ग्रहस्थिती : गुरू, हर्षल मेष राशीमध्ये, प्लूटो मकर राशीत, शनि कुंभ राशीत, राहू, नेपच्युन मीन राशीत, केतू कन्या राशीत, शुक्र वृश्चिक राशीत, रवि, मंगळ, बुध धनु राशीमध्ये. विशेष दिवस : २१ जानेवारी पुत्रदा एकादशी, २३ जानेवारी भीमप्रदोष, २५ जानेवारी शाकंभरी पौर्णिमा आणि गुरुपुष्यामृत योग, २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन.
मेष : शुभघटनांचा अनुभव येईल. तरुणांची स्वप्ने प्रत्यक्षात येतील. व्यावसायिकांची थकीत येणी वसूल होतील. घरासाठी केलेल्या कामाचे चीज झाल्याचा अनुभव येईल. मालमत्तेच्या संदर्भात कुटुंबातील चर्चेला गती मिळेल. नोकरीच्या ठिकाणी नवीन अनुभवांतून नवे शिकायला मिळेल. कामाचा ओघ वाढेल. करियरमध्ये चांगल्या संधी मिळतील. वास्तूच्या संदर्भातील प्रलंबित व्यवहार मार्गी लागतील. घरात छोटेखानी कार्यक्रमात नातेवाईकांची गाठभेट होईल. आर्थिक बाजू चांगली राहील, पण पैशाचा वायफळ वापर टाळा.
वृषभ : घरात, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी मनाविरुद्ध घटनांकडे लक्ष देऊ नका. धीराने आणि संयमाने घ्या. व्यवसायात यशदायक घटना घडतील. नवी नोकरी शोधणार्यांना चांगली संधी चालून येईल. बौद्धिक कौशल्यावर व्यवसायात यश कमावाल. विद्यार्थीवर्गाला चांगले यश मिळेल. काही निर्णयांच्या बाबतीत आपल्या मतांवर ठाम राहू नका. वैवाहिक जीवनात कटकटी होतील. जुने येणे वसूल होईल. खिशात पैसे राहतील. चिंतेपासून सुटका होईल.
मिथुन : कुटुंबासाठी वेळ द्याल. पत्नीचे बहुमोल सहकार्य मिळेल, कामाचा भार हलका होईल. नवीन व्यवसायाच्या प्रारंभास मुहूर्त मिळेल. युवकांच्या बाबतीत शुभघटना कानी पडेल, कामाचा उत्साह वाढेल. मित्रमंडळी, नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नव्या ओळखींतून लांबलेले काम मार्गी लागेल. नोकरीत नव्या कामाची जबाबदारी मिळेल, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खूश राहतील. कामाचा उत्साह वाढेल. रोखीच्या व्यवहारात काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्या.
कर्क : नोकरदारांना दूरचे प्रवास करावे लागतील. व्यावसायिकांच्या विदेशात विस्ताराच्या नियोजनाला गती मिळेल. दांपत्यजीवनात कटकटी घडतील, परंतु तुटेपर्यंत ताणू नका. घरातील वातावरण गढूळ होऊ देऊ नका. सामाजिक कामात पतप्रतिष्ठा वाढेल. मानसन्मान मिळेल. कोणताही निर्णय घाईगडबडीने घेऊ नका. काहींना अचानक धनलाभाचे योग आहेत. नियमात राहूनच काम करा. खर्च वाढवणार्या घटनांना आमंत्रण मिळेल, चिडचिड होईल. मानसिक स्वास्थ्य बिघडू देऊ नका.
सिंह : मनातील इच्छा पूर्ण होतील. मित्रमंडळींशी चेष्टा-मस्करी टाळा, त्यामधून गैरसमज निर्माण होऊन वाद होतील. नोकरीच्या ठिकाणी हटवादी भूमिका टाळा. आनंददायक घटनेमुळे उत्साह वाढेल. खाण्यापिण्याच्या बाबतीत जीभ सैल सोडू नका. व्यवसायाच्या ठिकाणी आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. सार्वजनिक जीवनात मोजकेच बोला. तरुणांना नव्या संधी मिळवून देणारा काळ आहे. महिलांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
कन्या : नोकरीच्या ठिकाणी काळजी घ्या, गैरसमज टाळा. मुलांकडून आनंदाची बातमी कानावर पडेल. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. भागीदारीत किरकोळ कुरबुरी घडतील. अभियांत्रिकी क्षेत्रात उत्तम काळ राहील. घरातील वृद्धांची काळजी घ्या. तरूण मंडळींना शुभघटनांचा अनुभव मिळेल. मित्रमंडळींच्या भानगडीत पडू नका. उगाच नसत्या वादात अडकाल. काही मंडळींच्या बाबतीत खर्च वाढेल. लेखक, रियल इस्टेट क्षेत्रात काम करणारी मंडळी यांच्यासाठी चांगला काळ.
तूळ : घरात एखादे शुभकार्य घडेल. मित्रमंडळींसोबत भरपूर वेळ खर्च होईल. नोकरीत आनंददायक बातमी कानावर पडेल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातून विदेशात जाण्याचे योग आहेत. महिलांना चांगल्या बातम्या कानावर पडतील. व्यावसायिकांना अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक लाभ मिळेल. घरासाठी एखादी महागडी वस्तू खरेदी कराल. दाम्पत्यजीवनात सुख मिळेल. घरात ज्येष्ठ मंडळींबरोबर कुरबुरी घडतील. कुणाची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्या.
वृश्चिक : गुंतवणुकीतून धनलाभ मिळेल. कुटुंबाबरोबर सहलीला जाल. आध्यात्मिक कार्यासाठी वेळ खर्च होईल. प्रॉपर्टीचा अडकलेला व्यवहार मार्गी लागेल. नातेवाईकांबरोबर किरकोळ वाद होतील. त्यांच्या वादात मध्यस्थी करावी लागेल. बुद्धीच्या जोरावर व्यावसायिक मोठे यश खेचून आणतील. फूड व्यवसायात आठवडा चांगला जाईल. नोकरीत सांगितले जाईल तेवढेच काम करा. कामासाठी धावपळ होईल. आठवड्याअखेर शुभवार्ता कानी पडेल. तापटपणा टाळा. आरोग्याची काळजी घ्या.
धनु : शुभवार्ता कानी पडतील. नशिबाची साथ मिळेल. एखादे काम झटक्यात पूर्ण होईल. नोकरीत प्रमोशन मिळेल, पगार वाढेल. तरुणांना नव्या कामाच्या, शिक्षणाच्या संधी चालून येतील. कर्जाचा प्रश्न मार्गी लागेल. गुरूकृपेमुळे हातातली कामे मार्गी लागतील. कलाकारांसाठी आगामी काळ उत्तम राहील. पुरस्कार मिळेल. मित्र, नातेवाईकांकडून मदतीची अपेक्षा नको. अपेक्षाभंग होईल. व्यावसायिकांनी कामात घाई टाळावी. ध्यानधारणा, आध्यात्मात मन रमवाल.
मकर : समाजात पत वाढेल. व्यावसायिकांच्या विस्तारयोजना मार्गी लागतील. आठवड्याच्या शेवटी घरात आनंददायक प्रसंग घडतील. प्रेमप्रकरणात वादाची ठिणगी पडू देऊ नका. कोणत्याही ठिकाणी व्यक्त होणे टाळा, म्हणजे मन:स्तापाच्या घटना घडणार नाहीत. कामानिमित्ताने बाहेरगावी जावे लागू शकते. स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्याल. शिक्षकांना चांगले अनुभव येतील. देवदर्शनासाठी बाहेरगावी जाल. व्यवसायातील मंडळींची जुनी कामे एका झटक्यात पूर्ण होतील. घरात मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. उधार उसनवारी टाळा.
कुंभ : कठीण कामे मार्गी लागतील. तरुणांना मनासारखी नोकरी चालून येईल. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात यश मिळेल. व्यावसायिकांनी अधिक मेहनत करून आर्थिक बाजू भक्कम करावी. तरुणांना स्पर्धेत यश मिळेल. महिलांनी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. नवीन गुंतवणूक योग्य ठिकाणी करा, कागदपत्रे तपासूनच पुढे जा. काम विचारपूर्वकच करा. प्रवासात काळजी घ्या, मुलांच्या वागण्या-बोलण्याकडे लक्ष ठेवा.
मीन : शुभ फळे मिळवून देणारा काळ अनुभवाल. व्यावसायिकांना मोठे यश मिळेल. नोकरीत स्थान भक्कम होईल. अधिकची जबाबदारी मिळेल. घरात मोकळेपणाने संवाद करा. शंका बिनधास्त विचारा आणि पुढे जा, म्हणजे त्रास होणार नाही. काहीजणांच्या मनासारख्या घटना घडतील. तरुणांचा उत्साह वाढेल. अति आत्मविश्वास दाखवू नका, भ्रमनिरास होईल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती कराल. व्यावसायिकांना चांगल्या संधी येतील. मित्रमंडळींबरोबर सहलीचे नियोजन कराल. पत्नीबरोबर जपून बोला. वाद टाळा.