळ ही फक्त मराठ्यांची चळवळ बनू नये, अशी मांडणी त्यांनी पोटतिडकीने केली होती. प्रसंगी या मुद्द्यावर छत्रपती शाहूंवरही टीका केली होती. त्यामुळे त्यांना हे वास्तव बघून वाईट वाटणं स्वाभाविक होते. त्यांनी आपली भावना अशा शब्दांत व्यक्त केलीय, `ब्राह्मणेतर पक्ष म्हणजे जातपाततोडक अभेद भावनेने यच्चयावत बहुजन समाजाचा उद्धार करायला निघालेला. म्हणूनच माझ्यासारखे काहीजण म्हणजे बहुजनांच्या एकाही अवस्थेच्या कोटीत केव्हाही न बसणारे मध्यमवर्गीय पांढरपेशे बहुजन समाजाच्या सर्वांगीण उद्धाराच्या विशुद्ध हेतूने या चळवळीत स्वजातीयांचा रोष पत्करूनही कार्य करीत होते. पण जाधवराव तर मराठ्यांची मते मराठ्यालाच मिळाली पाहिजेत, असा जोरदार प्रचार करीत सुटले. सत्यशोधक म्हणून मिरविणार्याला तरी ते खचित शोभत नव्हते.’
प्रबोधनकारांचा हा उद्वेग प्रबोधनच्या तिसर्या वर्षाच्या तिसर्या अंकात व्यक्त झाला. फक्त तिन्ही उमेदवारांविषयी काही लिहिणार नाही, असं आधीच सांगितलं होतं. म्हणून त्यांनी कुणाचंही नाव न घेता लिहिलंय. १६ नोव्हेंबर १९२३च्या अंकातल्या या अग्रलेखाचा मथळाच भारी आहे, नरकासुरच मरत नाही, मंगलस्नाने कशाची करता? या लेखात प्रबोधनकार लिहितात, `पक्षाचे नाव ब्राह्मणेतर आणि धिंगाणा मात्र जातिवर्चस्वाचा, या गोष्टी निरक्षर व अज्ञान जनांच्या हातून घडत्या तर त्या क्षम्य अतएव दुर्लक्ष्य ठरत्या. पण खुद्द पुढारीब्रुवच जेव्हा ब्राह्मणेतर पक्षाचे उमेदवार म्हणून डोक्यांवर पाट्या मारून निवडणुकीच्या पाटाला उभे राहतात आणि जो मराठ्यांच्या बीजाचा असेल, तो मराठ्यांनाच मते देईल, अशा अर्थाचा तोंडी व लेखी डांगोरा पिटतात, तेव्हा मात्र त्यांच्या जातिभेदाळू मनाची घाण सहन होत नाही. ब्राह्मण जाति दुष्ट म्हणून सुष्ट ब्राह्मणेतर पक्ष निघाला. त्यातही भिक्षुकशाही आहे व जातिभेदही आहे. सारांश, जातिभेदाने कुजलेली नादान हिंदू मनोवृत्तीच आमच्या फाटाफुटीला मुख्यत: जबाबदार आहे. अशा अवस्थेत कोणी कितीही उन्नतीच्या व स्वातंत्र्याच्या वल्गना करो, त्याला लफंगा म्हणून खड्याप्रमाणे निवडून काढणेच श्रेयस्कर होईल.’
याच अंकात प्रबोधनकारांनी निवडणूक या विषयावर दोन छोटी स्फुटंही लिहिली आहेत. `निरक्षरतेच्या जखमेवर इलेक्शन मिठाचे पलिस्तर’, या स्फुटात प्रबोधनकारांनी निरक्षर मतदारांना सोयीची होईल अशी मतदानाची सोपी पद्धत सुरू करण्याचा आग्रह धरला आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या चिन्हापुढे तीन फुल्या मारण्याची पद्धत कशी अडचणीची ठरते, हे त्यांनी यात सांगितलं आहे.
`अखेर जातिभेदावर गाडे बितले’ या आणखी एका स्फुटात प्रबोधनकारांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात जातीच्या नावावरच मतं मागितली जातात, यावर टीका केली आहे. ते लिहितात, `जहाल, मवाळ, फेर नाफेर, ब्राह्मण ब्राह्मणेतर, टाळकुटे सत्यशोधक, सुधारक असे नाना पक्ष किती सांगावे? प्रत्येकाच्या तक्रारीचा वेदान्त बाह्यत: कितीही स्तुत्यर्ह दिसला तरी अंतर्यामी अखेर सारे जातिभेदावरच कसे घसरतात, हे यंदाच्या निवडणुकीत खासे सिद्ध झाले. निवडणुकीच्या फाटक्या मानाचा स्वार्थ तो काय, पण तेवढ्यासाठी सुद्धा आपल्या पक्षाच्या ध्येयावर जातिभेदाचे रखरखीत निखारे ठेवायला कित्येक पुढारीब्रुव शरमले नाहीत. एवढ्यावरून हाच निष्कर्ष निघतो की सांप्रत हिंदू समाजांत ज्या पक्षभेदाचा आणि त्याच्या उदात्त वेदांताचा पुढारी मोठा गवगवा करतात, तो सारा बाहेरचा लफंगेपणाचा देखावा आहे. आतून जातिभेदाच्या घाणीशिवाय दुसरी कसलीही चीज आढळत नाही.’
प्रबोधनकार हे लिहित होते, ती देशातली एका अर्थाने पहिलीच सार्वत्रिक निवडणूक होती. या लिखाणाला दोन महिन्यांपूर्वी १०० वर्षं पूर्ण झाली. संदर्भ बदललेले असले, तरी प्रबोधनकारांनी सांगितलेलं सत्य काही बदललेलं नाही. त्यांनी देशाच्या राजकारणाच्या तत्त्वशून्यतेचे कारण जातिभेद असल्याचं सांगितलं आहे. ते अजूनही तितकंच खरं आहे.