• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

हमारा बजाज!

(संपादकीय १९ फेब्रुवारी २२)

टीम मार्मिक by टीम मार्मिक
February 19, 2022
in संपादकीय
0

देशातल्या वाहन उद्योगातील एक अग्रणी आणि बजाज उद्योगसमूहाचे अध्वर्यू पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने देशाने केवळ एक धडाडीचा उद्योगपतीच गमावलेला नाही, तर त्यांच्या कारखान्यांमध्ये काम केलेले कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय यांच्यापासून बजाजची वाहने वापरलेले कोट्यवधी ग्राहक यांना आपल्या जवळचा माणूस हरपल्याचे दु:ख झाले आहे. हे आजच्या युगात आश्चर्यकारक आहे. आज सर्वसामान्य जनतेला उद्योगपतींबद्दल आपुलकी वाटण्यासारखी परिस्थिती नाही. देशातली संपत्ती ज्या वेगाने मूठभरांच्या हाती एकवटते आहे ते पाहता उद्योगपती या शब्दाची शिसारी आली आहे लोकांना. उद्योगपती म्हणजे सरकारमध्ये सर्वोच्च स्थानांवर बसवलेल्या एजंटांमार्फत सगळे उद्योगव्यवसाय ताब्यात घेऊन मक्तेदारी निर्माण करतात ते लोक; उद्योगपती म्हणजे इथल्या बँकांमधला सर्वसामान्य जनतेच्या घामाचा पैसा लुटून संगनमताने देशाबाहेर पळ काढून ऐषोआरामात राहतात ते लोक, अशी सर्वसामान्यांची समजूत झाली आहे. कारण आज निव्वळ नफेबाज व्यापारीही उद्योगपती म्हणून मिरवायला लागले आहेत. अशा काळात एका उद्योगपतीच्या निधनाने सामान्यजनांना ‘हमारा बजाज’ गमावला, असे वाटावे, ही फार मोठी कमाई मानायला हवी.
राहुल बजाज यांना काही पुण्याई जमनालाल बजाज यांच्या घराण्यातून मिळाली होती आणि बाकीची कमाई त्यांच्या धडाडीची. देशात लायसन्स-परमिट राज असण्याच्या काळात सर्वसामान्य जनतेचं वाहन होती सायकल. फियाट किंवा अँबॅसेडर बाळगणारा माणूस सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेलाच असणार याची खात्री असायची. जिथे पायी चालणार्‍यासाठी सायकलच स्वप्नवत होती तिथे सायकलवाला थेट चारचाकीचं स्वप्न कुठून पाहणार? तसा लुनाचा पर्याय होता, पण ते किडकिडे वाहन म्हणजे सायकलची स्वयंचलित आवृत्ती. अशावेळी स्कूटरचा पर्याय बजाज यांच्या कंपनीने लोकांपर्यंत पोहोचवला. आधी स्कूटरनिर्मिती परदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून होती. पियाजियो कंपनीने कराराचं नूतनीकरण करायला नकार दिला तेव्हा राहुल बजाज यांनी स्वदेशी बनावटीच्या स्कूटरची निर्मिती केली. चेतक ही त्यांची स्कूटर अतिप्रचंड यशस्वी ठरली. ही स्कूटर आणि तीनचाकी रिक्षा या सर्वसामान्यांच्या वाहनांसाठी किती तरी महिन्यांचे, क्वचित वर्षांचे वेटिंग असायचे. लोक पैसे भरून वाट पाहात आणि नंबर लागून वाहन ताब्यात मिळाले की आयुष्यात काहीतरी मोठे मिळवले, अशा आनंदाने ते घरी आणत. बजाजची स्कूटर ही भारतवर्षाचं वाहन होती. भारतीय माणूस प्रवास करतो तेव्हा निव्वळ इकडून तिकडे जात नाही. कुठेतरी काहीतरी न्यायचं असतं, काही खरेदी करायचं असतं, कधीकधी नवरा, बायको यांच्याबरोबर एक मूल असतं. अशावेळी चालकाचं आसन आणि हँडल यांच्या मधल्या जागेचा वापर व्हायचा. भारतीय कनिष्ठ मध्यमवर्गाच्या आकांक्षांना चाकं पुरवली बजाज यांच्या स्कूटरने आणि नंतर एम फिफ्टी, एम एटी या वाहनांनी.
१९९१नंतर देशात उदारीकरणाचे युग आले, तेव्हा त्याला विरोध करणार्‍या स्थानिक उद्योगपतींमध्ये राहुल बजाज अग्रेसर होते. या उद्योगपतींच्या ‘बाँबे क्लब’वर तेव्हा भरपूर राळ उडवली गेली. यांना मक्तेदारी हवी आहे, जागतिक स्तरावरच्या उत्पादनांबरोबर स्पर्धाच नको आहे, असा सोपा अर्थ तेव्हा काढला गेला होता. पण, राहुल बजाज आपल्या मतांपासून ढळलेही नाहीत आणि स्पर्धा करण्याची वेळ आली तेव्हा तीही त्यांनी दर्जेदार उत्पादनं निर्माण करून केली, आपली नाममुद्रा लखलखीत ठेवली. मोटरसायकलींचे युग येईल आणि हीरो होंडा देशातील पहिल्या क्रमांकाची वाहन उत्पादक कंपनी बनेल, याचा अंदाज त्यांना आला नव्हता. मात्र, वार्‍याची दिशा बदलताच त्यांनी कावासाकीबरोबर करार करून बजाजच्या मोटरसायकल बाजारात आणल्या आणि बजाज म्हणजे उत्तम दर्जा, किफायत, टिकाऊपणा अशी पक्की सांगड मनात बसलेल्या भारतीय ग्राहकांनी त्यांनाही जोरदार प्रतिसाद दिला.
महात्मा गांधीजींचे मानसपुत्र असलेले जमनालाल बजाज यांचे राहुल हे नातू. त्यांनी उद्योगातून मूल्यसंस्कारही केला. त्यांचा मुलगा राजीव बजाज यांना टेल्कोमध्ये ट्रेनी इंजीनियर म्हणून प्रशिक्षणासाठी पाठवलं, तेव्हा त्यांना राहुल बजाज यांचा मुलगा म्हणून कोणत्याही सवलती मिळाल्या नाहीत, झाडू मारण्यापासून ते मशीन स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं इतरांसारखीच करावी लागली.
राहुल बजाज स्पष्टवक्ते होते. आम्ही सर्वच पक्षांना पैसे देतो, पण चेकने देतो, असं ते ठणकावून सांगायचे आणि सर्वच पक्षांच्या न आवडलेल्या ध्येयधोरणांवर टीका करायचे. तुम्हाला न आवडणार्‍या पंडित नेहरूंनी माझं नाव राहुल ठेवलेलं आहे, असं देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर सांगण्याची हिंमत त्यांच्यात होती. २०१४नंतर देशात आलेली राजवट भारताच्या मूळ गाभ्यालाच धक्का लावायला निघाली आहे, असे त्यांचे मत होते. त्यावरून सत्तामदांधांनी त्यांना टुकडे टुकडे गँगमध्ये आपल्या अकलेचे दिवाळे दाखवून दिले. पण, हमारा कल, हमारा आज यांना जोडणारी बुलंद भारत की बुलंद तस्वीर म्हणजे हमारा बजाज आहे, ही जनमानसातली भावना उखडून टाकणे इतके सोपे नाही, हे त्यांच्या लक्षात आले नाही. टाटा, बजाज यांच्या नाममुद्रा काही एका रात्रीत तयार झालेल्या नाहीत. या उद्योगपतींनी विश्वस्त भावनेने उद्योगविस्तार करताना एक कामगार संस्कृती रुजवली, लाखो रोजगार निर्माण केले आणि भारतीय उत्पादनांचा डंका जगभरात वाजवला. राहुल बजाज यांच्या निधनाने निव्वळ वाहन उद्योगाचेच नव्हे तर भारताच्या जडणघडणीचे एक शिल्पकार हरपले आहेत; पण हमारा बजाज हे समस्त भारतीयांबरोबरचे त्यांचे अतूट नाते मात्र तुटणार नाही.

Previous Post

नया है वह

Next Post

हिंदू मिशनरी सोसायटी

Next Post

हिंदू मिशनरी सोसायटी

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.