प्रबोधनकारांचा प्रवास समाजसेवेकडून समाजसुधारणेकडे झाला, या वळणाचं श्रेय गजाननराव वैद्य यांच्या हिंदू मिशनरी सोसायटीला द्यायला हवं. प्रबोधनकारांनी या संस्थेसाठी दीर्घकाळ आघाडीचे कार्यकर्ते म्हणून काम केलं.
– – –
विरोधाभास हे प्रामाणिकही असू शकतात. कारण माणसाचं आयुष्य अनेक विरोधाभासांनी भरलेलं असतं. स्वत:च स्वत:ला घडवणार्या माणसांचं तर अधिकच. त्या माणसांना एका चौकटीत शोधता येत नाही. ठरीव विचारधारांच्या चौकटींत तर नाहीच नाही. त्यामुळे प्रबोधनकारांचं साहित्य वाचताना अनेक विरोधाभासी वाटतील अशी विधानं सापडतात. त्यांच्या जगण्यातल्या स्थित्यंतराचा काळ हा देश आणि महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थित्यंतरांचा होता, हे लक्षात घेऊन त्याकडे बघावं लागतं. एकाच वैचारिक चौकटीत न अडकता चहुबाजूंनी मनमोकळी मुशाफिरी करत स्वतःला योग्य वाटेल ते करत राहण्याच्या त्यांच्या मनस्वीपणाचाही विचार करावा लागतो. त्याचबरोबर एक पत्रकार म्हणून समोर आलेल्या मुद्द्याचा समाचार घेण्याची त्यांची पत्रकाराची शैली आणि स्वभाव याकडेही आपल्याला दुर्लक्ष करून चालत नाही. हे संदर्भ लक्षात घेतले की ही वरवर विरोधाभासी वाटणारी विधानं तितकी परस्परविरोधी नसल्याचं ध्यानात येतं.
या नमनाचंही कारण सांगायलाच हवं. जानी दोस्त बाबूराव बेंद्रेंच्या हिप्नॉटिझमच्या अभ्यासाविषयी प्रबोधनकार `माझी जीवनगाथा`त लिहितात, `तो अध्यात्मवादी आणि मी? पक्का नास्तिक! पण ही प्रकृतिभिन्नता आमच्या स्नेहधर्मात कधीच आडवी आली नाही.` हे वाचून आपण एक मत तयार करतो आणि पुढे शंभरेक शब्द वाचून अचानक थबकतो. कारण ते लिहितात, `नेहमीच्या सांसारिक जीवनात आयुष्याला सात्विक सोज्वळ वळण देणार्या एखाद्या साधुपुरुषाची गाठभेट होणे, त्याच्या निकट सान्निध्याचा लाभा होणे, या परम भाग्याची संधी आद्य हिंदू मिशनरी गजाननराव वैद्य यांच्या अविस्मरणीय संगतीने मला लाभली.`
आता या नास्तिकाला सोज्वळ जगण्यासाठी कुणी साधू कशाला हवा, असा प्रश्न पडणं स्वाभाविक असतं. पण लगेच लक्षात येतं की यात विरोधाभास नाहीच आणि असलाच तर सुसंगतीच आहे. गजाननराव वैद्य कुणी बुवा बाबा किंवा आध्यात्मिक सत्पुरुष नव्हते. ते सामाजिक सुधारणांसाठी आग्रही असणारे खंदे आणि सक्रिय धर्मसुधारक होते. त्यांच्या पारदर्शक व्यक्तिमत्वाने प्रबोधनकारांना आपलंसं केलं होतं. त्यांच्या या व्यक्तिमत्वाचं वर्णन करताना प्रबोधनकार लिहितात, `चित्त गंगाजळ, वाणीचा रसाळ, त्याच्या गळा माळ, असो नसो` तंतोतंत या तुकोक्तीसारखे त्यांचे जीवन होते.`
गजाननरावांचे भाऊ सुंदरराव वैद्य यांनी लिहिलेल्या `श्रीगजानन महर्षी` या चरित्राच्या आधारे ज्येष्ठ इतिहासकार अ. रा. कुलकर्णी यांनी मराठी विश्वकोशात त्यांच्यावर एक टिपण लिहिलं आहे. त्यानुसार गजानन भास्कर वैद्य यांचा जन्म २ जून १८६७ रोजी कनकेश्वर डोंगराच्या पूर्वेस असलेल्या नारंगी या गावी झाला. हे गाव रायगड जिल्ह्यात खोपोलीपासून जवळ आहे. ते शिक्षणासाठी मुंबईत आले. १८९३ साली बीए झाले. १८९८पासून थिऑसॉफीचा प्रचार करू लागले. ते उत्तम वक्ते होते. दादाभाई नवरोजी यांच्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या शाळेत ते शिकवत असत. १८९९ ते १९२० असा दीर्घकाळ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष होते.
प्रबोधनकारांची वैद्य बंधूंशी जुनी ओळख होती आणि तीही कलाकार म्हणून. लाकडावर कोरीव काम करून छपाईसाठीचे ठसे बनवण्याच्या वुडकट एन्ग्रेविंगच्या कलेसाठी सुंदरराव वैद्य प्रख्यात होते. दोन्ही भावांचा वैद्य ब्रदर्स म्हणून काळबादेवीच्या कोलभाट लेनमध्ये छापखानाही होता. प्रबोधनकार स्वतःही वुडकट एन्ग्रेविंगच्या कामात निपुण असल्याने ते वैद्य बंधूंना भेटायला जात. या मैत्रीमुळेच गजाननराव `हिंदू मिशनरी सोसायटी` सुरू करण्याची तयारी करत होते, तेव्हाच प्रबोधनकार आणि बाबूराव बेंद्रे त्याच्याशी जोडले गेले. त्यांच्यासोबत असणारी बाळासाहेब राजे, अनंतराव पिटकर, सावळराम दौंडकर अशी आणखी नावं प्रबोधनकारांनी नोंदवली आहेत.
त्या काळात गिरगाव आणि परिसरात हिंदूंच्या ख्रिस्ती धर्मांतराच्या घटना घडत होत्या. त्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न करणारे ख्रिस्ती मिशनरी आणि त्यांच्या संस्थाही होत्या. `गरजू बेकार कोणी आढळला तर त्याला नोकरीची म्हणा, छोकरीची म्हणा, लालूच दाखवून बिनबोभाट बाटवायचे,` असं प्रबोधनकार सांगतात. इथे हिंदू धर्मातही बाटला म्हणजे आमच्यासाठी मेला असा विचार असायचा. त्यामुळे हिंदू धर्माची संख्या कमी होत असल्याच्या विचाराने अस्वस्थ झाले होते. यावर काम करायला दुसरं कुणी नसेल, तर आपण करायला हवं, असं त्यांनी ठरवलं. त्यासाठी त्यांनी आपल्या सोप्या तरीही प्रभावी शैलीत ठिकठिकाणी व्याख्यानं सुरू केली. त्यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली, `मी बोलतो ते निर्भेळ सत्य असेल, तुम्हाला तसे मनोमन पटत असेल, हिंदुत्वाविषयी तुम्हाला जातिवंत कळवळा असेल, तर माझ्या मागे या. हिंदुधर्माचा दरवाजा मी सताड उघडा करीत आहे. जगातल्या सर्व मानवांनी या धर्मक्षेत्रात यावे. आम्ही त्यांचे स्वागत करायला सिद्ध आहोत. काय म्हणता? हा अधिकार आम्हाला कोणी दिला? अधिकार देवाने दिला. हिंदूंचा वैदिक धर्म हा जगाचा धर्म झालाच पाहिजे. ही देवाची आज्ञा आहे.`
गजाननराव वैद्यांनी धर्मांतरीतांना हिंदू धर्माचे दरवाजे स्वतःच्या अधिकारात मोकळे केले होते. ते मुळात संस्कृतचे मोठे विद्वान होते. त्यांनी उपनिषदांवर लिहिलेली टिपणं आणि धर्माविषयीचे लेख याची साक्ष देतात. त्यामुळे त्यांनी वैदिक धर्म हाच हिंदू धर्म मानून त्याच्या आधारावर मांडणी केली होती. ते टिळकवादी असल्यामुळे त्याला कट्टर धार्मिक अभिमानाची डूबही होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा जोरजबरदस्तीच्या धर्मांतराच्या विरोधात पहिलं क्रांतिकारक पाऊल उचललेलं दिसतं. बजाजी निंबाळकरांपासून नेताजी पालकरांपर्यंत स्वराज्याच्या पाईकांना हिंदू धर्मात परत घेतलं. इतकंच नाही तर बजाजींचा मुलगा महादेव याच्याशी स्वतःच्या मुलीचं सखुबाईचं लग्न लावून सन्मान मिळवून दिला. पण पेशवाईत हा शिरस्ता पुढे नेल्याचं दिसत नाही. थोरल्या बाजीरावांना मस्तानी राणीसाहेबांकडून झालेल्या स्वतःच्या मुलाला समशेर बहादूरला इच्छा असूनही हिंदू बनवता आलं नाही. पुढे इंग्रजी आमदनीत राजा राममोहन रॉय यांच्यापासून स्वामी विवेकानंदांपर्यंत सर्व धर्मसुधारकांनी भारतीय संस्कृतीची थोरवी सिद्ध करून ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा नैतिक आणि वैचारिक पायाच उद्ध्वस्त केला.
याच काळात महर्षी दयानंद सरस्वतींच्या आर्य समाजाने धर्मांतरितांसाठी मोहीम हाती घेतली. थेट वेदांचेच दाखले देत त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद, विधवा विवाहबंदी याच्या विरोधात बंड पुकारलं. त्यामुळे महात्मा जोतिबा फुले आणि न्या. महादेव गोविंद रानडे अशा दिग्गजांनी पुण्यात त्यांचा सत्कार आयोजित केला. पुढे छत्रपती शाहू महाराजांनीही आर्य समाजाला प्रोत्साहन दिलं. याच आर्य समाजाने स्वामी श्रद्धानंद यांच्या नेतृत्वात शुद्धीची चळवळ चालवली. गजाननराव वैद्यांच्या धर्मांतरितांना पुन्हा हिंदू धर्मात घेण्याच्या उपक्रमाला याची पार्श्वभूमी आणि प्रेरणा होती. पण यात एक फरक होता की धर्माच्या क्षेत्रात हस्तक्षेप करणारे गजाननराव वैद्य हे ब्राह्मण नव्हते, तर चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी होते. ब्राह्मणेतर असल्यामुळे गजाननरावांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उभं केलं जात होतं. त्याला त्यांनी उत्तरही दिलं होतं. तेव्हाच्या त्यांच्या वर्तनाचं वर्णन `पाक्षिक प्रबोधन`च्या १६ मार्च १९२२च्या अंकात प्रबोधनकारांनी केलं आहे, `हिंदूंच्या जिवाग्री भिनलेल्या रोगांवर तोंडचोबडेपणाच्या मलमपट्ट्या लावून त्यांच्या वेदनांवरच आपल्या स्तोमाची प्राणप्रतिष्ठा चालविणार्या मानवदेहधारी श्वानांच्या भुंकण्याने वैद्यांचे काळीज थरथरले नाही. किंवा राष्ट्रीयत्वाचा उदो उदो करण्याचा हक्क स्वतःपुरताच रिझर्व करणार्या वर्तमानपत्री जगद्गुरूंच्या बर्यावाईट अभिप्रायांकडे त्यांनी लक्ष दिले नाही.` यातला जगद्गुरू हा उल्लेख करवीर पीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी यांच्या संदर्भात आहे. त्यांनी आधी हिंदू मिशनरी सोसायटीला प्रोत्साहनपर संदेश पाठवला होता. नंतर मात्र या कामाला विरोधच केला.
गजाननरावांचे लोकमान्य टिळकांशी `पितापुत्रवत` संबंध असल्याचं प्रबोधनकार नोंदवतात. पण हिंदू मिशनरी सोसायटीची योजना ऐकल्यावर लोकमान्यांची प्रतिक्रिया पाठराखण करणारी नव्हती. `केसरी`चे मुंबईचे प्रतिनिधी अनंतराव पिटकर यांना गजाननरावांनी लोकमान्यांकडे पुण्याला पाठवलं. त्यानंतरचं वर्णन प्रबोधनकारांच्या शब्दांतच वाचायला हवं, `प्रश्न अक्षरशः अपूर्व अशा धर्मक्रांतीचा. पण वैद्य हे तर ब्राह्मणेतर! ब्राह्मणेतर पंडिताने धर्माचे दरवाजे सगळ्यांना उघडे करायचे. बाटलेल्यांनाही परत हिंदू करून घ्यायचे. जगद्गुरू शंकराचार्यांनाही धाब्यावर बसवून `हा अधिकार मला देवाने दिला` म्हणायचे. या विलक्षण धर्मक्रांतीच्या योजनेला लोकमान्यांना होकार किंवा स्पष्ट नकार देण्याची शहामत झाली नाही. आज काय सांगणार? `प्रयोग करून पहा’ असा संदिग्ध नि मोघम अभिप्राय टिळकांनी दिला.`