• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आता बरं वाटेल…

- सारिका कुलकर्णी (बे दुणे पाच)

Nitin Phanse by Nitin Phanse
August 17, 2023
in भाष्य
0

आमच्या सुलतानाला (आमचा बोका) बरं वाटत नव्हतं. मला खूप काळजी वाटू लागली. शेजारच्या मंजिरी वहिनींनी चौकशी केली. त्यांना सांगितलं,’बघा ना हो वहिनी, त्याच्या अंगावर सारखे शहारे येत आहेत. काय उपाय करावा. डॉक्टरकडे घेऊन जाऊ का?’
मंजिरी वहिनी म्हणाल्या, ‘नाही हो, फार काही विशेष झालेलं नाहीए, आमच्या टेररला देखील असंच होत होतं, तर त्याच्यासाठी मी स्लीपर्स आणल्या. आता त्या घालून खाली घेऊन जाते. ते काय आहे, खाली खडे टोचतात, आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगावर शहारे येतात.’
मंजिरी वहिनींच्या कुत्र्याचे नाव टेरर आहे.
मी, ‘अगं बाई, हो का? आजच आणते स्लीपर्स. मग बरं वाटेल त्याला.’
माणसापासून जनावरापर्यंत प्रत्येकासाठी आपल्याकडे काहीतरी इलाज तयारच असतात. ते करून बघायच्या आधीच आपल्याला विश्वास असतो की या उपायाने यांना आता बरं वाटणार आहे. मला तर असे आजार आणि त्यावर सांगितले जाणारे उपाय यांची भयंकर उत्सुकता वाटू लागलेली आहे. काही आजारांवर तर हमखास उपाय हा झोप हाच असतो. म्हणजे मुलगी आईला म्हणते, ‘आई, खूप डोकं दुखतंय.’
आई म्हणते, ‘जागरण झालंय, पित्ताने डोकं दुखतंय. झोप जरा मग बरं वाटेल.’
डोक्याच्या ऐवजी मुलीने पोट, पाय, मान, घसा, जीभ, करंगळी असा कुठलाही अवयव सांगितला असता तरीही आईचा उपाय तोच राहिला असता. महाराष्ट्रीयन आईला सगळ्या अनारोग्यावर एकच औषध माहिती आहे. त्यातूनही आजार बरा झाला नाही, तर पुढचे कारण असते, ‘अबर चबर, वेळीअवेळी खात असता, मग होणारच हे असं. थोडं धण्याजिर्‍याचं पाणी घे, मग बरं वाटेल.’
त्यातही आजार एक एक निवडक असतात. अगदी सहज आढळणारा आजार म्हणजे, ‘कसंतरी होतंय.’ आता म्हणजे काय ते होणार्‍यालाच माहिती. मंजिरी वहिनी जेवायला बसल्या की त्यांचं सुरु होतं, ‘आज बाई जेवणच जात नाही, कसंतरीच होतंय.’ म्हणजे काय ते त्यांनाच ठाऊक. म्हणजे आपण विचारावं की पोट दुखतंय का, डोकं दुखतंय का, पाय दुखताहेत का? तर यावर उत्तर असतं, ‘ते काही कळत नाहीये, पण कसंतरी होतंय, त्यामुळे जेवण जात नाहीये.’
कोरोनाकाळानंतर तर उगीचच आजारी पडण्याचं प्रमाणही वाढलेलं आहे. लोकांना ऑफिसला जायचा कंटाळा येतो, मग ‘पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर’ अशी काहीही कारणे ते शोधत असतात. पण घरी जसे प्रत्येक आईकडे, ‘जरा झोप, बरं वाटेल,’ हा इलाज असतो तसेच बॉसकडेही कर्मचार्‍याच्या आजारावरील सगळे उपाय असतात. वेळोवेळी तोदेखील यावर जालीम उपाय सुचवत असतो, ‘तू आराम कर आता, तुझ्या अप्रेझलच्या वेळी मीच उपाय करतो,’ असे तो म्हणाला की कर्मचार्‍याला लगेच बरं वाटू लागतं.
‘ताण’ किंवा ‘स्ट्रेस’ या आजाराचे निदान तर हल्ली कोणीही करते. कुठलीही आई आपल्या मुलाला किंवा प्रेयसी प्रियकराला हे म्हणत असते, ‘तुला ना कामाचा खूप ताण होतोय. काम कमी कर जरा. बघवत नाही रे तुझा चेहरा अगदी.’
मागच्या आठवड्यात आमच्या सोसायटीच्या मोटरमनला (पाण्याची मोटर सुरू करणारा हो) त्याची बायको म्हणत होती ते ऐकलं, ‘रोज आपलं यायचं आणि पाणी सोडायचं, तुमाला कामाचा लै स्ट्रेस व्हायलाय.’ आता हे बघून त्याच्या या अतिकष्टाच्या कामाने तर तो अर्धमेलाच झालेला असणार यात मला काही शंकाच उरली नाही.
स्ट्रेस आणि ताण हे शब्द इतके प्रचलित झालेले आहेत की शेजारचा ७ वर्षांचा चिनू त्याच्या आईला म्हणत होता, ‘आई, मला अभ्यासाचा फार स्ट्रेस आलाय. तुम्ही लोक मला कुठे फिरायला का घेऊन जात नाही? मग मला बरं वाटेल.’
लहान मुलं, मोठी माणसं, म्हातारी माणसं सगळ्यांना काहीतरी होतंय. त्याचं कारणही माहिती नाही आणि उपाय देखील माहिती नाही.
आमच्या वॉर्डाचे आमदार तीन वेळा आमदार झाल्यावर मागच्या वेळी निवडणूक हरले. आम्ही त्यांचा दुखवटा काढायला गेलो. आमदारीण बाईंनी त्यांना भेटू दिले नाही. त्या म्हणाल्या, ‘त्यांना बरं वाटत नाही.’
मी विचारलं, ‘बरं वाटत नाही म्हणजे नक्की काय होतंय?’
बाई, ‘कसंतरीच होतंय, काही सांगता येत नाही, नक्की काय होतंय?’
खूप दिवस वाट बघून शेवटी त्यांच्या वाढदिवसाला आम्ही त्यांच्या कार्यालयात होती तशी खुर्ची त्यांना भेट म्हणून घेऊन गेलो. ती बघून बाई म्हणाल्या, ‘तुमचे उपकार कसे फेडू सांगता येत नाही. बहुतेक आता त्यांना बरं वाटेल.’
मी म्हटलं की त्यांना नाहीच बरं वाटलं तर महिन्याभर व्हिटॅमिनच्या गोळ्या खायला घाला, त्याने नक्कीच उभारी येईल.
आमच्या सोसायटीतील सुलूच्या सासूबाई गावाला गेल्यावर अचानकच तिची तब्येत बिघडली. सगळे म्हणू लागले की सुलूला कामाची सवय नाही म्हणून तिची तब्येत बिघडली; पण मला संपूर्ण कल्पना होती की ते खरे कारण नाही. मी तिथे जाऊन तिला १५-२० टोमणे मारले, तिला भरपूर बोल लावले. आता तिला जरासं बरं वाटतंय.
काय केल्याने कुठल्या माणसाला बरं वाटेल हे लक्षात घेतलं पाहिजे. पण त्याही आधी कोणाचं दुखणे काय आहे याचं निदानही करता यायला हवं.
उदा. एका काकांना सकाळी उठून रोज उपदेशाचे डोस असेलेले मेसेजेस पाठवण्याची सवय आहे. काकांचा मोबाईल खराब झाला आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचा रक्तदाब वाढतोय असं निदान डॉक्टरांनी केलं. आता हे काही खरं निदान नव्हे. त्यांच्या मुलाने त्याचा मोबाईल काकांच्या हवाली केला. काकांना १२ उपदेशवाले मेसेजेस आणि ६ फॉर्वर्डेड मेसेजेस असा डोस लागू पडलेला आहे. त्यांचा रक्तदाब आता त्यांनी मेसेजेसमधून पुढे पाठवला आहे.
आमच्या वॉर्डाच्या नगरसेवकांचा वाढदिवस होता. त्यादिवशी ते संपूर्ण शहरात एक चक्कर टाकून आले. येताना त्यांच्या अभीष्टचिंतनाचा फलक त्यांनी सिग्नलला बघितला. दोन मिनिटं गाडी बाजूला थांबवायला लावली आणि घरी आले ते अचानक कोणाशी बोलेनासे झाले. त्यांची तब्येत बिघडली. काय झालं, काय झालं म्हणून सगळे चौकशी करू लागले. साहेब गप्प. हूं नाही की चूं नाही. खूप मिनतवार्‍या करून कोणीतरी विचारलं, तेव्हा साहेब उत्तरले, ‘सिग्नलला लावलेल्या फलकात माझा उल्लेख फक्त चिंटू साहेब म्हणून केला आहे. त्यामागे कार्यसम्राट असं कोण लिहिणार?’ पुढच्या तासाभरात फलक बदलून कार्यसम्राट असं लिहिल्यावर साहेबांना मग कुठे जरा बरं वाटू लागलं.
दरवर्षी शेकड्याने काव्यसंमेलनाला हजर राहणार्‍या कवी महोदयांची तब्येत कोरोनाकाळात यामुळेच बिघडली होती. शेवटी आजूबाजूचे सगळे पाळीव प्राणी त्यांच्यासमोर बसवले आणि त्यांना कविता ऐकवली, तेव्हा कवेश्वरांना बरे वाटले. एक कुत्रा त्यांची कविता ऐकून कोपर्‍यात जाऊन तंगडे वर करून आला, ही त्यांना मिळालेली सगळ्यात मोठी दाद होती असं त्यांचं म्हणणं पडलं.
शिक्षणसेवक पदावर रुजू करून घेण्यासाठी लाच घेणार्‍या एका बाईंना त्यांच्याच भाचीला फुकट नोकरी द्यावी लागली, तेव्हा बाईंची तब्येत अशीच बिघडली होती. जेव्हा त्यांनी दुसर्‍या एका उमेदवाराकडून दुप्पट रक्कम वसूल केली, तेव्हा बाईंना बरं वाटलं म्हणे.
‘तुम्हाला झालेला असू शकतो हा भयंकर आजार, जाणून घ्या त्याची लक्षणे आणि उपाय ‘ असा मथळा ऑनलाइन वृत्तपत्रात वाचला की मला घाबरायला होतं. कारण आधीच ‘कसंतरी होतंय’ या आजाराने सगळे ग्रस्त असताना अजून कुठले भयंकर आजार इथे फोफावणार आहेत या कल्पनेने मला कसंतरी व्हायला लागतं.
खरं तर आजारपण, तब्येतीत झालेला बिघाड हा व्यक्तिसापेक्ष आणि कालसापेक्ष असतो. आजूबाजूला सारखं काहीतरी घडतंय आणि आपलं मन उद्विग्न होतंय. आपण धर्माच्या नावाने, जातीच्या नावाने भांडतोय. आपलं समाजस्वास्थ्य अक्षरशः शून्यत्वाकडे जातंय. आपण रोजच पेटून उठतोय आणि काहीही करता न येण्याच्या भावनेने पुन्हा एकदा थंड होऊन निपचित पडतो आहोत. सारखं काहीतरी होतंय, कसंतरी वाटतंय हे आपले आजार घरगुती न राहता सामाजिक झाले आहेत. आईने सांगितलेला ‘जरा झोप, म्हणजे बरं वाटेल.’ हा झोपण्याचा उपचार मात्र आपण तंतोतंत पाळत आहोत.

[email protected]

Previous Post

नॉस्टॅल्जिया जागवणारा ‘गदर-२’

Next Post

वारसदार

Next Post

वारसदार

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.