गजाननराव वैद्यांच्या विचारांचा प्रभाव प्रबोधनकारांवर पुढेही कायम राहिला. विशेषतः `प्रबोधन`मधले लेख वाचताना त्यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीशी असलेल्या संबंधांचा प्रवासही मांडता येतो.
– – –
२३ मार्च १९२१ रोजी गजाननराव वैद्य यांचं निधन झालं. त्यानंतर सहा वर्षं तरी प्रबोधनकार हिंदू मिशनरी सोसायटीमध्ये कार्यरत असल्याचं दिसून येतं. सोसायटीच्या गव्हर्निंग काऊन्सिलचे सदस्य म्हणून ते काम करत होते. तोवर प्रबोधनकारांचा प्रवास सत्यशोधक चळवळीच्या दिशेने होऊ लागला होता. तरीही १९२१च्या ऑक्टोबरमध्ये सुरू झालेल्या पाक्षिक `प्रबोधन`मधल्या त्यांच्या लिखाणावरही वैद्यांच्या हिंदुत्ववादी विचारांचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो. `हिंदू मिशनरी` हे सोसायटीचं मुखपत्र असलं तरी `प्रबोधन`ने सोसायटीची तितक्याच निष्ठेने सेवा केलेली आढळते. गजाननरावांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त `प्रबोधन`चा अग्रलेखही त्यांची महती गाणारा आहे. जुलै १९२५च्या अंकासोबत तर `हिंदू मिशनरी`चा अंकच पुरवणी म्हणून `प्रबोधन`च्या सोबत दिलेला आहे.
प्रबोधनकारांनी `प्रबोधन`मधून ख्रिश्चनांच्या जबरदस्ती धर्मप्रसारावर त्यांनी टीका केलेली आहे. सोसायटीच्या कामाची माहिती दिली आहे. तिच्यावरच्या आरोपांना उत्तरं दिली आहेत. पण त्याहीपेक्षा प्रबोधनकार गजाननरावांनी संशोधन केलेल्या वैदिक विवाह विधीच्या कामात गुंतलेले दिसतात. त्यांनी आचार्य म्हणजे पुरोहित बनून लग्नं लावलीच पण त्यावरचं लिखाणही सुरूच राहिलं. १६ जानेवारी आणि १ फेब्रुवारी २०२२ या `पाक्षिक प्रबोधन`च्या मागोमागच्या अंकांमध्ये `विवाहविधीचें संशोधन` या मथळ्याचा लेख दोन भागांत छापून आलाय. या लेखासोबत लेखकाचं नाव दिलेलं नाही. लेखाखाली नाव नसलेलं लिखाण संपादकाचं मानण्याची पद्धत त्याकाळी होती. ते `प्रबोधन`लाही लागू होतं. प्रचलित विवाहविधी धार्मिक राहिलेला नाही, तर रुढी परंपरांमध्ये अडकून सामाजिक उरला आहे. त्यामुळे त्यात पुन्हा तेज आणण्यासाठी गजाननराव वैद्यांनी त्याचं संशोधन केलं, अशी मांडणी त्यात प्रबोधनकार करतात. गजाननराव हिंदू मिशनरी सोसायटीसाठी २४ वर्षं तर वैदिक विवाहविधीसाठी १२ वर्षं अभ्यास करत असल्याची माहिती ते देतात.
या लेखात प्रचलित व्यवस्थेतले दोष सांगताना प्रबोधनकार रोचक गोष्टी त्याहून रोचक शैलीत सांगतात, `पेशव्यांच्या दप्तरांत कोणकोणत्या जातीच्या नवरदेवाची वरात कशाकशावर बसवून काढावी याचे निर्णय झालेले कागदपत्र पाहिले तर, कोणाची वरात घोड्यावर, कोणाची खेचरावर, कोणाची बैलावर, कोणाची पालखीत, कोणाची माणसाच्या डोक्यावर, तर कोणाची पायी असे अनेक प्रकार त्यांत दिसतात. बिचार्या गाढवाची मात्र सोय कोठेच लागली नाही! सारांश, मुसलमान, पारशी, यहुदी, क्रिस्ती म्हटला म्हणजे त्याच्या विवाहविधीची एक ठराविक पद्धत असते, तसा प्रकार हिन्दुजनांत नाही. सर्वसाधारण साम्य जर हुडकून काढले तर बहुतांशी ते `शुभमंगल सावधान` या मामुली बेंडबाजा पद्धतीत दिसते. कित्येक जातींतील लग्नविधी तर इतक्या चमत्कारिक पद्धतीने होतात की ते पाहून शिसारी आली नाही, तरी हंसूं आल्याशिवाय रहात नाही. शिवाय भिक्षुक भटजींच्या अकलेचे व विद्वत्तेचे तारे तुटतात, त्याचा महिमा सहस्रमुखी शेषाच्या बापाला सुद्धा वर्णन करतां यावयाचा नाही.`
लग्नमुहूर्तांविषयीची त्यांची मतंही वेगळी आहेत, `मुहूर्तांचे अनावश्यक दास्य पत्करून सुद्धा विवाहविधी ठराविक मिनिट सेकंदांवर घडून येत नाहीत ते नाहीतच! अशा परिस्थितीत `जोशी पंचांग पहाती, मग कां बालविधवा होती` ही तुकोक्ती कोणत्या विचारवंताला आठवणार नाही? खरे पाहिले तर मूळच्या वेदोक्त विवाहविधीत अंतर्पाट किंवा मंगलाष्टके यांचा काहीच मागमूस लागत नाही.` लेखाच्या शेवटी ते एक महत्त्वाची सूचना करतात, `आजपर्यंत ब्राह्मण, कायस्थ प्रभू, मराठे क्षत्रिय इ. अनेक जातींत या पद्धतीने बरेच विवाह लागले आहेत. या विधीची छापील पुस्तकें आज दोन वर्षे छापू लागली आहेत. कै. वैद्यांच्या ध्वजधारकांनी या कार्याचे महत्त्व जाणून, हा विधी शक्य तितक्या लवकर छापून प्रसिद्ध करावा, अशी आमची त्यांस आग्रहाची विनंती आहे.` हे काम प्रबोधनकारांनीच पार पाडलं. १९२४मध्ये प्रबोधनकारांनी `वैदिक विवाह विधी` हे पुस्तकं संपादित आणि प्रकाशित केलं. त्यात सुरवातीला गजाननराव वैद्य संपादित विवाहविधी मंत्रांसहित दिला आहे. त्यानंतर `विवाहविधीचं संशोधन` हा प्रबोधनमध्ये छापून आलेला लेख आहे. शिवाय या विधीची कायदेशीर ग्राह्यता सिद्ध करणारा `एक एमएलएलबी` या टोपण नावाच्या लेखकाचा लेखही आहे.
प्रबोधनच्याच १६ जून आणि १६ जुलै १९२२ च्या अंकात `आर्यांच्या विवाहविधीची चिकित्सा` असा अग्रलेख दोन भागांत छापलेला आहे. त्यात वैदिक काळ आदर्श असून आर्यांनी रचलेला विवाहविधी आदर्श असल्याचा दावा केलाय. पण ते करताना त्यांनी बहुपत्नी प्रथा आणि बालविवाहाचा कडाडून विरोध केला आहे. तसंच विधवाविवाह आणि आंतरजातीय लग्नांना मान्यता देण्याला प्रोत्साहन दिलं आहे.
याच दरम्यान १ जुलै १९२२च्या अंकात `झक मारतात मित्र, वैद्य काय म्हणतात?` या आकर्षक मथळ्याचं स्फुट आहे. मुंबईच्या शेट रतनसी धरमजी मुरारजी या प्रसिद्ध उद्योजकाने त्यांच्या मुलांची शिकवणी घेणार्या मिस माना रेंडा या अमेरिकन महिलेसोबत लग्न केलं होतं. त्या काळात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय लग्नांना मान्यता देण्याला धर्ममार्तंडांचा विरोध होता. मुरारजी यांनी मिस रेंडाला रखेली म्हणून ठेवावं, पण परधर्मातील असल्यामुळे तिच्याशी लग्नं करू नये, असं मत तेव्हा गुजराती वर्तमानपत्रांत छापूनही आलं होतं. पण गजाननरावांचे भाऊ सुंदरराव वैद्य यांनी मिस रेंडा यांना हिंदू करून घेतलं आणि वैदिक पद्धतीने दोघांचं लग्नही लावून दिलं. त्यांचं म्हणणं होतं की दुसरं लग्न करण्यासाठी मुरारजी मुसलमान बनायला तयार झाले होते.
पण `लोकमित्र` आणि `सुबोधपत्रिका` या नियतकालिकांनी हे लग्नच गजाननरावांच्या विचारांच्या विरोधात असल्याची टीका केली होती. तो आरोप प्रबोधनकारांनी साधार खोडून काढला. `हिंदू मिशनरी` साप्ताहिकाच्या जुन्या अंकातले वैद्यांच्या जुन्या लेखांचे दाखले देत त्यांनी वैद्यांचं मिश्र विवाहांना समर्थन असल्याचं सिद्ध केलं. पुढे १६ जानेवारी १९२४च्या अंकातही प्रबोधनकारांनी आंतरजातीय लग्नांचं जोरदार समर्थन केलं. त्याला मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर डॉ. जीवराज मेथा आणि बडोद्याच्या हंसाबेन यांच्यात वैश्य आणि ब्राह्मण यांच्यात झालेल्या आंतरजातीय लग्नाचा संदर्भ होता. तसंच इंदूरचे युवराज यशवंतराव होळकर यांचं लग्न कागलकर घाटगेंच्या मुलीशी झालं होतं. या धनगर आणि मराठा यांच्यातल्या लग्नासाठीही त्यांनी अभिनंदन केलं होतं.
मार्च १९२६च्या प्रबोधनच्या अंकात गजाननराव वैद्य यांच्या स्मृतिदिनानिमित्त `पहिले हिंदुधर्मोपदेशक` नावाची एक कविता प्रकाशित झालीय. कवी पाणसरे यांच्या या कवितेतल्या शेवटच्या ओळी अशा आहेत,
झाले प्यार जनांसि वैद्य
जगती सद्धर्म संचालक
यांचा तो पथ आचरा
सुजनहो, व्हा देश उद्धारक
गीता दिव्य करी
समाधीमधूनी आत्मा बजावी भवा,
`हिंदूंनो, प्रिय हिंदुधर्म
अजुनी प्रेमे जगी वाढवा`
हिंदू मिशनरी सोसायटीबरोबर असलेले प्रबोधनकारांचे जवळचे संबंध इथपर्यंत व्यवस्थित सुरू दिसतात. पण त्यानंतर कुरबुरी दिसू लागल्या आहेत. त्याचा स्फोट १ नोव्हेंबर १९२७च्या अंकात झालाय. प्रबोधनकारांनी सोसायटीकडून `प्रबोधन`साठी कर्ज घेतलं होतं. पण त्यानंतर अडचणींचा डोंगर उभा राहिल्यामुळे ते कर्ज वेळेत फेडणं त्यांना शक्य होत नव्हतं. म्हणून त्यांनी मुदत वाढवून देण्याची विनंती पत्र पाठवून केली. पण नवीन अध्यक्ष आनंदराव नाखवा यांनी कोर्टात केस केली. त्यावर टीका करणारं `हिंदू मशिनरी सोसायटी` हे खरमरीत टिपण प्रबोधनकारांनी लिहिलंय.
त्यात ते लिहितात, `ज्या गोष्टी एकमेकांच्या सोयीने आणि सवलतीने सहज एखाद्या बैठकीत सुटल्या जातात, त्यासाठी कायदेबाजी आणि कज्जेदलालीचा अवलंब करणार्या असल्या दीड शहाण्यांच्या हाती हिंदू मिशनरी सोसायटी सापडल्यामुळेच तिला हिंदू मशिनरी सोसायटी म्हणजे हिंदू लोकांच्या पिंडाला झोंबलेल्या बेमाणुसकीच्या यंत्रप्रसाराची सोसायटी असे नाव दिल्यास अत्यंत सार्थ ठरेल.`
प्रबोधनकारांच्या विचारांवर दाट प्रभाव टाकणार्या हिंदू मिशनरी सोसायटीपासून झालेली ताटातूट अनेक अर्थांनी स्वाभाविक होती. कारण ते तिच्या विचारांपासून आधीच दूर गेलेले होते. गजाननरावांविषयीचा आदर कायम राखत त्यांनी अधिक पुरोगामी आणि बंडखोर दिशा धरली होती.