१५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेल्या गदर या सिनेमाने इतिहास घडवला होता. भारतात पाच कोटींपेक्षा जास्त लोकांनी हा सिनेमा पाहिला. प्रेक्षकांना पुन्हा पुन्हा सिनेमागृहात जाऊन सिनेमा पाहायला लावणारा हा शोलेनंतरचा सिनेमा असावा. सर्वाधिक प्रेक्षकसंख्या कमावणार्या सिनेमांच्या यादीत तो तिसर्या क्रमांकावर आहेच. फिल्मी पद्धतीने का होईना, राष्ट्रवाद जागवणार्या या सिनेमात भावनांना हात घालणारा मसाला ‘हॅण्डपंपने’ कुटून कुटून भरला होता. पहिल्या सिनेमाची यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी आणि बावीस वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल, गदर टू रिलीज झाला आहे.
प्रेक्षकांच्या गतस्मृती जागवण्यासाठी जुन्या गदरमधील अनेक गोष्टी इथेही आल्या आहेत. सिनेमा सुरू होताना सुरुवातीच्या दोन मिनिटांत गदर १मध्ये काय घडलं होतं हे सांगितलं जातं आणि सिनेमाचा खलनायक पाकिस्तान सैन्यातील मेजर जनरल हमीद इकबाल (मनीष वाजवा) याची ओळख अभिनेते नाना पाटेकर यांच्या आवाजात करून दिली जाते. सिनेमाची कथा १९७१ सालातील आहे. कथा हिंदुस्तान-पाकिस्तानभोवतीच फिरते. तारासिंग (सनी देओल) हा ट्रक ड्रायव्हर असून तो त्याची पत्नी मॅडमजी (अमिषा पटेल) आणि मुलगा चरणजीत उर्फ जीते (उत्कर्ष शर्मा) यांच्यासोबत भारत-पाकिस्तान बॉर्डर जवळील गावात राहतोय. जीतला मुंबईत जाऊन सिनेमाचा हिरो बनायचा आहे, तर तारासिंगची इच्छा आहे की मुलाने आपल्यासारखं ट्रक ड्रायव्हर न होता, अभ्यास करून भारतीय सैन्यातील मोठा ऑफिसर व्हावा. एक दिवस पाकिस्तान सैन्याने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असा संदेश येतो.
बॉर्डरवर लढणार्या सैन्याला दारूगोळा पोहोचवण्याची जबाबदारी तारासिंग आणि त्याच्या सहकारी ट्रक ड्रायव्हरवर सोपवली जाते. या धुमश्चक्रीत भारतीय सैनिक आणि ट्रक ड्रायव्हर पाकिस्तानी सैन्याच्या हाताला लागतात. पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यातून वडिलांना सोडवण्यासाठी जीते पाकिस्तानला जातो. या कामात पाकिस्तानी मुलगी मुस्कान (सिमरत कौर) जीतला मदत करते. वडिलांना सोडवण्याच्या प्रयत्नात जीतला अटक होते. इकडे तारासिंग घरी पोहचतो, तेव्हा त्याला जीते पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात आहे हे कळतं आणि मग तो मागील वेळी बायकोला आणायला पाकिस्तानला गेला होता, तसाच यावेळी मुलाला परत आणायला पाकिस्तानला जातो. पुढे काय होतं, ते समजून घेण्यासाठी हा चित्रपटच पाहायला हवा.
कथेत फार नावीन्य नाही, या सिनेमाची नव्वदीच्या दशकातली मांडणी आहे. पाकिस्तानला बोल लावणे, जागा मिळेल तिथे त्यांना चार गोष्टी सुनावणं असे टाळ्याखेचक संवाद सिनेमात येत राहतात. सिनेमा १९७१च्या युद्धाच्या आधी घडतो. त्या युद्धाचे पडसाद सिनेमात दिसले असते तर कथेची खुमारी अजून वाढली असती. पण, मुलगा वडिलांना आणि वडील मुलाला सोडवण्याचा प्रयत्न करतात, याभोवतीच ही कथा फिरत राहते.
सनी देओल हा या सिनेमाचा तारणहार आहे. सिनेमामधील त्याच्या एंट्रीला टाळ्या वाजवून स्वागत केलं जाईल. निव्वळ आपल्या वावराने सिनेमागृहातील प्रेक्षकांना संमोहित करू शकेल असे हिरो आज फार कमी उरले आहेत. त्यापैकीच एक सनी देओल आहे. भेदक नजर आणि तारस्वरातील संवादफेक हे सनीचे बलस्थान. या सिनेमातही सनी प्रेक्षकांना निराश करत नाही. शेकडो सैनिक आणि जमावाशी एकटा माणूस लढतोय, हे दृश्य खरं वाटावं इतक्या सफाईने सनी करतो. पहिल्या सिनेमात त्याने जमिनीतील हॅण्ड पंप उखडून दुष्मनांना चोप दिला होता. यावेळी घोडागाडी, महाकाय चक्र, विजेचे खांब, तारा… असं बरंच काही आहे. जोडीला, ‘जर आज पाकिस्तानी जनतेला भारतात परत येण्याची संधी मिळाली, तर अर्धा पाकिस्तान रिकामा होईल’ अशा प्रकारचे टाळीबाज डायलॉग देखील आहेत. पण हे सर्व पाहायला, एन्जॉय करायला जे प्रेक्षक येतात, त्यांना सनी पडद्यावर फार काळ दिसत नाही, हे या चित्रपटाचे दुर्दैव आहे. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी त्यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा याला हिरो म्हणून आणखी एक संधी देण्यासाठी गरजेपेक्षा जास्त फुटेज दिलं आहे. उत्कर्ष सौदागरमधील विवेक मुश्रानची आठवण करून देते. लव्ह सीनमध्ये तो चागलं काम करतो, पण अॅक्शन सीनमध्ये त्याने अनेक प्रसंगांत सनी देओलसारखा अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. ओरिजनल समोर असताना लोक डुप्लिकेट का पाहतील, हा प्रश्न दिग्दर्शकाला पडल्याचं इथे दिसत नाही. मनीष वाधवा प्रमुख खलनायक मेजर जनरलच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या मनात चीड निर्माण होईल, असा अभिनय करण्यात यशस्वी झाले आहेत. सिमरत कौर आपल्या सुंदर दिसण्याने सिनेमाची ग्लॅमरस बाजू प्रेक्षणीय करते. राकेश बेदी, मुश्ताक खान, अनिल जॉर्ज असे जुने जाणते अभिनेते अभिनयाची एक बाजू खंबीरपणे सांभाळतात. गदर १मधील, उड जा काले कावा आणि मैं निकला गड्डी लेकर ही लोकप्रिय गाणी गदर २मध्येही वाजतात, यामुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होतात. बाकी नवीन गाणी ठीक ठाक आहेत.
सनी देओलच्या आयुष्यातील सर्वात यशस्वी चित्रपटाचा हा सिक्वल आहे. जुनी पिढी सनीच्या प्रेमापोटी या सिनेमाला गर्दी करेलच, पण नवीन पिढीने देखील नव्वदीच्या दशकातील मनोरंजन आणि सनीचा करिश्मा अनुभवण्यासाठी हा चित्रपट एकदा पाहायला हरकत नाही.